अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक विशेषांकाची आमचे वाचक आतुरतेने वाट पाहत असतात. अंकातील साहित्य आणि त्याची मांडणी याविषयी त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ही गरज लक्षात घेऊन या वर्षी आम्ही एक नवा प्रयोग करायचा ठरविला. तो प्रयोग म्हणजे या वर्षीच्या वार्षिक अंकात एकही जाहिरात प्रसिद्ध न करता त्याऐवजी अंकासाठी देणगी संकलन करायचे. हे काम थोडे अवघड होते; परंतु अंनिसच्या क्रियाशील कार्यकर्त्यांचे शेकडो हात पुढे आले आणि हा प्रयोग यशस्वी झाला. अंनिसला देणगी देणारे देणगीदार आणि अंनिसचे कार्यकर्ते यांच्या साथीला आमचा सलाम!
जाहिरातीऐवजी देणग्या मिळाल्यामुळे एकाचवेळी वार्तापत्राचे अनेक प्रश्न सुटायला मदत झाली. गेली अनेक वर्षे वार्तापत्राचा अंक 600 ते 700 पानांचा छापावा लागे. जाहिरातींच्या पानात वाचनीय मजकूर लुप्त होऊन जाई. वाचक नाराज होत. ही अडचण देणग्यांमुळे दूर झाली. या वेळचा वार्तापत्र विशेषांक 150 पानांचा झाला आहे. साहित्यिक मजकुरात कोठेही जाहिरातींची पाने नाहीत. त्यामुळे वाचकांना या साहित्याचा आनंद लुटता येणार आहे. जाहिरातींची पाने कमी झाल्यामुळे अंकाच्या छपाईचा जवळपास निम्मा खर्च वाचविता आलाय. या दुहेरी लाभामुळे वाचकही खूष आणि आम्ही पण खूष.
अंनिसच्या एकूण कार्याबद्दल महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील जाणकार विचारवंत आणि सर्वसामान्य नागरिक यांच्या मनात आदर आणि प्रेमभावना आहे, याची प्रचिती देणगीरुपी प्रतिसादामुळे आम्हाला आली. जाहिरात नाही, तर मग आर्थिक सहकार्य नाही, अशा प्रतिक्रिया लोकांकडून आल्या नाहीत. उलट आम्ही अंनिसच्या कुटुंबातीलच आहोत आणि प्रत्यक्ष चळवळीत काम करता आले नाही, तरी अंनिस जे समाजपरिवर्तनाचे कार्य करीत आहे, ते निरपेक्ष व मूल्यवान आहे, याची आम्ही जाण ठेवून आहोत. अशीच लोकभावना देणगी स्वरुपात व्यक्त झाली आहे. लोकांच्या या भावनेची योग्य ती कदर ठेवून वार्तापत्र आणि महाराष्ट्र अंनिस आपले सामाजिक उत्तरदायित्व नेटाने पूर्ण करण्याचा प्रयत्न जोमाने करत राहील, याची आम्ही ग्वाही देतो. विरोधकाच्या द्वेषमूलक अपप्रचाराला बळी न पडता लोकांनी आम्हाला जी मदत दिली आहे, त्या पै-पैचा व्यवहार आम्ही प्रामाणिकपणे करू, असे आश्वासन आम्ही सर्वांना देत आहोत.
या वर्षीचा विशेषांक विविध प्रकारच्या ललित आणि वैचारिक साहित्याने नटलेला आहे. राम-रहीम बाबाच्या निमित्ताने भारतातील कॉर्पोरेट बाबांचा भयचकित करणारा पसारा समोर आला आहे. त्यातील निवडक बाबांचा आध्यात्मिक व्यापार ‘कॉर्पोरेट बाबा’ या लेखात मांडला आहे. ‘रत्नागिरीचा नटरंगी पाटीलबाबा’ याची बुवाबाजी वाचकांना चकित करून सोडेल.
ज्येष्ठ विवेकवादी शास्त्रज्ञ यशपाल आणि पी. एम. भार्गव; तसेच प्रसिद्ध साहित्यिक नागनाथ कोतापल्ले आणि अंनिसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक गिरमे यांचा परिचय हे या अंकाचे खास आकर्षण ठरेल.
याचबरोबर विज्ञान, मानसविज्ञान, बहिणाबाईंच्या साहित्यातील विवेक, ग्रंथपरिचय, कथा, कविता, व्यंगचित्रे अशा साहित्याने परिपूर्ण असा हा अंक वाचकांना वैचारिक व भावनिक आनंद देईल, याची आम्हाला खात्री आहे.
हा विशेषांक प्रसिद्ध करण्यास विलंब झाला, याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. – प्रा. प. रा. आर्डे