Categories
अनिष्ट रुढी - परंपरा अभियान

मासिक पाळी तर निसर्गाचा आविष्कार;
मग उपासना स्वातंत्र्याला का नकार?

जानेवारी - २०१९

समाजात स्त्रियांच्या दुय्यमत्वाला अधोरेखित करणारी घटना घडते. अशा घटनेचा विषय घेऊन महाअंनिस महिला सहभाग विभागातर्फे 3 ते 12 जानेवारीदरम्यान महिला सबलीकरण व प्रबोधन अभियान राबविण्यात येते. यंदा केरळमधील शबरीमला येथे अय्यप्पाच्या मंदिरात 10 ते 50 वर्षेवयोगटातील महिलांना मासिक पाळी येते, म्हणून प्रवेशबंदी हा विषय पूर्ण भारतभर चर्चिला गेला. अय्यप्पा हा कट्टर ब्रह्मचारी देव. त्यामुळे पूर्वापार असलेल्या महिला प्रवेशबंदीवर केरळ उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब करून प्रवेशबंदीचा आदेश काढला. त्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि सर्वोच्च न्यायालयाने या आदेशाविरोधात निकाल दिला. त्याला संविधानातील समता, बंधुता आणि उपासना स्वातंत्र्य या मूल्यांचा आधार दिला. मासिक पाळी म्हणजे विटाळ असे म्हणून स्त्रियांना अस्पृश्य मानून दुय्यमत्व दिले जाते. अशा घटना शनिशिंगणापूर, हाजी अली आणि आता शबरीमला येथे घडत आहेत. हा संविधानाचा आणि सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. हाच विषय यंदाच्या महिला सबलीकरण व प्रबोधन अभियानाचा घेण्यात आला.

“मासिक पाळी तर निसर्गाचा आविष्कार, मग उपासना स्वातंत्र्याला का नकार?” हे शीर्षक घेऊन हे अभियान राबविण्यात आले. यामध्ये ‘कोष’ शॉर्टफिल्म, ‘सखी आली माझ्या दारी, करू तिची गं तयारी’ या सावनी आणि प्रसाद गोडबोले यांच्या गीताची व्हिडीओ क्लिप आणि एस. एस. शिंदे यांच्या गीताचा समावेश होता; शिवाय पाळीसंदर्भातील प्रश्नांचा मुक्त संवाद करण्यात आला. या अभियानाचे उद्घाटन वर्धा येथे गो. से. वाणिज्य महाविद्यालयात केले. प्रा. डॉ. अब्दुल बारी हे अध्यक्ष आणि महाअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील उद्घाटक होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी प्राचार्य डॉ. बारी, अविनाश पाटील व उषा शहा, राज्य महिला सहभाग विभाग कार्यवाह यांनी मार्गदर्शन केले. त्याचदिवशी या अभियानाचा तिसरा कार्यक्रम यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वायगाव, वर्धा येथे झाला, तेव्हा दहावीच्या 100 मुली उपस्थित होत्या. प्राचार्य डी. जी. देवढे हे अध्यक्ष होते. त्यांनी आणि उषा शहा व सारिका डेहनकर, जिल्हा प्रधान सचिव यांनी मार्गदर्शन केले. या तिन्ही कार्यक्रमांना राज्य सरचिटणीस गजेंद्र सुरकार, जिल्हाध्यक्ष बाबाराव किटे, सरोज किटे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे, प्रधान सचिव सारिका डेहनकर; तसेच डॉ. बुटले, मेश्राम, ढाले, गोटे, कोटंबकर, मिसाळ, मुरडीव इत्यादी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. त्यांचे सहकार्य कौतुकास्पद होते.

दि. 12 जानेवारी रोजी अभियानाचा समारोप लातूर येथे करण्यात आला. उषा शहा यांनी पूर्ण अभियानाच्या 10 दिवसांत महाराष्ट्रभर झालेल्या कार्यक्रमाचा आढावा सादर केला. यावेळी लातूर जिल्ह्यातील वेगवेगळे 100 स्त्री-पुरुष उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बब्रूवहान गोमसाळे होते. राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, प्रधान सचिव माधव बावगे, सरचिटणीस विनायक सावळे, रुक्साना मुल्ला, प्रा. श्रीराम जाधव व शोभा शिरढोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

3ते 12जानेवारी : सबलीकरण व प्रबोधन अभियान

राज्यभरात झालेल्या कार्यक्रमांचा संक्षिप्त आढावा.

3जानेवारी :- अभियानाच्या उद्घाटनाचा वर्धा येथे झालेल्या तीन कार्यक्रमांचा स्वतंत्र अहवाल दिला आहेच. इतर कार्यक्रम.

4) औरंगाबाद – जिल्हास्तरीय युवती परिषद डॉ. सौ. आय. बी. पाठक महिला कला महाविद्यालय, समर्थनगर येथे रा.से.यो.ओपन युनिटच्या वतीने घेण्यात आली. याप्रसंगी 178 युवती आणि महिला उपस्थित होत्या. सरचिटणीस शहाजी भोसले यांनी अभियानाविषयी आणि डॉ. सुजाता वाघमारे, डॉ. रश्मी बोरीकर यांनी मासिक पाळीसंदर्भात मार्गदर्शन केले. सोनालिका नागभिडे यांनी गटचर्चा घेतली. यावेळी डॉ. अजित खोजरे, प्रशांत कांबळे, रमा दूधभांडे, डॉ. मीनाक्षी देव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सहभागींना प्रमाणपत्रे देण्यात आली.

5) भारतीय समाजसेवा केंद्र, औरंगाबाद येथे रा.से.यो. अंतर्गत एक दिवसीय महिला परिषद. शहरातील 60 महिला उपस्थित होत्या. सरचिटणीस शहाजी भोसले व डॉ. शुभांगी पाळंदे यांनी मार्गदर्शन केले. भा.स.से. केंद्राच्या संचालिका वसुधा जातेगावकर, प्रशांत कांबळे, डॉ. रेणू चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. महिलांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

6) महिला कला महाविद्यालय, बीड येथे डॉ. सविता शेटे यांनी कार्यक्रम घेतला. ‘कोष’ फिल्म, गाणी, व्हिडीओ क्लिप आणि पाळीविषयक प्रश्नोत्तरे, संवाद साधला गेला. युवतींची उपस्थिती लक्षणीय होती.

7) महिला महाविद्यालय मांजरसुंबा येथे डॉ. सविता शेटे यांनी ‘कोष’ फिल्म दाखवून पाळीविषयक गाणी आणि प्रश्नोत्तरे असा कार्यक्रम घेतला. उपस्थित युवतींनी अशा कार्यक्रमाची आवश्यकता व्यक्त केली. 100 मुली, महिला व काही पुरुष उपस्थित होते.

4जानेवारी –

8) अमरावती येथील समाजकार्य महाविद्यालय (बडनेरा) येथे कार्यक्रम झाला. येथे युवती आणि युवक दोघेही उपस्थित होते. त्यांची संख्या 250 होती. उषा शहा यांनी अभियान आणि पाळीसंदर्भात मार्गदर्शन केले. कोष फिल्म व गाणी दाखवण्यात आली. युवतींबरोबर युवकांनी सुद्धा अंनिस आणि अभियान यासंदर्भात चांगला संवाद साधला. यावेळी अंनिसच्या कार्यवाह सुनीता संगेकर, सहकार्यवाह रजनी आमले आणि महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दासरवाड आणि प्रा. डॉ. ठाकूर, प्रा. सौ. इंगोले व इतर महिला प्राध्यापक उपस्थित होत्या.

9) अणुऊर्जा वसाहत, तारापूर येथे अभियानाचा कार्यक्रम कडलास्कर अण्णा यांनी घेतला. यावेळी मंदा ढाके यांना सावित्रीबाई पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

10) तीन जानेवारी रोजी डी.वाय.एफ.आय. शाखा पवई येथे प्रा. मुंडे सर आणि रेखा देशपांडे यांनी अभियान आणि पाळीसंदर्भात मार्गदर्शन करून कार्यक्रम घेतला. यावेळी सुशीला मुंडे यांची उपस्थिती आणि मार्गदर्शन खूप मोलाचे झाले.

11) पनवेल शाखेने 3 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे नॅन्सी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत अभियानाच्या विषयावर पथनाट्य सादर केले. 100 च्या आसपास उपस्थिती होती.

12) चार जानेवारी रोजी वाल्मिकीनगर येथे 50 मुली व पालकांसाठी पनवेल टीमने फिल्म दाखवून मासिक पाळीसंदर्भात मांडणी करून चर्चा घडवून कार्यक्रम सादर केला.

13) 5 व 6 जानेवारी रोजी पनवेलच्या 14 कार्यकर्त्यांनी सात बाईक्सवरून 15 गावांना भेट दिली. यासाठी त्यांनी 31 डिसेंबर ते 2 जानेवारीदरम्यान मासिक पाळीसंदर्भातील पथनाट्याचे स्क्रीप्ट तयार करून ते बसवलेही. प्रत्येक गावात लोक जमतील, अशी जागा शोधून सरपंच, सदस्य व घराघरांत जाऊन लोकांना गोळा करून निवेदन करायचे, पथनाट्य सादर केले. मासिक पाळी विषय घेण्याचे कारण व गरज, याविषयी भूमिका मांडली. ‘मासिक पाळी’ हा शब्दही न उच्चारलेल्या महिला व मुली विषय समजल्यावर मोकळेपणाने बोलल्या. पुरुषांनीही या विषयाची गरज मान्य केली. पनवेल शाखेच्या या तरुण कार्यकर्त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. असे कार्यकर्ते सर्व शाखांमध्ये असणे गरजेचे आहे.

6जानेवारी –

29) आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह शहापूर, वाफे येथे महिला सबलीकरण अभियानाचा कोकण विभागीय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अभियानामागची भूमिका स्पष्ट करून ‘कोष’ ही फिल्म दाखविण्यात आली. नंतर गटचर्चा घेऊन त्याचे रिपोर्टिंग घेण्यात आले. प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेतला. अनेक मुलींनी अंनिसशी जोडून घेण्यासाठी स्वत:चे संपर्क क्रमांक दिले. या कार्यक्रमात किरण जाधव, किशोरी गरड आणि सुरेखा भापकर यांचा प्रमुख सहभाग होता.

7जानेवारी –

30) नंदूरबार येथे महिला सबलीकरण अभियानांतर्गत महिला पोलीस कर्मचार्‍यांसाठी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जादूटोणाविरोधी कायद्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

31) चित्रदुर्ग मठ, बसव विचार मंच, कोल्हापूर येथे अभियानाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सुजाता म्हेत्रे यांनी अभियानाच्या विषयासंदर्भात सविस्तर मांडणी केली आणि मार्गदर्शन केले.

32) बार्शी येथील भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. 150 युवती उपस्थित होत्या. यावेळी उषा शहा यांनी मासिक पाळी संदर्भात शास्त्रीय माहिती देऊन तिचा उपासना स्वातंत्र्याला नकार देण्याशी काही संबंध नाही, हे उदाहरण व संत बसवेश्वर, संत सोयराबाई आणि चक्रधर स्वामी यांच्या वचनांचा उल्लेख करून स्पष्ट केले. सुप्रीम कोर्टाचा या संदर्भातील निकाल व संविधानातील मूल्यांचा विचार यावर मुलींनी मुक्त संवाद केला. इतर प्रश्नांची चर्चा झाली. अभियानाचा उद्देश प्रा. हेमंत शिंदे यांनी स्पष्ट केला. प्रा. पाटील यांनी या विषयाची चर्चा आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा. सौ. पाटील, प्रा. सौ. मुळे, इतर महिला प्राध्यापक, अंनिसच्या सौ. जाधवर, विनायक माळी यांची उपस्थिती होती. यावेळी ‘कोष’ ही फिल्म व गाण्यांची व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली.

8जानेवारी –

33) बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयात प्राचार्या डॉ. सौ. रेवडकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. यावेळी 200 युवती उपस्थित होत्या. शॉर्ट फिल्म, गाण्यांची व्हिडीओ क्लिप दाखवण्यात आली. अभियानाचा उद्देश अंनिसचे प्रा. डॉ. अशोक कदम यांनी स्पष्ट केला. मासिक पाळीसंदर्भातील गैरसमजुती आणि रुढी-परंपरा, स्त्रियांना दिलं जाणारं दुय्यमत्व याविषयी उषा शहा यांनी स्पष्टीकरण दिलं. मुलींनीही यासंदर्भातील आपली मतं मांडली. पालकांशीही संवाद होण्याची आवश्यकता बोलून दाखवली. अंनिसच्या इतर विषयांना घेऊन एक कार्यशाळा घेण्याचीही विनंती केली. प्रा. रेवडीकर यांनीही अनेक उदाहरणे देऊन मुलींनी स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. हेमंत शिंदे, विनायक माळी, सौ. जाधवर इत्यादी अंनिसच्या कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

9जानेवारी –

34) जानापूर, ता. उदगीर, जि. लातूर येथील महिला महाविद्यालयात महिला सहभाग विभागाच्या सहकार्यवाह यांनी कार्यक्रम सादर केला. अभियानाच्या आणि मासिक पाळीसंदर्भात त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी 200 युवती हजर होत्या. कामशेटे मठाचे मठपती, गव्हाणे, येरमे, खंडो यांची प्रमुख उपस्थिती होती. मुलींनी विविध प्रश्न विचारून चांगला संवाद साधला. या विषयाची माहिती मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

10जानेवारी –

35) सेवासदन ज्युनि. कॉलेज, सोलापूर येथे शालिनी ओक, उषा शहा, अंजली नानल आणि मधुरा सलवारू यांनी कार्यकम सादर केला. यावेळी ‘कोष’ फिल्म गाण्यांची व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली. उषा शहा यांनी अभियानाच्या विषयास अनुसरून मार्गदर्शन केले. अंजली नानल यांनी प्रश्नोत्तराच्या रुपात मुलींशी संवाद साधला. मधुरा सलवारू यांनी उपासना स्वातंत्र्य या विषयाचा ‘रोल प्ले’ सादर केला. यावेळी 100 मुली उपस्थित होत्या.

11जानेवारी –

36) महिला सबलीकरण अभियानांतर्गत ‘जोडीदाराची विवेकी निवड कार्यशाळा’ मनोरंजन केंद्र क्र.1, विद्युत विहार, कोराडी कॉलनी येथे आयोजित केली होती. यावेळी वीज केंद्राचे मा. दिलीप धकाते व मा. मुकेश मेश्राम, राज्य सरचिटणीस संजय शेंडे, उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे, रामभाऊ डोंगरे, बबनराव गायकवाड, डॉ. गणेश बबनराव दरेकर यांच्यासह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. गौरव आळणे यांचे संयोजन होते. आरती नाईक व सचिन थिटे यांनी कार्यशाळा संवादक म्हणून काम केले.

37) कोल्हापूर येथे शहाजी महाविद्यायात युवतींसाठी कार्यक्रम झाला. यामध्ये सुजाता म्हेत्रे यांनी अभियानाचे महत्त्व विषद केले, तर सीमा पाटील यांनी मासिक पाळीविषयी शास्त्रीय माहिती, सामाजिक वास्तव आणि अनेक उदाहरणे देत मुलींना याविषयी सजग केले. यावेळी ‘कोष’ फिल्म व गाणी दाखविण्यात आली. जिल्हा कार्याध्यक्ष रमेश वडणगेकर यांची संपूर्ण कार्यक्रमात उपस्थिती होती.

12जानेवारी –

38) पी.एन.पी. विद्यालय, वायशेत, ता. अलिबाग येथे सबलीकरण कार्यक्रम घेण्यात आला. नितीन राऊत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नीलेश घरत आणि वैशाली पाटील यांची मोलाची उपस्थिती होती.

39) दिशा फौंडेशन क्लासेस, जळगाव येथे महिलांचे शोषण याविषयी सविस्तर मार्गदर्शन जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे यांनी केले. यावेळी वासुदेव पाटील आणि सूर्यवंशी यांचीही उपस्थिती होती.

40) ते 43) नांदेडमध्ये विविध ठिकाणी एकूण चार कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी अभियानाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून सुलोचना मुखेडकर, डॉ. पुष्पा कोकीळ, उषा गौनवाड, रंजना यांनी मोलाचे काम केले.

44 ते 55) दि. 9, 10, 11 जानेवारी या तीन दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा व राजापूर तालुक्यात एकूण 13 कार्यक्रम महिला सबलीकरण अभियानांतर्गत घेण्यात आले. कार्यक्रम झालेल्या स्थळांची नावे 1) न्यू. इंग्लिश स्कूल, वनगुळे 2) इंदवटी शाळा, लांजा 3) सरस्वती विद्यानिकेतन खावडी 4) जानकीबाई तेंडुलकर महिलाश्रम, लांजा 5) काळे छात्रालय, लांजा 6) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांजा 7) न्यू. इंग्लिश स्कूल, जावडे 8) जावडे शाळा क्र. 1, लांजा 9) जिल्हा परिषद बापरे विद्यालय, लांजा 10) मनोहर हरी खापणे कला व वाणिज्य महाविद्यालय, पाचल, जि. राजापूर 11) सरस्वती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राजापूर 12) कलेश्वर महाविद्यालय, मूर, ता. राजापूर 13) पाचल नगरपंचायत.

या सर्व ठिकाणच्या कार्यक्रमांत ‘कोष’ फिल्म, सावनी गोडबोले आणि शाहीर शिंदे यांचे गीत, चर्चात्मक संवाद आणि प्रश्नोत्तरे हे सर्व राज्य प्रधान सचिव सुशीला मुंडे यांनी एकहाती पार पाडले. मासिक पाळीच्या काळात वेगळे बसण्याची, देवाचा कोप होईल, आपली परंपरा, आई सांगते म्हणून इत्यादी कारणे सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी वेगळे बसण्याने होणारी मानसिक घुसमट, वेळेचा अपव्यय, असमानता; तसेच लिंगभेदावर आधारित अन्याय इत्यादी गोष्टी आईशी मोकळेपणाने बोलण्याचे मान्य केले. कॉलेज व महिलाश्रमात या विषयाची सखोल कार्यशाळा घेण्याचे सुचविण्यात आले.

राज्यात अजूनही कार्यक्रम झाले आहेत; पण त्याची माहिती माझ्यापर्यंत पोचली नाही. त्यामुळे इथे देता आली नाही.

–उषा शहा, सोलापूर

मअंनिस महिला सहभाग विभाग कार्यवाह

संपर्क ः 9423593215