मांढरदेवी, ता.वाई, जि.सातारा यात्रेत काही वर्षांपूर्वी दुर्घटना घडली. त्यानंतर यात्रेचे स्वरूप अंधश्रद्धा विरहित निखळ धार्मिक रहावे असा प्रयत्न प्रशासनाने चालू केला. देवीच्या नावाने होणारी पशुहत्या थांबवण्यात मोठ्या प्रमाणात यशही आले. मात्र महिलांच्या अंगात येण्याचे, झाडांना करणीच्या काळ्या बाहुल्या ठोकून आपल्या शत्रूचा सर्वनाश व्हावा याची मागणी देवीकडे करण्याचे, दिव्य शक्तीच्या अद्भुत अंगठ्या यात्रेत विकण्याचे प्रकार चालूच आहेत. दिनांक 9 जानेवारी 2012 या तारखेला समितीच्या कार्यकर्त्यांना एकाच झाडावर पोतेभर बाहुल्या मिळाल्या. इच्छापूर्तीसाठी त्याबरोबर ठोकलेल्या चिठ्ठ्या पाहता हे सर्व अगदी अलिकडचे आहे हे स्पष्ट होते. त्या सर्व बाबी काळी जादू मानण्यात येतात. त्या विरोधातील कायदा महाराष्ट्र विधीमंडळासमोर असताना तरी हे प्रकार प्रशासनाने अधिक गांभीर्यपूर्वक बंद करावयास हवेत. वर्षभर त्यासाठी दक्षता हवी असे समितीला वाटते. अंधश्रद्धेचे प्रतिक असलेल्या या बाहुल्या, चिठ्ठ्या या समिती आज जाणीवपूर्वक जाळत आहे.

यात्रेतील प्रबोधनाच्या या चौथ्या वर्षीही महाराष्ट्रातून आलेल्या भाविकांनी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. अधांतरी साधू, हवेत तरंगणारे शरीर, 900 खिळ्यांच्या पाटावर झोपून, शरीरावर आणखी एक तसा पाट घेऊन, त्यावर माणसाला उभे करणे, अखंड तीर्थ देणारा कलश असे अनेक चमत्कार कार्यकर्त्यांनी सादर केले. मंडपात सर्पविज्ञान या विषयावरील मोठे प्रदर्शन लावले होते ते ही अनेकांनी आवर्जून पाहिले. एल.सी.डी.प्रोजेक्टरद्वारा रात्री अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चित्रफितीही दाखवण्यात आल्या. मांढरदेवी येथील ग्रामस्थ व माजी राष्ट्रीय कबड्डीपट्टू विनायक मांढरे यांच्या जागेत हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये सातारा, पुणे, सांगली, अहमदनगर या जिल्ह्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाच्या डॉ.मच्छिंद्र वाघ, मिलिंद देशमुख, विवेक सांबरे, प्रशांत पोतदार, भास्कर सदाकळे, भगवान रणदिवे, अनिल सुतार, अजय काळे, युवराज झळके, वसिम बागवान, प्रविण यादव, डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी भाग घेतला.

-प्रशांत पोतदार, सातारा.