26 डिसेंबर 2015 रोजी ‘मअंनिस’, कोल्हापूर शाखेमार्फत समाजकार्य विभाग, सायबर कॉलेज यांच्या सहयोगाने ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या ‘मअंनिस’च्या अभियानाअंतर्गत आणि कोल्हापूर ‘ऑनर किलिंग’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ‘जातीच्या खोट्या प्रतिष्ठेच्या बळींच्या विरोधात’ युवा निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ‘मअंनिस’चे राज्य प्रधान सचिव माधव बावगे, कॉ. अतुल दिघे, सरचिटणीस हमीद दाभोलकर व संजय बनसोडे, एस. एस. आपटे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कॉ. दिलीप पवार या निर्धार मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. या निर्धार मेळाव्याची सुरुवात माधव बावगे आणि सहकार्यांनी प्रबोधनपर गीते गाऊन केली. डॉ. एस. एस. आपटे यांनी आपल्या प्रास्ताविकात इंद्रजित कुलकर्णी व मेघा पाटील यांना आदरांजली वाहिली, तसेच ‘आता युवकांनी जात-धर्म न पाहता एच.आय.व्ही. टेस्ट करूनच आपला जोडीदार निवडायला हवा’ असेही नमूद केले.
कार्यक्रमाच्या दरम्यान राजवैभव कांबळे, हर्षल जाधव आणि सीमा पाटील यांनी आंतरजातीय विवाहाला अनुसरून वास्तव मांडणार्या विद्रोही कविता सादर केल्या. इंद्रजित-मेघाचा हा खून पहिला खून नसून जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपायी असे अनेक झाले आहेत. तसेच या घटनेचा ‘माणूस’ म्हणवून घेणार्या सर्वांनी निषेध करायला हवा, असं वक्तव्य संजय बनसोडे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कॉ. अतुल दिघे यांनी आंतरजातीय-आंतरधर्मीय विवाह हा गुन्हा नसून या जातिव्यवस्थेचं वास्तव समजून घेऊन युवकांनीच याबाबत कृतिशील व्हायला हवं, असं मत व्यक्त केलं!
याप्रसंगी कोल्हापूर ‘मअंनिस’चे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील स्वामी यांनी स्वतःच्या आंतरजातीय विवाहाबद्दल युवकांशी संवाद साधला व आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांच्या आंतरजातीय विवाहाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त 25 आंतरजातीय विवाह लावून देण्याचा आपला संकल्पही बोलून दाखवला.
‘मअंनिस’चे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी युवकांना जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती दिली. 180 हून अधिक लावलेल्या सत्यशोधकी विवाहातील काही लग्नांचे रोचक अनुभवकथनही त्यांनी केले. आंतरजातीय-धर्मीय व सत्यशोधकी विवाह करू इच्छिणार्यांच्या पाठीशी ‘मअंनिस’ नेहमी खंबीरपणे उभी राहील, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित युवकांच्याकडून इंद्रजित व मेघा यांना काल्पनिक पत्र लिहून घेऊन युवकांच्या या घटनेबद्दलच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातील उत्कृष्ट पत्राचं वाचनही सर्वांसमोर केले गेले. या मेळाव्याप्रसंगी बोलताना हमीद दाभोलकरांनी युवकांच्यावरील दृढ विश्वास व्यक्त केला. तरुणाईने अशा अमानुष घटनांबाबत निर्भिडपणे बोलायला हवं. जातधर्मापलिकडे जाऊन व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून आणि हिंसेला नकार व मानवतेचा स्वीकार युवकांनी करायला हवा, असं ते म्हणाले. आंतरजातीय-धर्मीय विवाहांना पाठबळ देण्याचे धोरण तयार करण्यासंबंधी शासनाची भूमिका उदासीन दिसत आहे, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.
कॉ. दिलीप पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात जातनिर्मूलनासह विवेकासह आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले. डी. एस. दळवी यांनी आभार मानले. या निर्धार मेळाव्यात 200 हून अधिक युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय कदम, नीलम धनावडे आणि मोमीना वाडीकर यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सायबर कॉलेज आणि कृष्णात कोरे, सीमा पाटील, रमेश वडणगेकर, निशांत शिंदे, कपिल मुळे, हर्षल जाधव, राजवैभव कांबळे आदी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. एकंदरीतच विवेकाचा आवाज आणखी बुलंद करण्यात हा निर्धार मेळावा अत्यंत यशस्वी झाला.
-विनायक होगाडे
लेखक संपर्क : 9011560460