गडहिंग्लज अंधश्रद्धा निर्मूलन शाखेच्या सहकार्याने नेसरी येथील अंनिस शाखेतर्फे श्रीमती विठाबाई लक्ष्मण कांबळे (वय 70) या वृद्धेची जटा काढण्यात आली. नेसरी शाखेचे हे तिसरे जटानिर्मूलन ठरले.
येथील शाखेचे कार्यकर्ते टी. बी. कांबळे यांनी विठाबाई यांते मतपरिवर्तन केले. त्यानुसार येथील नेसरी वाचन मंदिरात हा कार्यक्रम झाला. जिल्हाध्यक्ष प्रा. प्रकाश भोईटे यांनी प्रारंभी मार्गदर्शन करून जट हा अस्वच्छतेमुळे होणारा रोग असून दैवी देणगी वगैरे काही नसल्याचे सांगितले. त्यामुळे जटा काढल्यामुळे देव कोपेल, ही भावना चुकीची असल्याचे सांगून विठाबाई यांची भीती नष्ट केली.
यानंतर प्रा. भोईटे, बाबूराव धबाले, अलका भोईटे यांनी जटांचा गुंता सोडविला. यावेळी अॅड. सयाजीराव पाटील, पांडुरंग करंबळकर, अशोकराव मोहिते, गणपत पाथरवट, जयश्री हुक्केरी, शिवलीला हिडदुगी, सुवर्णलता गोईलकर, दिव्या देसाई, एम. डी. रेडेकर, वसंतराव पाटील, विठ्ठल कांबळे, पांडुरंग पाटील आदींची उपस्थिती होती.
शाखाध्यक्ष एस. एस. मटकर यांनी स्वागत केले. वसंतराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष प्रल्हाद माने यांनी सूत्रसंचालन केले. कार्याध्यक्ष रवींद्र हिडदुगी यांनी आभार मानले.