राजेंद्र सिंह राणा म्हणजे प्रख्यात पाणीवाले बाबा. पाण्याच्या स्त्रोतांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी हयात वेचणारे निसर्गमित्र! ‘कुंभमेळा कालसुसंगत की कालविसंगत’ या विषयावर महाराष्ट्र अंनिसतर्फे चर्चासत्र आयोजित केले होते. त्यामध्ये बोलताना राजेंद्रसिंह म्हणाले की, कुंभमेळ्याचा मूळ हेतु हरवला असून त्याला विकृत रूप आले आहे. कुंभ म्हणजे केवळ नदीत डुबकी मारणं नव्हे तर बरोबर आणि चुकीचं यातला भेद स्पष्ट करणं ही कुंभाची मूळ कल्पना. अच्छाई म्हणजे समाजाचं भलं करणं ही कायमस्वरूपी प्रेरणा आहे. तेच खरं अमृत होय असं ते म्हणाले. नीर म्हणजे पाणी किंवा नदी आणि नारी म्हणजे स्त्रिया यांचा सन्मान ही आपली संस्कृती होय. पण सध्या बरोबर उलट घडतंय अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
कुंभमेळ्यासारखे धार्मिक उत्सव आणि प्रदूषणकारी मोठ्या उद्योगधंद्यातील दूषित घटक, वाढते शहरीकरण, मूर्ती आणि निर्माल्य नदीत फेकणे अशा घटनांनी नदीरूपी कुंभ, जलकुंभ राहिले नसून ते मलकुंभ बनत आहेत. या विरोधात जनचळवळ उभारली तर मी त्यात सहभागी होईल असं राजेंद्र सिंह म्हणाले. पण राजेंद्रसिंहांनी पाणी प्रदूषणासाठी आधुनिक विज्ञानाला जबाबदार धरले ही गोष्ट न पटणारी आहे.
आधुनिक विज्ञानाने जी साधने निर्माण केली ती भांडवलदाराच्या हातात शोषक बनली. परिणामी निसर्ग प्रदूषित झाला हा दोष विज्ञानाचा कसा? ज्या लोखंडाचा शोध विज्ञानाने घेतला त्यापासून कांदे कापणारी सुरी बनवता येते आणि दुसर्याच्या पोटात खुपसण्याचा सुराही बनविता येतो. स्फोटक द्रव्ये बनवता येतात ज्याचा वापर बोगदे आणि खाणकामासाठी होतो; तसंच मानवी बाँब बनून अनेकांना ठार करण्यासाठीही होतो. विज्ञानामुळं जग कुरूप करता येतं पण जग अधिक सुंदरही करता येतं. म्हणून जगाला कुरूप करणारी, गंगा मैली करणारी आणि गोदावरी अस्वच्छ करणार्या शोषकांच्या मानसिकतेला लगाम घालायला हवा. अती हव्यासाच्या मागं न लागणं, अफाट लोकसंख्येच्या अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागविण्यासाठी आधुनिक विज्ञानाचा समुचित तंत्रज्ञानाद्वारे वापर करायला हवा. यासाठी विज्ञानाचा लगाम विवेकाच्या हाती असावा. हाच विवेक अध्यात्मालाही लागू पडतो. खरं अध्यात्म संतांनी स्पष्टपणे सांगून ठेवलंय. तुकारामांच्या आणि इतर संतांच्या अभंगात ते ठायी ठायी प्रकट झालं आहे. पण हे अव्हेरून नकली अध्यात्माचे बाजारू स्वरूप सगळीकडे वाढताना दिसत आहे. या नकली अध्यात्माचा आविष्कार म्हणजे येऊ घातलेला नाशिकचा कुंभमेळा.
या कुंभमेळ्यातून काय साध्य होणार आहे? नैतिकता? आयुष्यभर केलेल्या पापांचे विमोचन गोदावरीत आंघोळ केल्यावर होणार असेल तर पापविमोचन हे नैतिक कसं? ती व्यक्ती भविष्यकाळात पापभिरू बनेल की नवी पापे करायला मोकळी होईल? शाहीस्नानाच्या काळात गोदावरीचा खळाळणारा स्वच्छ जलप्रवाह हा मलप्रवाह बनेल त्याचं काय? आणि मग असं प्रदूषित पाणी शुद्ध करण्याचे भव्य कारखाने भांडवलदार काढणार आणि तथाकथीत शुद्ध पाणी बाटलीत भरून आपणाला विकणार. कुंभमेळ्याच्या तथाकथीत अध्यात्मिक जत्रेत व्यापारी आणि भांडवलदार आणि भ्रष्ट शासकीय नोकर यांंचं उखळ पांढरं होणार. कुंभमेळ्यात व्यसनांचे ओंगळवाणं प्रदर्शन स्वत:ला आध्यात्मिक म्हणणारे तथाकथित साधू करतात. चमत्कारांचेही प्रदर्शन कुंभमेळ्यात घडतं. या सर्व गोष्टी संतांनी सांगितलेल्या नीतीवर्धक अध्यात्मापासून अनेक कोसो दूर असणार्या आहेत.
खर्या अध्यात्मापासून दूर जाणारा नाशिकचा कुंभमेळा हा जलकुंभाचे मलकुंभ करणारा होणार असेल तर त्याचं खरं स्वरूप समाजासमोर यायलाच हवं. कुंभमेळा हा प्रबोधनकार ठाकरे यांच्या भाषेत तीर्थाचा बाजार होऊ नये. काळाबरोबर कुंभमेळ्याचं स्वरूप निसर्ग आणि नीती पोषक व्हावं.