Categories
पर्दाफाश

ट्रकचालकांना भीती दाखवून पैसे उकळणारा महाराज गजाआड

एप्रिल – २०१७

आपला धंदा कुठे चांगला चालेल हे धंदेवाईक व्यक्तीला बरोबर समजते! भोंदूबाबा देखील त्या अपवाद नाहीत. मोहन आप्पाराव भिंगोले या मुंबईतील एका खाजगी आस्थापनेत नोकरी करणार्‍या गृहस्थांना त्यांनी कोठे गाठले बघा!

मालवाहतुकीचा जोडधंदा करण्यासाठी म्हणून भिंगोले यांनी ट्रक विकत घेतला होता. बाळू बिराजदार यास वाहनचालक म्हणून नोकरीला ठेवले होते. निगडी येथे हा ट्रक उभा असताना त्या ठिकाणी एक बाबा आला व वाहनचालकाला म्हणाला की, या गाडीला धोका असून तो टाळण्यासाठी पूजा-पाठ करावे लागतील. चालकाने फोन करून हे ताबडतोब मालकाच्या; म्हणजेच भिंगोले यांच्या कानावर घातले व त्यांना बाबाचा मोबाईल नंबर दिला. 14 एप्रिल 2015 रोजी भिंगोलेंनी बाबाला फोन केला. बाबाने त्यांना निगडी येथे भेटायला बोलावले. प्रत्यक्ष भेटीत बाबाने आपले नाव राजू पुजारी असल्याचे सांगितले. तो भिंगोलेंना म्हणाला की, ‘तुमच्यावर करणी झालेली आहे, तसेच तुमच्या ट्रकचा नंबर चांगला नाही. त्यामुळे तुमच्यावर मोठे संकट येणार आहे व तुमच्या वाहनचालकाच्या जीवाला अपघातामुळे मोठा धोका निर्माण होणार आहे.’ यावरचा उपाय देखील त्याने लगेचच सांगितला. तो म्हणाला की, ‘माझ्या अंगात दैवी शक्ती असून मी तुम्हाला मंतरलेल्या खड्यांच्या वेगवेगळ्या अंगठ्या देऊन तुमच्या मागची इडा- पीडा कमी करू शकतो. त्यामुळे तुमच्या धंद्यात चांगली वाढ होईल व असे नाही केले तर तुमच्यावर शत्रूने केलेल्या करणीचा परिणाम होईल व तुमची संपत्ती नष्ट होईल.’

मोहन भिंगोले घाबरून गेले व बाबाने सांगितल्याप्रमाणे सर्व पूजापाठ करण्याचे त्यांनी ठरविले. भिंगोलेंच्या मनात वारंवार भीती निर्माण करून बाबाने त्यांच्याकडून पंधरा हजार रुपये उकळले. पूजापाठ केले तरी कोणताही सकारात्मक परिणाम घडून आला नाही व या काळात भिंगोलेंना त्यांचा ट्रक विकावा लागला, त्यामुळे भिंगोले यांच्या मनात शंका निर्माण झाली! थेट पोलिसांच्याकडे न जाता त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांची भेट घेतली व बाबाने केलेल्या फसवणुकीसंदर्भात कारवाई करण्यासाठी मार्गदर्शन व मदत करावी, असा विनंती अर्ज केला. पैशाच्या मागणीसाठी बाबाचा फोन आला की आम्हाला कळवा, असे नंदिनी जाधव यांनी त्यांना सांगितले.

काही काळ गेल्यानंतर मार्च 2017 मध्ये राजू पुजारी बाबा भिंगोले यांना सतत फोन करून पैशाची मागणी करू लागला. नंदिनी जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे भिंगोले यांनी बाबाला भेटीची वेळ विचारून घेतली. सात मार्च 2017 रोजी भेट ठरली. यानंतर नंदिनी जाधव व मिलिंद देशमुख यांनी पिंपरी चिंचवड स्टेशनचे पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्याशी संपर्क साधला व त्यांना या बाबाविषयी माहिती दिली. पोलीस निरीक्षक मुगळीकर यांच्या सूचनेनुसार भिंगोले यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दिल्यानंतर त्यांनी पिंपरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. बढे यांना आवश्यक त्या सूचना देऊन सापळा रचला.

प्रत्यक्ष अटक अशी घडली; बाबाने भिंगोले यांना पैसे घेऊन, आंबेडकर पुतळा, पिंपरी चिंचवड चौक येथे दुपारी दोन वाजता बोलावले. बाबाला देण्यासाठीच्या दोन हजारांच्या दोन नोटांचे नंबर पोलिसांनी लिहून घेतले. बाबाला पैसे दिल्यानंतर भिंगोलेंनी नंदिनी जाधव यांना फोन करायचा, त्यानंतर त्या पोलिसांना इशारा करतील, पोलीस तेथे पोचतील व बाबाला पकडतील, असा सर्व सापळा रचण्यात आला.

ठरल्याप्रमाणे मोहन भिंगोले हे स्वतःच्या गाडीतून आंबेडकर पुतळा, पिंपरी येथे जाऊन थांबले. समोरच्या चौकात नंदिनी जाधव व मिलिंद देशमुख थांबले. दोन पोलीस शिपाई सोबत घेऊन साध्या वेशातील पोलीस उपनिरीक्षक व्ही. बी. बढे चौकात गाडीत बसून राहिले.

सव्वादोनच्या सुमारास राजू पुजारी हा बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ आला व मोहन भिंगोले यांच्या गाडीत बसला. त्याने मोहन भिंगोलेंना सांगितले की,‘तुमच्यावर कोणीतरी करणी केलेली आहे, त्यामुळे तुमची स्मृती भ्रष्ट होऊन तुम्हाला वेड लागेल, तुमची संपत्ती नष्ट होईल, तुम्हाला रात्रीच कोणीतरी उचलून घेऊन जाईल; माझ्या अंगात दैवी शक्ती असल्याने मी हे सर्व टाळू शकतो, त्यासाठी तुम्हाला आणखी पूजापाठ करून बकरा कापावा लागेल.’ पूजापाठ करण्यासाठी भिंगोले यांनी त्याला दोन हजारांच्या दोन नोटा असे चार हजार रुपये दिले व लगेच नंदिनी जाधव यांना फोन केला. नंदिनी जाधव यांनी पोलिसांना इशारा केल्याबरोबर पोलिसांनी बाबाला गाठले. त्याचे खरे नाव सुभाष वसंतराव वाकोडे असल्याचे त्याने सांगितले. त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशात पोलिसांनी नमूद करून घेतलेल्या नंबरच्या नोटा सापडल्या. पंचनामा करून पोलिसांनी बाबाला ताब्यात घेतले.

मोहन भिंगोले यांनी दाखविलेले धाडस, नंदिनी जाधव यांनी केलेला पाठपुरावा व त्यांना पिंपरी चिंचवड शाखेतील सहकार्‍यांनी दिलेली साथ यामुळे या बाबाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. या बाबावर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी कृत्यांना प्रतिबंध व निर्मूलन कायदा 2013, क -2(1)ख अनुसूचीसह क-3(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस कारवाईच्या वेळी पिंपरी चिंचवड शाखेचे अ‍ॅड. मनीषा महाजन, देविदास इंगळे, डॉ हेमंत चिखलीकर हे कार्यकर्ते उपस्थित होते.