Categories
पर्दाफाश

मुलगाच देणारी अनुबाई, गर्भहत्या करणार्‍या पिटूला कोल्हापूर अंनिसचा दणका

जुलै - २०१७

सौ. अनुबाई केरबा सरनाईक रा. गिरगाव, ता. करवीर, जि. कोल्हापूर ही महिला गरोदर असणार्‍या महिलांना मुलगाच व्हावा म्हणून उपचार करीत होत्या. त्यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर शाखेकडे निनावी तक्रार आली. ही महिला गरोदर राहिलेल्या महिलेस दीड महिना झाल्यावर फुलांच्या कळ्या, अंगारा खायला द्यायची. तसेच डॉक्टरांकडे न जाण्याचा सल्ला द्यायची. त्याचप्रमाणे करणी, भुताटकी, लागीर झालेले असल्यास उपचार करीत असे.

या संदर्भात महाराष्ट्र अंनिस कोल्हापूर शाखेमधील साप्ताहिक बैठकीमध्ये चर्चा झाली. समितीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या महिलेकडे प्रत्यक्ष जायचे ठरविले. त्याप्रमाणे अंनिस कार्यकर्तीने नकली पेशंट होऊन या महिलेची भेट घेतली. कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाशिवाय ही महिला मूल होण्याचे उपचार करीत असल्याचे दिसले. अंनिस राज्य युवा सचिव व इतर कार्यकर्तेयांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर या फसवणुकीबाबत जिल्हाधिकारी, ठाणे अंमलदार करवीर पोलीस ठाणे यांना निवेदन दिले.

पोलीस प्रशासनाने याबाबत कारवाई करून अनुबाई सरनाईक (वय 62) हिला करवीर पोलीस ठाणे येथे हजर केले. या महिलेने असे उपचार करणे बंद केले आहे, अवैद्यकीय औषधे वगैरे देणार नाही, असे माफीनामा पत्र लिहून दिले. त्यानंतर अंनिस कोल्हापूर शाखेच्या स्वाती कोरे, सीमा पाटील, गीता हासूरकर, रमेश वडणगेकर यांनी या महिलेविरुद्ध तक्रार अर्ज मागे घेतला.

अनुबाई सरनाईकने पोलिसांना असे सांगितले की, गेली दोन वर्षेहे उपचार करीत होती. साधारणपणे सन 2017 मध्ये सुरू असलेल्या नोंदीमध्ये दर दिवशी पाच नोंदी आढळल्या, एकूण जवळजवळ 285 महिलांनी या महिलेकडून मुलगाच व्हावा म्हणून औषध घेतले. प्रत्येक महिलेकडून ती 500 रुपये घेत असे, त्यामध्ये एक पोलीस पत्नीही आढळून आली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील पिरवाडी या गावामध्ये गर्भनिदान करणारा पिटू रोडे या तरुणास पोलीस प्रशासनाने अटक केली, त्याने कित्येक मुलींची गर्भातच हत्या केली. त्याच्याकडे मोठ्या संख्येने महिला जात होत्या. काही वेळा मुलगा असतानाही पैशाच्या मोहापायी तो मुलगी आहे म्हणून गर्भपाताची औषधे देत असे. त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नव्हती. त्याचे गर्भनिदान करण्याचे मशीन कागलच्या डॉक्टर महाशयांनीच त्यास दिले होते. गावातील उत्सवात, यात्रेमध्ये पिटू रोडे भरघोस मदत करीत असे. त्याची पोस्टर्स लागली जायची. पिरवाडी येथील कारवाईत महाराष्ट्र अंनिसची पूर्वीची कार्यकर्ती ज्योती भालकर यांनी अतिशय धाडसाने या प्रकरणाचा छडा लावला, त्याबद्दल अंनिस परिवारातर्फे तिचे मन:पूर्वक आभार मानून सत्कार करण्यात आला.

या प्रकरणाबाबत कोल्हापुरातील वृत्तपत्रांनी चांगली प्रसिद्धी दिली. अशा घटना आपल्या आसपास घडत असल्यास संपर्क साधावा, असे आवाहन केले.

कोल्हापूरमधील या महिलेचा पर्दाफाश करण्यासाठी कोल्हापूर अंनिसचे कार्यकर्ते, स्वाती कोरे, सीमा पाटील, गीता हासूरकर, प्रकाश हिरेमठ, राज्य सचिव कृष्णात कोरे, संघसेन जगतकर, रमेश वडणगेकर, शहर कार्याध्यक्ष कपील मुळे यांचे सहकार्य लाभले. करवीर पोलीस ठाण्याचे अंमलदार दिलीप जाधव, पी. एस. मंडले (सहा. पोलीस निरीक्षक), श्रीकांत दाभोलकर पोलीस नाईक यांचे सहकार्य लाभले.

रमेश वडणगेकर, कोल्हापूर

मोबा.9764836994