अंधश्रद्धा निर्मूलन समिती शिराळा, समाजवादी प्रबोधिनी शिराळा, विवेकवाहिनी विश्वासराव नाईक महाविद्यालय, शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने 31 डिसेंबर रोजी ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या उद्देशाने दारूड्याची प्रतिकात्मक तिरडी काढून होळी केली. मद्यपानाला प्रतिष्ठा मिळत आहे. तरूण पिढी मद्यपानाच्या आहारी जाऊन बरबाद होत आहे. मद्यपान, गुटखा, विडी-सिगरेट या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे राष्ट्राची मोठी हानी होत आहे. उपरोक्त तीन संस्थांच्या विद्यमाने दारूड्याची प्रतिकात्मक तिरडी केली. प्रतिकात्मक दारूड्याची तिरडी गुटख्याच्या पुड्याने सजवली. तिरडीला दारूच्या मोकळ्या बाटल्या लटकाविल्या. शिराळा गावातील तळीचा कोपरा येथून तिरडीला प्रारंभ झाला. डांगे गल्ली, होळी टेक, गुरूवार पेठ, पोटे चौक, लक्ष्मी चौक, सोमवार पेठ, मरिमी चौक या प्रमुख भागातून तिरडीची मिरवणूक काढली. तिरडीला अडकवलेल्या दारूच्या बाटल्यांना कार्यकर्ते ‘जोडामार आंदोलन’ करीत होते. तिरडी मिरवणुकीच्या वेळी ‘दारू पितो तो बायकापोरांचे रक्त पितो’, ‘हॅप्पी न्यू ईयर, नका पिऊ दारू बियर’, मनात ठेवा एकच ध्यास, नको दारू नको वास’, ‘ओढू नका विडी, ओढू नका सिगरेट’, ‘गुटखा आला, दारू आली, घरातली लक्ष्मी गेली’, ‘सोड दारू कर विचार होईल सुखाचा संसार’ अशा घोषवाक्यांनी शिराळा गाव दुमदुमून गेले. शिराळ्याचे आंदोलन व्यसनाची प्रेतयात्रा ठरली. गावात जनजागरणाने व्यसनमुक्तीची ग्रामस्थांना प्रेरणा मिळाली. शिराळा गावातील दारूविक्री करणार्या दुकानांपुढे वरील उद्बोधक घोषणा देण्यात आल्या. या दारूड्याच्या प्रेतयात्रेला पत्रकार अमर पाटील, प्रियांका पाटील, गणेश साळवी, राहुल गायकवाड, राहुल तांबिरे, अमोल खांडेकर, रोहीत झिमूर, प्रशांत पठार, सचिन गायकवाड, सचिन बनसोडे, संदीप कांबळे, अश्विनी गायकवाड, माधवी पाटील, सुप्रिया पाटील, वैभव पाटील, सतीश पाटील, अजिंक्य आडके, प्रा.काशिलिंग गावडे, प्रा.विजयकुमार जोखे यांनी सहभाग घेतला. ग्रामस्थही मोठ्या संख्येने हजर होते. शेवटी तळीचा कोपरा येथे प्रतिकात्मक दारूड्याच्या प्रेताचे दहन केले. दहनाच्या वेळी फुलांचा वर्षाव न करता गावातून जमा केलेल्या गुटखा पुड्यांची प्रतिमेबरोबर होळी केली. प्रतिकात्मक दारूड्याच्या प्रतिमेला सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ जोडामार आंदोलनात सहभागी झाले. व्यसनाच्या आहारी जाण्यासाठी वेगवेगळी प्रलोभने दाखवण्याचा हा कार्यक्रम आगळा वेगळा, मद्यपानाच्या विरोधी जनजागरण करणारा ठरला. या आंदोलनाने संपूर्ण गाव ढवळून निघाले. ग्रामस्थांच्या प्रबोधनाचा हा तिरडी मोर्चा कौतुकाचा विषय ठरला.
-प्रा.विजयकुमार जोखे, शिराळा, जि.सांगली.