’राँग आयडिया ब्रेनमा ठोक दिया’
– प्रभाकर नानावटी / सुमन ओक
(धर्म आणि विज्ञान याबद्दल विचार करत असताना धर्म ही संकल्पना कशी रूढ झाली, हे समजून घेणे आवश्यक होते. म्हणून धर्मसंकल्पनेचा उदय, धर्माची गरज आणि धर्मचिकित्सेला आक्षेप, विश्वनिर्मिती आणि सत्याच्या शोधात याबद्दलची थोडीफार माहिती मागील चार लेखात दिलेली आहे. आत्मा ही संकल्पना प्रत्येक धर्माच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. ती नेमकी काय आहे याबद्दलची माहिती या लेखात आहे.)
‘गाईड’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटाच्या शेवटच्या काही शॉट्समध्ये ‘आगमें फेकूँगा, जलूँगा नहीं, तलवारसे वार करूँगा, कटूँगा नही…’ अशी काही वाक्ये देव आनंदच्या तोंडी दिलेली आपल्याला आठवत असतील. भगवद्गीतेतील अशाच अर्थाच्या श्लोकवरून हे संभाषण लिहिलेले असावे.
(नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः। न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः॥
इस आत्माको शस्त्र काट नहीं सकते, आग जला नहीं सकती, जल गला नहीं सकता और वायु सूखा नहीं सकता।)
आत्मा या संकल्पनेबद्दल धर्माला नेमके काय म्हणायचे आहे, हे या श्लोकात साररूपाने मांडलेले आहे व याबद्दल हिंदू धर्मीयांचा संपूर्ण विश्वास आहे. परंतु विज्ञान व धर्म यांच्यातील एक वादाचा मुद्दा म्हणून आत्मा या संकल्पनेकडे बघितले जाते. विज्ञानाला ही संकल्पना पूर्णपणे मान्य नाही; परंतु धर्माला यावाचून अस्तित्व नाही. बहुतेक धर्मशास्त्र आत्मा या संकल्पनेला मान्यता देतात. एवढेच नव्हे, तर त्यात देवत्वाचा अंश आहे असेही मानतात. आत्म्याच्या अमरत्वाबद्दल तर शेकडो पानं लिहिली असतील. पुनर्जन्म ही संकल्पना आत्म्याच्या अमरत्वाशी निगडित आहे. आत्मा म्हणजे मनुष्याच्या शरीराव्यतिरिक्त आणखी एक विशेष भाग, ज्यामुळे माणसाला खालीलपैकी एक तरी क्षमता प्राप्त होते:
जगण्याची, व्यक्तिमत्त्व किंवा स्वतः हालचाल करण्याची
विचार करण्याची आणि संवेदनांची
आपलं शरीर सोडण्याची,
चांगलं-वाईट जाणण्याची,
मरणानंतर उरण्याची,
आणि बहुधा पुनर्जन्म घेण्याची,
स्वतंत्र इच्छाशक्तीची किंवा
देवाशी भक्तिभावाचं नातं जोडण्याची इ.इ.
अशा अनेक क्षमता.
ही केवळ मनुष्याच्या आत्म्याची व्याख्या झाली. परंतु अनेक संस्कृतींमध्ये जनावरांनाही आत्मा असतो, असं मानतात. काही संस्कृतींमध्ये आत्म्याच्या या विविध क्षमता वेगवेगळ्या आत्म्यांमध्ये सामावलेल्या असतात म्हणून एका व्यक्तीला अनेक आत्मे असू शकतात आणि ते त्या व्यक्तीला जीवन, व्यक्तिमत्त्व व अमरत्व अशा वेगवेगळ्या क्षमता देतात.
आत्म्यावरील हा विश्वास फार प्राचीन व सार्वत्रिक आहे. संपूर्ण ऐतिहासिक काळात बहुतेक लोकांचा आत्म्यावर विश्वास होता. आयर्लंडपासून जपानपर्यंत काही ग्रामीण लोककथांमध्ये व्यक्ती झोपी जाते, तेव्हा तिच्या तोंडातून एक लहानसा प्राणी किवा कीटक बाहेर पडतो आणि इकडून तिकडे फिरतो. काही वेळाने हा प्राणी पुन्हा झोपी गेलेल्या व्यक्तीच्या तोंडात हळूच शिरतो आणि ती व्यक्ती जागी होते, अशा तर्हेचे वर्णन असते. काही गोष्टींप्रमाणे या प्राण्याला व्यक्तीच्या तोंडात शिरण्यापासून अटकाव झाला तर ती व्यक्ती मरण पावते. केव्हा केव्हा तर या लहान प्राण्याने व्यक्तीच्या शरीराबाहेर केलेली साहसे झोपलेल्या व्यक्तीला स्वप्नरूपात दिसतात. या सार्या गोष्टींमध्ये दिसून येणार्या साम्यामुळे प्रागैतिहासिक काळात आत्म्यावरील श्रद्धा युरोप, आशिया आणि बहुधा आफ्रिकेमध्येही पसरलेली होती, हे स्पष्ट होतं.
सुरुवातीच्या लिखित इतिहासानुसार आत्म्यावरील विश्वासात बरीच विविधता आहे. आत्म्याबाबतच्या आधुनिक संकल्पना विकसित होण्यामध्ये हिब्रू, पर्शियन व ग्रीक लोक़ांचा सहभाग मोठा आहे. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकाआधी हिब्रू, फिनिशियन, बाबिलोनियन, ग्रीक आणि रोमन लोक मरणानंतर आत्मा कसाबसा तग धरून उरतो; आत्मा एखाद्या सावलीसारखा किंवा पाताळात अल्पांशाने असतो; परंतु त्याचे अस्तित्व अंधुक आणि स्पष्ट जाणीव नसलेलं असं असतं, असं मानीत. ग्रीक लोकांच्या सुरुवातीच्या आत्म्याबाबतच्या संकल्पना एखादी व्यक्ती बनण्यास ज्या वैशिष्ट्यांची गरज असते, त्यांचाच अभाव असलेल्या टुकार संकल्पना आहेत असं एका संशोधकाचं मत आहे.
आत्म्यावरील विश्वास हा केवळ ऐतिहासिक कुतुहलाचा विषय नव्हे. काही वर्षांपूर्वी ‘टाईम’ या नियतकालिकामध्ये एका मतमोजणीचा अहवाल दिला होता. अमेरिकन प्रौढ व्यक्तींना आत्मे असतात का, असे विचारण्यात आले होते. 92 टक्के लोकांनी त्यांचा आत्म्यांच्या अस्तित्वावर विश्वास आहे, असे सांगितले. कित्येक हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू धर्मीय लोक अलौकिक आत्म्याचं अस्तित्व मानतात.
आत्म्याच्या अस्तित्वाविषयी पारंपरिक दृष्टिकोन
आत्म्याच्या अस्तित्वाविषयी दोन परस्परविरोधी दृष्टिकोन आहेत. याला आपल्याला दोन वैश्विक दृष्टिकोनामधील संघर्ष म्हणता येईल; पारंपरिक आणि वैज्ञानिक असे हे दृष्टिकोन आहेत.
पारंपरिक दृष्टिकोनामध्ये निर्जीव वस्तूला फारच कमी क्षमता असल्याचे मानले जाते. उदाहरणार्थ एखादा दगड; तो एकाच जागी स्थिर राहतो आणि आपला आकारही बदलत नाही. वस्तूंना जडद्रव्य असेही म्हणतात. त्याकडून जगण्याची किंवा विचार करण्याची अपेक्षा करता येत नाही. वस्तूंमध्ये जिवंतपणाची किंवा बौद्धिक क्षमतेची लक्षणे दिसण्यासाठी त्यामध्ये भौतिक जगताच्या बाहेर असलेल्या कशाचा तरी शिरकाव व्हायला पाहिजे. ते म्हणजे आत्मा. त्याचा शिरकाव झाल्याने वस्तू जिवंत होते आणि विचार करते. दगडाच्या मूर्तीमध्ये परमेश्वराचा आत्मा शिरल्यामुळे त्याला पावित्र्य प्राप्त होते व ती मूर्ती नवसाला पावू शकते. परंतु हे सगळे अतार्किक आहे असे आपल्याला वाटते. माणसाच्या (वा प्राण्याच्या) मरणानंतर आत्मा बाहेर निघून जातो व त्याच्या पाप-पुण्याच्या हिशोबानुसार, स्वर्गसुख, नरक यातना वा आत्म्याची कायमची मुक्ती वा एखाद्या प्राणियोनीत पुनर्जन्म व पुन्हा 84 लाख योनीच्या चक्रामधून सुटून मानव जन्म, अशी ही मांडणी असते.
आत्म्याच्या संकल्पनेमुळे आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणार्यांना आणखी एक फायदा मिळतो. तो म्हणजे त्यामुळे अमरत्वही शक्य होते. आत्मा दृश्य वस्तूंपासून बनतच नसल्यामुळे तो नाश पावताना कोणाला कधीच दिसला नाही. त्यांचा असा दावा असतो की, आत्म्याचे वेगवेगळे घटक नसल्याने त्याचे विघटन कसे होणार? त्यामुळे अशी कल्पना करता येते की, एखाद्याच्या मरणानंतर त्याचा आत्मा जसाच्या तसाच शाबूत राहतो. या वैश्विक दृष्टिकोनानुसार संवेद्यता हा आत्म्याचा गुण असल्याने माणसे मरणानंतरही आत्म्याच्या अस्तित्वामुळे विचार करू शकतात व त्यांना जाणीवही होऊ शकते.
वैज्ञानिक वैश्विक दृष्टिकोन
या दृष्टिकोनात परंपरा आणि अंतर्ज्ञानाऐवजी प्रयोगात्मक आणि निरीक्षणात्मक पुराव्यांवर भर दिला जातो. अनुभवाने किंवा निरीक्षणाने सिद्ध होऊ शकणार नाहीत असे कोणतेही दावे या दृष्टिकोनानुसार केले जात नाहीत. कोणत्याही गृहितकाची चर्चा करण्यास या दृष्टिकोनात वाव आहे; परंतु पुराव्याशिवाय कोणत्याही गृहितकाचा स्वीकार केला जात नाही. अलिकडच्या काही शतकांमधील वैज्ञानिक वैश्विक दृष्टिकोनाने खूप प्रगती केली आहे आणि त्यातून भौतिक आणि जैविक विश्वाबाबत आपल्याला नवीन आकलन मिळालेलं आहे. हे ज्ञान भक्कम पायावर उभं असल्याने याचा ज्ञानसमुच्चय जगातील विविध प्रकारच्या सर्व संस्कृतीतील वैज्ञानिक स्वीकार करतात.
विज्ञानाच्या प्रगतीने आपले निसर्गाचे आकलन बर्याच बाबतीत खूप बदलले आहे. पूर्वीच्या अतिभौतिक प्रक्रियांवर अवलंबून असलेल्या पारंपरिक श्रद्धा नैसर्गिक स्पष्टीकरणांमुळे नाहीशा झाल्या आहेत. याच्या महत्त्वपूर्ण उदाहरणांमध्ये सूर्यमालेची उत्पत्ती, जैविक उत्क्रांतीमधून प्राण्यांच्या शरीररचनेचा आणि कार्याचा झालेला विकास आणि या गुणवैशिष्ट्यांची ‘डीएनए’मुळे होत असलेली अनुवंशिकता इत्यादींची गणना करता येईल. जीवशास्त्रात झालेल्या प्रगतीमुळे जीवनाचे स्पष्टीकरण देण्यासाठी आता आत्म्याचे अस्तित्व गृहीत धरण्याची गरज उरली नाही.
मेंदूचा एवढा सखोल अभ्यास झालेला आहे की मेंदूच्या तज्ज्ञांच्या मते आता मेंदूतील सर्व प्रक्रिया मेंदूच्या कार्याच्या रूपामध्ये समजून घेता येतील आणि बहुतेक तज्ज्ञांच्या मते आपल्या सर्व मानसिक क्षमतांसाठी अलौकिक आत्म्याच्या अस्तित्वाची गरज नाही. जीवन आणि मानवी जाणीव यांच्या वैज्ञानिक आकलनातून मृत्यू म्हणजे जाणीव असलेल्या जीवनाचा अंत होय. कारण त्यामध्ये मेंदूतील सर्व क्रिया बंद होतात. या दृष्टीने अमरत्वाची संकल्पना चुकीची आहे. अमरत्वाची कल्पनाच जर चुकीची असेल तर अमर होण्यासाठी लागणार्या आत्म्याचीही गरज उरत नाही.
विज्ञाननिष्ठ आक्षेप
अलौकिक आत्म्याची संकल्पना वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरुद्ध असण्याची आणखी काही कारणे आहेत. जर आत्मे अस्तित्वात असतील तर विचार करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी होणार्या मानसिक प्रक्रियांमध्ये मेंदूचा आत्म्याशी आणि आत्म्याचा मेंदूशी वारंवार संपर्क व्हायला पाहिजे.
एक वैज्ञानिक या दृष्टीने असा संपर्क फार त्रासदायक वाटतो. अशा तर्हेच्या अन्योन्य क्रिया होत असतील, तर मानवी मेंदू म्हणजे एका अभौतिक जगाशी संपर्क साधणारं माध्यम ठरेल. विज्ञानाचे नियम सार्या विश्वाला लागू पडतात; परंतु मनुष्यप्राण्याला मात्र नाही, असे या अन्योन्य क्रिया सुचवितात. तसेच आपल्यात व या दुसर्या जगात सतत आंतरक्रिया होत असतात आणि या दुसर्या जगाचा आपल्या वागण्यावर परिणाम होत असतो, हे परिप्रेक्ष माणसाला या विश्वामध्ये एक खास स्थान बहाल करते. हे मानवकेंद्रित दृश्य वैज्ञानिक वैश्विक दृष्टिकोनाला साफ अमान्य आहे.
मानवी शरीरे या भौतिकी जगताचा भाग नसलेल्या मनांशी सतत आंतरक्रिया करीत असतात, ही संकल्पना सर्व भौतिक प्रक्रिया उप-आण्विय कणांमधील मूलभूत आंतरक्रियांवरच अधिष्ठित असतात या भौतिकीविज्ञानाच्या मूळ विश्वासालाच तडा देणारी आहे. समजा आपण असं मान्य केलं की, ज्यांच्यामुळे मनुष्य घडतो अशा मूलकणांमध्ये होणार्या आंतरक्रियांच्या अतिसूक्ष्म श्रेणीतून पाहतानाही मानवाचं कोणतेही वर्णन सार्थ असलं पाहिजे; तर आपल्यापुढे लागलीच एक समस्या उभी राहते. कारण भौतिक शास्त्रामध्ये भौतिक जग आणि दुसरं एखादं आध्यात्मिक जग यांच्यामध्ये आंतरक्रिया असूच शकत नाही आणि जर आध्यात्मिक जगाशी झालेल्या आंतरक्रियांचा मूलकणांवर परिणाम होत असेल तर भौतिक शास्त्रामध्ये एक प्रचंड क्रांतीच येत आहे, असं म्हणावं लागेल. पण अशी क्रांती होईल, असं समजायचं कारण नाही. कारण आत्म्याच्या अस्तित्वालाच काही खात्रीलायक पुरावा किंवा आधार मिळत नाही.
एखादा अलौकिक आत्मा मानवाच्या उत्क्रांतीवर कसा परिणाम करेल, याचा विचार करणं मोठं मनोरंजक ठरेल. आपलं विचार करणं जर शरीराबाहेर होत असेल तर हजारो वर्षांच्या कालावधीमध्ये उत्क्रांतीतून माणसाचा मेंदू उत्तरोत्तर लहान होत जाईल. म्हणजे अत्यंत कठीण विचारप्रक्रिया खरोखरच जर भौतिक जगाच्या बाहेर होत असेल तर कालपरत्वे मानवी मेंदू केवळ एक मज्जासंस्थेचे फाटक किंवा अध्यात्मिक जगतासाठीच्या संपर्कासाठीचे एक माध्यम बनून राहील. परंतु आतापावेतो आत्म्याच्या अस्तित्वाचा पुरस्कार करणार्यापैकी एखाद्यानेही अशा तर्हेचे विलक्षण परिणाम होण्याची शक्यता वर्तविलेली नाही.
याउलट मेंदू उत्क्रांत होत आहे व ही प्रक्रिया अजूनही संपलेली नाही, असेच वैज्ञानिकांना वाटते. याची साक्ष म्हणून मेंदूच्या आकारातील व वजनातील वाढ याकडे अंगुलीनिर्देश केला जात असतो. आज जरी मेंदूतील सर्व प्रक्रिया ज्ञात नसली तरी कालांतराने या गोष्टी समजतील हा विश्वास वैज्ञानिकांत आहे. यावरून आत्मा ही संकल्पना हळूहळू अस्तंगत होणार आहे हे मात्र नक्की, असे आपल्याला म्हणता येईल.
(पुढील लेखात ‘श्रद्धा – धार्मिकांचा प्लॅसिबो’ याची मांडणी केली जाईल.)
लेखक संपर्क ः 9503334895