Categories
उपक्रम

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सव

सप्टेंबर - २०१६

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संघटित कार्याचे अध्वर्यु शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र अं.नि.स. आणि आटपाट यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलनावरती राष्ट्रीय पातळीवर लघुपटांची स्पर्धा आयोजित केली जावी, अशी संकल्पना दिनांक 16 मे 2016 रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीमध्ये चर्चेला आली. या बैठकीसाठी ‘आटपाट’ चे प्रमुख नागराज मंजुळे, कार्यकारी निर्मात्या गार्गी कुलकर्णी, महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, कृष्णा चांदगुडे, राहुल थोरात व योगेश कुदळे उपस्थित होते.

खरं तर आत्तापर्यंत परिवर्तनवादी सामाजिक चळवळींनी गाणी, नाटक, सडक नाटक या सांस्कृतिक माध्यमातूनच प्रश्न मांडलेले आपणास दिसतील; परंतु एखाद्या सामाजिक संघटनेन अशा प्रकारे नावाजलेल्या निर्मिती संस्थेबरोबर राष्ट्रीय पातळीवरील लघुपट महोत्सव घेऊन प्रश्न मांडण्याचं हे पहिलंच उदाहरण असेल.

हल्लीच्या जमान्यामध्ये माध्यमं फार महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतात. मोबाईलच्या एका ‘क्लिक’वर जगभरची माहिती आणि जगभरातील सिनेमे, लघुपट सहजरित्या आपल्याला उपलब्ध होतात. असं असलं, तरी अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित लघुपटांची संख्या तुलनेने कमी दिसेल. अशा परिस्थितीमध्ये प्रभावीरित्या लघुपट निर्मिती करून दृक्श्राव्य माध्यमाच्याद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय आपणास लोकांपर्यंत पोचविण्यास मदत होईल, या उद्दिष्टापोटीच विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सवाची तयारी सुरु झाली. ललितने या फिल्म फेस्टिवल संदर्भातील एक छानसं पोस्टर तयार केलं; तसंच फेसबुक व ई-मेल तयार करून दिला. स्पर्धेमध्ये सहभागी होणार्‍या स्पर्धकांना प्रत्येकाला प्रमाणपत्र द्यायचं ठरल्यानंतर कुतुबने स्वतः प्रमाणपत्राचं डिझाईन तयार करून घेतलं; परंतु आमचं सार्‍यांचं असं म्हणणं होत की, प्रमाणपत्रामधला मजकूर हटके असावा म्हणून इस्लामपूर शाखेचे प्रा. एकनाथ पाटील यांनी त्यावरील मजकूर तयार करून दिला. ट्रॉफीचे डिझाईन नागराज आणि कुतुब यांनी तयार केले, जे की उत्कृष्ट झालंय.

एकीकडे लघुपटासंदर्भात जुजबी माहिती असणारे आपण अन् दुसरीकडे यशाच्या सर्वोच्च शिखरावर अढळ स्थान निर्माण केलेली ‘आटपाट’ संस्था. कधी-कधी वाटायचं की, कसा मेळ जुळून येणार कोणास ठाऊक? परंतु ती शंका फोल ठरली अन आम्ही गार्गी, प्रियांका, कुतुब, ललित, केशव, निखिल, नंदिनी, मिलिंद, अक्षय, रवी, श्याम, मयूर एकत्रित कामास लागलो. लघुपटाची तांत्रिक बाजू ‘आटपाट’ सांभाळणार असे ठरल्यामुळे म्हणावा, तसा ताण आम्हा कार्यकर्त्यांना नव्हता; परंतु त्याच्या अनुषंगाने संयोजनाचा ताण हा होताच. कारण लघुपट हे माध्यम आपल्यासाठी नवीनच होतं.

या महोत्सवाच्या निमित्त पत्रकार परिषद आयोजित केल्यानंतर हे जाणवलं की, हे माध्यम गरजेचं आहे आणि लोकदेखील चांगल्या पद्धतीने त्यामध्ये सहभागी होऊ शकतील. पत्रकार परिषदेमध्ये आम्ही लघुपटासंदर्भातील प्रकार व पाच श्रेण्या जाहीर केल्या त्या अशा 1) लघुपट (खुली श्रेणी) बक्षीस रुपये 25000 व स्मृतिचिन्ह, 2) लघुपट (विद्यार्थी श्रेणी ) बक्षीस रुपये 15,000 व स्मृतिचिन्ह 3) माहितीपट रुपये 10000 व स्मृतिचिन्ह 4) अ‍ॅनिमेशन श्रेणी रुपये 10000 व स्मृती चिन्ह. 5) अंनिस कार्यकर्ता श्रेणी रु. 5000 स्मृतिचिन्ह. स्पर्धेची तारीख 12 व 13 ऑगस्ट 2016; तसेच लघुपट स्वीकारण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट व स्पर्धेसाठीचे ठिकाण एस. एम. जोशी फौंडेशन, पुणे जाहीर करून टाकले. संपर्कासाठी दोघाजणांचे फोन नंबर दिले. एक केशव कुदळे यांचा अन् दुसरा नंदिनी जाधव यांचा. पुण्यामध्ये ‘मअंनिस’चे कार्यालय नसल्याकारणाने सीडी जमा करण्यासंदर्भात ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांना विचारले असता, ते लगेच हो म्हणाले. याकारणी कार्यालयातल्या लोकांची खूप मदत झाली, पाटील काका व जेसिका यांची खासकरून. कारण शेवटच्या क्षणापर्यंत सीडी जमा करून घेणे, ते पैसे व चेक जमा करून घेणे यामध्ये त्यांची चांगलीच दमछाक झाली.

स्पर्धेची अंतिम तारीख व लघुपटाची सीडी जमा करण्याची शेवटची तारीख जाहीर केल्यानंतर भरभरून प्रतिसाद मिळेल, असं वाटलं होतं; पण तसा फारसा प्रतिसाद मिळाला नाही, अगदी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आमच्याकडे फक्त 24 सीडी जमा झाल्या होत्या, सुरुवातीला वाटलं की, किमान 50 जरी आल्या, तरी त्याला स्पर्धेचं स्वरूप प्राप्त होईल, पण कुठलं काय? एवढी संख्या बघून आम्हालाच संकोच वाटू लागला होता, गार्गी, मी, केशव, निखिल; आमच्या चिंतेचा अन् चर्चेचा विषय हा फक्त किती लोक सहभागी होताहेत, हाच होता; परंतु नागराज मंजुळे आणि गार्गी यांच्यामध्ये ज्या चर्चा व्हायच्या, त्यामध्ये नागराज गार्गीला सांगत होते की, ‘शेवटीशेवटी येतील तुमी नका काळजी करू.’ तेवढ्यापुरतं आम्हाला हायसं वाटायचं; परंतु पुन्हा तोच विषय की, पुरेशी संख्या येते की नाही. एकीकडे सीडी जमा करण्याचा वेग अत्यंत कमी; पण केशव आणि नंदिनी यांना येणार्‍या फोनची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत होती. अशातच आम्हाला अपेक्षित असणार्‍या सहभागी स्पर्धकांचा टप्पा आम्ही 3 ऑगस्टनंतर पार करायला सुरुवात केली. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लोक सीडी जमा करून जात होते, यातच आम्ही 260 हा टप्पा कधी पार पाडला, हे आम्हाला कळलेच नाही.

सरतेअखेर आमच्याकडे जमा होणार्‍या लघुपटांची संख्या ही जवळपास 264 होती. अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद यानिमित्ताने मिळाला होता. यामध्ये लघुपट होते, माहितीपट होते, अ‍ॅनिमेशन पट होते. तसेच यामध्ये सहभागी होणारी मंडळी ही विद्यार्थ्यांपासून व्यावसायिक कलावंत ते कार्यकर्त्यापर्यंत सार्‍यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला होता. महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यातून लोक सहभागी झाले होते; पण आता खरी कसोटी होईल ती परीक्षकांची आणि निवड समितीची. कारण एवढ्या फिल्म्स 12 ऑगस्टपर्यंत पाहून होण निव्वळ अशक्यप्राय गोष्ट; तथापि दि. 12 ऑगस्टपर्यंत या सगळ्या फिल्म्स पाहून व निवडून होणार नाहीत, हे लक्षात आल्यानंतर आम्ही स्पर्धेची तारीख व ठिकाण बदलण्याचा निर्णय घेतला व 17, 18 ऑगस्ट ही तारीख व राष्ट्रीय फिल्मसंग्रहालय, पुणे हे ठिकाण निश्चित केले. यासंदर्भातील सूचना सर्व सहभागी कलाकारांना देण्यासाठी फेसबुक, ई-मेल आणि फोनद्वारे सूचित केलं.

लोकांना या महोत्सवाबद्दल इतकी उत्सुकता असेल, हे आम्हाला 16 ऑगस्टच्या रात्री समजलं. कारण 264 पैकी निवडलेल्या मोजक्या फिल्म्सची यादी 16 ऑगस्ट रोजी जाहीर करू, असं सांगितलं असल्यानं सतत म्हणजे अगदी पहाटे 2.30 पर्यंत फोन येतच होते, या फोनपैकीच एक फोन असा होता की, ‘सर, यादी तेवढी लवकर जाहीर करा, अहो ‘आईसीयू’ मध्ये भरती व्हायची वेळ आली आहे.’ शेवटी पहाटे 2.30 वाजता विवेक राष्ट्रीय लघुपट महोत्सवाच्या फेसबुक पेजवर 38 लघुपटांची यादी जाहीर केली, तसे फोन यायचे बंद झाले.

17 ऑगस्टला सकाळी बरोबर 11 वाजता विजय, जगन्नाथ, अवधूत, अजय, संजय बनसोडे यांनी अभिवादन गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. या महोत्सवासाठी आपल्याला उद्घाटक म्हणून अभिनेते जितेंद्र जोशी, दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, आणि नागराज मंजुळे; तसेच अविनाश पाटील व डॉ. हमीद दाभोलकर आले होते. या सार्‍या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. साठे यांनी केले. वास्तविक पाहता अशा महोत्सवांना तशी गर्दी मोजक्याच लोकांची असते; पण आपल्या महोत्सवासाठीची गर्दी ही विचारांची होती, तुडुंब भरलेले सभागृह लघुपट दाखवून झाला की, त्या कलावंताचं अन् मांडलेल्या विषयाचं कौतुक जमलेली मंडळी टाळ्या वाजवून करायची.

जाता-जाता ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी डॉक्टरांची सांगितलेली आठवण सांगतो. कधी तरी एकदा, डॉक्टर आणि विनोद शिरसाठ यांनी एकत्रित ‘विठोबा’ नावाचा लघुपट पहिला होता, जो की ‘अंधश्रद्धा निर्मूलना’वर बेतला होता, तेव्हा डॉक्टर बोलता-बोलता विनोद शिरसाठ यांना म्हणाले होते की, अशा पद्धतीने लघुपट करण्याची अन् गावोगावी दाखवण्याची गरज आहे. हीच डॉक्टरांची आठवण घेऊन कोश, श्रद्धा, वारी, पावला हे पारितोषिक प्राप्त लघुपट, अ‍ॅनिमेशनपट व माहितीपट घेऊन येत्या काही दिवसांमध्ये आपण महाराष्ट्राचा दौरा करणार आहोत, या फिल्म्स दाखवून चर्चा करणार आहोत. याची सुरुवात आपण दिनांक 18 सप्टेंबर 2016 पासून दिल्ली येथील नावाजलेल्या ‘स्टुडिओ सफदर’ येथून करणार आहोत. यानिमित्तानं एकच सांगावसं वाटतं की, परिवर्तनवादी चळवळींनी कोणत्याच सांस्कृतिक माध्यमापासून स्वत:ला अलिप्त ठेवू नये.

योगेश कुदळे