चिकित्सेला आक्षेप
धर्माच्या अतिरंजित दाव्यांवर लोक विश्वास का ठेवतात? चिकित्सा म्हणजे काय हे त्यांनी कधी ऐकलेलंच नाही म्हणून का? जवळजवळ सर्वच पारंपरिक धार्मिक श्रद्धा विज्ञानपूर्व काळामध्ये म्हणजे वैज्ञानिक पद्धती वापरात येण्याअगोदर जन्माला आलेल्या आहेत. धार्मिक सिद्धांतांच्या उगमाचा छडा निःपक्षपाती अभ्यासाने किंवा वैज्ञानिक शोध पद्धतीने लावणे अत्यंत कठीण आहे; विशेषतः जेव्हा पवित्र धार्मिक सत्यांच्या आधारांची चिकित्सा करायचा प्रयत्न असतो तेव्हा समाज असे प्रयत्न हाणून पाडतो. पाश्चात्य जगात सुद्धा बायबलची चिकित्सा मुद्रणावरील नियंत्रणातून आणि प्रस्थापित संस्थांच्या वैचारिक स्वातंत्र्यावरील दबावातून अगदी अलिकडेच मुक्त झालेली आहे. मुस्लिम जगतात तर कुराणाची चिकित्सा करणे अस्तित्वातच नाही; आणि जर चिकित्सा केली गेलीच तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागणार या भीतीच्या सावटाखालीच करावी लागते; बांगलादेशच्या तस्लिमा नसरीन यांनी केवळ कुराणाच्या चिकित्सेची गरज आहे, एवढेच म्हटल्याने त्यांना काय-काय भोगावे लागले हे आपण जाणतोच. महंमदाच्या दैवी सत्तेविषयी शंका व्यक्त करणं याला कुराणानेच ईश्वरनिंदा मानलं आहे आणि त्यासाठी फतवा काढून अपराध्याला कठोर शासन देता येते.
प्रेषितांद्वारे किंवा साक्षात्कारामुळे निर्माण झालेले प्राचीन धर्म- ज्यू, ख्रिस्ती व इस्लाम- या सार्यांचा असा दावा असतो की इतिहासात विशिष्ट काळात ईश्वराने मध्यस्थी केली; तो मोझेसशी आणि प्रेषितांशी बोलला, त्याने ख्रिस्ताला पुनरुज्जीवित केले किंवा गॅब्रिएलच्या मार्फत त्याने महंमदाशी संवाद साधला. चिकित्सकांचं मात्र असं म्हणणं आहे की या अधिनैसर्गिक म्हणजे निसर्गनियमांना डावलून घडणार्या घटनांच्या (पॅरानॅचरल) दाव्यांना पुरेशी पुष्टी देणारे कोणतेही स्वतंत्र पुरावे उपलब्ध झालेले नाहीत किंवा या घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदारही नाहीत. अर्थात या तथाकथित पवित्र ग्रंथांमध्ये प्राचीन भटक्या आणि शेती करू लागलेल्या समाजांच्या धर्मशास्त्रविषयक आणि आध्यात्मिक उत्कट इच्छा किंवा आर्तता आहेत. तसेच त्यावेळेच्या माणसांच्या नैतिक ऊर्मी या ग्रंथांमधून प्रकट होतात हे मान्य करावे लागेल. मूळ प्राथमिक स्रोताऐवजी त्या दुसर्या अगर तिसर्या स्रोताकडून मिळालेल्या ऐकीव माहितीवरून अनेक दशके उलटून गेल्यानंतर लिखित स्वरूपात मांडल्या गेल्या. त्यांच्या या रूपक कथांमध्ये निव्वळ काल्पनिक वाटाव्यात अशा नाट्यपूर्ण गोष्टी विणल्या गेल्या आणि आपल्या धर्माचा प्रसार करण्यासाठी त्या उत्कट भावनापूर्ण शैलीत लिहिण्यात आल्या. हे पवित्र ग्रंथ श्रद्धाळूंना या दुःखमय जगानंतर एका दुसर्याच (सुखसंपन्न) जगाची ग्वाही देतात. अस्तित्वाच्या संघर्षातील अनंत अडचणींना तोंड देता-देता मेटाकुटीला आलेल्या गरिबांच्या कित्येक पिढ्यांना यातून सुटका मिळविण्याचा आकर्षक संदेश या ग्रंथांनी दिला. श्रद्धाळूंनी त्यांच्या या संदेशाला पूर्णसत्य मानले. शेकडो वर्षांनंतर ते समाजाच्या अंगी बाणले. कालांतराने या एकेश्वरी धर्मसंस्था प्रभावशाली राजकीय, सैनिकी आणि आर्थिक संस्थांशी गुंफल्या गेल्या वा गुंफण्यात आल्या आणि धार्मिक आणि ऐहिक सत्तांच्या संयोगाने या पवित्र ग्रंथांच्या संदेशांना (धर्माज्ञांना) जास्तच बळकटी आली.
त्याचप्रमाणे श्रद्धाळू लोकही स्वतःची फसवणूक करून घ्यायला अगदी उत्सुक असतात. कोणतेही सबळ पुरावे न मागता; किंबहुना पुराव्यांची गरज साफ धुडकावून देऊन अलौकिक शक्तींचे दावे खरे मानायला लोक अगदी उतावीळ असतात. अशा तर्हेच्या वृत्ती सामान्य लोकांप्रमाणे वैज्ञानिकांमध्येसुद्धा दिसून येतात. कारण वैज्ञानिक कोणत्यातरी एखाद्याच विषयाचे तज्ज्ञ असतात आणि या फसवाफसवीच्या कलेमध्ये तर अगदीच अनभिज्ञ असतात. या जगापलिकडे एक वेगळे अस्तित्व आहे, हे सिद्ध करण्यासाठी एक मोठा उद्योगच भरभराटीला येत आहे. यामध्ये पुनर्जन्मावरील विश्वास किंवा या संकल्पनेचा आधार आहे ‘पूर्वायुष्यामध्ये प्रतिगमन करण्याची प्रक्रिया’ म्हणजे मागील जन्माच्या आठवणी जाग्या करणं ही मानसिक क्रिया. हाच पुनर्जन्म कल्पनेचा आधार म्हणून दाखवला जात आहे.
वरील सर्व ऊहापोह प्रेषितांद्वारे किंवा साक्षात्कारांमुळे निर्माण झालेल्या धर्मांबद्दल केलेला आहे. यामध्ये भारतातील अल्पसंख्याकांचे इस्लाम, ख्रिश्चन व यहुदी धर्म आहेत. परंतु भारतीय हिंदू बहुसंख्याकांच्या धर्माविषयी चर्चा केलेली नाही. हिंदू धर्मामध्ये या धर्मांसारखा एक प्रेषित, त्याला झालेला साक्षात्कार व त्याने सांगितलेल्या धर्माचा एक धर्मग्रंथ असे काहीही नाही. परंतु हिंदू धर्म सनातन मानला जातो. या धर्माचे वेद हे आदिग्रंथ अपौरुषेय मानले आहेत. वेदांना काही लोक मानतात तर काही त्यांचे प्रामाण्य मानीत नाहीत. ईश्वरालाही न मानणारे हिंदू आहेत. तरीही बहुसंख्य हिंदू पुनर्जन्म व कर्मविपाक सिद्धांत मानणारे आणि इतर धर्मियांसारखेच चमत्कारांचे सूत कातून विणलेल्या अचाट कल्पनांच्या पौराणिक कथा खर्या मानून त्यांच्यावर श्रद्धा ठेवणारे, असेच असतात. एवढेच नव्हे, तर नवनवीन पंथ व नवीन देवता निर्माण करून त्यांच्या पूजापाठामध्ये शक्ती, युक्ती आणि संपत्ती खर्च करीत राहतात. यातील प्रत्येक निर्मितीमागे किमान एक तरी मिथ्यकथा असते. अशा मिथ्यकथा रचण्यामध्ये आणि त्या खर्या मानण्यामध्ये सार्या वैज्ञानिक पुराव्यांना मागे टाकून इतक्या प्रचंड संख्येमध्ये माणसं हिरिरीने भाग का घेत असतात आणि अगदी असंभाव्य आणि विलक्षण अशा कथा खर्या का मानतात; थोडक्यात आपली बुद्धी गहाण का टाकतात, याचं स्पष्टीकरण कसं करायचं हा प्रश्न पुनःपुनः आपल्यापुढे उभा राहतो.
धर्माचे तात्त्विक अधिष्ठान
धार्मिक अनुभवाच्या युक्तिवादात जेव्हा तुम्हाला लोक त्यांना काही खास अनुभव आल्याचे सांगतात तेव्हा त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवायला हवा, असं गृहित धरलेलं असतं. आणखी आश्चर्याची गोष्ट अशी की व्यावसायिक तत्त्ववेत्तेसुद्धा या मताला दुजोरा देतात. गूढ किंवा धार्मिक अनुभव वस्तुनिष्ठदृष्ट्या खरे असतात, निराधार भ्रम किंवा इतर ज्ञात मानसिक विकृती नसतात, असं म्हणायला विश्वासार्ह असा काडीचाही पुरावा नाही याशिवाय लोकांनी वर्णन केलेले धार्मिक अनुभव एकमेकांपासून खूपच भिन्न असतात आणि त्या त्या व्यक्तीच्या संस्कृतीवर अवलंबून असतात. यातून हे अनुभव मानसिक घटनाच असाव्यात, असंच सूचित होतं.
धार्मिक श्रद्धांची चिरकाल टिकणारी शक्ती तीन मोठ्या नाट्यपूर्ण घटनांमधून स्पष्ट दिसून येते. पहिली घटना हाज यात्रेची. दरवर्षी मक्का येथे तीस लक्ष श्रद्धाळू मुस्लिम यात्रेसाठी येतात. काही अलिकडच्या फोटोग्राफमधून असं दिसून येतं की या श्रद्धाळूंमध्ये सर्व तर्हेचे व्यावसायिक; तसेच सर्व वर्गातील लोक असतात. दुसरी अशीच नाट्यपूर्ण घटना म्हणजे हिंदूंचा कुंभमेळा. अलिकडच्याच अशा एका मेळाव्यामध्ये एक करोड श्रद्धाळू गंगेच्या तीरावर हरिद्वार येथे गंगेत स्नान करून आपली पापे धुऊन पुण्य गाठीला मारण्यासाठी जमलेले होते. तिसरी घटना ट्युरीन येथील. इथल्या भव्य कॅथेड्रलमध्ये ख्रिस्ताला पांघरलेले तथाकथित प्रेतवस्त्र लोकांना दर्शनासाठी पुन्हा खुले ठेवले होते. जगाच्या सर्व कानाकोपर्यातून लाखो लोक त्याचे दर्शन घेण्यास येत होते.
मक्केची यात्रा करणार्या मुस्लिम श्रद्धाळूला स्वर्गाचं दार खात्रीने खुलं होणार आणि कुंभ पर्वणीच्या वेळी गंगास्नान करणार्या सार्या हिंदू श्रद्धाळूंची पापे धुतली जाऊन त्यांना पुण्यप्राप्ती होणार, याविषयी अनेक शंका उपस्थित करता येतील. प्राचीन परंपरांवर आधारलेली ही निव्वळ श्रद्धाळू कर्मे आहेत. यांना अनुभवसिद्ध तथ्यांचा काडीचाही आधार नाही, असे विज्ञाननिष्ठ संशयवादी म्हणतील. मक्केतील काब्याभोवती तीन प्रदक्षिणा घालणं किंवा गंगास्नान करणं अशी प्रायश्चित्ताची आणि पश्चात्तापाची कर्मकांडे करून श्रद्धाळू मुसलमान स्वर्गात जातात आणि हिंदू परमात्म्यानजीक पोचतात याला काहीही पुरावा नाही. परंतु या प्राचीन धर्मांच्या श्रद्धाळूंना या धार्मिक कर्मकांडांना काहीही आधार नाही, असं सांगायला गेलं तर ते ऐकूनही घेणार नाहीत.
तसेच ट्युरीनमधल्या प्रेतवस्त्राबाबत तर उपलब्ध असलेला वैज्ञानिक पुरावा ते बनावट असल्याचं सिद्ध करतो. चौदाव्या शतकामध्ये फ्रान्समधील लियरी येथे ही बनवाबनवी घडवून आणल्याचे उघड झाले आहे. आश्चर्याची गोष्ट अशी की, त्याकाळी त्याचा निषेधही त्या भागातल्या धर्मगुरूने केला होता. कारण तेथे आपल्या रोगांवर उपचार करून घेण्यासाठी येणार्या हजारो श्रद्धाळू यात्रेकरूंना फसविण्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता. त्यावरील लाल डाग मानवी रक्ताचे नसून कृत्रिम रंगांचे होते, हे वॉल्टर मॅक्रोन या सूक्ष्मदर्शक बनविणार्या तज्ज्ञाने सिद्ध केले होते. त्याकाळी फ्रान्समध्ये उपलब्ध असलेल्या कृत्रिम रंगांच्या सहाय्याने प्रेतवस्त्रावर आहे तशी प्रतिमा कापडावर रगडून उमटविता येते, हेही जो निकेल यांनी दाखवून दिले आहे. याशिवाय तीन वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये त्या वस्त्राच्या काही तुकड्यांची कार्बन डेटिंग तंत्राने तपासणी केल्यावर ते वस्त्र 1900 नव्हे तर केवळ 700 वर्षे जुने असल्याचे उघड झाले. या सर्व गोष्टी वैज्ञानिक साहित्यात प्रसिद्ध झाल्या होत्या आणि त्यांना प्रसिद्धीही खूप मिळाली होती. संशयवादी वैज्ञानिकांनी प्रेतवस्त्रावरील आकृती हा चमत्कार नसून त्याचं नैसर्गिक स्पष्टीकरण देणार्या या पुराव्याचं जोरदार स्वागत केलं.
प्रेतवस्त्राबाबतच्या श्रद्धेचा पुरस्कार करणार्यांचा पराभव झाला, असे मानणार्या वैज्ञानिकांना हा प्रेतवस्त्राचा धंदा पुन्हा खूप जोमाने फळफळू लागला आहे आणि चिकित्सकांनी चुकीचा निष्कर्ष काढला होता, असा दावा करू लागला आहे, हे पाहून आश्चर्याचा धक्का बसला. भाविक अजूनही असंच म्हणतात की ‘कार्बन 14’ च्या तंत्रात आणि चिकित्सकांच्या तर्कामध्ये त्रुटी आहेत आणि ते वस्त्र येशू ख्रिस्ताचे प्रेतवस्त्रच आहे.
लेखक संपर्क : 9503334895