भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांबद्दल, कार्याबद्दल आणि जीवनाबद्दल विपुल लेखन झालेले आहे. धनंजय कीर यांनी लिहिलेले त्यांचे चारित्र अप्रतीम आहे. परंतु बाबासाहेबांच्या विचारांचा चिकित्सक आढावा घेणारे लेखन फार कमी लोकांनी केलेले आहे. एकतर हे कार्य अवघड आहे. दुसरे म्हणजे अशा प्रकारच्या लिखाणाला हेतु चिकटवले जाऊ शकतात, आणि हेतुही असू शकतात. उदा.अरूण शौरी सारखे जातीयवादी लोक “सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करीत असतातच.” एखाद्या व्यक्तीला समाजात जेव्हा त्याच्या कार्यकर्तृत्वामुळे अगदी देवासमान दर्जा प्राप्त होतो तेव्हा अशा व्यक्तीचे मूल्यमापन करणे अधिक अवघड बनते. त्यांच्या अंधभक्तांनी त्यांची जी प्रतिमा उभी केलेली असते तिला थोडा जरी ओरखडा गेला तरी मोठा अवघड प्रसंग लेखकावर येऊ शकतो. परंतु फक्त काही लोकांचा हा ‘प्रमाद’ मान्य केला जाऊ शकतो. कारण हे लोक उघड बाबासाहेबांच्या जीवनकार्याचे सर्वार्थाने समर्थक असतात. आणि त्यांनी जीवनभर केलेल्या कार्यातून त्यांनी ते सिद्ध केलेले असते. उदा.गं.बा.सरदार, नलिनी पंडीतांसारखे विचारवंत जेव्हा बाबासाहेबांच्या विचारांबद्दल चिकित्सक मांडणी करतात, त्यांच्या कार्य विचारांशी तर्कशुद्ध पद्धतीने, तितक्याच व्यासंगपूर्णतेने युक्तीवाद करून मतभेद दर्शवतात तेव्हा ते मान्य केले जातात. किंबहुना त्याबद्दल गंभीरपणे पाहिले जाते. नलिनी पंडीत यांनी बाबासाहेबांच्या विचाराबद्दल चिकित्सक पद्धतीने लिहिलेले पुस्तक या स्वरूपाचे आहे. हे पुस्तक खरोखरच सर्वांनी वाचणे गरजेचे आहे. डॉ.बाबासाहेबांच्या विचारांचा नेमका गाभा नलिनी पंडीतने वाचकांना बहाल केला आहे. या पुस्तकाचे नाव “आंबेडकर” असे आहे. आणि ग्रंथालीने 1996 साली ते प्रकाशित केले आहे. या पुस्तकात एकूण 11 प्रकरणे आहेत.
‘सामाजिक भूमिका’ या शिर्षकाच्या पहिल्या प्रकरणात नलिनी पंडीतांनी बाबासाहेबांच्या जडणघडणीचा आणि त्यांच्या एकंदर विचारांचा त्रोटक आढावा घेतला आहे. आणि पुढील प्रकरणात याच विचारांचा विचारपूर्वक परामर्ष घेऊन ठोस मांडणी केली आहे. पहिल्या प्रकरणातच नलिनी पंडीतांनी त्यांची हे पुस्तक लिहिण्यामागची भूमिका विशद केली आहे. त्या म्हणतात “डॉ.आंबेडकर हे केवळ ज्ञानैक्य दृष्टीने अभ्यास करून लेखन करणारे समाजशास्त्रज्ञ नव्हते. ते एका चळवळीचे नेते होते. प्रत्यक्ष राजकारणाच्या आखाड्यात ते उतरले होते. भारतातील निरनिराळ्या राजकीय पक्षांशी कधी सहकार्य तर कधी संघर्ष करीत होते. त्यांच्या विचारांचा अभ्यास करताना समाजजीवनात वेळोवेळी निर्माण झालेल्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेल्या भूमिका आणि चळवळीचे डावपेच यांचाही परामर्श घ्यावा लागेल. माणूस कितीही मोठा असला तरी त्याच्या कार्यावर तत्कालीन परिस्थितीच्या मर्यादा पडल्याखेरीज राहत नाहीत.” ही पार्श्वभूमी विशद करून नलिनी पंडीतांनी म्हटले आहे, “आंबेडकरांच्या कार्याचे मूल्यमापन करताना त्यांचे योगदान, यशापयश व मर्यादा या सर्वांचा तटस्थ व नि:पक्षपाती दृष्टीने विचार करावा लागेल.” आणि या पुस्तकात त्यांनी याच पद्धतीचा विचार करून मांडणी केली आहे.
“डॉ.आंबेडकर आणि भारतीय राजकारण” या दुसर्या प्रकरणात नलिनी पंडीतांनी बाबासाहेबांचा राजकारणात उदय होण्याच्या आधी महात्मा फुले, महर्षी शिंदे यांच्या जीवनकार्याचा तसेच इंग्रजांनी भारत जिंकण्यासाठी सुरवातीला सैन्यामध्ये दलित जनतेची भरती केली होती. हे सैनिक आणि माजी सैनिक, तसेच कारखानदारी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात दलित कामगारवर्ग उदयाला आला हा दलित कामगारच पुढे बाबासाहेबांच्या चळवळीचा कणा बनला. याबद्दल विवेचन केले आहे. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना तिचा उद्देश तसेच महाड सत्याग्रह परिषद, याचे विवेचन या प्रकरणात केले गेले आहे.
तिसरे प्रकरण सर्वात महत्वाचे आहे. “भारतीय राज्यघटना आणि दलितांचे राजकीय हक्क” असे या प्रकरणाचे नाव आहे. या प्रकरणात दलितांच्या राजकीय हक्कांच्या-प्रस्थापनेसाठी बाबासाहेबांनी केलेल्या प्रचंड कार्याची ओळख करून दिली आहे. केवळ दलित हक्कच नव्हेत तर भारतीय घटनेसमोर येणार्या देशातील प्रत्येक प्रश्नांबद्दलची बाबासाहेबांची भूमिका या प्रकरणात विशद केली आहे. उदा.एकंदर जनतेच्या मूलभूत हक्कांबद्दल बाबासाहेबांना करावी लागलेली कसरत. कारण हे मूलभूत हक्क-भांडवलदार-जमीनदार वर्गाच्या प्रतिनिधींना जाचक वाटत होते. त्यांचे अनेक आक्षेप खोडून काढावे लागले. तसेच अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाबद्दलही बरीच मेहनत घ्यावी लागली. हे प्रकरण म्हणजे बाबासाहेबांनी राज्यघटना तयार करण्यासाठी जी अफाट मेहनत घेतली. त्याचा लेखाजोखा आहे. हे प्रकरण वाचताना बाबासाहेबांबद्दलचा आपला आदर आणि प्रेमभाव शतपटीने वाढतो.
चौथे प्रकरण “पाकीस्तान अथवा भारताची फाळणी” या संदर्भातील आहे. पाकीस्तानबद्दल भूमिका घेताना बाबासाहेबांचे काय विचार होते यामागे काय तर्क होता याचा नेमका खुलासा नलिनी पंडीतांनी केलेला आहे. पाकीस्तानच्या प्रश्नावर बाबासाहेबांवर नेहमीच गैरसमजुतीतून टीका होत आहे. पण ती खरी नाही. एकतर त्यांना भारत एक राष्ट्र आहे ही हिंदुत्ववाद्यांची कल्पना मंजूर नव्हती. भारत हे होऊ घातलेले राष्ट्र आहे अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे पाकीस्तान हे वेगळे राष्ट्र स्थापणे म्हणजे एका राष्ट्राची फाळणी करणे आहे असे त्यांना वाटत नव्हते. दुसरी सतत होणार्या जातीय दंगलींच्या पार्श्वभूमीवर त्यांना हिंदू-मुस्लीम प्रश्नांसंदर्भात फाळणी एक तोडगा वाटत होता. या संदर्भात लोकांच्या अदलीबदली भूमिका बाबासाहेबांनी मांडली होती. पण ती विचारात घेतली गेली नाही. त्यामुळे करोडो लोक स्वातंत्र्यांच्या पूर्वसंध्येलाच जातीय दंगलीत मृत्यूमुखी पडले.
“भारताच्या प्राचीन इतिहासाची मीमांसा” हे पाचवे प्रकरण अतिशय महत्वाचे आहे. या प्रकरणात जातीव्यवस्थेचा उदय, विकास, तिच्या निर्मितीची प्रक्रिया, शूद्र पूर्वी कोण होते, ते शूद्र कसे झाले, जात आणि वर्ग या संदर्भातील बाबासाहेबांनी केलेली मांडणी, मांडलेले सिद्धांत, निष्कर्ष, यांचा सांगोपांग विचार नलिनी पंडितांनी केलेला आहे. ज्या ठिकाणी त्या बाबासाहेबांच्या विचारांशी सहमत आहेत तेथे सहमती दाखवून जिथे मतभेद आहेत त्यांची वेगळी मते आहेत ती मते त्यांनी नोंदवलेली आहेत. त्यामुळे हे प्रकरण भारतीय प्राचीन इतिहासाची, धर्मशास्त्रांची, वेद, उपनिषदे, महाभारत, रामायण या सर्वांची चर्चा करणारे आहे. भारतीय प्राचीन इतिहासाबद्दल अनेक इतिहासकारांनी, मानववंशशास्त्रज्ञांनी मांडलेले सिद्धांत या प्रकरणात वाचावयास मिळतात.
वरील प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला “हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म” या संदर्भात बाबासाहेबांनी केलेली व्यासंगपूर्ण मांडणी पाहावयास मिळते. धर्मासाठी माणूस नाही तर माणसासाठी धर्म ही क्रांतीकारक भूमिका घेऊन बाबासाहेबांनी हिंदू धर्म आणि बौद्ध धर्माची तुलना केली आहे. आणि बौद्ध धर्माचे वेगळेपण स्पष्ट केले आहे.
सातवे प्रकरण “जातीव्यवस्था-उगम-घडण-निर्मूलन” या संदर्भात असून बाबासाहेबांनी जातीव्यवस्थेची केलेली सांगोपांग चिकित्सा केली आहे. मनुस्मृतीबद्दलची भूमिका, जातीव्यवस्था आणि लोकशाही या सर्व संदर्भात चर्चा या प्रकरणात केली आहे. हे प्रकरण अतिशय महत्वाचे आहे. ‘आंतरजातीय विवाह’ हेच जातीव्यवस्थेस उत्तर आहे. अशी ठोस मांडणी बाबासाहेबांनी पुढे आणली आहे.
आठवे प्रकरण “हिंदू कोड बिला’ संदर्भात आहे. बाबासाहेबांच्या जीवनकार्यातील अनेक ठळक इतिहासात अजरामर झालेल्या कामगिर्यांपैकी एक कामगिरी असे आपण ‘हिंदू कोड बिला’ संदर्भात म्हणू शकतो. त्या काळी हे हिंदू कोड बील म्हणजे आपल्या धर्मावर अखेरचा घाव या दृष्टीने प्रतिगामी ब्राम्हण्यवर्णवर्चस्ववादी लोकांनी पाहणे साहजिकच होते. यामध्ये एकीकडे जातीवर्चस्व, दुसरीकडे आर्थिक वर्चस्व आणि पुरूषी वर्चस्व या तिन्ही गोष्टींना शह बसणार होता. त्यामुळे या बिलाने खूपच गदारोळ देशात निर्माण केला गेला. बाबासाहेबांना ठार मारून टाकावे असे उघडपणे बोलण्यापर्यंत प्रतिगाम्यांची मजल गेली होती. काँग्रेसमधील ‘सनातनी’ विचारांचे लोक या बिलाच्या विरोधात होते. म्हणजे चोहोबाजूने या बिलाला विरोध झाला. या बिलासाठी आपले सरकार पणाला लावले जाईल अशी सुरवातीला नेहरूंनी घोषणा केली होती. पण सर्व बाजूंनी होत असलेला विरोध पाहून त्यांनी कच खाल्ली. बाबासाहेब अखेरपर्यंत कोणाच्याही विरोधाला न जुमानता, न घाबरता आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. नेहरूंनी घेतलेली माघार त्यांना आवडली नाही. आणि त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन या बिलाबद्दलची त्यांची बांधिलकी सिद्ध केली. भारतीय जातीग्रस्त जीवनामधील आजवर चालत आलेल्या अमानुष अशा स्त्रीविरोधी प्रथांचा नायनाट करून स्त्रियांना काही एक माणूसपणाचे, नागरिकत्वाचे अधिकार मिळावेत म्हणून समाजसुधारणेचा जो लढा झाला तो समजून घेण्यासाठी या ‘हिंदू कोड बिला’ संदर्भात या बिलाच्या बाजूने आणि विरोधात ज्या त्या काळी चर्चा झाल्या या वाचणे परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना खूप ज्ञानदायी आणि मार्गदर्शक ठरणारे आहे. नलिनी पंडीतांनी या प्रकरणात या सर्व बाजू खूप प्रभावीपणे मांडलेल्या आहेत.
“वसाहतीक राजवटीच्या अर्थकारणाची मीमांसा” या नवव्या प्रकरणात नलिनी पंडीतांनी बाबासाहेबांच्या आर्थिक विचारांच्या संदर्भात चर्चा केली आहे. ते एक अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते हे सर्वांनाच माहीत होते. पण ज्या पद्धतीचे शिक्षण त्यांनी घेतले ते विद्यापीठीय या चाकोरीतील होते. या संदर्भात नलिनी पंडितांनी म्हटले आहे, “भारतातील वित्तव्यवस्था आणि चलनव्यवस्था हे विषय त्यांनी आपल्या प्रबंधासाठी निवडले होते. या प्रबंधांच्या निमित्ताने नवअभिमत अर्थशास्त्रीय सिद्धांताचा त्यांनी जो सखोल व्यासंग केला याचे प्रतिबिंब पुस्तकरूपाने प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या या प्रबंधात जागोजागी पडले आहे. मात्र हे लिखाण ज्ञानैकनिष्ठ(अॅकेडमिक) पद्धतीचे आहे. दलितांच्या हक्कांसाठी त्यांनी जन्मभर जी चळवळ चालवली तिच्याशी या लिखाणाचा काही संबंध नाही…. शासनाची जी धोरणे येथील सामान्य लोकांच्या हितास बाधक आहेत असे त्यांना वाटले त्यांच्यावर त्यांनी निर्भीडपणे परखड टीका केली आहे.” पुढे त्यांनी म्हटले आहे, “शेतकरी कामगारांच्या प्रश्नाशी संबंध आल्यावर उदारमतवादी अर्थशास्त्राच्या मर्यादा त्यांना जाणवल्या व हळूहळू त्यांचा कल समाजवादाकडे झुकू लागला. 1947 साली शे.का.फेडरेशनच्या वतीने घटनासमितीला जे निवेदन त्यांनी सादर केले त्यामध्ये भारताच्या राज्यघटनेत शासकीय समाजवादाच्या तरतुदींचा समावेश करण्यात यावा अशी त्यांनी मागणी केली आहे. मार्क्सवादाचे त्यांना आकर्षण होते. मात्र त्यातील हिंसेला त्याचा विरोध होता. म्हणून मार्क्सवादातील हिंसेचा त्याग करून त्यातील समाजवादी आशयाशी सुसंगत अशा दृष्टीने बौद्ध धर्माचा अर्थ लावण्याची त्यांची धडपड चालली होती.” या प्रकरणात बाबासाहेबांनी त्यांच्या अर्थविषयक अभ्यासाच्या अनुषंगाने लिहिलेल्या प्रबंधाचा उहापोह नलिनी पंडितांनी केला आहे. या प्रबंधातून त्यांनी वसाहतीक कालखंडात ब्रिटीश साम्राज्यशाहीने भारताची कशी लूट केली याबद्दल परखडपणे लिहिले आहे. तसेच अनेक आर्थिक सिद्धांताबद्दल त्यांनी व्यक्त केलेली मते या प्रकरणात मांडली आहेत.
“उदारमतवादाकडून समाजवादाकडे” या दहाव्या प्रकरणात नलिनी पंडीत यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विचारांचा आलेख मांडला आहे. बर्याच लोकांची अशी समजूत आहे की, इतर लोकशाही वाद्यांप्रमाणे बाबासाहेब हेही उदारमतवादी होते. पण ते चूक आहे. सुरवातीच्या काळात त्यांच्यावर जरूर उदारमतवादाचा प्रभाव होता पण नंतर ते उदारमतवादाकडून समाजवादाकडे वैचारिकदृष्ट्या स्पष्टपणे वळलेले दिसतात. “स्वतंत्र मजूर पक्षाच्या” ध्येयधोरणात या विचारांचे प्रतिबिंब स्पष्टपणे पहावयास मिळते.
बाबासाहेब हे लोकशाहीवादी होते असे नेहमी सांगितले जाते पण बाबासाहेबांना प्रचलित लोकशाहीच्या मर्यादा माहीत होत्या. त्यांना भांडवली लोकशाही बिलकूल मान्य नव्हती. त्यांनी म्हटले आहे. “लोकशाहीत कराराचे स्वातंत्र्य हे पवित्र तत्व मानले जाते. आणि व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावावर त्याचे समर्थनही केले जाते. पण करार करणार्या दोन बाजूंच्या लोकांचे सामर्थ्य समान नसेल तर कराराच्या स्वातंत्र्याचा त्यांच्यावर(दुर्बलांवर) काय परिणाम होतो हे शोधून काढण्याची तसदी तिच्या पुरस्कर्त्यांनी कधी घेतली नाही. सबलांनी दुर्बलांना फसविले तर त्याची ती दाद घेत नाही. त्यामुळे या व्यवस्थेत पददलित व दरिद्री लोकांवरील अन्याय वाढतच जातात.” अशा शब्दात बाबासाहेबांनी भांडवली लोकशाहीच्या मर्यादा उघड करून ती अखेर समाजातील धनदांडग्या लोकांच्याच फायद्याची ठरते असा निष्कर्ष काढला आहे.
आंबेडकर आणि मार्क्स यांच्या संदर्भात वेळोवेळी चर्चा होत असते. या प्रकरणात नलिनीताईंनी त्याचा उहापोह केला आहे. एक हिंसा सोडली तर मार्क्स आणि बुद्ध यांचे विचार एकच होते हे बाबासाहेबांचे मत वर आलेच आहे. परंतु बाबासाहेबांनी मार्क्सवादावर जी टीका केली आहे ती टीका मार्क्स यांच्या मूळ लिखाणापेक्षा भारतीय आणि रशियन कम्युनिस्टांनी ज्या भूमिका घेतल्या मार्क्सवादाचा जो प्राप्त परिस्थितीत अर्थ लावला त्यावर आधारीत आहेत. असा निष्कर्ष नलिनीताईंनी काढला आहे. कारण बाबासाहेबांच्या एकंदर लिखाणात मार्क्सच्या मूळ लिखाणातील एकही अवतरण सापडत नाही की, बाबासाहेबांनी जी टीका केली आहे त्याचे संदर्भ त्यांनी दिलेले नाहीत. हा विषय नेहमीच वादाचा राहिला आहे. परंतु एका बाबतीत मात्र भारतीय कम्युनिस्टांनी जातीचा प्रश्न महत्वाचा मानला नाही हे मात्र खरंच आहे असा जो निष्कर्ष नलिनीताईंनी काढला आहे तो बरोबर आहे. त्यामुळे हे पुस्तक मुळातून वाचण्याची गरज आहे. पुस्तकाच्या अखेरीस पुन्हा एकदा नलिनीताईंनी बाबासाहेबांच्या एकंदर विचारांचा आलेख मांडून अखेरीस म्हटले आहे, “आज आंबेडकरांच्या व्यक्तीमत्वाशी संबंधित असलेल्या नामांतर, हिंदूधर्मातील कोडी, पुतळ्याची विटंबना यासारख्या प्रश्नांवर सर्व गटाचे पुढारी एकत्र येऊन निदर्शन करतात पण हे ऐक्य फार काळ टिकत नाही. डाव्या पक्षांमध्येही असेच अनेक छोटे छोटे गट आहेत आणि त्यांचीही अशीच परिस्थिती आहे. म्हणून केवळ रिपब्लिकन गटांना दोष देणे योग्य नाही. परंतु आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या समाजवादाच्या दिशेने वाटचाल करण्यास डावे आणि आंबेडकरवादी हे दोन्ही पक्ष अयशस्वी ठरले आहेत. हीच येथील समाजपरिवर्तनाच्या चळवळीची शोकांतिका आहे.
–सुभाष थोरात