राजगुरूनगर येथील नेहरू चौकात भोंदूगिरी करणार्या महेशकुमार जोशी या भोंदूबाबाचा ‘अंनिस’ने पर्दाफाश केला.
राजगुरूनगर येथील नेहरू चौक या ठिकाणी राजस्थान येथील महेशकुमार जोशी याने आपले दुकान मांडून पत्रकाद्वारे प्रसिद्धी केली हेती. लग्न जुळवणे, कलह दूर करणे, प्रेमप्रकरणी मार्गदर्शन करणे, दारू सोडवणे, भविष्य सांगणे यासाठी पाच हजार हा या बाबाचा दर होता. मात्र, त्यात ग्राहक पाहून कमी-जास्तपणा होत असे. याची खबर मिळताच खेड तालुक्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून पोलिस सहकार्यातून जोशीबाबांचे पितळ उघडे पाडले. छाया परदेशी यांनी प्रज्ञा रजपूत या नावाने बाबांकडे पतीची दारू सोडवण्याचा उपाय मागितला. त्यासाठी बाबांनी चार हजार रूपयांची मागणी केली. शेवटी तडजोड करून प्रकरण दोन हजारांवर आले.
दोन हजारांचा स्वीकार केल्यानंतर लगेचच पोलीस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी धाड टाकली. पोटापाण्यासाठी हा व्यवसाय करीत असल्याची जोशीबाबांनी कबुली देऊन पुन्हा असा धंदा करणार नसल्याचे कबूल केले. बाबांची ही विनंती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ज्याला स्वत:चे भविष्य माहीत नाही, ते दुसर्याचे भविष्य काय सांगणार असा प्रश्न नेहरू चौकात उपस्थित होत होता. बाबांच्या भूलथापामुळे अनेकजण त्यांच्या नादी लागले होते. बिडीचे तुकडे, वेगवेगळ्या प्रकारची इंजक्शने, सात मोबाईल, बिलबुक आणि चिल्लरसहीत 8 हजारांची रोकड पोलिसांनी घेतलेल्या झडतीत मिळाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्याचे कार्यवाहमिलिंद देशमुख, अतुल सवाखंडे, प्रमोद बचुटे, रमाताई हुलावले, छायाताई परदेशी, शुभांगी आगरकर, धनंजय शेवकरी, मनोहर शेवकरी, विलास बारवकर, महेश घाडगे, रत्नीशी शेवकरी, विकास गोरे, विलास पेंडसे, विविध कामत यांनी कारवाईत सहभाग घेतला होता. राजगुरूनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने याबाबत महेशकुमार जोशी याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.बी.शेख, सहाय्यक फौजदार सी.व्ही.शेलार, पोलीस कॉन्स्टेबल वडेकर, व्ही.आर.नागरगोजे यांनी यात भाग घेतला होता.
–मिलिंद देशमुख