Categories
उपक्रम जो.वि.नि

जोडीदाराची विवेकी निवड : काय पाहून कराल?

जून - २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या, ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमाकडे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे संघटनेचा पुढील दशकातील महत्त्वाचा उपक्रम म्हणून बघायचे. व्यवसायाची निवड आणि जोडीदाराची निवड या तरुणांच्या भावी आयुष्यावर खोलवर परिणाम करणार्‍या दोन बाबी आहेत. यापैकी, व्यवसाय निवडीचा सर्वांगीण विचार कसा करावा, या विषयीच्या माहितीचे अभिसरण आपल्या समाजात सुरू झालेले आहे. जोडीदाराची निवड या विषयाचा साकल्याने विचार कसा करावा, याविषयी मात्र फारच कमी माहिती व चर्चेच्या संधी समाजात उपलब्ध आहेत! ‘प्रेमात पडणे’, ‘प्रेम आणि आकर्षण यातील फरक’, ‘जोडीदाराची निवड’ या विषयी कोणी बोलतंय, म्हटलं की तरुणांचे कान ‘आतून उघडतात’ असा अनुभव आहे. तरुणांना जे हवंय आणि विवेकी समाजधारणेसाठी जे गरजेचे आहे, ते चळवळीने उचलून धरण्याची डॉक्टरांची भविष्यवेधी दृष्टी प्रत्यक्षात आणण्याच्या कामाला महाराष्ट्र अंनिसमधील तरुण पिढी सध्या जोमाने भिडली आहे.

‘जोडीदाराची विवेकी निवड’(जोविनि) या उपक्रमाची प्रमुख सूत्रधार आरती नाईक सांगते की, ‘समस्येवर उपाय शोधण्याच्या गरजेतून हा उपक्रम विस्तारत गेलेला आहे!’ त्याचे असे झाले की…. शनिशिंगणापूरच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईहून महा. अंनिसचे कार्यकर्ते सोबत प्रवास करत होते. रिझर्व्ह बँकेतील सचिन थिटे, पोलीस दलातील तुषार शिंदे, आरती, महेंद्र नाईक असे प्रवासात एकत्र होते. प्रवासातील गप्पांत असा विषय निघाला की, सचिन आणि तुषारचे लग्न राहिले आहे! इतकी सुस्थिर नोकरी असलेल्या मुलांचे लग्न खोळंबले होते. कारण त्यांना त्यांच्या विचारांना अनुरूप असा जोडीदार हवा होता. कांदेपोहे पद्धतीने, जातीतील, सुंदर मुलगी बघून लग्न करण्याची त्यांची इच्छा असती तर आई-वडील, नातेवाईक, वधू-वर सूचक मंडळे असा सगळा फौजफाटा त्यांच्या मदतीला तयार होता; परंतु समविचारी जोडीदार शोधताना यांपैकी कोणतीही आधारफळी ( सपोर्ट सिस्टीम) कामी येत नव्हती. या मुलांना त्यांच्या अपेक्षांविषयी घरातल्यांशी मोकळेपणाने बोलता देखील येत नव्हते. समविचारी जोडीदार हवा म्हणजे नक्की कसा हवा, याविषयी स्वतःची काही मते अधिक सुस्पष्ट करून घेण्याची गरज त्यांना जाणवत होती; त्यासाठी सातत्याने चर्चा करता येईल, असा एखादा गट ही त्यांची गरज होती!

Whats app गट आणि संवादशाळा

विचारांना अनुरूप असा जोडीदार शोधणे किती कठीण आहे, या विषयी त्या प्रवासात खूप चर्चा झाली आणि समविचारी जोडीदार शोधू इच्छिणार्‍या तरुण-तरुणींसाठी एखादा मंच (platform) तयार करण्याचे ठरले. आरती आणि महेंद्र यांचे 12 वर्षांपूर्वी लग्न झाले, तेव्हापासून जोडीदार निवडीचे एखादे पर्यायी व्यासपीठ उपलब्ध झाले पाहिजे, असे त्यांना वाटत होते; त्या इच्छेला यानिमित्ताने मूर्तरूप आले. समाजमाध्यमे (सोशल मीडिया) हा सर्वांत सोपा आणि बिनखर्चाचा उपाय वाटल्याने तो वापरून बघण्याविषयी एकमत झाले. अंनिसच्या महाराष्ट्रभरातील किती कार्यकर्त्यांचे लग्न या मुद्द्यावर अडले आहे, हे बघून त्यांनापण या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे ठरले. सात डिसेंबर 2015 रोजी ही चर्चा झाली आणि 13 डिसेंबर 2015 रोजी ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमाचा Whats app गट सुरू झाला. अंनिसचे महाराष्ट्रभरातील लग्नेच्छू कार्यकर्ते त्यात सहभागी झाले.

या गटातून आपल्याला नेमके काय साध्य करायचे आहे? लग्न जुळविण्यासाठीचे व्यासपीठ म्हणून आपण हा गट वापरणार आहोत का? हा गट नेमका चालवायचा कसा? या मुद्द्यांचा अधिक तपशीलवार विचार सुरू झाला. त्यातून असे ठरले की, वधू-वर सूचक मंडळ म्हणून हा गट आपण चालवू नये, तर जोडीदाराची निवड करण्याच्या निकषांबद्दल या गटात चर्चा व्हावी. गटावरील अवांतर संदेश टाळण्यासाठी सहभागी तरुणांना नेमके काहीतरी काम द्यायचे ठरले. पहिल्यांदा त्यांचा व्यक्तिगत परिचय मागवला. तो परिचय अगदी पारंपरिक पद्धतीने यायला लागला, तेव्हा सखोल चर्चेसाठी असला ‘बायोडेटा’ अपुरा आहे, हे लक्षात आले. ‘तुम्ही कसे आहात’, ‘तुम्हाला आयुष्यात काय हवे आहे’, ‘तुमचे व्यक्तिमत्त्व कसे आहे’ हे स्पष्ट करून देणारा परिचय येथे गरजेचा होता. सततच्या चर्चेतून मुद्दे सुचत व स्पष्ट होत गेले. Whats app गटावर दर दिवशी एक प्रश्न चर्चेसाठी टाकायचा व त्या दिवशी त्या मुद्द्यावर गटात चर्चा करायची, असे ठरले. पंचेचाळीस प्रश्नांचा एक संच तयार झाला. दिवसाला एक प्रश्न, असे पंचेचाळीस दिवस पंचेचाळीस प्रश्नांची चर्चा सुरू झाली. गटाचा कार्यकाल 45 दिवस ठेवण्यात आला.

गट सुरू झाल्यावर गटाची माहिती देणारा एक संदेश तयार करून तो Whats app वर फिरवला. त्यातून निशा, दीक्षा अशा अंनिसच्या कार्यकर्त्या नसलेल्या; पण विवेकी विचाराने समविचारी जोडीदाराची निवड करू इच्छिणार्‍या तरुणी जोडल्या गेल्या. समविचारी जोडीदार कसा शोधायचा, या प्रश्नावरच त्यांची वर संशोधनाची गाडी अडली होती. सचिन- निशा सांगतात की, पहिली batch ही प्रायोगिक होती, त्या अनुभवातून गट चालविताना सोयीचे ठरणारे मुद्दे लक्षात आले. गट चालविण्यासाठीचे नियम तयार होत गेले. जसे की, एका शब्दातले किंवा एका ओळीतले छोटे-छोटे संदेश नकोत, आपल्याला जे म्हणायचे आहे, ते एकत्र करून एक मोठा संदेश पाठवायचा म्हणजे संदेशांची संख्या कमी होऊन वाचणे सोपे जाते! सहजपणाने चर्चेला वळण कसे लावायचे, हे कौशल्य अनुभवातून विकसित झाले. गटात सहभागी असलेल्या काही लोकांनी वैयक्तिक chatting करायला सुरुवात केली. त्यातून तक्रारी आल्या, मग गटाच्या संचालकांना सांगितल्याशिवाय वैयक्तिक chatting करायचे नाही, असा नियम तयार केला. सहभागी होणार्‍या व्यक्तीची पूर्ण माहिती मिळण्यासाठी इच्छुक तरुणांची मुलाखत घ्यायला सुरुवात केली. आरती नाईक, महेंद्र नाईक, सचिन थिटे, निशा फडतरे आणि दीक्षा अशी कोअर टीम तयार झाली.

गटात स्वतः व्यक्त न होता, इतरांची मते फक्त वाचायची अशी बर्‍याच जणांची प्रवृत्ती असते. त्यातून देखील त्यांना शिकायला मिळते; पण सहभागी पद्धतीने गट चालवायचा असेल तर प्रत्येकाने बोलणे गरजेचे असते. त्यामुळे रोजच्या प्रश्नावर प्रत्येकाने एकदा तरी व्यक्त झालेच पाहिजे, असा नियम केला. सगळ्यांची उत्तरे ‘सेव्ह’ करायला सुरुवात केली. सहभागी व्यक्तींच्या मतांत हळूहळू कसा बदल घडत गेला, हे पडताळून पाहण्यासाठी किंवा उत्तरांमधील अंतर्विसंगती तपासण्यासाठी याचा उपयोग झाला. 45 प्रश्नांपैकी, सुरुवातीच्या काही प्रश्नांमध्ये स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्द्यावर तात्विक चर्चा होते आणि शेवटच्या काही प्रश्नांमध्ये घरकामाच्या मुद्द्याची चर्चा होते. ‘सेव्ह’ केलेली उत्तरे पडताळून पाहण्याची सोय केल्यावर हे स्पष्टपणे दिसू लागले की स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्द्याबाबत जे सकारात्मक बोलायचे, त्यांचे ‘घरकामातील पुरुषांचा सहभाग’ याबद्दलचे मत वेगळे असायचे. स्वतःच्या विचारातील अंतर्विसंगती समोर आल्यावर मुले स्वतःच्या उत्तरांतील तफावतीबद्दल विचार करू लागली. अनेक जण स्वतः उत्तर न देता उत्तरे ‘कॉपी-पेस्ट’ करायचे, ते या गटात चालणार नाही, असा नियम केला. तीनपेक्षा जास्त दिवस गटातील चर्चेत सहभागी झाले नाही तर गटातून बाजूला करण्यात येईल, असा एक नियम केला. मुलं खोटं पण बोलायची; म्हणजे एखाद्या मुलीचा बायोडेटा आवडला आणि तिची जन्मतारीख समजा 1991 असेल तर स्वतःची 1989 करून टाकायची, असं! उत्तरे ‘सेव्ह’ करत गेल्याने याला पण आळा बसला.

गटात सहभागी होणार्‍या सर्व मुलांना सांगण्यात येते की, ते या गटात का सहभागी होत आहेत, हे त्यांनी घरच्यांशी बोलणे आवश्यक आहे. स्वतःला नक्की काय हवंय, हे सर्वांत आधी त्यांनी स्वतःशी, नंतर घरच्यांशी आणि त्यानंतर बाहेरच्यांशी पण बोलले पाहिजे, तरच सतत होणार्‍या कांदेपोह्यांच्या कार्यक्रमांना वेगळे वळण देता येईल. आई-वडील जेव्हा बाहेरच्यांना सांगू लागतील की ‘आमच्या मुलीला असे-असेच स्थळ हवे आहे बरं का, तसे असेल तरच स्थळ सुचवा!’ तर दाखवून घेण्याचे अपमानास्पद वाटणारे कार्यक्रम कमी होतील. जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमांतर्गत परिचयोत्तर विवाहाला प्राधान्य द्यावे असे सुचविले जाते. परिचयोत्तर विवाहात फसवणूक कमी असते व विचारांना अनुरूप जोडीदार मिळण्याची शक्यता जास्त असते. या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या मुलांच्या लक्षात येते की, समाधानी सहजीवनासाठी महत्त्वाच्या असणार्‍या मुद्द्यांवर मुला- मुलीचे आधीच बोलणे होणे गरजेचे आहे. किमान सहा महिन्यांचा वेळ या सर्व प्रक्रियेला दिल्यानंतर लग्न ठरले पाहिजे. त्यामुळे ज्यांना या रस्त्याने जायचे आहे, त्यांनी या प्रक्रियेकडे प्रशिक्षण म्हणून पाहावे. या गटाचे मुख्य उद्दिष्ट हे स्वतःचे विचार स्वतःला स्पष्ट होणे हे आहे व त्यातून काहीजणांचे परिचयोत्तर विवाह घडू शकतील, असे लक्षात आले. तसे ते घडलेही. या उपक्रमाच्या माध्यमातून आजवर सहा जोड्या जमल्या.

यातील सर्वांत महत्त्वाची अट अशी असते की, येथे कोणीही एकमेकाला जात किंवा धर्म विचारणार नाही! तुम्ही व्यक्ती म्हणून कसे आहात, तुमचे विचार कसे आहेत, हे महत्त्वाचे आहे. आता या गटामध्ये ‘आंतरजातीय आणि आंतरधर्मीय जोडीदाराची निवड’ असा शब्द न वापरता ‘जात-धर्मविरहीत जोडीदाराची निवड’ असा शब्द वापरला जातो. कारण ‘आंतरजातीय’ असा शब्द वापरतात, तेव्हा आपली जात माहीत असते आणि ती बाजूला ठेवायची, असे आपण ठरवले असते. जेव्हा आपण ‘जात-धर्मविरहीत जोडीदाराची निवड म्हणतो, तेव्हा आपण जात- धर्म या मुद्द्यांचा विचार करायलाच नकार दिलेला असतो.

गट चालविताना एका टप्प्यावर लक्षात आले की, ऑनलाईनच बोलणे होतेय आणि या गटातील बर्‍याच जणांना एकमेकांना भेटायला आवडेल. त्यामुळे 14 फेब्रुवारीला पनवेलमध्ये पहिली ‘संवादशाळा’ घेण्यात आली. मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर प्रदीप पाटकर तरुणांशी संवाद साधायला आले होते. तो भन्नाट अनुभव होता! तेथून ‘संवादशाळे’चा जन्म झाला. ‘संवादशाळे’त मुलांबरोबर पालक देखील सहभागी होऊ लागले. त्यांनतर महा. अंनिसच्या जोडीदाराची विवेकी निवड या विभागाने ‘संवादशाळा’ हा उपक्रम सुरू केला. संवादशाळा घेण्याच्या निमित्ताने ज्या-ज्या गावात जाणे होई तेथे whats app गटातील आठ-दहा मुले असायचीच, मग त्यांची भेट घेण्यासाठी कोपराभेटी सुरू केल्या.

महेंद्र नाईकने सांगितलं की, ‘जोविनि’ हा महा. अंनिसचा विभाग आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना मदत करणे, महाविद्यालयात कार्यक्रम घेणे हे उपक्रम करतच आलेला आहे. ‘जोविनि’च्या या पुढील टप्प्यावर आपण मुले आणि पालकांशी अधिक तपशिलात जाऊन चर्चा करतोय. जोडीदाराची निवड या विषयावर स्वतःशी, एकमेकांशी आणि पालकांशी संवाद साधायला त्यांना उद्युक्त करून, त्यासाठी त्यांना मुद्दे पुरवितोय. लग्नाचा विचार करताना काय महत्त्वाचे आहे, याचे मुद्दे त्यांना पुरवल्यानंतर ते वेगळा विचार करू शकतात.

मुलीचे लग्न

‘जोविनि’चा चमू सांगतो की, आतापर्यंत या गटांत सहभागी झालेल्या बहुतांश मुलींना कांदेपोहे प्रकाराला तोंड द्यायचे नाहीये. त्यामुळे त्यांना अगदी बाहुली बनवून शोकेसमध्ये ठेवल्यासारखे वाटते. स्वतःचे लग्न ठरवायला स्वतः पुढाकार घेणे, त्यासाठी पालकांशी बोलणे, फोन करणे हे मुलींना मुलांच्या इतके सहज जात नाही, त्यांना हे माध्यम देखील सुरक्षित वाटत नाही, तरीही ज्या मुली येतात त्या विचारांनी ठाम असतात, समतेचा आग्रह धरणार्‍या असतात आणि लग्नसंस्थेतील बर्‍याचशा अडचणी त्यांना जाणवत असतात. कारण त्यांनी त्या बघितलेल्या असतात. या मुली खूप गांभीर्याने मुद्दे मांडतात, त्यामुळे संपूर्ण गट अधिक गांभीर्याने चर्चेमध्ये सहभागी होतो. मुलींच्या अपेक्षा आणि त्यांच्या घरच्यांच्या अपेक्षा यांच्यात तफावत दिसून येते. घरच्यांच्या अपेक्षा भौतिक बाबींबाबत आहेत; घरदार, नोकरी, पगार अशा! आणि मुलींना त्यांच्या विचारांना समजून घेणारा, त्यांना वाव देणारा मुलगा हवाय.

सुरुवातीला स्वतःहून फोन करणार्‍या मुली फार कमी असायच्या, आई-वडीलच फोन करायचे; पण त्यांना सांगितले जायचे की, जिला गटामध्ये सहभागी व्हायचे आहे, तिने स्वतः फोन करून बोलले पाहिजे. सध्या सोशल मीडियावर, ‘मुलींच्या अपेक्षा किती भयंकर असतात किंवा त्यांच्या अपेक्षा म्हणजे मुली घेत असलेला एक हुंडाच आहे’ अशा ‘पोस्ट्स’ फिरत असतात, पण ‘जोविनि’ चमूचा अनुभव यापेक्षा वेगळा आहे; आतापर्यंत या गटावर शेकड्याच्या हिशेबाने ज्या मुली येऊन गेल्या, त्यातील एकाही मुलीने अशा पद्धतीच्या अपेक्षा मांडल्या नाहीयेत. मुलींच्या अपेक्षा फारच साध्या आहेत; पण त्या समाजाच्या दृष्टीने भयंकर आहेत. त्यामुळे ‘मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्यात’, असं एक वातावरण निर्माण केलं जात असावं. आर्थिक अपेक्षा आहेत; पण अवास्तव म्हणता येतील अशा नाहीयेत! सासू-सासरे नकोच असे म्हणणारी एकही मुलगी येथे आढळलेली नाही. मुलींच्या बाबतीत नोंदवलेले अजून एक निरीक्षण म्हणजे महाराष्ट्रातील मुली आज असे म्हणताहेत की, आम्ही जे कमावतोय त्यावर आमच्या पालकांचा सुद्धा हक्क आहे. त्यामुळे लग्नानंतर त्यावर बंधने असता कामा नयेत. मुलगा आई-वडिलांसाठी जे करतो त्याला त्याची कर्तव्यबुद्धी म्हणायची आणि मुलगी स्वतःच्या आई-वडिलांसाठी जे करते त्याला मात्र नावे ठेवायची, अशी आपल्या समाजाची दुटप्पी भूमिका आहे.

बर्‍याच मुला-मुलींना एक मूल दत्तक घ्यायचं आहे आणि त्यासाठी तयार असणारा जोडीदार त्यांना हवा आहे. जे जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करून लग्न करू इच्छिताहेत, त्यांची पळून जाऊन लग्न करायची इच्छा दिसत नाही; उलट कित्येक मुले असं म्हणताहेत की, आम्हाला आमच्या लग्नात आई-वडील सोबत हवेतच! त्यांना जोपर्यंत पटत नाही, तोपर्यंत आम्ही थांबू; पण त्यांचा सहभाग घेऊनच लग्न करू. काही मुले आम्हाला जातीतील मुलीचाच विचार करता येईल, अशा मानसिकतेतून येतात; पण जेव्हा ती गटात सहभागी होतात, तेव्हा जात-धर्म न सांगतासुद्धा, त्याचा विचार न करतासुद्धा आपल्याला लग्नाची एवढी चर्चा करता येऊ शकते, हे त्यांच्या लक्षात येते.

whats app गट किंवा ‘संवाद शाळे’च्या सुरुवातीला, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची जोडीदाराच्या विवेकी निवडीच्या पाच सूत्रांची ध्वनिफीत सहभागींना ऐकवली जाते. हे पाच अगदी practical मुद्दे असे की, जोडीदाराची निवड करताना तुम्ही व्यसनाला 100 टक्के नकार द्यायला हवा, कुंडलीला 100 टक्के विरोध करायला हवा, रंग- रूप- उंची यापेक्षा भावनिक, बौद्धिक आणि मूल्यात्मक अनुरूपता तपासायला हवी, प्रेम आणि आकर्षणातील फरक समजून घ्यायला हवा आणि लग्न साध्या पद्धतीने, किमान कर्ज न काढता करायला हवे.

लग्न कशासाठी करायचे, याची स्पष्टता

‘जोविनि’ या उपक्रमात हे स्पष्ट आहे की, जात तोडण्यासाठी आपल्याला जोडीदार निवडायचा नाहीये, तर दोघांचे आयुष्य आणखी छान व्हावं, यासाठी जोडीदाराची निवड करायची आहे. त्यामुळे एखादा विवाह आंतरजातीय असूनसुद्धा ती अविवेकी निवड असू शकते आणि एखादा जातीअंतर्गत विवाह ही विवेकी निवड असू शकते. जातीतलाच जोडीदार पाहिजे आणि आंतरजातीयच पाहिजे, ही दोन्ही आग्रही टोके अविवेकी आहेत. यामुळेच, जोडीदाराची जात- धर्मनिरपेक्ष विवेकी निवड ही संकल्पना अधिक योग्य वाटते. सामाजिक चळवळीत कार्यरत असणारे कार्यकर्ते अनेकदा असे म्हणतात की, मुलगी कुठल्याही विचारांची असली, तरी चालेल आम्ही तिला बदलवू; दुसरा असा एक गट आहे की, आम्हाला विधवा, घटस्फोटिता, अनाथ, अपंग अशाच मुलीशी लग्न करायचे आहे. ‘जोविनि’ उपक्रमात त्यांच्या भावनांचा आदर केला जातो; पण त्यांना असे सांगितले जाते की, निव्वळ मदत किंवा उपकार हा लग्नाचा निकष असू शकत नाही, उपकाराच्या भावनेतून, कोणाचे कल्याण करण्यासाठी जोडीदार नाही निवडत!

पालकांचा सहभाग

पहिल्याच whats app गटात सहभागी झालेल्या विजयला स्वतःच्या विचारांना अनुरूप अशी मुलगी जोडीदार म्हणून निवडायची होती आणि त्याच्या आई-वडिलांना हेच लक्षात येत नव्हतं की, विजयसाठी चांगल्या घरातील मुलगी शोधायला ते समर्थ असताना त्याला स्वतःच्या मनाने स्वतःची बायको निवडायची काय गरज होती? माधव बावगे सरांनी विजयच्या आई-वडिलांशी संवाद साधला आणि त्याचे लग्न लागले; पण या निमित्ताने पालकांशी संवाद साधण्याचे महत्त्व लक्षात आले. मग मुले- मुली आणि पालक यांच्या एकत्रित ‘संवादशाळे’ला सुरुवात झाली. अंनिसच्या वेगवेगळ्या शाखा त्यांच्या गावात ‘संवादशाळां’चे आयोजन करतात. दिवसभराच्या कार्यशाळेसाठी 100 ते 150 जण हजर राहतात. आजपर्यंत 14 जिल्ह्यांत मिळून 24 ‘संवादशाळा’ झाल्या आहेत आणि 25 वी रौप्य महोत्सवी ‘संवादशाळा’ 24 जूनला मुंबईत होत आहे.

आरती, महेंद्र, सचिन, निशा, दीक्षा असे पाचजण सध्या whats app गट व संवादशाळांच्या कामात सक्रिय आहेत. या विषयाला असलेली तरुणांची मागणी पाहून महा. अंनिसच्या प्रशिक्षण विभागाने, जोडीदाराची विवेकी निवड या विषयाचे संवादक बनू इच्छिणार्‍या कार्यकर्त्यांसाठी 26, 27 मे रोजी पिंपरी-चिंचवड येथे प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केली होती. या पंचवीस ‘संवादशाळां’च्या अनुभवाबद्दल आपण या तरुण कार्यकर्त्यांशी पुन्हा कधीतरी संवाद साधणार आहोत.

जात पाहून लग्न करू नका, कुंडली पाहून लग्न करू नका हे लोकांना सांगताना, ‘मग काय पाहून लग्न करा’ हे सांगितले पाहिजे; ते करण्याचे काम हा उपक्रम करत आहे.

संपर्क ः सचिन थिटे – 84240 41159

आरती नाईक – 86522 23803