दिनांक 3 जुलै रोजी ‘मअंनिस’तर्फे डोंबिवली येथील महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ठाणे जिल्हातील ‘अंनिवा वाचक मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला ‘अंनिवा’च्या संपादकीय मंडळाचे राजीव देशपांडे, राहुल थोरात, प. रा. आर्डे सर, मुक्ता दाभोलकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीप्रसाद खुळे यांनी केली. सर्व मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर प्रा. मच्छिंद्र मुंडे यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रम सुरू झाला. ‘मअंनिस’, ठाणे जिल्हा कार्याध्यक्षा सुरेखा भापकर यांनी संपादकीय मंडळातील सदस्यांची ओळख करून दिली. नंतर मंडळातील सदस्यांनी आपले विचार मांडले.
राजीव देशपांडे यांनी ‘अंनिवा’ची आतापर्यंतची वाटचाल व उत्तरोत्तर होत असलेली प्रगती, यावर थोडक्यात; पण अत्यंत मुद्देसूद विवेचन केले. राहुल थोरात यांनी ‘अंनिवा’ने टिकून राहण्यासाठी केलेला संघर्ष, आलेली संकटे, कोर्ट केसेस, या विविध आपत्तींवर केलेली मात, यावर माहिती दिली. कोणतीही विदेशी मदत न घेता, केवळ वाचकांकडून मिळालेली वर्गणी व दिवाळी अंकातील जाहिराती यांच्या सहाय्याने उत्पादनखर्चापेक्षा कमी किमतीत वाचकांना गेली 25 वर्षे‘अंनिवा’चा अंक पुरवला जातोय, हे सांगितल्यावर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात ‘अंनिवा’ ला दाद दिली. मुक्ता दाभोलकर यांनी ‘अंनिवा’ सारख्या वार्तापत्राचे महत्त्व सांगून असे वार्तापत्र लोकांपर्यंत पोचणे कसे गरजेचे आहे, हे विषद केले. त्यासाठी त्यांनी आवाहन केले की, प्रत्येकाने कमीत कमी पाच तरी नवीन वर्गणीदार आणावेत ज्या योगे ‘अंनिवा’चा प्रसार होईल व अंधश्रद्धा दूर होण्यास तसेच ‘अंनिस’चा विचार लोकांपर्यंत पोचविण्यास हातभार लागेल. प्रा. मुंडे यांनी थोडक्यात आभार प्रदर्शन केले व मेळावा संपल्याचे जाहीर केले.
–उत्तम जोगदंड, डोंबिवली