Categories
आंदोलन

पुण्यातील ‘जवाब दो’ आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद

सप्टेंबर - २०१८

20 ऑगस्ट 2018 हा शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा 5 वा स्मृतिदिन. गेल्या 5 वर्षांत डॉक्टरांच्या खुनासंदर्भात वीरेंद्र तावडे या एकाच व्यक्तीला अटक करण्यात आली होती. या वर्षी 19 ऑगस्टला डॉ. दाभोलकरांचा खुनी पकडला गेला, अशी बातमी आली. गेली पाच वर्षे दर महिन्याला, दरवर्षी महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते तपास यंत्रणांना ‘जवाब दो’ असा जाब रस्त्यावरून विचारत होते. सरकारी यंत्रणांना निवेदने, मोर्चे, धरणे अशा विविध मार्गांनी जाब विचारत होते. न्यायालय तपास यंत्रणांना फटकारत होते. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या 20 ऑगस्टच्या कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे पुणे येथे केले होते. त्याचा वृत्तांत येथे देत आहोत.

राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन

20 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला म्हणजे 19 ऑगस्ट 2018 रोजी संध्याकाळी 6 वाजता ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’ आणि महाराष्ट्र अंनिस यांनी संयुक्तरित्या ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवसा’च्या निमित्ताने परिसंवादाचे आयोजन केले होते. पुणे येथील सिम्बॉयसिस महाविद्यालयात झालेल्या परिसंवादाला श्रोत्यांचा; विशेषत: महाविद्यालयीन युवकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या परिसंवादात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर, ‘ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्क’चे समन्वयक डॉ. विवेक मॉन्टेरो, ज्येष्ठ शास्त्रज्ञ सत्यजित रथ आणि अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर आदी सहभागी झाले होते. सर्वांचे स्वागत करताना सिम्बॉयसीस महाविद्यालयाचे प्रमुख डॉ. शां.ब.मुजुमदार यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार ही जीवनप्रणाली झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

डॉ. विवेक माँटेरो

‘वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ हा देशातील सर्व राज्यात पाळला जाईल, असे सांगताना डॉ. विवेक मॉन्टेरो म्हणाले, “वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे जेवढा पुरावा तेवढेच स्वीकारणे. डॉ. दाभोलकरांचा हा विचार असल्याने त्यांचा स्मृतिदिन हा वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून स्वीकारला आहे. उजव्या विचारसरणीच्या लोकांकडून अवैज्ञानिक विचारसरणीचा प्रचार जाणीवपूर्वक करण्यात येतो, त्याला विरोध केला पाहिजे; तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी लोकशाही व्यवस्था असणे आवश्यक आहे.”

डॉ. जयंत नारळीकर

याप्रसंगी डॉ. जयंत नारळीकर म्हणाले, “21 व्या शतकात जगायला शिकण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक आहे. विज्ञानाचे सर्वच शोध कल्याणकारी असतात, असे नाही, त्यामुळे या शोधांचा उपयोग योग्य प्रकारे करणे आवश्यक आहे. सध्या माहितीचा प्रचंड स्रोत उपलब्ध आहे. या माहितीचा खरेखोटेपणा तज्ज्ञांच्या मदतीने तपासून घेतला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारेच अंधश्रद्धा कोणती, हे ठरविता येईल. लोकांवर अजूनही अवैज्ञानिक गोष्टींचा प्रभाव मोठा आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.”

सत्यजित रथ

सत्यजित रथ म्हणाले, “परंपरा आणि नवता याचे यथार्थ ज्ञान होण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची गरज आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी येथे योग्य वातावरण किंवा शिक्षण नाही, अशी तक्रार केली जाते; पण ती खरी नाही. सर्वसामान्य माणूस दैनंदिन जीवनात अनेक निर्णय वैज्ञानिक दृष्टिकोनानेच घेतो. असे केले तर काय होईल, तसे केले तर काय होईल, असा विचार करून तो कार्यकारणभाव शोधत असतो; परंतु त्याचे शोषण करण्यासाठी शोषकांसाठी त्याची वैज्ञानिक दृष्टिकोनाने विचार करण्याची सवय बदलली, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

यानंतर झालेल्या 20 मिनिटांच्या कार्यक्रमात श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना वक्त्यांनी यथोचित उत्तरे दिली. सूत्रसंचालन करणार्‍या प्रियदर्शनी कर्वे यांनी इंग्रजीत बोललेल्या वक्त्याच्या भाषणाचा सारांश मराठीत, तर मराठीत बोललेल्या वक्त्याच्या भाषणाचा सारांश इंग्रजीत ताबडतोब कथन केला. महाराष्ट्र अं.नि.स.चे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी आभारप्रदर्शन केले. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने अतिशय प्रभावशाली असा हा कार्यक्रम झाला.

मुक्ता दाभोलकर

आपले मनोगत व्यक्त करताना मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “अवैज्ञानिक गोष्टींचा वापर करूनच लोकांचे शोषण मोठ्या प्रमाणावर केले जाते. वैज्ञानिक दृष्टिकोन हा शोषणमुक्तीचा एक मार्ग आहे. हा मार्ग कठीण असला, तरी त्याला पर्याय नाही. लोकांच्या अडचणी समजून घेणे महत्त्वाचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणार्‍यांना होणारा हिंसात्मक विरोध ही एक मोठी समस्या आहे; पण त्याचा मुकाबला केलाच पाहिजे. तर्काच्या आधारे निर्णय करण्याची सवय लागली पाहिजे.”

कँडल मार्च

19 ऑगस्टलाच रात्री 8 वाजता कार्यकर्ते विठ्ठल रामजी शिंदे पुलावर जमले. जेथे डॉ. दाभोलकरांचा खून झाला, त्या ठिकाणीच मेणबत्त्या पेटवून डॉ. दाभोलकरांना दरवर्षीप्रमाणे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ‘शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर अमर रहे’ अशा घोषणा देण्यात आल्या.

पुलावर आंदोलन

दि. 20 ऑगस्ट रोजी शेकडो कार्यकर्ते सकाळी लवकरच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर जमले. महाराष्ट्र अंनिस बरोबर समविचारी संघटनांचे अनेक कार्यकर्ते; तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. डॉक्टरांचा खून झाला, बरोबर त्या वेळेला म्हणजे सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी डफावर तीन वेळा आवाज काढण्यात आले. डॉक्टरांवर झाडलेल्या तीन गोळ्यांचे ते प्रतीक होते. त्यानंतर चळवळीची गाणी म्हणून घोषणा देण्यात आल्या. पावसाला न जुमानता अनेक कार्यकर्ते व मान्यवर शहीद दाभोलकरांना अभिवादन करण्यासाठी व शासनाला जबाब मागण्यासाठी एकत्र जमले होते. यावेळी डॉ. बाबा आढाव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्रा. सुभाष वारे, कॉम्रेड अजित अभ्यंकर, कामगार नेत्या मुक्ता मनोहर, लक्ष्मीकांत देशमुख, अतुल पेठे, डॉ. शैलाताई दाभोलकर, अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, मेघा पानसरे, नितीन पवार, सिनेदिग्दर्शक सुनील सुकथनकर आदी मान्यवर उपस्थित होते. सीबीआयने मारेकरी पकडले म्हणून आपण समाधानी न राहता सूत्रधाराला पकडण्यासाठी शासनावर दबाव आणला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. बाबा आढाव यांनी केले. अहिंसेचा पुरस्कार करणारे, लोकांना चांगले व तर्कशुद्ध विचार करायला सांगणार्‍या डॉ. दाभोलकरांचा खून कोणी व कशासाठी केला असावा, अशी विचारणा सोनाली कुलकर्णी यांनी केली. अंधश्रद्धा झुगारून देण्यासाठी आपण वचनबद्ध होऊया, असेही आवाहन सोनाली कुलकर्णी यांनी केले. प्रा. सुभाष वारे, अजित अभ्यंकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. राजू इनामदार व सहकार्‍यांनी ‘आम्ही प्रकाशबीजे रुजवित चाललो’ हे गाणे म्हटल्यानंतर 8 वाजून 15 मिनिटांनी सर्व कार्यकर्ते पायी रॅलीने वि. रा. शिंदे पुलावरून निघाले.

निषेध रॅली

‘फुले-शाहू-आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर,’ ‘विवेकाचा आवाज बुलंद करू या,’ ‘गोळीने विचार मरतात का?’ ‘हू किल्ड दाभोलकर, जबाब दो, जबाब दो’ अशा विविध घोषणा देत शेकडो कार्यकर्त्यांचा पायी मोर्चा शिस्तबद्ध रीतीने निघाला. रहदारीला अडथळा येऊ नये, याची दक्षता घेण्यात येत होती. पोलीस बंदोबस्तही चोख होता. अनेक पुरोगामी संघटनांचे तरुण कार्यकर्ते या ‘जबाब दो’ आंदोलनात सहभागी झाले होते. सर्व कार्यकर्त्यांच्या हातात घोषणाफलक होते. या फलकांद्वारे कार्यकर्ते शासनाचा निषेध करून मारेकरी व सूत्रधार यांना केव्हा पकडणार याचा जबाब मागत होते. सुमारे एक तासाने हा पायी मोर्चा पर्वतीच्या पायथ्याला असणार्‍या राष्ट्र सेवा दलाच्या प्रांगणात पोचला. सतत पडणारा पाऊसही कार्यकर्त्यांच्या उत्साहाला आणि आवेशाला रोखू शकला नाही.

राष्ट्र सेवा दलाच्या ‘निळूभाऊ फुले सभागृह’ येथे दिवसभराच्या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. येथे पोचल्यानंतर सर्वांना चहा-नाष्टा देण्यात आला. मोर्चाचे आणि दिवसभराच्या कार्यक्रमाचे अत्यंत शिस्तबद्ध नियोजन अतुल पेठे सर यांच्या मार्गदर्शनाने आणि नेतृत्वाखाली करण्यात आले होते. त्यांनी बरोबर 10 वाजता सर्वांना स्थानापन्न होण्याचे आवाहन करत कार्यक्रमाची सुरुवात केली. इस्लामपूरच्या अंनिस गटाने ‘संकटे दाही दिशा,’ ‘मुल्क है आवाज दो,’ ‘जिंदगी मौत ना बन जाये, संभालो यारो’ ही तीन गाणी सादर करून वातावरण निर्मिती केली.

व्यर्थ ना हो बलिदान

या नंतर ‘व्यर्थ ना हो बलिदान’ या पहिल्या सत्राला सुरुवात झाली. अतुल पेठे यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले. यामध्ये मुक्ता दाभोलकर, मेघा पानसरे, अमोल पालेकर, अशोक धिवरे आणि तुषार गांधी सहभागी झाले होते. प्रास्ताविक करताना अतुल पेठे यांनी गेल्या पाच वर्षांत आलेल्या विविध कलाकार, विचारवंत व नेते मंडळींचा नामोल्लेख केला. सत्राची सुरुवात करताना मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, “विवेकाचा आवाज उठविणारा प्रत्येक मनुष्य हा प्रवाहाविरुद्धच पोहत असतो. ऊर्जा असलेली व संवादावर विश्वास असणारी माणसे निर्माण करणे हे अंनिसचे ध्येय आहे. ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे उच्चारणे कठीण असले, तरी आवश्यक आहे. रचनात्मक कार्य करण्यासाठी संघर्ष करावाच लागेल. विवेकी लोकांना दुर्जन ठरवून त्यांचा नाश करण्याची भाषा जाहीरपणे बोलणार्‍यांविरुद्ध शासन केव्हा कारवाई करणार आहे? डॉ. दाभोलकरांच्या मारेकर्‍यांना अटक केल्याचे तपासयंत्रणा सांगत असल्या तरी तेवढे पुरेसे नाही. कटाच्या सूत्रधारापर्यंत पोचून त्याला शासन होईपर्यंत ‘जबाब दो’ आंदोलन सुरूच ठेवावे लागेल.

यानंतर ज्येष्ठ सिनेकलावंत अमोल पालेकर यांनी डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतरच्या पाच वर्षांतील घटनांचा आढावा घेतला. आपण संघर्ष केला नाही, तर हा लढा विस्मरणात जाईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, “शहिदांचे केवळ स्मरण करून भागणार नाही, तर विचारवंतांनी कृतिशील होणे गरजेचे आहे. न्याय मिळविण्यासाठी प्रचंड ऊर्जा खर्च करावी लागते, त्याची मानसिकता ठेवली पाहिजे. सतत खोटे बोलणे, अपप्रचार करणे ही सनातनी प्रवृत्ती आहे. कर्नाटकात बीजेपीचे सरकार नाही. त्यामुळे तेथील तपास यंत्रणा अधिक सक्षमपणे खुनाचा तपास करू शकल्या. निर्भयतेचे मूल्य सतत मांडत राहणे व जपणे हे आवश्यक आहे.”

अशोक धिवरे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उपाध्यक्ष व माजी पोलीस महानिरिक्षक अशोक धिवरे सर म्हणाले, “विचारांची लढाई आजची नसून अनंत काळापासूनची आहे. विरोधकांच्या हिंसाचाराचे स्वरूप आपण लोकांसमोर आणले पाहिजे. विवेक जागृत ठेवण्यासाठी माणसांच्या मनाची मशागत केली पाहिजे.”

तुषार गांधी

महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी पहिल्या सत्राचा समारोप करताना म्हणाले, “आतापर्यंत अनेक बलिदान व्यर्थ गेले आहेत. भगतसिंह, महात्मा गांधी यांचे विचार लोकांपर्यंत पोचले नाहीत, याचाच अर्थ त्यांचे बलिदान व्यर्थ गेले आहे. विचारांचा प्रतिकार विचारांनी करू न शकणे ही विरोधकांची कमजोरी आहे. त्यांची खुनी संस्कृती आहे. विचारवंतांचे बलिदान व्यर्थ जाऊ द्यायचे नसेल, तर अशा घटनांविषयी मनात राग असला पाहिजे. तो राग नियंत्रणात असला पाहिजे. खून करण्यास व्यक्ती नाही, तर संस्था जबाबदार आहेत. अशा संस्थांचीच एक शाखा आपल्यावर राज्य करत आहे. या संस्थांना न्यायालय शिक्षा देऊ शकत नसेल, तर समाजाने त्यांना वेगळे पाडून शिक्षा दिली पाहिजे. प्रश्न विचारणार्‍यांना देशद्रोही ठरवून त्यांना मारण्यात येत आहे. ही विचारसरणी अत्यंत घातक असून ती देशाची फाळणी करू शकते. खून केल्याने विचार संपतील, ही अशा संस्थांची अंधश्रद्धा आहे. पुढील पिढ्यांमध्ये उदारमतवादी विचार रुजविणे, ही आपली जबाबदारी आहे. खुनी सापडले म्हणून आपण थांबलो, तर आपल्याला विद्वेषाच्या वातावरणातच जगावे लागेल. आपले विचार प्रखर असले पाहिजेत. या विचारांच्या तसदीवरच आपण संघटित होऊन लढले पाहिजे.”

पुस्तक प्रकाशन

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी लिहिलेली सर्व पुस्तके मराठीत आहेत. डॉक्टरांचे विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविण्यासाठी डॉक्टरांच्या पुस्तकाचा हिंदी व इंग्रजीत अनुवाद करून ती पुस्तके प्रकाशित करण्याचे अंनिसने ठरविले आहे. डॉ. दाभोलकरांनी लिहिलेल्या ‘तिमिरातून तेजाकडे’ या पुस्तकाचा हिंदी अनुवाद ‘भ्रम और निरासन’ या नावाने करण्यात आला. या हिंदी पुस्तकाचे लोकार्पण ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुस्तकाचे अनुवादक प्रा. विजय शिंदे, पुस्तक संपादित करणार्‍या प्रा. चंदा सोनकर व प्रा. काशीद हे उपस्थित होते.

रावसाहेब कसबे

या वेळी विस्तृत मांडणी करताना रावसाहेब कसबे यांनी खालीलप्रमाणे विचार मांडले, “आता जे मारेकरी पकडले गेले आहेत, त्या बातमीतून एक संदेश दिला जातो की, विशिष्ट धर्माचेच लोक दहशतवादी असतात, असे नाही. जे लोक मूलतत्त्ववादी असतात, ते दहशतवादी बनतात; मग धर्म कोणताही असो.

चातुर्वर्ण्य, जातिव्यवस्था, स्त्रीदास्य मानणार्‍या सांस्कृतिक राष्ट्रवादाची कठोर चिकित्सा करणे, त्याविरुद्ध लढाई लढणे, हीच डॉ. दाभोलकरांना खरी आदरांजली ठरेल. डॉ. दाभोलकरांचे विचार देशभरात पोचले, तर ते केवळ हुतात्मा न राहता क्रांतिवीर ठरतील!”

या सत्राचे सूत्रसंचालन अतिशय समर्पक व खुसखुशीत शब्दात पुणे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे यांनी केले.

गांधींचे करायचे काय?’

भोजनानंतर झालेल्या तिसर्‍या सत्राची सुरुवात इचलकरंजी येथील कार्यकर्ता सुनील स्वामी यांनी संविधानाविषयी म्हटलेल्या जोरदार पोवाड्याने झाली. संविधानाची महती सांगणारा हा पोवाडा स्वामी सर यांनी स्वत:च रचला आहे. टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांच्या पोवाड्याला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. या सत्रामध्ये इचलकरंजी येथील स्मिता पाटील कला पथकाने संजय रेंदाळकर लिखित ‘गांधींचे करायचे काय?’ हे इचलकरंजी येथील महाराष्ट्र अंनिस व राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी सुमारे 50 मिनिटांचे नाटक सादर केले. गांधींचे विचार आणि विचारांवरील आक्षेपांचे निराकरण अत्यंत प्रभावी पद्धतीने या नाटकात मांडण्यात आले. आपापले नोकरी-व्यवसाय सांभाळून हे नाटक करणार्‍या कार्यकर्त्यांनी उत्तम अभिनयाद्वारे प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवत कलाकारांचे विशेष कौतुक केले.

समारोपाच्या सत्रात डॉ. शैलाताई दाभोलकर यांनी नाटकाचे व त्यात अभिनय करणार्‍या कलाकारांचे खास कौतुक केले. तसेच सकाळी वि. रा. शिंदे पुलावर झालेला कार्यक्रम, पायी रॅली व दिवसभरातल्या कार्यक्रमांनी आपण भारावून गेल्याचे डॉ. शैलाताई दाभोलकर म्हणाल्या. या सर्व कार्यक्रमांसाठी मेहनत घेतलेल्या पुणे जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना मिलिंद देशमुख यांनी मंचावर आमंत्रित केले. उपस्थित लोकांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले. यावेळी चाकणच्या कार्यकर्त्यांनी ‘जातीचा ह्यो किल्ला’ हे गीत सादर केले. भानुदास दुसाणे या कार्यकर्त्याने सादर केलेल्या ‘गोळी बंदुकीची सुटली’ या गीताने सर्वांना गहिवरून आले. शेवटी ‘हम होंगे कामयाब!’ हे गीत सामूहिकपणे म्हणून कार्यक्रमाची सांगता आली. या सर्व कार्यक्रमात विशेष उल्लेख केला पाहिजे तो ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांचा. पूर्ण दिवसाच्या कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन, नेटके व शिस्तबद्ध आयोजन, कार्यक्रमाच्या विविधतेतील कल्पकता हे सर्व अतुल पेठे सरांच्या मार्गदर्शनाने व नेतृत्वानेच शक्य झाले. अशा प्रकारे दिवसभर झालेल्या जोरदार कार्यक्रमाने कार्यकर्ते एक नवीन जोश व नवा विचार घेऊन चळवळीत अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प करूनच घरी परतले.

आणखी एका विशेष उपक्रमाचा उल्लेख केल्याशिवाय या वृत्तांताची पूर्तता होणार नाही. अंनिस पुणेचे ज्येष्ठ कार्यकर्ता अरुण जाधव यांनी गेल्या पाच वर्षांत विविध वर्तमानपत्रांत आलेल्या डॉक्टरांच्या खुनाच्या संदर्भातील बातम्या, अंनिसच्या विविध उपक्रमांविषयीच्या बातम्यांच्या कात्रणांचे संकलन केले. ही बातम्यांची कात्रणे कार्डशीटवर लावून त्याचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालनात दि. 19 व 20 ऑगस्ट रोजी भरविले. डॉ. शैलाताई दाभोलकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शैलाताई म्हणाल्या, “दाभोलकर खून प्रकरणात माळेचे मणी सापडले आहेत लवकरच त्याचा धागाही सापडेल.” डॉक्टर नेहमी म्हणायचे, “आपल्या कामाचे डॉक्युमेंटेशन करणे जरुरीचे आहे. निदान गेल्या पाच वर्षांचे डॉक्युमेंटेशन अरुण जाधव यांच्यामुळे झाले, म्हणून मी त्यांचे कौतुक करते.” शेकडो लोकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन अंनिसच्या कार्याविषयी माहिती करून घेतली. ‘अंनिस’ तर्फे अरुण जाधव यांचे विशेष आभार!