Categories
आंदोलन

शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आंदोलन

ऑगस्ट - २०१८

20 जुलै ते 20 ऑगस्ट दरम्यान ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ आणिजबाब दो’ आंदोलन राबविणार – महाराष्ट्र अंनिस

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघटित कार्याचे अध्वर्यु डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला 20 ऑगस्ट 2018 रोजी पाच वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्यामुळे 20 फेबु्रवारी 2015 रोजी झालेल्या मृत्यूलादेखील साडेतीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानंतर याच पद्धतीने कर्नाटक राज्यातील माजी कुलगुरू प्रा. डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांचे निर्घृण खून झाले आहेत. या खुनांच्या मालिकेमागे षड्यंत्र आखून नियोजनबद्ध कार्यवाही करायला प्रवृत्त करणारे सूत्रधार म्हणून सनातन संस्था व हिंदू जनजागरण समितीच्या साधकांचा सहभाग असल्याचे आरोपपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. अशा पार्श्वभूमीवर खुनाच्या तपासातील अक्षम्य दिरंगाईमागे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जाणवत आहे. तसेच खुनाच्या तपासात समोर आलेल्या साक्षी-पुराव्यांच्या बळकटीसाठी फरार गुन्हेगारांना अटक करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले आहे. अशा परिस्थितीत फरार मारेकर्‍यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय रेड कॉर्नर नोटीस, तपास यंत्रणांकडून बक्षीस आणि त्यांची छायाचित्रांचे पोस्टर जाहीर करूनही काहीही उपयोग झालेला नाही. त्या सोबतच अल्पसंख्याक, दलित-मागासवर्गीय, महिला-युवती-कुमारी-बालिका यांच्या विरोधातील असहिष्णुतेचे वर्तन देशातील जनसामान्यांमध्ये भयग्रस्तता निर्माण करणारे आहे. भारतीय संविधानाच्या अधिष्ठानाला धक्का पोचवून संवैधानिक व्यवस्था मोडकळीस आणण्याचा डाव असल्याचा संशय सत्ताधार्‍यांबद्दल व्यक्त केला जात आहे.

या सर्व स्थितीला जबाबदार असणार्‍या केंद्र व राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी 20 जुलै ते 20 ऑगस्ट 2018 दरम्यान महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकाराने आणि समविचारी पक्ष, संघटना, संस्थांच्या सहभागाने ‘जबाब दो’ आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे, असे प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर करीत आहोत.

व्यक्तिगत, कौटुंबिक, सार्वजनिक जीवनापासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंसेच्या विरोधात कृतिशील होण्यासाठी संकल्पित करण्याच्या हेतूने ‘हिंसा के खिलाफ मानवता की ओर’ युवा संकल्प अभियान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविले जाणार आहे. महाराष्ट्र अंनिसच्या युवा सहभाग विभागाच्या पुढाकाराने महाविद्यालयीन व विद्यापीठस्तरीय युवा संकल्प मेळावे संयोजित होत आहेत. यामध्ये कोणत्याही प्रश्नांची सोडवणूक करताना व अन्यायाशी संघर्ष करताना देखील अहिंसक आणि संवैधानिक मार्गानेच कृती करण्याचा संकल्प युवक, युवती, विद्यार्थ्यांकडून घेतला जाणार आहे.

महाराष्ट्र राज्याबरोबरच दिल्ली येथे ‘जबाब दो’ आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले असून देशातील केरळ, पंजाब, हरियाना, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्यप्रदेश यासह जवळपास 15 राज्यांमध्ये हे आंदोलन केले जाणार आहे.

20 ऑगस्ट हा शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन यापुढे ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ म्हणून साजरा करावा, असे ठरविण्यात आले आहे. भारताच्या 22 राज्यांमधून कार्यरत विज्ञान क्षेत्रातील चाळीस प्रमुख संस्था-संघटनांच्या सहभागाने गठीत झालेल्या ‘ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क’ मार्फत हा निर्णय घेतला गेला आहे. त्या अनुषंगाने 20 ऑगस्ट- राष्ट्रीय वैज्ञानिक दिन ते 21 सप्टेंबर – चमत्कार सत्यशोधन दिन यादरम्यान महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकाराने ‘सर्वांगीण मानवी विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन-संवाद व प्रबोधन अभियान’ राबविले जाणार आहे.

अविनाश पाटील

राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती