Categories
कव्हर स्टोरी

विसर्जित गणपती दान मोहीम दोनाचे दोन लाख कसे झाले त्याची गोष्ट!

ऑक्टोबर – २०१६

कोल्हापुरात यावर्षी शासनातर्फे दोन लाख गणेशमूर्ती जमा करून पाणी प्रदूषण टाळण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. पण याची सुरुवात एकेकाळी केवळ दोन मूर्तींनी झाली, हे कितीजणांना ठाऊक आहे?

पंचवीस वर्षांपूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना कोल्हापुरात झाली. विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. एम. पाटील अध्यक्ष आणि सहाय्यक शिक्षक अनिल चव्हाण सचिव बनले. विद्यापीठ हायस्कूल हेच चळवळीचे, बैठका, सभा आणि उपक्रमांचे केंद्र राहिले. हायस्कूलमध्येच अंनिसच्या बैठका होत.

पाणी प्रदूषणात गौरीगणपतीचे निर्माल्य आणि गणेशमूर्तीचा वाटा मोठा आहे, अशी चर्चा एका बैठकीमध्ये झाली आणि पाने-फुले-गौरीचे निर्माल्य पाण्याबाहेर ठेवा, असा प्रचार करण्याचे ठरले. निर्माल्य पाण्यात कुजल्याने दूर्गंधी पसरते, कीटक तयार होतात, पाणी प्रदुषित बनते, हे सांगण्यासाठी विद्यार्थ्यांची प्रचार फेरी आयोजित करण्यात आली. त्या फेरीत विद्यापीठ हायस्कूलबरोबर म. ल. ग. हायस्कूल, इंदूमती देवी गर्ल्स हायस्कूल, राजाराम हायस्कूल, इंदिरा गांधी विद्यानिकेतन अशा भवानी मंडपाजवळील शाळांना विनंती करण्यात आली. हेच विद्यार्थी व शिक्षक विसर्जनाच्या दिवशी पंचगंगेच्या काठावरही अंनिसबरोबर निर्माल्य जमा करण्याच्या कामात सहभागी झाले.

गणेशमूर्तीवरील रंग अखाद्य असतात. त्यानेही पाणी प्रदूषित बनते. पण जनतेची निर्माल्यासंबंधीची मानसिकता तयार झाल्याशिवाय मूर्तीबद्दल बोलायचे नाही, असे ठरले. राजे संभाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना हे सांगितल्यावर त्यांनी मात्र काहील ठेवून गणेशमूर्तीही पाण्याबाहेर ठेवण्याचा प्रचार केला.

पहिल्या वर्षी त्यांना थोडे निर्माल्य आणि केवळ दोन मूर्ती मिळाल्या. एक चव्हाण कुटुंबियांची आणि दुसरी कदम! राजे संभाजी तरुण मंडळाने अत्यंत निष्ठेने, चिकाटीने आणि कष्टाने दरवर्षी काहील ठेवून गणेशमूर्ती गोळा केल्या. हळूहळू मूर्तींची संख्या वाढू लागली.

काहील उचलून आणणे, पाण्याने भरणे, रिकामी करून परत पोचवणे, हे कष्टाचे काम करण्यासाठी वीस-पंचवीस कार्यकर्तेकिमान आवश्यक असतात. असा प्रयत्न दुसर्‍या कोणत्याही पर्यावरणवादी कार्यकर्त्याने केला नाही.

निर्माल्य पाण्याबाहेर ठेवण्याची चळवळ मूळ धरायला चार वर्षे लागली. कळंब्याच्या काठावरही ही चळवळ राबविण्याचे ठरले. त्याचे तत्कालीन कारण म्हणजे विद्यापीठ हायस्कूलमधील लॅब असिस्टंट महादेव खानविलकर कळंबा गावचे सरपंच बनले. विद्यापीठ हायस्कूलचे चारशे विद्यार्थी, कळंबा हायस्कूल व शिवशक्ती हायस्कूलचे नववीचे शंभरभर विद्यार्थी, गावचे पंच, सरपंच यांच्या मदतीने प्रचार फेरी काढण्यात आली. शाळांचे शिक्षक, राजे संभाजी तरुण मंडळाचे कार्यकर्तेविकास जाधव, अंनिसचे सचिव अनिल चव्हाण, कॉ. मारुतराव निकम यांनी त्याचे नियोजन केले.

प्रत्यक्ष विसर्जनादिवशी कळंबा गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सावंत मॅडम विद्यार्थिनींसह निर्माल्य गोळा करण्याच्या कामात सहभागी झाल्या. विद्यार्थिनींनी उत्साहाच्या भरात निर्माल्याबरोबर गणेशमूर्तीही पाण्याबाहेर ठेवण्याचे आवाहन केले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळू लागला. पंचायतीने माईकची सोय केली होती. मीना चव्हाण माईकवरून ‘विसर्जित गणपती दान करा- पाणी प्रदूषण टाळा,’ असे आवाहन करू लागल्या.

गणेश विसर्जनासाठी धर्मरक्षक पक्षाचे एक स्थानिक नेतेही आले होते. त्यांच्या लक्षात आले की, ही चळवळ समजतो, तशी केवळ पर्यावरण रक्षणाची नाही. ही राजकीय चळवळ आहे. आज गणपतीच्या प्रदूषणाबद्दल ऐकून घेणारे नागरिक उद्या देव व धर्माच्या नावावर केलेल्या आवाहनाला ठोकारून लावतील. धर्माच्या नावावर पक्ष चालणे, मते मिळविणे अवघड होईल. त्यांनी ‘दान’ शब्दाचा आक्षेप घेतला. – “देव दान दिला जात नाही, आमच्या भावना दुखावू नका.” म्हटल्यावर-

“हा देव नाही, ही विसर्जित मूर्ती म्हणजे पार्थिव आहे.”

“मुलीला लग्नानंतर बाळकृष्ण दिला जातो,’ असे प्रत्युत्तर त्यांना मिळू लागले.

पण समंजस सरपंचांनी ‘दान’ शब्द गाळून आवाहन करण्याचा मधला मार्ग सुचवला. पण पुढे मात्र हीच घोषणा राज्यभर प्रसिद्धी पावली.

उत्साहाच्या भरात मूर्तिदान उपक्रमाला प्रचंड यश मिळाले. अंधार पडू लागला, तसे भाविक कमी झाले. विद्यार्थी आणि शिक्षकांनी समाधानाने निरोप घेतला आणि कार्यकर्त्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला – ‘या मूर्तींचे करायचे काय?’

महापालिकेच्या अधिकार्‍यांना फोन करण्यात आला. या विभागाचे प्रमुख पचरेवाल नावाचे अधिकारी होते. त्यांनी कानावर हात ठेवले. “आम्ही तुम्हाला मूर्ती पाण्याबाहेर ठेवायला सांगितले नव्हते. आता तुमचे तुम्ही बघा. आम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही.”

कार्यकर्त्यांना घाम फुटला. पण त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. आयुक्त, डी.एस.पी., कलेक्टर अशा विविध अधिकार्‍यांना फोन झाले.

शेवटी दुसर्‍या दिवशी मूर्ती नेण्याचे ठरले. कर्मचार्‍यांचा पहारा बसला. दुसर्‍या दिवशी लष्कराची वाहने आणि एन.सी.सी.ची मुले मदतीला आली. कार्यकर्तेचिखलातून तलावाभोवती फिरून मूर्ती गोळा करू लागले. दुपारच्या सुमारास सर्व मूर्तींची योग्य ती निर्गती लावण्यात आली.

कळंबा तलावाच्या काठावर मिळालेल्या यशानंतर अंनिसने ही मोहीम पंचगंगा नदीच्या काठी राबविण्याचे ठरविले. कोल्हापुरातल्या पंधरा-वीस विद्यार्थ्यांनी प्रचार फेरीत सहभाग घेतला. पंचगंगेच्या काठावरही विद्यार्थी-शिक्षक मदतीसाठी आले. पहिल्याच वर्षी तीन हजार गणेशमूर्ती दान मिळाल्या. हे यश मोठे होते.

पण दुसर्‍या वर्षी याला गालबोट लागले. धर्मांध संघटना एक झाल्या. त्यांनी धर्मरक्षणासाठी या मोहिमेला विरोध सुरू केला. शंभरच्यावर तरुण घोषणा देत भाविकांना मूर्ती वाहत्या पाण्यातच सोडण्याचे आवाहन करू लागले. भाविकांशी तंडू लागले. दान द्यायला काहिलीकडे येणार्‍या गणेशभक्तांना अडवू लागले. परिणामी तीन हजारांची संख्या एकदम खाली म्हणजे केवळ दीडशेवर आली. पुढे अनेक वर्षेही संख्या कायम राहिली.

विरोधकांनी खोट्या प्रचाराचे टोक गाठले. पूर ओसरल्यावर, पाणी आटल्यावर नदीतल्या मूर्ती उघड्या पडतात. त्या प्रवाहाने भग्न झालेल्या असतात; अवयव तुटून विद्रुप दिसत असतात. अशा मूर्तींचे फोटो काढून त्यांनी पोस्टर तयार केली आणि ते ‘दुर्जनांच्या नाशाला आणि ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी सज्ज झाले.” एका भोंदूबुवांनी पवित्रकांची कल्पना मांडली.

“मूर्तीवरील उरलीसुरली पवित्रके पाण्याबरोबर वाहत जातात; पाण्याची वाफ झाली की, वाफेबरोबर हवेत सर्वदूर पसरतात म्हणून मूर्ती वाहत्या पाण्यातच विसर्जित करा,” असा त्यांचा प्रचार होता. प्रत्यक्षात हिंदू धर्मामध्ये पावित्र्य-एकसंघ मानले जाते. त्याची सूक्ष्म पवित्रके; तीही वाहणारी, वाफ होणारी, म्हणजे भौतिक गुण असणारी कुठेही वर्णिलेली नाहीत; पण धर्माच्या नावावर काहीही खपविता येते, याची प्रचिती आली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने चिकाटी सोडली नाही. ‘निर्माल्य पाण्याबाहेर ठेवा,’ ‘विसर्जित गणपती दान करा’ आणि ‘पाणी प्रदूषण टाळा’ या चळवळीची सांगड पर्यावरण शिक्षण, मूल्यशिक्षण यांच्याशी घालण्यात आली. शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना भारतीय घटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोनाची आठवण करून देण्यात आली. त्यांच्या सहाय्याने शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना भारतीय घटनेतील वैज्ञानिक दृष्टिकोनाची आठवण करून देण्यात आली. त्यांच्या सहाय्याने शासकीय पत्रके, शाळा-शाळांमधून पोचविण्यात आली. कोल्हापुरातल्या मुख्याध्यापक संघाने पत्रक छपाई आणि वितरणाची जबाबदारी एक कर्तव्य म्हणून पेलली. के. डी. खुर्द, बी. एम. पाटील, अनिल चव्हाण, शिवाजी शिंदे, बिजली कांबळे, गिरीष फोंडे, सुशील लाड, दिलीप पवार, सुनील जाधव, मिलिंद यादव, संजय सुळगावे, रमेश वडणगेकर अशा कार्यकर्त्यांनी कामात सातत्य ठेवले.

विरोधकांच्या अरेरावीमुळे, आक्रस्ताळेपणामुळे विद्यार्थी व शिक्षक प्रत्यक्ष नदीच्या काठावर आणणे बंद झाले. तरीही ही चळवळ राज्यभर पसरविण्यास अंनिसला यश आले. याचवेळी न्यायालयीन लढाईही चालू ठेवली. न्यायालयाने पाणी प्रदूषण टाळण्याचा आदेश दिला.

पंचगंगेच्या काठावर जसा पुरोगामी विरुद्ध प्रतिगामी संघर्ष चालू राहिला, तसा रंकाळा तलावाच्याकाठी झाला नाही. राजे संभाजी तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धर्मांध संघटनांना पहिल्याच वर्षी बजावले, “x x x ह्यो गणपती काय तुमच्या बा चा हाय काय? गणपती आमचा हाय x x x परत इकडं आलासा, तर तंगडी मोडून हातात दिन x x x.”

फुलीच्या ठिकाणी आई-वडिलांचा उद्धार करणारे ‘प्रेमळ’ शब्द घातले की, शिवाजी पेठेची भाषा तयार होते. या भाषेमुळे धर्मांधांनी रंकाळा तलावावरून काढता पाय घेतला.

या तलावाच्या काठावर प्रदूषणाचा सामना तरुणांना करावा लागत होता. ते जागृत झाले. त्यांनी एकत्र येऊन एकवीस फुटी गणेशमूर्ती तलावात सोडायला विरोध केला, प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवली. शरद तांबटसारख्या कार्यकर्त्यांनी त्यांचं प्रवक्तेपण केले. परिणामी प्रशासन झुकले. मोठ्या मूर्तींची सोय त्यांना इराणी खणीत लावावी लागली.

आज महाराष्ट्रभर पसरलेली ही चळवळ प्रथम अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विद्यापीठ हायस्कूल, राजे संभाजी तरुण मंडळ यांनी सुरू केली. ही चळवळ आपल्या मुळावर येण्याची शक्यता वाटल्याने धर्मांध संघटनांनी विरोध सुरू केला. डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्याबद्दल द्वेष निर्माण करण्याचे एक कारण ‘मूर्तीदान’ चळवळ हे आहे.

याच रागाच्या परिणामी मोदींनी कोल्हापूरच्या पर्यावरण चळवळीचा उल्लेख करताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव घेतले नाही. अर्थात, अंनिस त्याबद्दल मोदींची आभारी आहे, नाही तर पुरोगाम्यांनी अंनिसला नारळ दिला असता.

धर्मांधांच्या विषारी प्रचाराला, गुंडगिरीला अंनिसने तोंड दिले. दोनाचे दोन लाख होताना, असे अनेक अनुभव चळवळीच्या गाठीशी आहेत.

–अनिल चव्हाण

मोबा. 9764147483