गडहिंग्लज नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष, देवदासी चळवळीचे शिल्पकार आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विठ्ठल सिद्धाप्पा बन्ने यांचे रविवार, दि. 18 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 87 व्या वर्षी निधन झाले.
देवदासीसारखी अनिष्ट प्रथा निर्मूलनासाठी उभारलेल्या चळवळीत ते नेहमी अग्रेसर राहिले. 1975 मध्ये ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, प्रा. सुभाष जोशी, सुरेश शिपूरकर, बापू म्हेत्री यांच्या उपस्थितीत देशातील पहिली देवदासी परिषद गडहिंग्लजमध्ये घेण्यात त्यांचा पुढाकार राहिला. प्रथा निर्मूलन आणि पुनर्वसनासाठी शासनाने नियुक्त केलेल्या राज्यस्तरीय अभ्यास गटाचे सदस्य होते. आंदोलने, मोर्चे, उपोषणांद्वारे उभारलेल्या चळवळीतून शासनाने देवदासी प्रथा निर्मूलन कायदा केला; परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने ते नाराज झाले होते. महाराष्ट्र आणि कर्नाटकातही त्यांनी देवदासी प्रथा निर्मूलनासाठी संघर्ष केला. यामुळे दोन्ही राज्यांत जिथे-जिथे देवदासी चळवळ सुरू झाली त्या ठिकाणी प्रा. बन्ने यांचे नाव आदराने घेतले जायचे. देवदासीला स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाबरोबर संघर्ष करून त्यांनी गडहिंग्लजच्या शेंद्री माळावर देशातील एकमेव देवदासी पुनर्वसन केंद्र सुरू केले.
प्रा. बन्ने यांचे ‘सामर्थ्य आहे चळवळीचे’ हे पुस्तक गाजले. ‘देवदासी चळवळ’ नावाचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. त्यांच्या सामाजिक कार्याच्या योगदानाबद्दल राज्य शासनाचा ‘लताताई सकट’ पुरस्कार, सोलापुरातील सुशीलकुमार शिंदे फौंडेशन आणि दलित संघटनेतर्फेही पुरस्कार देऊन त्यांना गौरविले आहे; तसेच गडहिंग्लज नगरपरिषदेचा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे. काही वर्षांपूर्वी आजारी असतानाही त्यांनी ‘अंनिवा’च्या वार्षिक अंकासाठी उत्साहाने मुलाखत दिली.
अशा या बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या प्रा. विठ्ठल बन्ने सरांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली!