‘व्हॅटिकन सिटी’ हे स्थान ख्रिश्चन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र समजले जाते. पोप हे सर्वोच्च ख्रिश्चन धर्मगुरू ‘व्हॅटिकन’मध्ये राहतात. जगभरातल्या ख्रिश्चन धर्मगुरूंना याठिकाणी धर्मासंदर्भातील विविध गोष्टींचे प्रशिक्षण दिले जाते. ‘व्हॅटिकन सिटी’ ही सध्या एका वेगळ्याच गोष्टीने चर्चेत आलेली आहे. भूतपिशाच, अतींद्रियशक्ती यांची बाधा झालेल्या लोकांची कशी उतरवावी, याविषयीचा एक विशेष कोर्स व्हॅटिकन सिटीमध्ये घेण्यात आल्यामुळे जगभरात याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
तसे पहिले तर, ‘चमत्कारांचा दावा’ आणि ‘भूतपिशाच’ यांच्या वरील विश्वास या गोष्टी व्हॅटिकन सिटी आणि पोप यांच्यासाठी नव्या नाहीत. ख्रिश्चन धर्मियांमध्ये एखाद्या व्यक्तीला संत घोषित करण्याचे अधिकार हे केवळ पोप आणि व्हॅटिकन सिटीला आहेत. व्यक्तीला संत घोषित करण्यासाठी त्या व्यक्तीने दोन चमत्कार केले असणेची पूर्वअट आहे. मदर टेरेसा यांना मागील वर्षी संतपद देण्यात आले. त्यासाठी त्यांनी दोन चमत्कार केल्याचा दावा व्हॅटिकन सिटीमार्फत करण्यात आला होता. त्याअनुषंगाने या चमत्कारांच्या विषयी जगभरातील विवेकवादी लोकांनी जोरदार टीका केली होती. या टीकेला न जुमानता चमत्काराचे निकष बदलण्यात आले नाहीत. आता भूत-पिशाच उतरवण्यासाठी धर्मगुरूंचे शिक्षण करून व्हॅटिकन सिटी आणि पोप काळाची चाके उलटी फिरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे वाटते. विज्ञानवादी विचारांची खूप मोठी परंपरा असलेल्या युरोपमध्ये धर्माच्या नावावर असल्या बाष्कळ गोष्टी खपवल्या जातात, ही गंभीर बाब आहे.
या कोर्समागची पार्श्वभूमी सांगताना असे म्हटले जाते की, केवळ इटलीमध्ये 50 हजारपेक्षा अधिक लोक दरवर्षी भूत-पिशाच उतरवण्यासाठी इंद्रिय शक्तींवर विश्वास ठेवून धर्मगुरूंची मदत घेतात. संपूर्ण युरोपचा विचार केला तर ही संख्या काही लाखात जाईल.आधुनिक विज्ञानाच्या मते भूत-पिशाच, अतींद्रिय शक्ती यासारख्या कोणत्याही गोष्टीला काहीही वैज्ञानिक आधार नाही. कोणत्याही प्रयोगाआधारे त्यांचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही. भीतीपोटी समाजमनावर गोष्टींचा पगडा असला तरी त्यांना वास्तवात कोणताही आधार नाही. अनेकवेळा ‘स्किझोफ्रेनिया’सारख्या मानसिक आजारांमध्ये रुग्ण व्यक्तीला विविध भास आणि भ्रम होत असतात. या लक्षणांमध्ये कोणीही बोलत नसताना आवाज ऐकू येणे, समोर एखादी व्यक्ती नसली तरीही ती दिसणे, अशा गोष्टी आजारामुळे मेंदूत झालेल्या रासायनिक बदलातून घडून येतात. विकसनशील देश नव्हे, तर विकसित देशांमध्ये देखील या आजारांविषयी टोकाचे अज्ञान असल्यामुळे आजारी व्यक्तीला आणि काही वेळा त्यांच्या नातेवाईकांना देखील या गोष्टी अतींद्रिय शक्तीमुळे अथवा भूत-पिशाच यांच्या प्रभावातून घडून आल्या आहेत, असे वाटू शकते. आयुष्यातील शिक्षण, अर्थकारण, कौटुंबिक ताणतणाव यांच्यामधून व्यथित झालेल्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातील चाललेला वाईट कालखंड हा भूत-पिशाच अशा अतींद्रिय शक्तींच्या प्रभावातून होत आहे, असे वाटू शकते. आपल्या त्रासाला बाह्यशक्तींना जबाबदार धरण्याची आदिम मानसिकता आपल्या सर्वांच्यात असते. चांगल्या धर्मश्रद्धेने लोकांना आपल्या आयुष्यातील प्रश्नांची कारणमीमांसा तपासून त्याप्रमाणे उत्तरे शोधायला शिकवणे अपेक्षित असते. त्याऐवजी लोकांची दिशाभूल करून त्यांना अतींद्रिय शक्तींच्या सारख्या चुकीच्या गोष्टींच्या मागे लावणे हे धोक्याचे आहे. अशा व्यक्तींना खरेतर मनोविकारतज्ज्ञ आणि समुपदेशन यांची गरज असते. अशावेळी धर्मगुरूंना जर प्रशिक्षणच द्यायचे असेल, तर अशा लोकांना असलेला त्रास कसा ओळखावा? त्यांना योग्य तज्ज्ञाकडे कसे पाठवावे? याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ते काहीही न करता, ज्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही, अशा भोंदूगिरीचे प्रशिक्षण ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च संस्थेने देणे हे अशा गोष्टींवर विश्वास ठेवणार्या लोकांची फसवणूक करणे आहे.
‘पृथ्वी सूर्याभोवती फिरते’, हे वैज्ञानिक सत्य सांगण्याचे धाडस करणार्या गॅलिलिओला चर्चने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. गॅलिलिओने माफी मागितल्यामुळे पुढे ती शिक्षा स्थगित झाली. पुढे तीनशे वर्षांनी का होईना, चर्चने गॅलिलिओची माफी मागितली. या माफीचे कारण हे, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सत्य नाकारण्यामधील हास्यास्पदता व आपली चूक चर्चच्या लक्षात आली हे होते. आपली चूक दुरुस्त केल्याने कुठल्याही धर्माची अप्रतिष्ठा होण्याऐवजी प्रतिष्ठाच वाढते. विज्ञान हे कायम आपली चूक सिद्ध झाल्यास ती दुरुस्त करते आणि म्हणून प्रवाही राहते. गॅलिलिओच्या बाबतीत झालेली चूक आणि माफीनामा यांची पुनरावृत्ती जर चर्चला नको असेल, तर त्यांनी तातडीने धर्मगुरूंना अतींद्रिय शक्तीवर उपचार करण्याचे दिले जाणारे धडे थांबवायला हवेत व असे कोर्स चालू केल्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करायला हवी.
विज्ञानवादी विचार आणि सेवाभाव यांचा मोठा वारसा हा जरी युरोपला असला तरी आशा भोंदूगिरीला पाठिंबा दिल्याने त्यांचे जगभर हसे होत आहे. सॅम हॅरिस, रिचर्ड डॉकिन्ससारखे अनेक विवेकवादी विचारवंत ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धांविषयी सातत्याने टीका करीत असतात. सॅम हॅरिसने आपल्याला, ‘एन्ड ऑफ फेथ’, तसेच ‘लेटर टू ख्रिश्चन नेशन’ अशा बेस्टसेलर पुस्तकांमधून ख्रिश्चन धर्मातील अंधश्रद्धांविषयी जोरदार आवाज उठवला आहे. सध्याचे पोपही सुधारणावादी विचारांचे आहेत. समलिंगी संबंधांविषयी त्यांनी प्रागतिक मते व्यक्त केली आहेत. असे असताना अतींद्रिय शक्तीसारख्या भोंदूगिरीवर देखील त्यांनी विज्ञानवादी भूमिका घेणे आवश्यक आहे, असे वाटते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात. शिक्षण, व्यवसाय, नातेसंबंध, प्रेम, लग्न यामधील अपयश आर्थिक ताण अशा विविध स्वरुपाच्या अडचणी असतात. त्या अडचणींना असलेली खरी कारणे शोधण्याऐवजी बाह्यशक्तीवरती ते कारण ढकलून देणे आणि परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याऐवजी अतींद्रिय शक्तींचा दावा करणे ही वास्तवापासून पळून जाण्याची मानसिकता आहे. धर्मसंस्थेचे खरे उद्दिष्ट हे लोकांना वास्तवाला सामोरे जाण्यासाठीची कौशल्ये देणे असायला हवे. त्याऐवजी लोकांची दिशाभूल करण्याचे जे काम व्हॅटिकन सिटी मार्फत होत आहे, ते नक्कीच निंदनीय आहे.
भारतामध्ये देखील भूतप्रेत, पिशाच यांची बाधा आणि ते उतरवण्यासाठी मांत्रिक बाबा-बुवा यांचा सर्वत्र सुळसुळाट दिसतो. पण महाराष्ट्रासारखे राज्य जेव्हा जादूटोणाविरोधी कायद्याचा स्वीकार करते, तेव्हा लोकांची फसवणूक करणार्या अशा गोष्टी केवळ चर्चेचा अथवा प्रबोधनाचा विषय न राहता कायदेशीररित्या गुन्हा ठरतात. जर अशा स्वरुपाची घटना महाराष्ट्रात घडली तर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत, दैवी दहशतीचा वापर करून फसवणे आणि ठकवणे या कलमाखाली असा दावा करणार्या धर्मगुरूंवर थेट कारवाई करता येऊ शकते. या अर्थाने महाराष्ट्रातील जादूटोणाविरोधी कायदा हा केवळ देशाला नव्हे, तर जगाला देखील दिशादिग्दर्शक ठरू शकतो. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे या कायद्यासाठी आग्रही राहण्यातील जागतिक संदर्भ यामुळे आपल्या लक्षात येतात. भूत-पिशाचाचे अस्तित्व शास्त्रीय कसोटीवर सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसचे 21 लाखांचे आव्हान आहे. जगभरातील कोणतीही व्यक्ती हे आव्हान स्वीकारू शकते. व्हॅटिकन सिटी आणि पोप यांनी अतींद्रियशक्तीविषयी कोर्स सुरू करण्याआधी हे आव्हान स्वीकारून पहिल्यांदा भूत-पिशाच, अतींद्रियशक्ती यांचे अस्तित्व सिद्ध करून दाखवले पाहिजे. ते सिद्ध करून दाखवण्याची त्यांची तयारी नसेल, तर हा कोर्सही लोकांची शुद्ध फसवणूक ठरेल. जगभरातील विज्ञानवादी लोक आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात काम करणार्या व्यक्ती आणि संस्थांची सोबती महाराष्ट्र अंनिस व्हॅटिकन सिटी आणि पोप यांच्या अवैज्ञानिक आणि धर्माच्या नावावर सामान्य लोकांचे शोषण करणार्या या प्रशिक्षणाचा जोरदार विरोध करणार आहे. ‘व्हॅटिकन सिटी’ चे पदाधिकारी या गोष्टींची योग्य दाखल घेऊन हा कोर्स मागे घेतील, अशी आशा आहे.