Categories
जात पंचायत

नंदीवाले जातपंचायतीच्या पंचावर गुन्हा

जानेवारी - २०१७

महाराष्ट्रात भटक्या समाजाच्या 42 जाती व 6 हजार 100 पेक्षा जास्त पोटजाती आहेत. नंदीवाले हा भटक्या समाजापैकीच एक जातसमूह. याच लोकांना तिरसाळी, तिरुमली असेही संबोधले जाते. महाराष्ट्रात तिरुमली समाजाची लोकसंख्या 16 हजारांच्या आसपास आहे. अहमदनगर, बीड या दोन जिल्ह्यांमध्ये नंदीवाल्यांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे.

अन्य भटक्या समाजात असलेल्या जातपंचायतीप्रमाणेच या समाजातही जातपंच व जातपंचायतीचे वर्चस्व संपूर्ण समाजावर आहे. बहुतांश पंच हे अहमदनगर व बीड जिल्ह्यात राहणारेच आहेत.

संगमनेर तालुक्यातील पारेगाव या गावी राहणार्‍या माणिक हाटकर या तरुणाने 2010 या सालात जंगम समाजाच्या मुलीशी आंतरजातीय विवाह केला. व्यक्तीच्या जन्मापासून ते मरणापर्यंतच्या सर्वच बाबी जातपंचांच्या अधिकार क्षेत्रात असल्याने माणिक हाटकरने केलेला आंतरजातीय विवाह त्यांना कसा मानवणार? 2011 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी मानूर (ता. पाथर्डी) येथे जातपंचायत बसली व त्यांनी माणिक हाटकर याच्या संपूर्ण कुटुंबास जातीबाहेर काढले. माणिक हाटकर व त्याच्या वडिलांनी ‘चूक झाली माफ करा जातीबाहेर टाकू नका,’ अशी विनंती केली; तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की, आठ लाख रुपये दंड द्याल, तर जातीत घेतो. हाटकर यांनी पैसे न दिल्याने ते बहिष्कृताचे जिणे जगत होते. त्यानंतरच्या काळात माणिक हाटकरच्या कुटुंबाशी ज्या-ज्या लोकांनी नातेसंबंध जोडले किंवा येणे-जाणे केले, त्या सर्व म्हणजे दहा कुटुंबांना जातपंचांनी बहिष्कृत केले. त्यांना यात्रा-जत्रा, लग्नसमारंभ, अंत्यविधी किंवा अन्य कोणत्याही सुखद किंवा दु:खद प्रसंगात सामील होऊ दिले नाही. या दहा कुटुंबांच्या मुला-मुलींच्या सोयरिकी जमू दिल्या नाहीत. त्यामुळे त्यांची लग्नं खोळंबली. सध्या या दहा कुटुंबातील 17 मुलं-मुली विनालग्नाची आहेत.

5 सप्टेंबर 2016 रोजी पुन्हा टाकळी मानूर येथे तिरुमली समाजाची जातपंचायत भरली. माणिक हाटकर व त्याचे कुटुंब टाकळी मानूर येथे गेले; परंतु पंचांनी त्यांची दखल घेतली नाही. दुसर्‍या दिवशी म्हणजेच 6 सप्टेंबर रोजी भरणार्‍या जातपंचायतीसाठी सर्वजण तेथेच थांबले. 6 सप्टेंबरला पोलीस आल्याची चाहूल लागल्यामुळे जातपंचांची दाणादाण उडाली व ते टाकळी मानूरहून निघून थेट संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथे आले. सायंकाळी सात वाजता जातपंचायत भरली. माणिक हाटकर व त्याच्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी, ‘आम्हास जातीत घ्या, आमच्या मुला-मुलींची लग्नं खोळंबली आहेत,’ अशी विनवणी केली असता, ‘तुम्ही 27 लाख रुपये दिले, तरच जातीत घेऊ,’ असे पंचांनी सांगितले. माणिक हटकरच्या कुटुंबाने पैसे देण्यास असमर्थता दर्शवली असता, अतिशय उद्धट भाषेत हाटकर यांच्या कुटुंबियांना जातपंचांनी शिवीगाळ केली. माणिक हाटकर यांची पत्नी व मामी त्यांच्यासोबत होत्या. त्या पंचांची विनवणी करू लागताच सर्व पंचांनी अश्लील भाषेत शिवीगाळ तर केलीच, परंतु त्या दोघींकडे बघत अश्लील हावभाव व अंगविक्षेप केले. त्यामुळे हाटकर व त्याचे कुटुंबीय गावी परत आले. पंचांची दहशत एवढी होती की, अन्याय होऊनही पोलिसात फिर्याद दाखल करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. परंतु परिसरातील एका नागरिकाने हाटकर कुटुंबियांना महाराष्ट्र अंनिसच्या ‘जातपंचायत मूठमाती अभियाना’संबंधात माहिती दिली व माझा फोन नंबर दिला. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात माणिक हाटकर व त्याचे 15 नातेवाईक माझी भेट घेण्यासाठी आले. त्यांनी त्यांची व्यथा मांडली, परंतु तरीही ते तक्रार करण्याच्या मन:स्थितीत नव्हते. मी त्यांना मानसिक आधार दिला, फिर्याद दाखल करण्याबाबत त्यांची मानसिकता तयार केली. ‘आम्ही विचार करतो’ असे म्हणून ते निघून गेले. परंतु चार-पाच दिवसांनंतर ते पुन्हा आले, ते फिर्याद दाखल करण्याच्या तयारीनेच. माणिक हाटकर, त्याची पत्नी व मामी यांच्या नावाने फिर्याद तयार करून त्यांना संगमनेरचे डी.वाय.एस.पी. अजय देवरे यांच्याकडे घेऊन गेले. देवरेसाहेबांशी चर्चा केली. त्यांनी ताबडतोब संबंधित पोलीस स्टेशनचे पी.आय. औताडेसाहेब यांना बोलवून घेतले व तपास करून फिर्याद दाखल करण्यास सांगितले. तपास करण्याकामी सुमारे 15 दिवसांचा काळ गेल्यानंतर दहा पंचांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. प्रथम 5 नोव्हेंबरला दोन जातपंचांना अटक झाली. कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कस्टडी दिली. दोन दिवसांनंतर आठही पंचांना अटक झाली. 13 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली. नऊ दिवस जातपंचांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली. त्यांचे विरुद्ध खंडणी, जातीय विद्वेष, शिवीगाळ, धमकी देणे या संबंधात 383, 504, 506, 153 (अ) हे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे दाखल होऊन, नऊ दिवस पोलीस कोठडीची हवा खाऊनही जातपंच ‘चोर तर चोर, वर शिरजोर’ या न्यायाने, पीडितांच्या विरोधात निवेदन, मोर्चाची भाषा बोलत आहेत; परंतु त्यांच्या या अरेरावीस न घाबरता लढा सुरूच राहणार आहे. पीडितांना न्याय मिळवून देणारच; परंतु जातपंचायत बरखास्त करणे, हे अंतिम उद्दिष्ट असेल. लढेंगे-जितेंगे!

रंजना गवांदे, संगमनेर

संपर्क : 8275444998