Categories
जात पंचायत

जातपंचायतचा विरोध झुगारून तिने दिला बाळाला जन्म : आरोपी व जातपंचांना अटक

जुलै - २०१९

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात धोंगडेपाडा गाव आहे. या गावात आदिवासी भिल्ल समाजाची लोकसंख्या जास्त आहे. सुनीता (नाव बदलविले आहे) या पंधरा वर्षांच्या मुलीची गावातल्या एका लग्नात बाळा सहाणे या तरुणाशी ओळख झाली. तो बेज (नाशिक) येथील रहिवासी असून आपल्या एका नातेवाईकांकडे धोंगडेपाडा येथे आला होता. तो सुद्धा तिच्याच समाजाचा होता. तिला लग्नाचं आमिष दाखवून बाळा सहाणे याने तिच्यावर दोनदा बलात्कार केला.

बाळा सहाणे याच्या नातेवाईकांना ही घटना सांगितली. ते जात पंचायतचे सदस्य आहेत; मग जात पंचायत बसली. यावेळी बाळा सहाणेच्या नातेवाईकांनी हा सर्व प्रकार नाकारला. मधला मार्ग म्हणून सुनीताचे बाळा सहाणेबरोबर लग्न लावून देण्याची विनंती सुनीताच्या आई वडिलांनी केली; परंतु बाळा सहाणे याच्या नातेवाईकांनी त्यास विरोध केला. बाळा सहाणेही लग्नास साफ नकार दिला. जातपंचांनी सुनीताचा गर्भपात करण्यासाठी दबाव आणला; परंतु सुनीताच्या आईवडिलांनी त्यास नकार दिला. सुनीताचा गर्भपात करत नाही, असे लक्षात आल्यावर जातपंचायतीने तिच्या परिवाराला वाळीत टाकले. रस्त्याची अडवणूक केली गेली. गावात पाणी, किराणा आणि दळण बंद झालं, पिण्याच्या पाण्यासाठी पाच किलोमीटर दूर जावे लागले. गावातील लोकांचे बोलणे बंद झाले. त्यांनी पिंपळनेर पोलीस ठाणे गाठले व आपली कैफियत मांडली; परंतु पोलिसांनी उलट हा प्रश्न गावातच मिटवा, असा अजब सल्ला दिला.

शेवटी 14 मे रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे धुळे येथील कार्यकर्तेनवल ठाकरे यांची भेट झाली. नवल ठाकरे यांनी त्यांना आधार दिला. महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्याशी भेट घालून दिली. अविनाश पाटील यांनी कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना दिल्या. नवल ठाकरे व इतर कार्यकर्त्यांनी धुळे येथील पोलीस अधिकार्‍यांना भेटून मोठ्या प्रयत्नाने पॉस्को (बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण व प्रतिबंध अधिनियम 2012) अंतर्गत गुन्हा दाखल केला; मात्र पोलिसांनी जातपंचायत व पंच याविषयी एकही शब्द तक्रारीत उल्लेख केला नव्हता.

पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती मिळताच जातपंचायतीने पीडित कुटुंबाला अकरा हजार रुपयांचा दंड केला. पीडित कुटुंबाची परीस्थिती गरिबीची असल्याने त्यांनी दंड भरण्यास नकार दिला. अ‍ॅड. विनोद बोरसे यांच्या सहकार्याने पोलीस अधीक्षक यांना तक्रार अर्ज देण्यात आला व जातपंचायतच्या सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यान्वये पंचाविरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी करण्यात आली. त्यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात पण अर्ज सादर करण्यात आला. दरम्यान 30 मे रोजी सुनीताला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच दिवशी तिने एका मुलीस जन्म दिला.

महाराष्ट्र अंनिस, आ. डॉ. निलम गोर्‍हे, पत्रकार यांनी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरला. राज्यच नव्हे, तर संपूर्ण देशात ही बातमी गेली होती. महाराष्ट्र अंनिसचे धुळे येथील कार्यकर्ते अ‍ॅड. विनोद बोरसे, नवल ठाकरे, रणजित शिंदे, डॉ. दीपक बावीस्कर आदींनी पाठपुरावा चालू ठेवला. शेवटी पोलीस अधीक्षक यांनी पिंपळनेरचे पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड, पीडित कुटुंब, जातपंचायतचे पंच व महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्तेयांची बैठक घेतली. चर्चेनंतर पोलीस अधीक्षक यांनी गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. या प्रकरणात बलात्काराचा आरोप असलेल्या तरुणाला व जातपंचायतीच्या 5 सदस्यांना अटक करण्यात आली आहे. बाळा सहाणे, जयवंत श्रीपत सहाने (सोनवणे), ब्यानामी बाबरा सोनवणे, प्रदीप अशोक सोनवणे, पराशुराम माळी, ममता किशोर सोनवणे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत.