डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा धर्मांधांनी खून केला, ज्याला गेल्या ऑगस्टला तीन वर्षेपूर्ण झाली. ही हत्या विवेकाचीच हत्या होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील तो भ्याड हल्ला होता. धर्माची विधायक चिकित्सा करून धर्माचे उन्नयन होते, कालानुरूप त्याला अधिक नैतिक आशयाकडे नेले जाते, हे सनातन्यांना कळणार कसं? धर्माचे संरक्षक असल्याचा बहाणा करून, ही मंडळी अवनत धार्मिक कर्मकांडाचे संरक्षण करण्यात गुंतलेली असतात.
डॉ. दाभोलकर, कलबुर्गी आणि कॉम्रेड पानसरे या विचारवंतांच्या हत्येनंतर महाराष्ट्रात आणि देशात गेली तीन वर्षेवेगवेगळ्या मार्गांनी विवेकाचा आवाज अधिक बुलंद करण्याचा निर्धार कार्यकर्ते कृतीने दाखवून देत आहेत. यासाठी वेगवेगळ्या अहिंसात्मक मार्गाचा अवलंब सुरू आहे. ‘निर्भय मॉर्निंग वॉक’, निषेध मोर्चे, कोर्टामार्फत खुन्यांना शिक्षा व्हावी म्हणून घटनात्मक मार्गाचा अवलंब, अशा विविध मार्गांनी हिंसेविरोधात जनप्रबोधन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यांना यशही मिळत आहे. अनेक युवक-युवती अंनिसच्या लढ्यात सहभागी होत आहेत. ‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’ हे घोषवाक्य सर्वत्र दुमदुमू लागले आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनावेळी सांस्कृतिक उठाव झाला होता. या उठावातील अग्रणी होते अमर शेख. आपल्या पोवाड्यांनी त्यांनी उभा महाराष्ट्र जागृत करून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ प्राप्त करून दिले. आज महाराष्ट्रात आणि देशात विचारस्वातंत्र्याची आणि घटनेने दिलेल्या इतर अधिकारांची गळचेपी करू पाहणार्या सत्तांध आणि धर्मांध शक्तीविरोधात स्वातंत्र्याची दुसरी लढाई सुरू झाली आहे.
या लढाईचे रणक्षेत्र दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी हत्येनंतर प्रथम महाराष्ट्राला आणि नंतर संपूर्ण भारताला व्यापून गेलं आहे. या लढाईचे रूपांतर व्यापक जनआंदोलनात होणं आवश्यक आहे. त्यासाठी हवा सांस्कृतिक उठाव. महाराष्ट्र अंनिसने हा उठाव यशस्वी करण्यासाठी विविध मार्ग हाताळायचे निश्चित केले आहे. रिंगणनाट्याच्या रुपाने गतवर्षापासून हा उठाव सुरू झाला. ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर’ या रिंगणनाट्याने दिल्लीपर्यंत धडक मारली. अतुल पेठे यांचे दिग्दर्शन या नाट्याला मिळाले.
या उठावात गेल्या काही दिवसांत एका नव्या माध्यमाची भर पडली आहे, ते म्हणजे लघुपटाचे. प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि त्यांचे सहकारी यांनी ‘अंधश्रद्धा’ या विषयावर लघुपटाची स्पर्धा जाहीर केली. तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एकूण 264 चित्रपट या स्पर्धेत उतरले. त्यातील 40 चित्रपटांची अंतिम महोत्सवासाठी निवड झाली.
नागराज, गार्गी आणि त्यांचे सहकारी यांनी विवेकाच्या चळवळीला या सांस्कृतिक उठावाने मोठे बळ प्राप्त करून दिले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन! नागराज हे एक ध्येयवादी दिग्दर्शक आहेत. जनसामान्यांतून पुढे आलेले हे अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व आहे. अंधश्रद्धांना, जातियतेला आणि धर्मांधतेचा त्यांचा विरोध आहे. अंनिसच्या विचारांशी त्यांची नाळ जुळली आहे. यामुळेच विवेकवादाच्या लढाईत त्यांनी लघुपटाच्या माध्यमातून महाराष्ट्र अंनिसला तरुणाईचे पाठबळ मिळवून देण्यात मोलाची मदत केली आहे. या सांस्कृतिक चळवळीतून महाराष्ट्रातील तरुणाई मोठ्या संख्येने विवेकाच्या लढाईत सामील होईल आणि विचारस्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे दाभोलकरांचे स्वप्न साकार करेल, याबद्दल आम्हाला शंका नाही.