शतकानुशतके शूद्र, पंचम व स्त्रियांना देवालयात प्रवेश नव्हता. त्या देवालय व्यवस्थेवर बहिष्कार घालून, पुरोहितशाहीला चपराक देत बसवण्णांनी इष्टलिंगरुपात प्रत्येकाच्या जवळच देव दिला आणि देहचि देवालय असल्याचे ठामपणे सांगितले. बहिष्कृत समाजाला धार्मिक उपासनेचे स्वातंत्र्य इष्टलिंगाच्या रुपात मिळाले. शरण षण्मुख शिवयोगी म्हणतात :
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कोणीही असो,
कोणत्याही जातीत जन्मलेला असो,
गुरुकारुण्य प्राप्त करून अंगावर लिंग धारण करून
आचारक्रियासंपन्न झालेला महात्माच
तिन्ही लोकांत श्रेष्ठ पाहा.
महात्मा बसवण्णांनी इष्टलिंग उपासनेद्वारा समानता प्रस्थापित केली. इष्टलिंग उपासना ही व्यक्तिगत असल्यामुळे पुरोहितासारख्या मध्यस्थांची गरजच नाही. उपासनेत पुरोहित नसल्यामुळे शोषण नाही. इष्टलिंग हृदयावर धारण केल्यामुळे त्याच्या उपासनेसाठी स्थळ, काळ, वार, महिना, नक्षत्र, दिशा, मुहूर्त, शुभाशुभ असे काहीही पाहण्याची गरज नाही. पंचांग पाहण्याची गरज नाही. त्याच्या उपासनेसाठी यज्ञयाग-होमहवन, अभिषेक, उपवास, व्रतवैकल्ये अशा नाना साधना करण्याची आवश्यकता नाही.
महात्मा बसवण्णांनी लिंगायत धर्मात सर्व वर्णांतील पुरुषांबरोबरच स्त्रियांनाही उपासनेत समान स्वातंत्र्य दिले आहे. पुरुषांवर केले जाणारे सर्व संस्कार त्याच पद्धतीने स्त्रियांवरही केले जातात. लिंगायत धर्मातील सर्व संस्कारांत स्त्रीही पुरुषांबरोबर समानपणे सहभागी होते. इष्टलिंग दीक्षा घेण्याचे अधिकार स्त्री-पुरुष दोघांनाही समान आहेत. सर्व धार्मिक व सामाजिक सभा-समारंभात स्त्री मुक्तपणे सहभागी होऊ शकते. पुरुषाप्रमाणेच सर्व धार्मिक लांछने परिधान करण्याचे स्वातंत्र्य स्त्रियांना आहे. विशेष म्हणजे मासिक पाळीच्या कालावधीतसुद्धा लिंगायत स्त्री मुक्तपणे इष्टलिंग उपासना करते. रजस्व ही नैसर्गिक क्रिया असल्याचे सांगून शरणांनी ते सुतक मानण्याचे नाकारले आहे. फक्त उपासना करण्यापर्यंतच स्त्री समानतेची मर्यादा न ठेवता त्यांना धर्मपीठावर बसून इष्टलिंग दीक्षेद्वारा उपासनेचा उपदेशही करण्याचे स्वातंत्र्य आहे.
बाराव्या शतकात अनेक स्त्रिया शरणी झाल्या. त्यांनीही धर्मप्रसार केला, वचन रचना केल्या. गुड्डापूरच्या दानम्माने असंख्य लोकांना लिंगदीक्षा दिली आहे. ही परंपरा आजही चालू आहे. बसवण्णांचे ऐक्यस्थळ असलेल्या कूडलसंगम येथील धर्मपीठावर महिला जगद्गुरू विराजमान आहेत. कदाचित स्त्रियांना एवढ्या मुक्तपणे धार्मिक क्षेत्रासह सर्व क्षेत्रांत स्वातंत्र्य आणि समानता देणारा हा पहिलाच धर्म असावा.
स्त्रिया, ब्राह्मण, वैश्य, शूद्र, अस्पृश्य यांच्यासोबतच समाजाने ज्यांना अमान्य, अनैतिक, अनौरस म्हणून हिणवले आहे, अशा समाजघटकांनाही बसवण्णा लिंगदीक्षेद्वारे उपासना स्वातंत्र्य देतात.
दासीपुत्र असो, वेश्यापुत्र असो,
लिंगदीक्षा झाल्यावर साक्षात् शिव मानून,
वंदून, पुजून तयाचे पादोदक–प्रसाद
स्वीकार करणेच योग्य.
असे न करता, तिरस्कार करणार्यास
पंचमहापात नरक पाहा हो, कूडलसंगमदेवा.
दासीपुत्र असो, वैश्यपुत्र असो, हे लिंगदीक्षेने सर्वसमान होतात. त्यांना प्रत्यक्ष शिव मानून, वंदन करून, त्यांचे पूजन करावे. म्हणजेच त्यांचा अत्यादर करावा. त्यांचे पादोदक घेण्याद्वारे आपल्यातील “अहं” आणि त्यांच्यातील ‘न्यून’ यांचे निरसन होईल आणि प्रसाद घेण्याद्वारे सहभोजन केल्याने समानतेची भावना निर्माण होईल, असा बसवण्णांना विश्वास आहे.
बसवप्रणित लिंगायत धर्मातील इष्टलिंग उपासना ही लिंगभेद नसलेली समरती, वर्णभेद नसलेली समकळा आणि वर्गभेद नसलेली समसुख प्रज्ञा रुजविणारी आहे. स्त्री आणि पुरुष यांचे सहजीवन म्हणजे समरती होय. समरतीमध्ये स्त्री ही पुरुषाला समान होत असते, सहचर भावाने राहत असते. सर्व मानव समकळा अंगीकारलेले असतात. एका ठराविक धर्माला, वर्णाला किंवा जातीला कळा म्हणजेच तेजस सीमित नसते. तसेच सुख ही वरच्या वर्गाची मक्तेदारी किंवा संपत्ती नव्हे. सर्व मानवांना सुख अनुभवण्याचा हक्क आहे. मानवांना समसुखाची प्रज्ञा आल्यास वरचे वर्ग, समकळा आणि समसुखाची प्रज्ञा रुजविणेच इष्टलिंग उपासनेचा मुख्य उद्देश आहे. इष्टलिंग उपासना करण्याद्वारे समानतेची प्रज्ञा रुजविण्याप्रमाणे भावैक्यदेखील अंगीकारले पाहिजे. जसे नद्या एकमेकांत मिसळून समरस होतात, तसे सर्व मानव एकरूप व्हावेत. ही खरी उपासना होय.
काही दिवसांपूर्वी देशभर उपासना स्वातंत्र्यावर भरपूर चर्चा, विचारमंथन, आरोप-प्रत्यारोप चालू होते. विचारवंत, शासन आणि धर्ममार्तंड यांच्यातील संघर्ष वाढत चालला होता. अशा वेळी भारतासारख्या राष्ट्रात समरती, समकळा नि समसुख रुजविणारी उपासना पद्धती सार्वत्रिकपणे पुरस्कृत करणे काळाची गरज आहे. यातच उद्याच्या राष्ट्राचा विकास दडलेला आहे. या अर्थाने महात्मा बसवण्णांनी 12 व्या शतकात अमलात आणलेली ही उपासना पद्धती काळाच्या किती पुढची आहे, याचे चिंतन भारतीय विचारवंतांनी करावे.
– राजू ब. जुबरे
संपर्क : मो. 08904638908