चार महिन्यांपूर्वी देशात रामरहीमच्या प्रकरणाने खळबळ माजली होती. आणि त्याचवेळी महाराष्ट्रात रत्नागिरीच्या पाटील बाबाच्या काही आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मिडिया व टीव्ही चॅनेल्सवर प्रसारित झाल्या. या व्हिडीओमध्ये बाबा महिलांना अर्वाच्य शिवीगाळ करताना, तरूणीसोबत नृत्य करताना दिसतो आहे. अशा या नटरंगी पाटीलबाबाच्या आश्रमास प्रत्यक्ष भेट देऊन लिहिलेला हा रिपोर्टाज खास अंनिवाच्या वाचकांसाठी…!
आपल्या देशाला बाबा-बुवा-महाराज यांची नव्याने ओळख करून देण्याची गरज नाही. गावापासून राज्य आणि देशपातळीपर्यंत त्यांची संख्या लाखांमध्ये होईल. तरीही प्रत्येकाची खासियत वेगळीच असते. कामाच्या पद्धतीत समानता असली, तरी एक बाबा दुसर्यासारखा आढळत नाही.
असेच एक बाबा-पाटीलबाबा. त्यांचे मूळ नाव श्रीकृष्ण आनंदा पाटील. समाज त्यांना ‘पाटीलबाबा’ म्हणून; तर भक्त ‘देव’ म्हणून ओळखतात.
कर्मभूमी कोकण
पाटीलबाबा कोकणातले. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ म्हणून ठणकावून सांगणारे लोकमान्य, आईचं हृदय असलेले साने गुरुजी, ‘जुबानी तलाक’च्या विरोधात जिहाद पुकारणारे हमीद दलवाई याच कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातले. एवढेच काय; पण अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा म्हणून अठरा वर्षे लढण्याची चिकाटी ठेवणारे आणि शेवटी त्यासाठी बलिदान देणारे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे मूळ गाव दाभोलीही कोकणातलेच!
पाटीलबाबा रत्नागिरीतल्या मिर्या बंदरातील पंधरामांड भागाचे. कामचलाऊ शिक्षण घेतल्यावर ते पोलीस खात्यात वाहन चालक म्हणून रुजू झाले. लहानपणापासून त्यांना भजनाची आवड होती. आपला फावला वेळ ते भजन आळवण्यात घालवू लागले.
सामान्यजनांना ज्ञानप्राप्तीच्या कोणत्याच सोयी उपलब्ध नव्हत्या, तेव्हापासून भजन, कीर्तन या मार्गाने त्यांना शहाणे करण्याचे काम संतांनी केले आहे. सर्व वारकरी संत उत्कृष्ट कवी होते. माणसाने पैशापेक्षा माणुसकीला महत्त्व द्यावे, नीतीने वागावे, प्राण्यांवर दया करावी, ज्येष्ठांचा आदर राखावा, आई-वडिलांची सेवा करावी आणि त्याचबरोबर स्वत:चे काम प्रामाणिकपणे करावे, श्रम करूनच जगावे. कोणाला लुबाडून खाऊ नये, लुबाडणार्यांपासून सावध राहावे; देवाचे नाव घेऊनही लुबाडणारे येतात, त्यांना ओळखावे इत्यादी व्यवहारज्ञान संतांनी अभंगातून दिले आहे. अभंग, भजनाच्या माध्यमातून ते जनसमूहापर्यंत पोचतात.
भजनीबुवा
पाटीलबाबा भजनात तरबेज झाले. ते भजनीबुवा झाले. भजनीबुवा म्हणजे अभंग गाणारा प्रमुख; तो भजन सांगतो, त्याच्यासमोर पखवाज वगैरे वाजवणारे वादक आणि धरकरी मंडळी ओळीत बसतात. धरकरी म्हणजे पद धरणारे; भजनीबुवाने सांगितलेले पद त्याच्यामागे पुन:पुन्हा आळवण्याचे काम धरकरी करतात.
भजनीबुवा हा त्या भजनातला स्टेजवरचा नेता असतो. या भजनीबुवांची प्रसिद्धी पोलीस खात्यातही झाली. भजन केले, भजनातील पदांचा अर्थ सांगितला की भजनीबुवांचे काम संपते. पण या भजनीबुवांनी त्या पुढची पायरी गाठली. जमलेल्या श्रोत्यांचे प्रश्न समजून घेऊन, ते मार्गदर्शन करू लागले. मार्गदर्शन करणे चांगलेच; पण भौतिक प्रश्नांसाठी आध्यात्मिक मार्गदर्शन सुरू झाले की, बुवाबाजीचा जन्म होतो. आजारपण, लग्न जुळत नाही, उद्योगात तोटा होतोय, मूल होत नाही इत्यादी प्रश्न भौतिक आहेत. मंत्र-तंत्र, पूजा-अर्चा, होमहवन, असे आध्यात्मिक मार्ग भौतिक प्रश्न सोडवू शकत नाहीत. भजनीबुवांचे असेच झाले. त्यांच्याकडे दैवीशक्ती असल्याचा बोलबाला सुरू झाला.
आध्यात्मिक बुवा
एका महिला पोलीस अधिकार्याकडे पग जातीची कुत्री होती. ही लाडकी कुत्री एकदा भुंकायला लागली. ती काही केल्या थांबेना. बाई वैतागल्या. त्यांना कळेना, करावे काय? एवढ्यात कुणीतरी भजनीबुवांच्या आध्यात्मिक शक्तीचा हवाला दिला. भजनीबुवांना पाचारण करण्यात आले. त्यांनी कुत्र्याच्या तोंडावरून हात फिरवला तशी ती कुत्री गप्प झाली. या घटनेने भजनीबुवांना आध्यात्मिक बुवा बनवले. कीर्ती दूरदूरपर्यंत पोचली.
कीर्तीचे रुपांतर संधीत करण्यासाठी दरबार भरू लागला. प्रत्येक सुधारणेची सुरुवात घरापासून करावी म्हणतात. दरबार घरात भरू लागला. कोणतेही ज्ञान देताना लोकांना जुना ब्रँड आवडतो; नवीन पचत नाही. बुवांनी स्वामी समर्थांची साथ धरली. ‘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ’ हा एक ओळीचा मंत्र लोकांना देऊ लागले आणि ‘बुवा’चे रुपांतर ‘बाबा’त झाले – ‘पाटीलबाबा.’
बुवाचे बाबा
बाबा झाल्यावर पुढची पायरी म्हणजे ती सुप्रसिद्ध म्हण खरी करणे- ‘ब्रह्म तेथे माया, वृक्ष तेथे छाया आणि बुवा तेथे बाया!’ या म्हणीची प्रचिती त्यांना येऊ लागली.

बुवा-बाबांच्या मागे महिला का जातात? खरं म्हणजे पुरुषही जातात. ते का जात असावेत? जीवनामध्ये अनंत अडचणी येतात; किंबहुना अनेक अडचणींशी संघर्ष करणे म्हणजेच जीवन. या संघर्षात अनेकदा मार्ग सापडत नाही. मती गुंग होते. सर्वत्र अंधार, समोर खाचखळगे; माणूस आधार शोधतो. विश्वासाने एखाद्या खांद्यावर मान टेकवतो. लहानपणी घरातील वडीलधारे आधार द्यायला असतात. त्यावेळी ते आधार देतात आणि पुढे उपयोगी पडावे म्हणून देवाचा आधार कसा घ्यावा, याचे प्रशिक्षणही देतात.
अडचणी खूप
मुलीचं लग्न जुळत नाही, आणलेल्या स्थळाला मुलगी पसंत करत नाही; आई-बापाच्या पुढे समस्या उभी राहते; वेळेवर लग्न झाले नाही, तर गाव नावे ठेवेल. लग्न झालं, आता वेळेवर पोर पाहिजे. मुलगी झाली, तर वंशाला दिवा पाहिजे. आजारपण तर प्रत्येकाला आहे. कधी साधा ताप, तर कधी लवकर बरा न होणारा एखादा विकार! वैद्यकीय सेवेच्या नावाने, ग्रामीण भाग कोरडाच! “लई डागदर झालं, पर काय गुण आला न्हायी म्हणून बाबांच्याकडे आलोय” म्हणणारे खूप. मुळात गावात डॉक्टर तीन; त्यातले दोन कालपर्यंत कंपाऊंडर होते; तिसरा आठवड्यातून एकदा येतो, असे ‘सगळे डागदर झाले’ तोपर्यंत कुणीतरी बाबाचा मार्ग दाखवतो.
पाटीलबाबांना असे अनुभव खूप आले. त्यांनी त्यांच्या परीने मार्ग सुचवले. आध्यात्मिक बुवा असा बोलबाला झाल्यामुळे आध्यात्मिक मार्ग सुचवणे गरजेचे! अशा भाविकांना दर आठवड्याला यायला लावणे म्हणजे पाच वार्या करा! अकरा वार्या करा, असा सल्ला दिला की, दर आठवड्याच्या गर्दीची सोय होते. असा ‘वार-करी’ आपल्या सोबत नव्या भाविकांना आणतो. गर्दी पाहून त्यांचेही डोळे दिपतात. काही मेंढरे या पूर्वीच खड्ड्यात पडली असतील, तर आपल्याला जास्त विचार करण्याची गरज नसते. फक्त वेळेवर गर्दीत सामील झालं की, आपली जबाबदारी संपते.
संसारातून विरक्त
अशा भाविकांनी दरबार भरू लागला; पण घरच्यांना काही बाबी पटल्या नाहीत. घरच्यांनी त्यांना संसारातून विरक्त केले.
बहुतेक बुवा स्वत:हून संसारातून विरक्त होतात. इथे जगाच्या कल्याणासाठी घरच्यांनी बाबांना विरक्त केलं. पोलीस अधिक माहिती घेण्यासाठी घरी गेले, तेव्हा ही माहिती पुढे आली.
तेव्हा बाबांनीही संसार सोडला- म्हणजे स्वत:चा संसार सोडला आणि भक्तांचा ‘संसार’ हाच आपला संसार मानला. स्वत:चे घर सोडले आणि भक्तांची घरेच स्वत:ची मानली. त्यांनी आपला आणि मठाचा मुक्काम मुरुगवाडा-सन्मित्रनगर, रत्नागिरी-सूर्य मंदिर, कशेळी- नाचणा आणि मग सध्या आहे तो झरेवाडी मठ, असा हलवला. विशेष म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांना परिसरातील जनतेने स्वत:हून पुढाकार घेऊन निरोप दिला. जगाच्या कल्याणासाठी प्रत्येक वेळी त्यांनी नव्या ठिकाणाचा शोध न थकता घेतला. 2009-10 साली त्यांचा मठ स्थिर झाला. दत्ताच्या स्थानासाठी एक भाविक शंकर कृष्णाजी कळंबटे यांनी त्यांना 21 गुंठे जमीन देऊ केली. कळंबटे धार्मिक वृत्तीचे. नियमित पंढरीची वारी करणारे. कोल्हापूरच्या अंबाबाईपासून प्रयाग-काशीपर्यंत अनेक देवस्थानांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. त्यांच्या सुपुत्रांची भेट घेतली, तेव्हा आपल्या पिताजींनी, बाबांना-पाटीलबाबांना ही जमीन आनंदाने, देवाच्या कामासाठी दिल्याचे सांगितले; त्यांचा पूर्वी चिर्यांचा व्यवसाय होता.
ठिकठिकाणचा विरोध पचवत, अनुभव घेत बाबांनी आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती केली होती. आपले कार्य असेच जगाच्या अंतापर्यंत निर्विघ्न व्हायचे असेल, तर काही पथ्ये पाळली पाहिजेत, पाळणूक केली पाहिजे, याचे ब्रह्मज्ञान त्यांना झाले होते. नव्या मठात त्यांनी या महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणल्या.
पाळणूक
भाविकांनी मठात येताना सोबत चप्पल, मोबाईल, कॅमेरा आणू नये, अशी सूचना काढली. त्याच्या काटेकोर अंमलबजावणीची सोय केली. आत येण्यासाठी मोठा 15 फुटी लोखंडी दरवाजा-फाटक असले, तरी तो बंद ठेवून एका वेळी एकच भाविक प्रवेश करू शकेल, अशी आडत तयार केली. आडत म्हणजे ‘यू’ आकाराचा मार्ग! दगडी भिंतीच्या या मार्गातून जनावरेही आत येऊ शकत नाहीत. एका वेळी एक भाविक येत असल्याने तपासणे सोपे झाले. इथे भाविकाला शुद्ध करण्यासाठी आंब्याच्या पानाने गोमूत्र शिंपडण्यासाठी एकाची नियुक्ती केली.
मधल्या काळात विज्ञान पुढे गेले. पेन, चष्मा अशा वस्तूंमध्येही कॅमेरे बसवले जाऊ लागले. चाणाक्ष बाबांनी अटींमध्ये सुधारणा केली, अशा वस्तूही प्रतिबंधित म्हणून जाहीर केल्या.
सत्य बाहेर
डोळ्यात तेल घालून एवढी काळजी घेतली, तरी घोटाळा झालाच! सत्य लपवणे जमले नाही. शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणत – “सत्याला स्वत:ची ताकद असते, ते फार काळ लपवता येत नाही.” तसेच झाले.
आत घडणार्या घटना कुणाला चुकीच्या वाटल्या, तरी बोलता येत नव्हत्या. कारण पुरावाच नाही! त्यामुळे एखाद्याचं खटकलंच, तर गुपचूप घरचा रस्ता धरणे, एवढाच मार्ग असायचा; फार तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार करायची. काही तक्रारी आल्या; पण तेही काही करू शकत नव्हते. ‘बुवा तेथे बाया’ नाटकाचा खेळ प्रत्यक्ष पाहू शकले नाहीत. कार्यकर्ते भक्तांच्या संपर्कात राहिले; पण ताकास तूर लागत नव्हती. पण एके दिवशी तीही सोय झाली. मोबाईलवरून क्लिप व्हायरल झाली. ठसठसणार्या जखमेला एक टाचणी लागली. या व्हिडीओ क्लिपने रत्नागिरी जिल्हा व्यापला. आध्यात्मिक कार्याचा पर्दाफाश झाला. अनेकांना बोलतं केलं!
‘अंनिस’ आक्रमक
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना ही क्लिप पाहायला मिळाली. ‘बाबा एका महिलेला अश्लील शिवीगाळ करत आहे.’ त्यांनी इतर सहयोगी संघटनांना एकत्र केलं आणि पोलिसांकडे तक्रार दिली. बाबाला अटक झाली. नाव वृत्तपत्रांतून, टीव्हीवरून गाजू लागले. या प्रकरणाची अधिक माहिती द्यावी म्हणून मी रत्नागिरी गाठली.
“तुमचे काम हमखास व्हावे असे वाटत असेल, तर ते गावात त्या सर्वांत व्यस्त माणसाला सांगा” अशा एका वचनाची आठवण झाली. रत्नागिरी जिल्ह्याचे अंनिसचे कार्याध्यक्ष आहेत, विनोद वायंगणकर! त्यांचा छोटा हॉटेल व्यवसाय आहे. पहाटे पाचपूर्वी त्यांचा दिवस उजाडतो आणि रात्रीचे अकरा वाजून गेले, तरी मावळत नाही. पती-पत्नी दोघेही कामात व्यस्त. पण त्यातून ते ‘अंनिस’चे कार्याध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळताहेत. त्यांनी बाबांचे जुने भक्त, नवे भक्त, सोडून गेलेले भक्त, गावकरी, सरपंच, यापूर्वीच्या मठांच्या जागांचे मालक, कार्यकर्ते अशा अनेकांच्या भेटी घेण्याचे व्यवस्थित नियोजन केले. एक कार्यकर्ते अतुल तांबट यांनी वृत्तपत्रांच्या कात्रणांची फाईलच समोर ठेवली. व्हिडीओ क्लिप उपलब्ध करून दिली.
व्हिडीओ क्लिप
ज्या व्हिडीओ क्लिपमुळे बाबांचे भांडे फुटले, त्यामध्ये त्यांनी स्वत:ला दत्तात्रेयांचे अवतार जाहीर केले आहे. त्यांच्या मते, दत्तात्रयांचे दहा अवतार आहेत. एका अवतारात बाबा स्वामी समर्थ आहेत, तर दुसर्यामध्ये जीझस. अवतार आहेत याचा अर्थ ड्रेपरी करून बनले आहेत. ते ड्रेपरी कशी करतात, याचेही शूटिंग झाले आहे. सुरुवातीला शंकराच्या पिंडीवर नळातून पाणी पडावे, तशी दुधाची धार पडत आहे. बाबा मध्ये हात घालून तोंड धुतात. त्यानंतर ते बनतात स्वामी समर्थ!
राजघराण्यातील व्यक्तीप्रमाणे उंची पोषाख करून, श्रीमंतीचे प्रदर्शन करत ते छबिन्यासह निघाले आहेत. सोबत उघडेबंब भालदार-चोपदार आहेत. एका भालदाराच्या पोटावर बोटाने डिवचण्याची लीला ते पुन:पुन्हा दाखवतात. आपले रूप राजबिंडे असल्याचे ते जाहीर करतात. महिलेला ‘रांडे, इथे पासली पडणार आहेस काय?’ अशी अर्वाच्य विचारणा करतात.
ड्रेपरी बदलून जीझस बनतात. त्यासाठी सेवेकर्यांची मदत घेतात. सोबत सेवेकरी आणि भक्त माळावरच्या खाचखळग्यातून फिरतात. माळ मठाच्या परिसराचा भाग आहे. यावेळी ते आपण जनकल्याणासाठी वणवण फिरतो आहोत, हे पाहा, असे आव्हान देतात. फिरताना आपल्याला “— मध्ये घालण्यासाठी बंद सोबत बंदूकधार्याची (स्टेनगनची) गरज नाही,” हेही जाहीरपणे सांगतात.
‘अंनिस’ची तक्रार
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष विनोद वायंगणकर, प्रमुख कार्यकर्तेवल्लभ आणि राधा वणजू, अतुल तांबट, मधुसुदन तावडे, धीरज भोसले, अ. भा. अंनिसचे विलास कोळपे, ‘मी रत्नागिरीकर गु्रप’चे शेखरकुमार भुते, नाचण्याची जागा गमावलेले मंगेश सुफल इत्यादींनी मा. कलेक्टर, डी.एस.पी. व ग्रामीण पोलीस विभागप्रमुख यांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदने दिली.
‘महिलेला अर्वाच्य भाषेत शिव्या देणे’ याबद्दल आक्षेप घेऊन अंनिसने तक्रार दिली. गुन्ह्याचा तपास पो. नि. अनिल विभुते करत आहेत.
पाटील बाबावर गुन्हा दाखल करावा, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीबरोबर मी रत्नागिरीकर, लक्ष्यसिद्धा फौंडेशन, फक्त ओढ समाजकार्याची, चेतना फौंडेशन, श्री संस्कार फौंडेशन, जिल्हा महिला आय काँग्रेस कमिटी, झरेवाडीचे नागरिक अ. भा. अंनिस अशा संघटना एकवटल्या.
निवेदनाचा आशय
“गेले काही दिवस म.अंनिस रत्नागिरी शाखेकडे झरेवाडी येथील पाटीलबाबाच्या बुवाबाजीबाबत तक्रारी येत आहेत. दरम्यान, बाबाची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली असून, प्रमुख वृत्तपत्रांनी बाबापासून सावध राहण्याचा सल्ला जनतेला दिला आहे.

या बाबाकडून होणारी बुवाबाजी जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा ठरेल अशी असून, या कायद्यातील कलम नं. 11 (क) नुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला दक्षता अधिकारी नेमण्याची तरतूद आहे. हे अधिकारी बाबावर ‘सुभोटो’ अॅक्शन घेऊ शकतात. त्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशनने सखोल चौकशी करून बाबाला ताब्यात घ्यावे व जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करावा. पाटीलबाबा पोलीस खात्यात वाहन चालक म्हणून नोकरी होता, असे असेल तर हा प्रकार अधिक गंभीर आहे.”
व्हिडीओबाबत शंका
व्हिडीओ पाहिल्यावर काही शंका मनात आल्या. मठाच्या परिसरात कॅमेरा येऊ नये, याची व्यवस्थापन डोळ्यांत तेल घालून खबरदारी घेत असताना, व्हिडीओ कसा घेतला? कोणी घेतला की पाटीलबाबांनीच व्हिडीओ घ्यायला लावला? व्हिडीओ नियोजनपूर्वक, व्यवस्थित, योग्य दिशेने, अडथळे न येता घेतलेला दिसतो आहे. बाबांनी खास पोझही दिल्या आहेत. त्यावरून दुसरी शक्यता बळावते.
व्हिडीओ व्हायरल का केला? बदनामीसाठी की प्रसिद्धीसाठी? हितशत्रूंनी की हितचिंतकांनी? यामागचे नेमके सूत्रधार कोण? व्हिडीओ पूर्ण आहे की संपादित?
हे सर्व वर्षानुवर्षे सुरू आहे. ते भक्ताला पचले आहे; पटले आहे. पटले असल्याची खात्री पाटीलबाबांना आहे; म्हणून तर ते हे नाटक वारंवार करतात. व्हिडीओमध्ये दाखवलेल्या दृश्यांमध्ये आपण काही चूक करतो आहोत, असे पाटीलबाबांना वाटत नाही, त्यामुळे व्हिडीओ बदनामीसाठी व्हायरल केला की प्रसिद्धीसाठी? अशी शंका मनात येते.
पाटीलबाबांनी स्वत:ला देव म्हणून, अवतार म्हणून जाहीर केले होते. अनेक भक्त त्यांचा ‘देव’ म्हणूनच उल्लेख करत. तेव्हा देवाने अभिषेकाच्या धारेत हात घालून तोंड धुण्यास कोणाची हरकत नाही.
पुढील अवतारातील अभिनय, कसलेल्या अभिनेत्याला लाजवेल असा आहे. अश्लील शिव्या देणे सुसंस्कृत माणसाला लांच्छनास्पद वाटत असले, तरी अशा व्यक्तींना ‘अवलिया’ समजणारेही काहीजण आहेत. जगाच्या कल्याणाचा विचार करत- त्यामध्ये गढलेले, प्रचलित समाजनियम न पाळणारे, समाजापासून दूर राहू इच्छिणारे, त्यासाठी जवळ येणार्यांना शिवीगाळ करून हाकलणारे, अशा दैवी पुरुषांना अवलिया म्हणतात. वैद्यकीय शास्त्र यांना मनोरुग्ण म्हणते हा भाग वेगळा.
अशा शिव्यांमुळे भक्त यांना ‘अवलिया’ समजू शकतो. त्यांच्याकडे अतिमानवी शक्ती असते, असेही समजतात. त्यांना भूत, भविष्य कळते; भविष्य बदलता येते. ते प्रसाद-शिव्या, मारहाण अशा स्वरुपातही देतात; पण पाटीलबाबांचा तसा प्रयत्न वाटत नाही. आपल्या सुरू असलेल्या नाटकात व्यत्यय येतोय, असे वाटल्याने रागाच्या भरातही त्यांनी शिवी दिली असेल.
आपण स्वामी समर्थ आहोत, कलियुगी अवतार आहोत; मेलेले मूल जिवंत केले, आंधळ्याला त्याचे नेत्र परत केले. ‘स्वामी समर्थांचे सांगणे आहे, डॉक्टरकडे जाऊ नका, औषधोपचार करत बसू नका,’ असे सांगणे स्वत:चे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न आहे. शेवटी ‘त्याला स्टेनगन लागते —– मध्ये घालण्यासाठी’ ही टीका, त्याच भागातल्या व्यवसायबंधू बुवावर असावी; त्यांची बुवाबाजी मोठी आहे. यावरून त्यांच्या नकळत शिवीमुळे ते अडचणीत आल्याचे दिसते.
अखेर गुन्हा दाखल
सहा संघटनांनी दिलेल्या निवेदनाचा परिणाम म्हणजे वृत्तपत्रांनी यांची दखल घेतली आणि चांगलीच प्रसिद्धी दिली; पण केवळ निवेदनाने पोलीस गुन्हा दाखल करू शकत नव्हते. बातमी वाचून एका महिलेने धाडस केले. पाटीलबाबांविरोधात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल झाला.
वृत्तपत्रांनी 21 सप्टेंबर 2017 च्या अंकामध्ये सविस्तर वृत्त दिले आहे. एका वृत्तपत्राने म्हटले आहे – ‘पाटीलबुवावर अखेर गुन्हा दाखल!’ दुसर्याने म्हटले आहे – ‘पाटीलबाबाचे बिंग फुटले – गुन्हा दाखल!’
रत्नागिरी शहरानजीक झरेवाडी येथील भोंदूगिरी करणार्या श्रीकृष्ण आनंदा पाटील ऊर्फ पाटीलबाबा व त्याचा साथीदार जयंत रावराणे या दोघांविरोधात अखेर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर दोघांविरोधात अश्लील शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
तक्रारदार महिलेच्या मुलाला ताप आला होता. त्याला घेऊन महिला सप्टेंबर 2016 मध्ये झरेवाडी, ता. रत्नागिरी येथील पाटीलबाबाच्या मठात गेली होती. त्यावेळी पाटील बाबाने तिला अश्लील शिवीगाळ केली. महिलेने जाब विचारला असता, त्याचा साथीदार रावराणे याने तिला दमदाटी केली. भीतीने महिलेने याची वाच्यता केली नव्हती. एका व्हिडीओद्वारा भोंदूबाबाचे कारनामे सोशल मीडियावर प्रसारित झाले. यानंतर या बाबाकडून फसवणूक झालेले अनेकजण पुढे येऊ लागले आहेत. माध्यमांनी घेतलेल्या भूमिकेनंतर आपल्याला धीर मिळाला. त्यामुळे अन्यायाविरोधात उभी राहिली असल्याचे तक्रारदार महिलेने स्पष्ट केले.
यावेळी पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनी पीडितांनी त्वरित पोलीस स्थानकाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन केले आहे. पाटीलबाबावर भारतीय दंडविधान कलम 509, 506, 34 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
या अटकेनंतर त्यांना जामीन मिळाला; पण अंनिसने जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आणि पोलिसांनी त्या कलमाखाली बाबाला पुन्हा अटक केली.
झरेवाडीतील ग्रामस्थ
झरेवाडी येथील मठाबाबत ग्रामस्थांच्या यापूर्वीपासून अनेक तक्रारी होत्या; पण त्यांची दखल घेतली जात नव्हती. बाबाला अटक झाल्याबरोबर ग्रामस्थ पुन्हा एकवटले. ग्रामस्थांनी बाबावर कारवाई करून झरेवाडीतील मठ कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी केली. याबाबत जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे – ‘तंटामुक्ती समिती सभेत याबाबत पाच वर्षांपूर्वी चर्चा झाली आहे; पण पोलिसांकडून ग्रामस्थांऐवजी बाबाचीच पाठराखण झाली.’ त्यांनी त्यावेळच्या महिला पी.एस.आय. यांच्या नावाचाही उल्लेख तक्रारीत केला आहे.
असे हे भक्त
भक्तांची प्रतिक्रिया
गुरुवारी पहाटे पाटीलबाबाला रत्नागिरी शहरातून अटक करण्यात आली; पण तरीही गुरुवारी झरेवाडीतील मठात वारीसाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
पोलीस स्टेशनपर्यंतही दुसर्या-तिसर्या दिवशी भक्तांनी वारी केली. भोळे भक्त ‘आमचा देव कुठाय?’ अशी विचारणा पोलिसांना करत होते.
झरेवाडीतील भक्ताचा दावा
22 सप्टेंबरच्या ‘प्रहार’ने झरेवाडीतील भक्ताची मुलाखत प्रसारित केली आहे. त्यात सूर्यकांत सागवेकर म्हणतात – ‘झरेवाडीतील मठ स्थापन झाला, तेव्हा मी एकटाच बाबांचा भक्त होतो.’ मठासाठी पाटीलबाबाला दोन जागा मिळाल्या होत्या. एकाने कमी पैशात, तर दुसर्याने बाबाला फुकटात जमीन देण्याचा पर्याय ठेवला. यापैकी बाबाने फुकटातली जागा निवडली आणि मठ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

ग्रामपंचायतीकडून तीस बाय तीसच्या बांधकामास परवानगी घेऊन वाढीव बांधकाम देखील केले. बाबाचे प्रस्थ वाढीस लागले, तशी त्याच्या गुर्मीतही वाढ झाली. त्याने मठात येणार्या महिला भक्तांना शिवीगाळ आणि दमदाटी करायला सुरुवात केली. मी बाबांना देव म्हणून समजायचो आणि ते सांगतील तसे करायचो.
दारू–मटण
बाबाला रात्री-अपरात्री दारू लागायची. मी डी.एस.पी. ब्लॅकचा खंबा रातोरात घेऊन येत होतो, नाहीतर बीअरच्या तीन बॉटल्स बाबाला एका वेळी लागत होत्या. दर बुधवारी बाबाला चिकन किंवा मटण बिर्याणी हवी असायची. याशिवाय रात्री-अपरात्री महिला भक्तांना पाटीलबाबा बोलावून घेत होता. त्यांच्यासोबत अन्य कुणालाही थांबण्याची परवानगी नसायची.
पाटील महाराज खोटे भक्त उभे करून भक्तांमध्ये गैरसमज पसरावयाचा. कुणाला मुलगा झाला, तर पाटील महाराजांच्या उपायामुळे झाला, असे सांग – असे भक्तांना सांगायला लावायचा.
नाचणे येथील भक्त
नाचणा गाव रत्नागिरीपासून तीन किलोमीटरवर आहे. या गावचे मंगेश बाबल्या सुपल आपली कैफियत घेऊन संघटनेकडे आले. 2007 साली बाबांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. यापूर्वी बाबांचा मठ कशेळीच्या सूर्यमंदिर परिसरात होता. पण इथल्या रहिवाशांनी त्यांना रात्री दहा वाजता बेघर केले. बाबांनी नाचणा येथील सुपलांचे घर गाठले. “देव दारात आलाय, घरात घेणारेस काय?” अशी विचारणा केली. देव स्वत:हून घरी आला, तर कोण नाकारणार? मंगेशच्या आई-वडिलांनी देवाला घरात घेतले. त्यांना फोटो ठेवायला व्हरांड्यात जागा दिली. व्हरांडा पंधरा फूट रुंद आणि साठ फूट लांब आहे. आता इथे भक्त जमू लागले.
‘पण देवाला व्हरांड्यात ठेवणे बरे नाही,’ हे देवाने आई-वडिलांना पटवून दिले. ‘देव’ म्हणजे पाटीलबाबा स्वामी समर्थांच्या फोटोसह लवकरच घरात शिरले. तसे घर प्रशस्त. चाळीस बाय साठ फुटाचे बांधकाम. त्यात नऊ खोल्या. एक खोली अपुरी पडू लागली, तेव्हा मधली भिंत काढून दोन खोल्यांचा मिळून एक हॉल केला. हळूहळू शेजारच्या तीन खोल्यांतील कुळे काढली. एक मुलगा चिडून बाहेर भाड्याने राहायला गेला, तर दुसर्याने शेजारच्या रिकाम्या जागेत नवीन बांधकाम केले.
एके दिवशी आई-वडिलांनाही शेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये राहायला पाठवून ‘देवाने’ सर्व घर व्यापले. यासाठी सासू-सून आणि बाप-लेक यांच्यामधील मतभेदाचे ‘अग्निहोत्र’ सतत पेटते ठेवले.
एके दिवशी महाराजांचे ‘कार्य’ पाहिलेल्या सुनेने महाराजांची गळपट्टी धरून जाब विचारला. तेव्हा त्यांना हा परिसर सोडावा लागला, ते साल होतं 2010. तिथून बाबा सध्याच्या झरेवाडी मठात पोचले; पण जाण्यापूर्वी त्यांनी ट्रस्ट स्थापन केला होता. सुपल दांपत्याशी गोड बोलून घरावर ट्रस्टींची नावे नोंद केली. आता सात-बाराला ट्रस्टची नोंद आहे. त्यावर सुपलांच्या सह्या आहेत.
सुपल आपले घर परत मिळवण्यासाठी झगडत आहेत, एक आशेची बाब म्हणजे त्यांनी ताबा सोडलेला नाही.
दानशूर भक्त
2009-10 साली बाबांना आणखी एका भक्ताने हात दिला. ते दानशूर म्हणजे झरेवाडीचे शंकर कृष्णाजी कळंबटे. कळंबटे धार्मिक वृत्तीचे! नियमित पंढरीची वारी करणारे. कोल्हापूरच्या अंबाबाईपासून प्रयाग काशीपर्यंत अनेक लहान-मोठ्या देवस्थानांना त्यांनी भेटी दिल्या आहेत.
त्यांच्या सुपुत्रांची भेट झाली. त्यांनी पाटीलबाबांना आपण आपल्या खुशीने 21 गुंठे जमीन दिली असल्याचे सांगितले. त्यांनी बाबांच्या चमत्कारांची प्रचिती अनेक जणांना आली असल्याचे सांगितले. फोन करून आणखी दोन भाविकांना बोलावून घेतले. त्यांनीही त्यांचे अनुभव सांगितले. त्यांच्या मते – ‘रत्नागिरीमध्ये दर्शनसोहळा चाले. तिकडे अनेक भाविक जात. काहीजण बाबांना म्हणाले, ‘आमच्या गावी या’ आणि बाबांनी इथे आश्रम स्थापन केला. मठात जोरात वाजवल्या जाणार्या स्पीकरचा त्रास गावकर्यांना आणि शेजारच्या शाळेला काही प्रमाणात होत असल्याचे त्यांनी मान्य केले.
गावात हनुमान जयंती आणि शिवरात्र साजरी केली जाते. पण हे उत्सव मठावरही सुरू झाले आणि गावातल्या देवळातील गर्दी कमी होऊ लागली.
मठाचा दिनक्रम
मठात गुरुवार, पौर्णिमा अशावेळी दर्शनसोहळा असतो. या काळात भक्त सकाळी सहापासून येत राहतात. ते सायंकाळी सहापर्यंत येतच असतात. मठामध्ये सकाळी 8 वाजता मानसपूजा असते. यावेळी गणपती, दत्त, हनुमंत, विठ्ठल, शंकर, गायत्रीमाता, सत्यनारायण, साईबाबा इत्यादींच्या आरत्या होतात. दिवसभर भजन सुरू असते. ज्याला बसायचे असेल, त्याने बसावे, अशी बाबा मुभा देतात. सुरुवातीला महादेवाच्या पिंडीची पूजा होते, अभिषेक होतो. बेल, फुले अर्पण केली जातात. त्यासोबत स्वामी समर्थांचीही पूजा होते. हार-फुले, नारळ, उदबत्ती भाविक घेऊन येतात. बाबा ते सर्वांना वाटतात. पैसे ठेवले, तर ते उचलायला सांगतात. साडी-ओटी आणली, तर तिथेच गरिबाला देतात. बाबा प्रवचनानुसार मार्गदर्शन करतात. प्रवचन, भजन किंवा भक्तीमध्ये अडथळा नको म्हणून मोबाईल बंद करायला लावतात. यामागे वेगळा उद्देश नाही.
‘बाबा काही घेत नसतील, तर मठाचा खर्च कसा चालतो?’ या प्रश्नावर त्यांनी ‘सगळी देवाची कृपा’ असे उत्तर दिले.
‘आज ना उद्या मंदिर पुन्हा सुरू होईल, तेव्हा तुम्ही स्वत: याचा अनुभव घ्या’ असे आवाहन त्या भक्तांनी केले.
रेल्वेमध्ये कर्मचारी असलेले एक भक्त भेटले. त्यांनाही बाबांची प्रचिती आली आहे. त्यांचे लग्न 1994 साली झाले. दोन-चार वर्षे झाली, तरी मूल होईना, तेव्हा डॉक्टरी उपचार सुरू केले. सर्व तपासण्या झाल्या; पण उपयोग झाला नाही; परिणामी ते दारूच्या आहारी गेले. काही उपाय चालत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी मुलाचा विचार सोडून दिला. अशा वेळी 2006 साली झरेवाडीतील एक मुलगा हरवला होता. बाबांच्या कृपेने तो सापडला. हा अनुभव ऐकल्यावर आपणही भक्ती करावी, असा विचार त्यांच्या मनात आला. आपले उर्वरित आयुष्य चांगले जावे म्हणून अध्यात्माकडे वळण्याचा विचार करून त्यांनी बाबांचे ‘दर्शन’ केले.
बाबा झाडाखाली एका दगडावर बसले होते. त्यांच्यासमोर चार भाविक होते. आपला नंबर आल्यावर या भाविकांनी लांबून नमस्कार केला.
बाबा म्हणाले – ‘काय पाहिजे?’
भाविक – ‘काही नको, माझ्याकडे सर्व आहे.’
बाबा – ‘नाही, तुझ्याकडे एक गोष्ट कमी आहे.’
भाविक – ‘नाही, मी खाऊन-पिऊन सुखी आहे. मला नोकरी-पैसा आहे. अजून काही नको. माझ्याकडे सर्व आहे.’
तेव्हा बाबा ओरडले. “सांग, तुझ्याकडे एक गोष्ट कमी आहे. सांगतोस की, नाही?”
तेव्हा भाविकाने विचार केला. आपण मुलाची आशा सोडली आहे; पण सांगू या – ‘मला मूल नाही.’
बाबा म्हणाले – “ही विभूती घे. दोघांनी लावा. आजपासून नऊ महिने नऊ दिवसांनी मुलगा होईल. त्याचे नाव ‘प्रसाद’ ठेव.”
भाविक गुरुवारच्या वारीला जोडीने जाऊ लागला. लवकरच प्रचिती आली. पत्नीला उलट्या होऊ लागल्या. स्त्रीरोग तज्ज्ञाने सांगितले, दिवस गेले आहेत. त्या वर्षी मुलगा झाला.
सायन्सने हात टेकले, तिथे बाबांनी मदत केली.
मुलगा लहान असताना सहा फुटावरून तोल जाऊन पडला. त्याला मठात नेले. बाबांनी सांगितले, “काही झालेले नाही, मुक्का मार लागला आहे. हात गळ्यात बांधा.” त्यानंतर मुलाला दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी एक्स-रे काढून पाहिले. खरोखरच काही झालेले नव्हते. विश्रांती मिळावी म्हणून डॉक्टरांनी प्लॅस्टर घालून हात गळ्यात बांधला.
अशा अनेक प्रचिती या भाविकांना आल्या. कमरेखाली अपंग झालेल्या मुलीला बाबांनी चालते केले, लग्नाला तयार न होणार्या मुलीकडे पाहून ते म्हणायचे, ‘तुझे एका मुलावर प्रेम आहे’ किंवा काही वेळा – ‘तुझे अर्धेलग्न झालेले आहे.’ मुलगा चांगला आहे लग्न लावून द्या.’ अशी अनेक उदाहरणे त्यांनी सांगितली.
पण वरील बाबी गावकर्यांना मान्य नाहीत. गावचे सरपंच चंद्रकांत गोताड यांचा या कथांवर विश्वास नाही.
झरेवाडी पूर्वी हातखंबा ग्रामपंचायतीच्या अखत्यारित होती. गावातील काहीजण शेतात राहायला आले आणि वाडी तयार झाली. दोन झरे असल्यामुळे गावाला झरेवाडी नाव मिळाले. आता गावची लोकसंख्या 1800 झाली आहे. गावात सातवीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. माध्यमिक शाळा व कॉलेज हातखंब्यास आहे.
बहुसंख्य ग्रामस्थ शेती करतात. काही रत्नागिरीला सेंट्रिंगच्या कामावर जातात. मठाचे भक्त इथे हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच. बहुसंख्य भक्त लांब-लांबून येतात. देवरूख, लांजा, संगमेश्वर, चिपळूण, कोल्हापूर, मुंबई इत्यादी, असे मत गावकर्यांनी व्यक्त केले. त्यांच्या मते चार ते पाच हजार भक्त वारीला जमा होतात. भक्त आणि वडापचे जीपवाले बाबांचा प्रचार करतात. मठात हिंदी सिनेमाची गाणीही लावली जातात. माईकवरून शिव्या ऐकायला येतात. भाविक आपले अनुभव, त्यांना आलेल्या अनुभूती माईकवरून सांगत राहतात.
“माका गुण आला”, “माका पोर झाला”, “माझो आजार बरा झाल्यान.” गावकर्यांना वाटते, शासनाने मठाची जागा ताब्यात घेऊन तिथे व्यायामशाळा किंवा पीएससी युनिट इत्यादी सुविधा कराव्यात.
तो मी नव्हेच
‘अंनिस’ व गावकर्यांनी दिलेल्या अर्जात हा बाबा ढोंगी असून, तो दैवीशक्ती असल्याचे दावे करतो, असे म्हटले आहे; पण पाटीलबाबांनी हा आरोप फेटाळला आहे. 24 सप्टेंबरच्या ‘रत्नागिरी टाईम्स’ मध्ये बातमी आहे – “पाटीलबाबाचा दावा – आपण साधूबुवा असल्याचे कधीच म्हटले नाही.” ‘आपण साधूबुवा असल्याचे कधीच म्हटले नाही, लोकच मला बुवा म्हणत असतील, तर त्याला मी काय करणार?’ असा अजब सवाल अटकेत असलेल्या पाटीलबाबाने केला आहे. पाटील बाबांच्या अटकेची दखल मीडियाने चांगलीच घेतली आहे. त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्तापत्राच्या उपसंपादिका मुक्ता दाभोलकर व अॅड. रंजना गवांदे यांनी सभा घेऊन लोकांना मार्गदर्शन केले. ही सभा केतन मंगल कार्यालयात आयोजित केली होती.
सभेला येण्यापूर्वी मुक्ता दाभोलकर यांनी पाटीलबाबाच्या मठाची पाहणी केली. पीडित महिलांची भेट घेतली. पीडित महिलांना संरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली. त्यानंतर संघर्ष सभेत त्यांनी पाटीलबाबावर योग्य ती कारवाई पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या कामाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या, “जादूटोणा विरोधात पीडित व्यक्ती किंवा त्यांचे नातेवाईक पुढे आले नाहीत. अशा वेळी दक्षता अधिकार्यांची भूमिका महत्त्वाची असते. ग्रामस्थांनी पुढे येऊन तक्रार द्यायला हवी. सर्वसामान्य व्यक्ती तक्रार द्यायला घाबरतात. अशा वेळी पोलीस, माध्यमांनी आवाज उठवणे आवश्यक आहे. पाटीलबाबाच्या प्रकरणात पोलीस, मीडिया यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गेल्या दहा वर्षांत पाटीलबाबा मोठ्या प्रमाणात फोफावला. त्यांच्यासारखे अनेक भोंदू, भगत कार्यरत आहेत. त्यांनाही तुरुंगात टाकणे आवश्यक आहे.”
“डॉक्टरकडे जाऊ नका, असे सांगत आजारांवर उपचार करणार्या पाटीलबाबावर इंडियन मेडिकल असोसिएशनने आपली भूमिका स्पष्ट करावी.” यानंतर त्यांनी कोकणातील लहान-मोठ्या भोंदूबाबांचे सर्वेक्षणाचे काम अंधश्रद्धा निर्मूलन समिती हातात घेणार आहे, असे सांगून पाटीलबाबाचा आश्रम कायमस्वरुपी बंद करण्यासाठी अंनिस जनआंदोलन उभे करणार असल्याचे जाहीर केले.
अ. भा. अंनिसचे श्याम मानव यांनीही कार्यकर्त्यांसह झरेवाडीस भेट दिली आणि जनसमूहास मार्गदर्शन केले.
झरेवाडीचा मठ
रत्नागिरीपासून बारा किलोमीटरवर हातखंबा आहे. इथून दक्षिणेकडे म्हणजे पणजी रोडवर दोन किलोमीटरवर झरेवाडी फाटा आहे. फाट्यावर ‘झरेवाडी 2 कि.मी.’ असा छोटा फलक डाव्या हाताला उभा आहे, तर उजवीकडे मोठा डिजिटल फलक मार्गदर्शन करत आहे. – “श्री स्वामी समर्थ दत्त मंदिर हरिद्वार, झरेवाडी, रत्नागिरी.” झरेवाडी मंदिर एक किलोमीटरवर.

या फलकाच्या दोन्ही बाजूंना दोन गोलांमध्ये फोटो आहेत. डावीकडच्या गोलात स्वामी समर्थ हात टेकून आणि नेहमीप्रमाणे मांडी घालून बसले आहेत, तर उजवीकडच्या गोलात एक देवी आहे. ती सरस्वती असावी, असे मला वाटते. निरखून पाहिले तर तिच्या हातात कमळ दिसेना. दोन्ही हात खालच्या दिशेने आणि रिकामेच!
जनतेप्रमाणेच देवीही कमळाला कंटाळली की काय, अशी मला शंका आली. पण देवीचा चेहराही नेहमी असतो, तसा गोल नव्हता. उभट दिसत होता. काळ जाईल, तसा माणसाचा चेहरा बदलतो. हे पहिलेच उदाहरण असावे. मी माझी शंका विनोद वायंगणकरांना विचारली.
त्यांना हसू फुटले. ते म्हणाले, “अहो चव्हाण सर, ती महाराजांचा मुखवटा असलेली आदिमाया आहे; सरस्वती नव्हे.”
आदिमायेच्या रुपातल्या महाराजांच्या फोटोला नमन करून भाविक महाराजांमध्ये आदिमाया शोधण्यासाठी मार्गस्थ होतात. आम्हीही झालो.
एक किलोमीटरच्या अलिकडेच मठाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. 15 फूट लांबीचे लोखंडी प्रवेशद्वार बंद असून शेजारी भाविकांसाठी आडत रस्ता आहे. इथून पन्नास फुटावर पायर्या सुरू होतात. तिथे डाव्या हाताला पाच टपर्या दिसल्या. भाविकांना दूध पिशव्या, उदबत्ती, नारळ, चहा, वडा इत्यादी खरेदीची सोय टपर्यांमध्ये करण्यात आली होती.
पुढे सुमारे दोनशे फुटापर्यंत कमी उंचीच्या म्हणजे सुमारे चार इंच उंच रुंद पायर्या आहेत. त्या पार केल्या की, दहा इंच उंचीच्या बारा पायर्यांवर मुख्य देवालयाच्या हॉलची सुरुवात होते. पहिल्यांदा मंडप, पंधरा-वीस फूट रुंदीचा. त्यानंतर सव्वाशे फूट लांबी आणि सुमारे पन्नास फूट रुंदीचा प्रशस्त हॉल. हॉलच्या शेजारी आठ-दहा फूट रुंद व्हरांडा. त्याचीही लांबी हॉलएवढी. व्हरांड्याच्या शेवटी बाबांची बैठक. बैठक म्हणजे साडेतीन फूट उंच आणि तेवढ्याच व्यासाचा सिमेंटचा दंडगोल. बैठकीवर ठळक सूचना – “हे स्वामींचे बसण्याचे स्थान आहे. इथे कोणी बसू नये व पिशवी ठेवू नये. लहान मुलांना बसवू नये.” हा व्हरांडा म्हणजे दर्शनमार्ग. याच मार्गाने परतायचे आहे. परतीच्या मार्गावर पाण्याची मोठी टाकी, समोर “या खिडकीवर महाप्रसाद मिळेल,” अशी अक्षरे. खिडकी असलेली पत्र्याच्या छपराची इमारत म्हणजे स्वयंपाकघर.
बोलक्या भिंती
इमारतीच्या सर्व भिंतींवर भाविकांच्या धार्मिक शिक्षणाची सोय केलेली. पांढरी भिंत, त्यावर तांबड्या अक्षरात आध्यात्मिक ज्ञान आणि सूचना.
सूचनांमध्ये – ‘कॅमेरा आणू नये, मोबाईलची बॅटरी काढून ठेवावी,’ ‘दर्शनाला जाण्याचा मार्ग’ ‘सर्व भाविकांनी येताना पादत्राणे (चप्पल) गेटजवळ काढून गोमूत्र शिंपडून मंदिरात प्रवेश करावा. मंदिरात कोणीही फोटो काढू नये,’ रस्त्याच्या मधून चालू नये’, ‘काही प्रकार घडल्यास झरेवाडी मंदिर जबाबदार राहणार नाही.’ यांचा समावेश.
आध्यात्मिक ज्ञानाचा भर – ‘जाताना बरोबर काही येत नाही’ या सूत्रावर आहे. “भांडण, कोर्ट, वाद यामुळे मिळालेला पैसा फक्त 10 वर्षे टिकतो.” संपत्ती, बंगला, गाडी यामुळे आपण सुखी होत नाही. मृत्यूनंतर सोबत काही येत नाही. रिकाम्या हाताने जावे लागते.” “राखसुद्धा इथेच टाकतात.”
एवढे पटवून दिल्यावर संपत्ती मठापर्यंत यायला काहीच अडचण राहत नाही. मग कोणी ‘सेवा देण्या’च्या नावावर वडे विकत घेऊन वाटतो, कोणी महाप्रसादाचा खर्च देतो, तर एखादा घर आणि जमीन नावावर करतो.
भौतिक समस्यांवर उपाय शोधताना आलेल्याला अध्यात्माची भांग पाजायची, पैशाचा रतीब अव्याहत सुरू राहावा म्हणून पुन:पुन्हा वार्या करण्याचा सल्ला द्यायचा, मधल्या काळात चुकून त्याची समस्या सुटली किंवा सुटल्याचा भास झाला, तर श्रेय मठाच्या नावावर जमा होण्याची मानसिकता तयार करायची. माणसांचे रूपांतर मेंढरात करण्यासाठी वारीला आलेल्याला दिवसभर थांबवून ठेवायचे, ही सर्वसामान्य मठव्यवस्थापनाची सूत्रे इथे व्यवस्थित वापरलेली दिसतात.
पूजा-अर्चा आणि होमहवन, नारायण नागबळी, शांती इत्यादी खिसे कापण्याच्या स्पेशल कात्र्या चालवता याव्यात, याची सोय दर्शन मंडपामध्ये हवनकुंड तयार ठेवून केली आहे.
विश्वैक्याचा प्रयत्न
कुंडाच्या शेजारच्या भिंतीवर आदिगुरू दत्तात्रेयांचे दहा अवतार नोंदवले आहेत. ते पुढीलप्रमाणे – अब्राहम, राजा जनक, लावोत्से, श्री झरत्रुष्ट, साईनाथ, श्री मोझेस, गुरूनानक, श्री सॉक्रेटिस, श्री कन्फ्युशियस, श्री मोहम्मद पैगंबर. त्याखाली शेवटी – “श्री स्वामी समर्थ अक्कलकोट हातखंबा, झरेवाडी, रत्नागिरी अशी ओळ त्यांचा पत्ता सापडावा म्हणून लिहिली आहे.

फार प्राचीन काळापासून भारताबाहेरही दत्तात्रेयांनी अवतार घेऊन विश्वैक्य स्थापण्याचा प्रयत्न केल्याचे वाचून मन सद्गदीत झाले. आतापर्यंत “हत्तीचे डोके माणसाच्या धडावर चिकटवण्याची शस्त्रक्रिया भारतात होत होती,” एवढीच ऐतिहासिक माहिती आमच्या माननीय पंतप्रधानांनी दिली होती.
पण जगभर असे दत्तात्रेयांचे अवतार झाले आहेत, हे त्यांना कळले, तर जग फिरताना त्यांना या पवित्र स्थानांना भेटी देता येतील. सत्यासाठी विषाचा प्याला रिचवणार्या सॉक्रेटिसलाही बाबांनी दत्तात्रेयांचा अवतार व पर्यायाने आपला पूर्वज बनवले.
सर्वसामान्य जनतेला भोंदूबुवांनी लुबाडू नये म्हणून ‘माझ्यानंतर पुन्हा प्रेषित होणार नाही’ असे जाहीर करणार्या पैगंबरांनाही दत्तावतारात समाविष्ट करून स्वत: प्रेषित होण्याचा मार्ग मोकळा करण्याची युक्ती भारतीय बुवाशिवाय कुणाला सुचणार?
एका भिंतीवर एकादश रूद्र नोंदवले आहेत – महागणेश, हिरण्यगर्भ, श्रीबुद्ध, श्री महावीर, श्री जीझस, श्री महालक्ष्मीनारायण, श्री शिवशक्ती, श्री महाकार्तिकेय, श्री महाहनुमान, श्री महाब्रह्मदेव, सरस्वती.”
एवढ्या अगाध ज्ञानाने संपन्नअसलेल्या दर्शन मंडपावर फलक आहे – “॥श्री स्वामी समर्थ॥ ‘आदिमाया आदिशक्ती मंदिर,’ हातखंबा, झरेवाडी, रत्नागिरी”
बाबा कारावासात असल्याने मुख्य हॉलला कुलूप आहे. त्यामुळे दहा खांबांवर उभा असलेल्या प्रशस्त हॉलमधील पिंडीचे दर्शन हुकले. मठातले भौतिक कार्य दिसले; पण ‘आध्यात्मिक कार्य’ अनुभवता आले नाही. ती कसर ‘अंनिस’ शाखेचे कार्याध्यक्ष मधुसूदन तावडे यांनी पुरी केली होती. त्यांनी वर्षापूर्वी मठास भेट दिली होती.
आध्यात्मिक जीवन
भरउन्हाची वेळ, मठ तर भाविकांनी फुललेला. रस्त्यावरही भाविकांची भली मोठी रांग. रस्ता आणि बाजूचा माळ मोटारसायकल आणि फोर व्हीलरनी खचाखच भरलेला, त्यातून वाट काढत तावडे मठात शिरले; पण त्यांच्या कपड्यामुळे आणि व्यक्तिमत्त्वामुळे रक्षकाने त्यांना बरोबर हेरले. हटकले- “चष्मा आणि चप्पल काढून आत यायचं, इनशर्ट कशाला केलाय? इथं नम्रता पाहिजे.” पाय पोळत उभे असणार्या भक्तांच्या गर्दीत त्यांची भर पडली. तासाभरात त्यांना अनेक बाबी पाहता आल्या. त्याची सुरुवात झाली गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र केल्यावर. इथे नारायण नागबळीची सोय होती. स्टॉलवर केवळ पंचवीस रुपयांत पिठाचा नाग करून मिळत होता. तो घेऊन मग पूजेसाठी मठात जायचे.
शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करण्यासाठी स्टॉलवर दूध पिशव्यांची सोय केली होती. जवळजवळ प्रत्येकाच्या हातात पिशवी होती. अभिषेकानंतरचे दूध तीर्थ म्हणून भरून घेता यावे म्हणून काही जणांच्या हातात रिकाम्या बाटल्या दिसत होत्या.
बाबांचे चमत्कार प्रत्यक्ष अनुभवणे एवढ्या कमी वेळेत शक्य नव्हते; पण प्रचिती घेतलेले भक्त माईकवरून अनुभव कथन करत होते. त्यामध्ये – ‘मुलीचे लग्न कसे ठरले, कृपेमुळे विजेचा मीटर कसा मिळाला, निपुत्रकाला मूल कसे झाले, आजार बरा कसा झाला’ इत्यादी कथानके सविस्तर ऐकायला मिळत होती.
होमकुंडाच्या एका बाजूला मंत्र पुटपुटणारा, तर तीन बाजूंना हवन करणारी जोडपी बसली होती. प्रत्येकाकडे सव्वा किलोच्या मापाने धान्य, तूप इत्यादी बाबी होत्या. हवन संपले की, जोडपे बदलले जाई. जोडप्यांच्या रांगेचे व्यवस्थापन एकजण करत होता. हवन करताना पती एकीचा आणि पत्नी दुसर्याची, अशी गफलत होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात होती.
बाबांचे दर्शन झाल्यावर हॉलमध्ये बसवण्याचे व्यवस्थापन एकाकडे, तर माईकवर बोलणार्यांचा क्रम लावण्याचे काम दुसर्याकडे होते. खालून तापलेला जांभा आणि वरून आग ओकणारा सूर्य सहन करत उभ्या असलेल्या म्हातार्या-कोतार्यांच्याही केविलवाण्या नजरा टाळत तावडे कसबसे बाहेर आले. पायर्यांच्या मधोमध लोखंडी रोलिंग टाकून येणे-जाणे मार्ग ‘वन वे’ तयार केले आहेत. बाहेर उन्हात रस्त्यावर बसलेल्या तरुणाची त्यांनी चौकशी केली. “आम्ही मूल नाही म्हणून आलोय, पहिल्या दोन वार्या दोघांनी केल्या. या वारीपासून एकट्या बायकोनेच आत जायचे असल्याने मी तिची वाट पाहत साहित्य सांभाळत बसलोय.” मुंबईहून आलेला तरुण जीवनाच्या रखरखत्या वाळवंटात पोराच्या रुपाने थंड हवेची झुळूक येईल, या आशेवर तापलेल्या रस्त्यावर उन्हात बसला होता.
झरेवाडीचे सरपंच चंद्रकांत गोताड यांचेही अनुभव असेच ऐकायला मिळाले. त्यांनी हजारो लिटर दूध, खाद्य पदार्थ, नारळ, उदबत्ती इत्यादींच्या खर्चाचा हिशोब मांडला.
विशेष म्हणजे दूरदूरहून येणार्या भाविकांना मठात प्रवेश होता; पण गाववाल्यांना अडवले जाई. ग्रामपंचायतीची नोटीसही सेवक दारात येऊन घेई. त्यांच्या मते भक्त आणि वडाप गाडीवाले हे चांगले प्रचारक असतात. माईकवरून हिंदी सिनेमाची गाणी, शिवीगाळ याचा त्रास नागरिकांना आणि शेजारच्या शाळेला होई.
भाविकांचे भविष्य घडवणार्या बाबांना आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलंय, याचा पत्ता नव्हता. त्यांच्यावर भा.दं.वि.क. 509, 506, 34, 420, 294 तर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत 2 (1) ख, 2, 5, 8, 3 (2) ही कलमे लावली आहेत. ही माहिती 29 सप्टेंबर 2017 च्या ‘पुढारी’ने छापली आहे.
महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत नियम 2013 चे कलमानुसार एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा होण्यास भुताचा किंवा अतींद्रिय शक्तीचा कोप असल्याचा समज करून देणे, तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे, व्यक्तीला शारीरिक वेदना करण्याची किंवा तिचे आर्थिक नुकसान करण्याची धमकी देणे, लोकांना ठकवणे, फसवणे, त्यांच्यावर दहशत बसवणे इत्यादी बाबी गुन्हा ठरतात.
शासकीय अधिकारी
या निमित्ताने पोलीस खात्याला व शासकीय कर्मचार्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन भारतीय घटनेतील एक तत्त्व असल्याची जाणीव करून देण्याची निकड लक्षात आली. 25 सप्टेंबर 2017 च्या वृत्तपत्रातील बातम्यांचे मथळे त्याबाबतीत बोलके आहेत. “महिला पोलीस अधिकारीच बुवाची मोठी भक्त” – दै. ‘तरुण भारत’, रत्नागिरी.
“पाटीलबुवाच्या दर्शनासाठी महिला पोलीस अधिकारी पोचली कोठडीत – दोनदा पायाशी लोटांगण, पोलीस अवाक्” – दै. ‘प्रहार’
“अटकेनंतरही खाकी वर्दी पाटीलबाबासमोर झुकली” – दै. ‘सागर’
“बुवाच्या आशीर्वादाची कर्मचार्यांनाही गोडी- कृषी कार्यालयातील एक कर्मचारी दर गुरुवारी सुट्टी घेऊन पाटील बाबाच्या आश्रमात” – दै. ‘लोकमत’ (27 सप्टेंबर)
“पाटीलबाबाच्या दरबारी देवरुखच्या अधिकार्याची वारी” – दै. ‘तरुण भारत’ (5 ऑक्टोबर)
भारतीय घटनेने प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य दिले आहे; पण त्यांनी ते स्वत:च्या घरी पाळावे, शासकीय कार्यालयात आणि शासकीय वेळेत नव्हे, निदान नोकरीला लागल्यावरही त्यांनी धर्मनिरपेक्षता आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची माहिती करून घेतली पाहिजे.
मठ आणि आश्रम
देशात विविध धर्म, पंथ, उपपंथांचे बुवांचे मठ आणि आश्रम आहेत. प्रत्येक जण आपल्याला सोयीचा धर्म सांगतो. फायद्याचे अध्यात्म सांगतो. कोणीही स्वत:ला दैवीपुरुष किंवा अवतार जाहीर करतो. जनतेच्या अडचणींचा अभ्यास करून त्यांचा उपयोग जाळ्यात ओढण्यासाठी करतो. त्यातून आर्थिक साम्राज्य उभे करतो. आर्थिक, भावनिक, शारीरिक, लैंगिक शोषण करतो. ईश्वरी; ज्याचा दावा करून सज्जनांचे खून पाडतो, लष्कर उभा करतो, देशाच्या घटनेला आव्हान देतो.
शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी याबाबत डोळ्यावर कातडे ओढून बसतात, जमलं तर ‘मतां’वर हात मारतात. कधी पुण्य पदरात पाडून घेतात.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने जादूटोणा प्रतिबंधक कायदा झाला; पण तो मठ संस्कृतीला हात लावण्यास पुरेसा नाही. मठ, आश्रम, दर्गे, डेरे इत्यादीसाठी खास कायद्यांची गरज आहे. त्यांच्या संपत्तीला कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे. मठातील दिनक्रम सर्वांसाठी खुला असला पाहिजे. शासनाशिवाय इतर कोणालाही स्वत:चे सुरक्षा गार्ड, सैन्य उभारण्याची परवानगी असता कामा नये. भारतीय घटनेतील तत्त्वांचे उल्लंघन होऊ देता कामा नये. मठ नियमन कायद्यासाठी आता संघटनांनी कंबर कसावी. त्याचबरोबर जनसाक्षरतेसाठीही प्रयत्नांची गरज आहे. खरे अध्यात्म, खरा धर्म हा दुर्बलांच्या मदतीमध्ये आहे, हे त्यांना समजले पाहिजे. वारकरी संप्रदायाने संतांचे खरे विचार भाविकांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न करावेत.
लोकांच्या समस्या खूपच आहेत. जागतिकीकरणाच्या रेट्यात व्यवसाय बंद पडलेले, नोकरी गेलेले, नोकरी मिळालेले, वैद्यकीय सेवा न परवडणारे अशांची संख्या वाढत जाणार आहे. त्यांच्या योग्य मार्गदर्शनासाठी सक्षम यंत्रणांचा विचार व्हावा.
आपल्या समाजात महिला हा घटक उपेक्षित आहे. त्यांना आपल्या समस्या सांगायला, मन मोकळे करायला, मार्ग शोधायला, योग्य पर्याय दिला पाहिजे. आव्हान मोठे आहे; पण त्यापासून समाज, कार्यकर्त्यांना मागे फिरता येणार नाही, हेही तेवढेच खरे आहे.
– अनिल चव्हाण, कोल्हापूर
संपर्क: 9764147483