21 ऑगस्ट 2013 या दिवशी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची निर्घृण हत्या झाली. हा दिवस म्हणजे भारताला आणि जगाला धार्मिक मूलतत्त्ववाद आणि गूढवाद यांच्या वाढत चाललेल्या प्रभावामुळे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेवर येऊ घातलेल्या संकटाची स्मृती जागवणारा दिवस. डॉक्टरांच्या खुनानंतर पुढे ज्या घटना घडल्या, त्या हा खून म्हणजे केवळ एका व्यक्तीच्या हत्येपुरता मर्यादित नाही, तर कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्यासारख्या विवेकवादी आणि मानवतावादी विचारवंतांना पद्धतशीरपणे संपविण्याच्या व्यापक कटाचा भाग असल्याचे लक्षात यावे. या तिघांचे कोणाशीच कसलेही खाजगी वैर किंवा भांडण नव्हते; पण त्यांचे निर्दयपणे खून करण्यात आले. ते लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचे उद्गाते आणि समर्थक होते. निर्भयपणे आणि नि:पक्षपाती वृत्तीने मानवी प्रतिष्ठा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. अशा विचारवंतांच्या मारेकर्यांना अजूनही पकडले गेले नाही आणि घटनेनुसार योग्य ती शिक्षाही झालेली नाही, याचे आश्चर्य आणि चिंताही वाटते. न्यायास विलंब म्हणजे न्यायास नकारच होय.
डॉ. दाभोलकर, कॉम्रेड पानसरे आणि डॉ. कलबुर्गी हे सामान्य लोक नव्हते. त्यांच्या-त्यांच्या क्षेत्रातील असामान्य व्यक्तिमत्त्वे होती. त्यांच्या निर्घृण खुनामुळे अवघा देश हादरला. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील विचारवंत, सामान्य नागरिक, युवक-युवती, स्त्री-पुरुष या सर्वांनी या खुनाच्या घटनांचा तीव्र निषेध नोंदविला. या तिघांना ज्यांनी पाहिलेही नव्हते, अशा लाखो लोकांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. तरुण आणि वयस्कर स्त्री-पुरुष या सर्वांसाठी हे निर्भय विचारवंत धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समता आणि न्याय यासाठीचे आदर्श होते.
डॉ. दाभोलकर हे थोर गांधीवादी, विवेकवादी आणि मानवतावादी समाजधुरिण होते, ज्यांनी प्रतिगामी बुरसट विचार आणि अंधश्रद्धा यांचा शांततामय मार्गाने प्रतिकार केला. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या दाभोलकरांनी वैचारिक आजारग्रस्त समाजाचा इलाज करण्याचे कार्य हाती घेतले. अंधश्रद्धा, अस्पृश्यता आणि जातिभेद यांच्या विरोधात जंग छेडले. आपल्या संघटनेमार्फत त्यांनी ‘आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहां’ना उत्तेजन दिले. अंधश्रद्धा आणि जातीयता याविरोधातील लढाई ही एकट्यानं लढण्याची गोष्ट नाही, हे हेरून त्यांनी सशक्त संघटनेची बांधणी केली आणि त्याद्वारे आपला लढा सशक्तपणे लढला.
लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष समाजात सामाजिक बदलासाठी कायदा महत्त्वाचा ठरतो; पण प्रतिगामी धर्मगुरू, संधिसाधू राजकारणी आणि इतर अनेक घटक नव्या कायद्याला विरोध करतात. महाराष्ट्र सरकारच्या दोन्ही सभागृहातील आमदारांना जादूटोणाविरोधी नव्या कायद्यासाठी अनुकूल करणे, हे तसं अवघड आणि चिकाटीचे काम. पण अत्यंत चिकाटीने आणि धीराने त्यांनी या कायद्यासाठीचा प्रयत्न चालू ठेवला. या कायद्याच्या मसुद्यात बदल करण्याची लवचिकताही त्यांनी दाखविली. पण 18 वर्षांच्या अविरत प्रयत्नांनंतरही सनातनी आणि त्यांचे समर्थक राजकारणी यांनी कायद्याला विरोध चालूच ठेवला. अखेरीस धर्मांधांनी त्यांचा खून केल्यावर, जनतेचा प्रक्षोभ पाहून सरकारला जाग आली आणि ‘जादूटोणाविरोधी कायदा’ मंजूर करण्यात आला.
‘नास्तिक केंद्रा’ची स्थापना 76 वर्षांपूर्वी गोरा आणि सरस्वती गोरा यांनी केली. डॉ. दाभोलकर या केंद्राशी संपर्क करून होते. त्यांनी नास्तिक केंद्राला भेटही दिली होती. गोरांच्या 28 व्या स्मृती समारोहात त्यांनी 2003 मध्ये सहभागी होऊन आपले विचार मांडले होते. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’च्या ‘विशेषांका’त ‘नास्तिक केंद्रा’चा परिचय आणि त्यांच्या कार्याबाबत सविस्तर लेखही प्रसिद्धही केला होता. जात ही मोठी अंधश्रद्धा आहे. नास्तिक केंद्रात जातिभेदाच्या उच्चाटनाला महत्त्वाचे मानले जाते. ‘लरीींश’ हा शब्द मूळचा पोर्तुगीज. तो ‘लरीींश’ चे अपभ्रंश आहे. लरीींश म्हणजे वर्ळींळीळेप. लरीींश म्हणजे भेदाभेदाला लोकशाहीत स्थान नाही.
डॉ. दाभोलकरांनी बांधलेल्या संघटनेत जातिप्रथेला स्थान नाही. महाराष्ट्रातील जात, धर्म, लिंगनिरपेक्ष अशी ही संघटना आहे, हे कौतुकास्पद आहे. जानेवारी 2016 मध्ये नास्तिक केंद्र, विजयवाडा यांच्या पुढाकाराने ‘जागतिक नास्तिक परिषद’ भरविली होती. या परिषदेला महाराष्ट्रातून ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांना खास निमंत्रित केले होते. ते या परिषदेचे अध्यक्ष होते.
महाराष्ट्राच्या धर्तीवर आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये अंधश्रद्धाविरोधी कायदा करण्यासाठी ‘नास्तिक केंद्रा’तर्फे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जिल्हा पातळीवर प्रचारयंत्रणा राबविण्यात आली. पण राज्यकर्ते जातीच्या आधारावर राजकारण करीत आहेत. त्याचा मोठा अडथळा अनुभवाला येत आहे. जात गेलीच पाहिजे आणि ती जाण्यासाठी धर्माला हद्दपार करायला हवे. यासाठी धर्मनिरपेक्ष लोकशाही मजबूत व्हायला हवी.
आज दाभोलकर आपल्यामध्ये नाहीत. पण त्यांनी उभे केलेले कार्य आपल्याला स्फूर्ती देत राहील आणि तरुणाई शोषण, अन्याय आणि दडपशाही याच्याविरोधात लढण्यासाठी सज्ज होईल. दाभोलकरांच्या तिसर्या स्मृतिदिनानिमित्त हाच संदेश सर्वत्र जायला हवा.
जानेवारी 2014 मध्ये घेतलेल्या नास्तिक केंद्राच्या 75 व्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात डॉ. दाभोलकरांचे सर्वांनी चिंतन करावे, असे उद्गार अधोरेखित केले गेले. या उद्गारांनी आपण तिसर्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करूया.
“लोकांच्या मनात बुद्धिप्रामाण्यवादाचं बीज पेरणं तसं अवघड काम आहे. तथापि, विवेकाचा पुन्हा-पुन्हा उद्घोष वाया जात नाही. त्याचा परिणाम चळवळ उभारणीत होतो. लोक या चळवळीत सामील होत असताना तिचे संघटनशक्तीत रूपांतर होते. हे संघटन सामाजिक परिवर्तनासाठीचं असेल, तर सोन्याहून पिवळं; पण या अवघड मार्गावर दमछाक होते. मी माझ्या अल्पशा शक्तीनुसार या मार्गावरून जात आहे; पण मला याची जाणीव आहे की, ही कधीच न संपणारी वाट आहे.”
आपणही या वाटेवरचे प्रवासी होऊया!
(मराठी अनुवाद : प्रा. प. रा. आर्डे)