Categories
नवी अंधश्रद्धा

मनी वसे ते सर्वत्र दिसे

वार्षिकांक - २०१८

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये एका चमत्काराच्या बातम्या पेपरमीडिया आणि व्हॉट्सअपद्वारे सगळीकडे पसरल्या. शिर्डीच्या साईबाबांचा चेहरा चंद्रावर दिसू लागला. साईबाबा चंद्रावर अवतरले, अशी बातमी वेगाने सगळीकडे पसरली. लोक घराबाहेर पडून चंद्रावरील साईबाबाचे दर्शन घेण्यास अधीर झाले. काहींनी दुर्बिणीतून तसेच बायनॉक्युलरवरून साईबाबाचे दर्शन घेण्यास सुरुवात केली. ज्यांना चंद्रावर साईबाबा दिसले नाहीत, ते पापी किंवा साईबाबाच्या मर्जीतून उतरलेले, अशी कुजबूज सुरू झाली. ज्यांना साईबाबा दिसले, ते पुण्यवान, अशीही चर्चा होऊ लागली.

चंद्रावर साईबाबा दिसणे हा दृष्टीभ्रमाचा प्रकार आहे. विविध संस्कृतीत चंद्राच्या पृष्ठभागावर विविध प्रकारच्या आकृत्या दिसल्याची वर्णने आहेत. कोणाला चंद्रावर ससा दिसतो, तर कोणाला हरिण. काही जणांना चंद्रावर राक्षसाची आकृती दिसते. हे सगळे दृष्टीभ्रमाचे प्रकार होत. चंद्राचा पृष्ठभाग गुळगुळीत व एकसारखा प्रकाशमान नाही. चंद्रावर उल्कापातामुळे विवरे तयार झाली आहेत. तसेच त्यावर डोंगरदर्‍याही आहेत. त्यामुळे सूर्याच्या चंद्रावर पडलेला प्रकाश कमी-अधिक तीव्रतेने परावर्तित होऊन आपल्याला दिसतो. त्यामुळे अशा आकृत्या चंद्रावर असल्याचा भ्रम होतो. ग्रीक पुराणात याबाबत एक छान कथा आहे. एका राक्षसाला ठार केल्यानंतर त्याचे रक्त सगळीकडे उडाले. त्यातील काही थेंब चंद्रावर जाऊन पडले. त्यामुळे त्या रक्ताचे डाग चंद्रावर दिसतात, अशी ही मिथक कथा आहे.

श्रावण महिन्यात आकाशातील रंगीबेरंगी ढग आपले आकार बदलताना तुम्ही पाहिले असेल. काहींना असा एखादा ढक हत्तीसारखा दिसतो, तर काहींना हरणासारखा, तर काहींना राक्षसासारखा. अशा आकृत्यांच्या बाबतीत आपल्या मनातील कल्पना डोळ्यासमोर साकार होतात. ‘मनी वसे ते सगळीकडे दिसे’ असा हा प्रकार आहे.

अंधारात दिसलेल्या माणसासारख्या आकृतीला आपण भूत समजतो. खरं तर ती आकृती पांढर्‍या रंगाने रंगवलेले तुळशी वृंदावनही असू शकते. अंधारातील मोठी काळी आकृती म्हणजे हत्तीने घेतलेले भूताचे रूप, अशी आपली समजूत होते. नसलेले भूत आपल्याला दिसायला लागते. भूत शरीररुपाने कोठेही नसते. ते असते आपल्या मनात. दृष्टीभ्रमाचा हा अजब प्रकार आहे.

प्रा..रा.आर्डे