ती एकदम सुंदर तरुणी… विशीतली… उंचीपुरी…गोरगोमटी…. एखाद्या चित्रपटाची नायिका शोभेल अशी! पोलीस भरतीसाठी ती प्रयत्न करत आहे. बावीस मे रोजी तिचं लग्न झाले. नवर्यामुलाचे अगोदर एक लग्न झालेले! तरीही आनंदाने तिने त्याला स्वीकारले. साधारण कुटुंबातील असूनही वडिलांनी कर्ज काढून जोरदार लग्न लावून दिले. सर्व गाजावाजा संपल्यावर अखेर ती वेळ आली… कौमार्याची परीक्षेची! तिच्या हातावरच्या मेहंदीचा रंग खुलला होता; पण भीतीने चेहर्याचा रंग उडून गेला होता. वयस्कर महिलेने मंडपाशेजारीच एका खोलीत नेऊन तिला विवस्त्र केले. तिने कुठे पीन, ब्लेड वगैरे धारदार वस्तू लपवून ठेवली नाही ना, हे तपासून घेतले. तिच्या बांगड्या मोजून दोर्याने एकत्र बांधून घेतल्या. अंगावरचे दागिने काढून घेतले. पुन्हा अंगावर कपडे घातले. एका वयस्कर पुरुषाने नवर्यामुलाला तसंच चांगलं तपासून घेतलं. पुन्हा अंगावर कपडे घातले. जातीच्या पंचानी एक पांढरंशुभ्र वस्त्र त्यांच्या हातात दिलं. दोघांना त्या खोलीमध्ये सोडले. सोबत दिलेल्या वस्त्रावर दोघांनी एकत्र झोपायचं असतं. काही वेळेनंतर जातपंचायत बसली. दोघेजण बाहेर आले. एका महिलेने हातातील बांगड्या मोजून घेतल्या. पंचांनी विचारणा केल्यावर मुलाने आत घडलेल्या प्रसंगाचे हुबेहूब वर्णन केले. शेजारी बसलेल्या वडिलांनी मान खाली घातली. शेवटी पंचांनी एक धक्कादायक प्रश्न विचारला. तो म्हणजे माल खरा निघाला की खोटा?
मुलाने हातातले पांढरेशुभ्र वस्त्र पंचांकडे दिले. पंचांनी ते बारकाईनं बघितलं. त्यावर रक्ताचा डाग नव्हता. पंचांनी त्या मुलाकडे बघितले. मुलाने रागाने उत्तर दिले, ‘माल खोटा, खोटा, खोटा…’
एकच शांतता पसरली. पंचांनी लग्न रद्द ठरवले. तिने आक्रोश केला. पोलीस भरतीच्या ट्रेनिंगमुळे असं घडल्याचं, तिने जीव तोडून सांगितले. वडिलांनी विनवणी केली; पण पंच हेका सोडायला तयार नव्हते. अखेर मुलाच्या नातेवाईकांनी लग्नाच्या सर्व भेटवस्तू जमा करून सोबत घेतल्या. इतकेच नाही, तर तिचे अंगावरचे दागिनेही काढून नेले. नवरा व वर्हाडी तिला तिथेच सोडून निघून गेले; मात्र मंगळसूत्र काढून नेण्याचे ते विसरले नाहीत.
घरात स्माशानशांतता पसरली
लग्नाच्या तिसर्या दिवशी मला ही माहिती मुलीच्या नातेवाईकांनी सांगितली. फोनवर चौकशी केल्यावर आमचे आपसांत मिटणार असल्याचे समजले. दुसर्या दिवशी अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. रंजना गवांदे यांच्यासह मी त्यांचे घर गाठले. जावई परत येईल, या आशेवर चार दिवस झाले, तरी घरासमोरचा मंडप सोडला नव्हता. लग्नाचे वातावरण आता गंभीर झाले होते. घरात रडारड झाली. पोलिसांत गेल्याने बहिष्कृत झाल्यास आणखी दोन मुलींचे लग्न कसे होणार, या काळजीने वडील हवालदिल होते. जातीचे प्रश्न जातीतच सोडविण्याच्या मानसिकतेने इतर अनेक प्रश्न उभे ठाकले. आम्ही तासभर थांबून सर्व समजून घेतलं. वडिलांच्या ढसा-ढसा रडण्याने मात्र आम्ही हेलावून गेलो. आई व नवरी मुलगी हिंमतवान वाटली. ‘एक दिवस थांबा, जावई पंचासोबत आला नाही, तर आपण रीतसर तक्रार दाखल करू’, असे आम्हाला सांगण्यात आले. आम्ही त्यांना हिंमत देऊन निघून आलो. दुसरा दिवस असाच निघून गेला. पुढच्या दिवशी मुलीने एकटीने गुपचूप पोलीस स्टेशन गाठले. मुलीने फोन करून मला तसे कळवले. अॅड. गवांदे मॅडम त्याच शहरात राहत असल्याने लगेचच पोलीस ठाण्यात पोचल्या. मी पोचण्याच्या अगोदरच तिच्या वडिलांनी रागारागात पोलीस ठाण्यात गाठले. तक्रार दाखल करण्याअगोदरच मुलीला रागावत घरी परत घेऊन गेले. जाताना आणखी एक दिवस वाट पाहण्याची विनंती केली. नंतर मुलीचा मोबाईल काढून घेतल्याने आमचा संपर्क होईना. त्यांनी राज्यभरातील पंचांना संपर्क साधला; पण कुणीच मुलीला परत सासरी जाण्याच्या बाजूने नव्हते. पुढच्या दिवशी मी पुन्हा संगमनेर गाठले. सायंकाळी मात्र मुलगी अॅड. गवांदे यांच्या घरी आली. आणखी एक दिवस थांबण्याची विनंती केली. दुसर्या दिवशी पुन्हा तसेच झाले. मुलीच्या भल्यासाठी नवरा सोडेल; पण तक्रार दाखल करेल, असे म्हणणार्या आईचाही नाईलाज झाला. तक्रार दाखल होण्याची शक्यता मावळली. दहाव्या दिवशी आम्ही मग आपल्या पद्धतीने आखणी केली. स्थानिक व संबधित पंचांशी संपर्क केला. नवर्या मुलासोबत पंच येण्यास तयार नव्हते. त्याला बायको हवी असल्याचे दिसून आले. मुख्य पंच आजारपणाचे नाटक करत दवाखान्यात दाखल झाला. स्थानिक पंचांनी मागील वर्षी मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यावेळी मी पोलिसांत तक्रार दिल्याने त्यांनी नाराजी कायम होती. ते सुरुवातीपासूनच मुलीच्या विरोधात होते. मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचे दिसत होते. अशा मुलीला शुद्धीकरणाच्या अमानुष प्रथेला सामोरे जावे लागणार होते. आयुष्याभर वडिलांच्या घरी बसावे लागणार होते. मग आम्ही प्रसारमाध्यमांना सोबत घेऊन सामाजिक दबाव तयार केला. तेव्हा मात्र सर्व घाबरून गेले. पोलिसांनी स्वतः हस्तक्षेप केला. अॅड. गवांदेंसमोर तिने पोलिसांना आपबीती सांगितली. पोलिसांनी जबाब इन कॅमेरा रेकॉर्ड केला. अहवाल बनवून तत्काळ महिला आयोगास पाठवला. जातपंचायतीची मनमानी मोडून काढत नवरा घेण्यास आला नाही, तर सायंकाळी तक्रार दाखल करणार, अशी भूमिका मुलीने घेतली. पत्रकारांमार्फत आम्ही मुलालाही हिंमत दिली. दोघांनी जातपंचायतविरोधी बंड केले. सायंकाळी मुलाने मुलीचे घर गाठले. पोलिसात लिहून दिले. मुलीला नोकरीसाठी पोलिसांत पाठवण्यास राजी असल्याचे त्याने प्रसारमाध्यमांना सांगितले. पोलीस बंदोबस्तात दोघे आपल्या घरी रवाना झाले, ते सुध्दा शुद्धीकरणाचा घृणास्पद विधी केल्याविना ! मुलीचा चेहरा मात्र खुलला होता. तिच्या वडिलांनी ‘अंनिस’मुळेच मुलीचे आयुष्य वाचल्याचे नम्रपणे कबूल केले. हे किती मोठे बंड आहे, याची कल्पना फक्त ते जातबांधवच करू शकतात. समाजातले अशा प्रकारचे हे पहिलेच लग्न ठरले. त्यामुळे पंचांचे धाबे दणाणले. त्यांच्या सत्तास्थानाला हादरे बसले. पंचांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश महिला आयोगाने दिले. प्रसारमाध्यमांनी अक्षरश: दिवसभर हा विषय लावून धरला. देशभरात न्यूज हेडलाईन बनली गेली. शिवसेना प्रवक्त्या निलमताई गोर्हे यांनी तिच्यासाठी आर्थिक मदतीची तयारी दाखवली, तर सिन्नर येथील इंद्रभान गाडे या अंनिसच्या हितचिंतक कार्यकर्त्यांनी तिच्या ट्रेनिंगचा पूर्ण खर्च उचलला.
राज्यभर आता कौमार्य या विषयावर चर्चा होत आहे. वयात आलेल्या व शरीरसंबंध न ठेवलेल्या मुलीला कुमारिका म्हटले जाते. लग्नाच्यापूर्वी तिने शारीरिक संबंध ठेवले आहेत का, याची अशास्त्रीय पद्धतीने जातपंचांकडून तपासणी केली जाते, हे अत्यंत चुकीचे आहे. पहिल्या शरीर संबंधाच्या वेळी रक्तस्त्राव होणं जरुरीचे असते, असे नाही. रक्तस्त्राव होणे म्हणजे तिचे चारित्र्य शुद्ध असणे व रक्तस्त्राव न होणे म्हणजे तिचे अशुद्ध असणे, असे समजणे सुद्धा चुकीचेच आहे. स्त्रीच्या योनीमार्गात एक पातळ पडदा (हायमेन) असतो. खेळताना, सायकल चालवताना, व्यायाम करताना, थोडेसे शारीरिक मेहनतीच्या कामानेही तो तुटू शकतो. त्यामुळे कौमार्य व चारित्र्य यांचा काहीही संबंध नसतो. मात्र पहिल्या वेळी शरीरसंबध आल्यावर रक्त न आल्यास कौमार्यभंग अगोदरच झाले असल्याचा गैरसमज काही जातपंचांकडून केला जातो. पंचांचे मापदंड व वैद्यकशास्त्राचे निकष या दोन्हींचा मेळ बसताना दिसत नाही. अनेक प्रश्न समोर येतात ते हे की, अशा असंख्य महिला याला बळी पडण्याचे कसे थांबणार? कौमार्य का तपासले जावे? प्रत्येकाच्या खासगी जीवनात हस्तक्षेप इतरांनी का करावा? न्यायनिवाडे करण्याचा अधिकार पंचांना कुणी दिला? समाज अजूनही मध्ययुगीन मानसिकतेच्या चिखलात किती अडकलाय, हे दर्शविणारे आणि तळपायाची आग मस्तकात नेणारे, हे उदाहरण आहे. कौमार्याची परीक्षा घेणे हा परंपरेचा भाग समजून पालन केले जात आहे. ती प्रथा पाळली नाही तर बलात्कार वाढतील किंवा खराखुरा पुरुष तपासून घेण्याची संधी महिलेला मिळाल्याने तिचे आयुष्य वाचते, हा दावा हास्यास्पद आहे.
अशा परीक्षेमुळे नवर्या मुलाला नकार दिल्याचे ऐकण्यात नाही. जातपंचायतीच्या बाबतीत स्त्रीला दुय्यम ठरवत तिच्या लैंगिकतेवर निर्बंध घालणे, तिला जखडून ठेवले गेले आहे. पुरुषी वर्चस्वातून स्त्रीला दुबळी ठरवलं गेलं आणि व्यवस्थेने नेहमी दुबळ्याचा बळी घेतला आहे. जातपंचायतच्या न्यायनिवाड्यातसुद्धा नेहमी बळी हा स्त्रीचा जातो. मुलीचे कौमार्य अबाधित राहण्याच्या गैरसमजातून अनेक जातीत तिचा पुरुषांशी येणारा सहभाग टाळला जातो. आईच्या पोटात असताना किंवा पाळण्यात लग्न लावले जाते. मुलींच्या शिक्षणाचा मार्ग बंद करणं, त्यांच्यावर केवळ जातीचे संस्कार होतील, याची दक्षता घेणे यावर लक्ष केंद्रित केलं जातं. दुसर्या एका विशिष्ट जातीत तर मुलीचे कौमार्य हे तिच्या योनी मार्गात कोंबडीचे अंडे घालून बघितले जाते. एका धर्मात मुलीच्या बालपणी खतना नावाचा विधी पंचांकडून केला जातो.मोठेपणी तिच्यामध्ये लैंगिक इच्छा उत्पन्न होऊ नये, यासाठी लहानपणी तिच्या योनी मार्गातील विशिष्ट भाग कापून टाकला जातो. एका जातीत परपुरुष आकर्षित होऊ नये, यासाठी महिलांचा चेहरा गोंदून विद्रुप केला जातो. एका जातीत तर महिलांनी दररोज अंघोळ करण्यास बंदी आहे; परंतु असे करणे, हे लैंगिक ज्ञानाचा अभाव व अंधश्रद्धा यामुळे होते.
कौमार्य अबाधित राहण्याच्या गैरसमजातून तिला बंधनात अडकवून ठेवले जाते, हे काम जातपंचायतीमार्फत बहुतांश जातीच्या पंचायतीमध्ये केले जाते. अगदी स्त्रीला परपुरुषाचा स्पर्श झाल्याने दंड किंवा शिक्षा केली जाते. जातपंचायतीच्या बहुतांश कू्रर शिक्षा या स्त्रीच्या योनीशूचितेशी निगडित आहेत. अनेक समाजात तिला ‘कमोडिटी’ म्हणून वापरलं जातं. बहुतांश समाजाच्या प्रत्येक कुटुंबात पंच मंडळींचा इतका हस्तक्षेप असतो की, व्यक्तीला स्वतःचे निर्णय घेता येत नाहीत. ती परावलंबी झाल्याने तिचं कर्तृत्व खुंटले जाते. पंचांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन धक्कादायक आहे. मुलगी पोटात असताना तिचं लग्न निश्चित करण्यापासून मरणानंतरही प्रेताला दंड करण्यापर्यंत पंचांना अधिकार असतो. आयुष्यात चारित्र्यावर केवळ संशय घेतला गेला. महिलांची ‘अग्निपरीक्षा’ घेण्याचे स्वयंघोषित अधिकार पंचांनी स्वत:कडे घेऊन टाकले आहेत. पंचांच्या मनमानी कार्यशैलीमुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सर्वसामान्य मुलगी लग्न निश्चित होताना पुढील सहजीवन, संसार यांच्या स्वप्नात रंगून जाते. पण अनेक जमातीतील युवतींना अशी स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य नाही. उलट, लग्न झाल्यानंतर पहिल्याच रात्री पंचांच्या देखरेखीखाली होणार्या कौमार्य परीक्षेचा मुलींना धाकच आहे.
सदर मुलीची शुद्धीकरणाची गोळ्यांची परीक्षा मात्र थांबली. अशा अमानुष प्रथा म्हणजे महिलांचे भयानक शोषण आहे. महिलेला साधारण एक मीटरचे संपूर्ण पारदर्शक वस्त्र दिले जाते. ते नेसवून वयस्कर महिलांकडून तिला पंचासमोर दूध व पाण्याची अंघोळ घातली जाते. नंतर जंगलात तिला एकटीला पळण्यास सांगितले जाते. मागून पंच रुईच्या झाडाच्या काठीने मारण्यासाठी धावतात व धान्याच्या पिठाचे गोळे गरम करून तिला फेकून मारण्यात येते. महिलेने मार वाचवत पुढे चालायचे असते. अंधारात चाललेला हा शुद्धीकरणाचा विधी काही वेळाने संपतो. सहा महिन्यांपूर्वी नंदुरबार येथे असाच होणारा विधी ‘अंनिस’ने थांबवला होता. विधवा महिलेची मिळकत हडप करण्याच्या हेतूने तिच्या चारित्र्यावर संशय घेण्यात आला. जातपंचायत बसली. रात्रभर शेणाच्या गोवर्यात लालबुंद केलेली कुर्हाड मुलाच्या हातावर ठेवून परीक्षा होणार होती. तिच्या बारा वर्षांच्या मुलाच्या हातावर रुईच्या झाडाची पाच पाने कच्च्या दोर्याने बांधायची व त्यावर लालबुंद झालेली कुर्हाड ठेवायची.
रामाची शपथ घेत काही ठराविक पावले चालून ती कुर्हाड मुलाने फेकून द्यायची.
तो धागा जळाला नाही व हात भाजला नाही तरच त्याच्या आईचे चारित्र्य शुद्ध ठरवण्यात येणार होते. चारित्र्य अशुद्ध असल्यास नंतर आईस शुद्धीकरणाची गोळ्यांची परीक्षा घेतली जाणार होती. विधानसभेत या विषयावर तारांकित प्रश्न उपस्थित झाला होता.
अहमदनगर जिल्ह्यातील कौमार्याच्या परीक्षेची घटना काही पहिलीच घटना नव्हे! कित्येक वर्षांपासून दबलेल्या आवाजाला महाराष्ट्र अंनिसच्या जातपंचायतविरोधी मोहिमेने वाचा फोडली आहे. काही समाजात या अमानुष प्रथेचे पालन कित्येक वर्षांपासून चालू आहे. परिघाच्या आतमधील लोकांना हे परिघाबाहेरचे जग माहिती नव्हते; परंतु ‘अंनिस’मुळे अशी प्रकरणे समोर येत आहेत. अंनिसकडे साधारण दिवसाआड एक नवीन प्रकरण येत आहे. पंचांच्या अशा मनमानी विरोधात राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी कायदा बनवला आहे. त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली आहे. राष्ट्रपतींची स्वाक्षरी बाकी आहे. या महिन्यात ती होणे अपेक्षित आहे. एका बाजूने व्यापक प्रबोधन, दुसर्या बाजूने कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यास व पीडित व्यक्तींनी पुढे आल्यास अशा अमानुष प्रथांना मूठमाती देता येईल.
- कृष्णा चांदगुडे
लेखक संपर्क : 9822630378