Categories
पुस्तक परिचय

पृथ्वीमोलाचा माणूस!

ऑगस्ट - २०१६

पुरोगामी महाराष्ट्रात विवेकाची पताका आपल्या हाती घेऊन ज्यांनी-ज्यांनी मार्गक्रमण केले, त्यामध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. 25 वर्षांपूर्वी ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची स्थापना करून भूत, भानामती, जादूटोणा, बुवाबाजी, धर्मचिकित्सा यांचा एल्गार सुरू करणारे दाभोलकर एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व होते. ‘विचारांचा लढा विचारानेच लढला पाहिजे,’ ही त्यांची मानसिकता होती. मात्र विचारांना हत्याराने मारू पाहणार्‍या विघातक प्रवृत्तींना दाभोलकर समजलेच नाहीत.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याबरोबर गेली 25 वर्षे एक कार्यकर्ता म्हणून खारीचा वाटा उचलताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू दृष्टिपथात आले. रक्त न सांडता वैचारिक क्रांती व मानसिकतेत बदल करणार्‍यांची आपल्या देशात हत्या होते, हा आपला इतिहास आहे. त्याची पुनरावृत्ती झाली, एवढेच म्हणता येईल.

विवेकी माणूस बनवण्याचे एक तत्त्वज्ञान दोन वर्षांपूर्वी ओंकारेश्वराच्या पुलावर विसावले; मात्र त्या दिवसापासून प्रत्येकालाच दाभोलकर समजून घेण्याची आस निर्माण झाली. डॉक्टरांनी घेतलेला अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा आणि त्यांच्या विवेकी कार्याने जनमानसात उमटवलेला ठसा अनेकांना बोलतं आणि लिहितं करून गेला. त्यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र आणि देशविदेशाच्या वृत्तपत्रांमधून भरभरून लेख-अग्रलेख लिहिले गेले. त्यांचे संकलन मी करत राहिलो. ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांशिवाय जनसामान्यांना दाभोलकर कसे भावले, कसे उमगले, याचा हा मूर्तिमंत ठेवा मुक्तहस्ताने इतरांनाही द्यावा, असे सहजच मनात आले. तळा, जि. रायगड येथील द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या संकलनाला मूर्त स्वरूप दिले. त्यासाठी प्रा. भगवान लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. हे तीन-चारशे पानांचे अमूल्य संकलन माझे साथी अरविंद पाखले यांच्याकडे घेऊन गेलो. प्रत्येकालाच सर्व वृत्तपत्रे वाचायला मिळतातच, असे नाही. म्हणून हे सारे पुन्हा पुस्तकरुपाने प्रकाशित करायचेच, असे मनोमन ठरवून आम्ही दोघांनी मिलिंद जोशी व प्रभाकर नानावटी यांना गाठले आणि त्यानंतरच्या त्यांच्या अविरत परिश्रमातून ‘पृथ्वीमोलाचा माणूस’ (हे अरविंद पाखले यांनी सुचविलेलं नाव) साकार झाले.

या संकलन साहित्याची प्रस्तावना कोणी लिहावी, हा यक्षप्रश्नच होता; पण डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रा. पुष्पा भावे यांचे नाव सुचविले आणि प्रा. भावे यांनी रुग्णालयात असतानाही त्वरित प्रस्तावना लिहून दिली, त्याबद्दल त्याचे ऋण व्यक्त करायलाच हवेत.

महात्मा गांधींच्या तोलामोलाचे कर्तृत्व, साने गुरुजींची साधना, पंडित नेहरुंची विज्ञाननिष्ठा आणि शाहू, फुले, आंबेडकरांची विवेकी विचारसरणी लाभलेला डॉ. नरेंद्र दाभोलकर अर्थात ‘पृथ्वीमोलाचा माणूस’ आपल्या समोर ठेवताना डॉ. नरेंद्र दाभोलकर नसण्याची वेदना तर आहेच; पण ‘माणूस मारता येतो; विचार नाही’ याचे विवेकी भान ‘पृथ्वीमोलाचा माणूस’ देते, याचे मनस्वी समाधानही आहे.