जीवन हे केवळ एक स्वप्न नसून ते एक वास्तव आहे, एक संघर्ष आहे. जी व्यक्ती मन, ध्यास व दृढ संकल्प यांच्या सहाय्याने आपले ध्येय गाठण्यासाठी चालत राहते, ती जीवनावर विजय प्राप्त करते. आपल्या कार्याविषयी ध्यास, दृढता व बांधिलकी असणे, हे जीवनाचे असे दागिने आहेत की, जे विजयाकडे घेऊन जातात. ज्यांचे आदर्श उच्च व शुद्ध असतात, ज्यांचे सुख लोकांच्या सुखाशी निगडित असते, असे जीवनाचे रूपच आपल्या पाऊलखुणा उमटविण्यास समर्थ असते. जीवनाच्या अशाच एका संघर्षमय रुपाचे नाव आहे डॉ. नरेंद्र दाभोलकर. त्यांनी अज्ञानाचा काळोख दूर करण्यासाठी आपले जीवन पणाला लावले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोलकर केवळ देशातीलच नाही, तर जगभरातील विवेकवादी, मानवतावादी व लोकहितकरी समूहातील एक चर्चित नाव आहे. लोकांना अंधश्रद्धा व अज्ञानाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढून भ्रममुक्त समाजाची स्थापना करणे, हेच त्यांचे ध्येय होते.
अज्ञानाच्या विरोधात प्रकाशाचा प्रचार करणार्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे खुनी निःसंशय तेच लोक आहेत, जे धर्माच्या बुरख्याआडून अंधविश्वास व अज्ञानाचा व्यापार करीत आहेत. लोकांचे अज्ञान व धार्मिक भावनांच्या सहाय्याने राज्यसत्ता गाठणे हे ज्यांचे कर्म आहे, असे लोकच डॉ. दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या विचारांना व कार्यक्रमांना विरोध करून लक्ष्य करीत होते. जातीय शक्तींनी डॉ. दाभोलकर यांचे शरीररूप आपल्याकडून हिरावून घेतले असले, तरी त्यांचे विचार, आदर्श व स्वप्ने अगदी जशीच्या तशी जिवंत आहेत. त्यांची स्वप्नपूर्ती करूनच अशा जातीय शक्तींचा पराभव करायचा आहे. वातावरणात डॉ. दाभोलकर यांचे शब्द घुमत आहेत…. “चला, समाजाला आपली गरज आहे ….. जात-पात, असमानता, अज्ञान व अंधश्रद्धा यांच्याविरुद्धच्या या मोहिमेस अजून तीव्र करा. विज्ञानाचा प्रकाश अज्ञानाच्या अंधारास एक दिवस दूर करेल…. श्रद्धा हीच अंधश्रद्धेची जननी आहे.”
तर्कशील सोसायटीने पंजाब आणि हरियाणामध्ये दाभोलकरांच्या खुनानंतर दहा जिल्ह्यांमध्ये जोरदार निर्दशने केली. डॉक्टरांच्या फोटोंचे कॅलेंडर तयार करून ते दोन्ही राज्यात वितरीत केले. तर्कशील या मासिकाचे तीन विशेषांक डॉ. दाभोलकरांवर प्रसिद्ध केले. या महिन्यात डॉ. दाभोलकरांच्या स्मरणार्थ पंजाब आणि हरियाणामध्ये शहीद सप्ताह पाळण्यात आला. दिल्लीमधील धरणे आंदोलनात तर्कशील साथींनी सहभाग दिला.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा मार्ग, आपला मार्ग आहे, त्यांच्या आदर्शांची पूर्ती करण्यासाठी आपल्याला चालतच राहावयाचे आहे.
(मराठी अनुवाद : उत्तम जोगदंड)