Categories
पर्दाफाश

घरावर दगडे पडणार्‍या भानामतीचा भांडाफोड

फेब्रुवारी – २०१७

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात, नितीन राऊत यांच्या पाठपुराव्यातून 2015 साली महाराष्ट्र अंनिसची शाखा सुरू झाली.

समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याची इच्छा असणार्‍या व्यक्तींना एक कृती मंच उपलब्ध झाला. डिसेंबर 2016 मध्ये खेड शाखेने भानामतीची एक घटना यशस्वीपणे हाताळली व लोकांच्या मनावरील भीतीचे मळभ दूर केले.

खेड तालुक्यातील मेटे भोईवाडी येथील श्री. संदीप यशवंत जाधव यांचे घर आणि त्यांच्या शेजारच्या दोन घरांवर गेली दीड वर्षे रोज रात्री दगड पडत होते. त्यामुळे या तीनही कुटुंबांच्या मनात दहशत निर्माण झालेली होती, वाडीतील अन्य कुटुंबेही घाबरलेल्या मन:स्थितीत होती. दररोज रात्री घरावर दगड पडत असल्याने भयभीत झालेले लोक रात्रीचा पहारा देऊ लागले. पहारा चालू असताना देखील दगड पडत होते; पण हे कसे घडते ते समजून येत नव्हते. या प्रकरणाची चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यासाठी बैठका घेण्यात आल्या, तरीही कोणतीही व्यक्ती आपणच दगड मारत असल्याचे कबूल करत नव्हती. हा भानामातीचा प्रकार असल्याची समजूत करून घेऊन काही मांत्रिक आणि भगतगिरी करणार्‍या बुवांना या प्रकरणाचा बंदोबस्त करण्यासाठी बोलाविण्यात आले. त्यांच्या उपायानंतरही दगड पडण्याचा प्रकार चालूच राहिला. या त्रासाला कंटाळून सदर घरातील लोक घर व गाव सोडून मुंबईला स्थलांतर करण्याचा विचार करू लागले. या सुमारास काही ग्रामस्थांनी खेड अंनिसचे पदाधिकारी सचिन गोवळकर यांच्याशी संपर्क साधला. हे कृत्य एखादा माणूसच करत आहे व यामागे कोणतीही दैवी शक्ती नाही असा विश्वास अंनिसच्या कार्यकर्त्यांनी गावकर्‍यांना दिला. अंनिसच्या वतीने त्यांनी दगड पडणार्‍या घरांची व परिसराची पाहणी केली. घरावर पडलेले दगड हे परिसरात मिळणार्‍या दगडांसारखेच होते, त्यांना शेण लागलेले होते, हे दाखवून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी गावकर्‍यांना पटवून दिले की, हे दगड कोठूनही बाहेरून येत नसून घरातील किंवा आजूबाजूची कोणीतरी व्यक्तीच हे कृत्य करत आहे. गस्त घालताना देखील दगड पडतात. याचा अर्थ त्यावेळी ही व्यक्ती आजूबाजूला असते किंवा गस्त घालणार्‍या गटात सहभागी असते, हे ग्रामस्थांना पटले.

मनातील भीती दूर झाल्यावर ग्रामस्थ गस्त घालतेवेळी बारीक लक्ष ठेवू लागले व त्यांनी दगड फेकणार्‍या व्यक्तीला रंगेहाथ पकडले. ज्या घरांवर दगड पडत होते, त्यांच्या भावकीतील एक महिला हे कृत्य करत होती. ती व्यक्ती स्वतःचा गुन्हा कबूल करण्यास तयार होईना, तेव्हा विषय पोलीस स्टेशनला गेला. आपणच हे कृत्य करत असल्याचे तिने कबूल केले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाला क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची गरज असते, हे डॉक्टर दाभोलकरांचे विचार ध्यानात ठेवून, त्या बाईला समज देऊन सोडून देण्यात आले. खेड शाखेचे सचिन, संदीप, संजय गोवळकर व प्रशांत पावसकर यांच्या प्रयत्नांतून या भानामातीच्या प्रकाराचा पर्दाफाश झाला.

प्रशांत पावसकर, खेड (जि. रत्नागिरी)