‘सैराट’ची महाराष्ट्रभर धूम सुरू आहे. खरं तर अजय-अतुलच्या संगीताने, गाण्याने चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच तरुणाईला ‘याड’ लावलं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हे याड जणू मास हिस्टेरियात रुपांतरित झाले आहे. आर्ची नावाचं नवं गारूड त्यातून उभं राहिलं आहे. मराठी चित्रपटाच्या वाट्याला असं घवघवीत यश फार कमी वेळा येतं. बर्याच वेळा सरकारी अनुदानाच्या ऑक्सिजनवरच ते तग धरून राहतात. काही अपवाद वगळता मराठी चित्रपटांचा दर्जा हा चिंताजनक आहे. चित्रपटांची नावंही त्यांना नीट ठेवता येत नाहीत, इतकी कल्पनाशून्यता दिग्दर्शनात असते. शिवाय कसलीही बांधिलकी नाही, प्रश्नांची खोली नाही. मुंबई; जिथे चित्रपट निर्मितीचा कारखाना आहे, त्या शहरात गिरणी कामगारांचं, गिरणगावाचं वाटोळं झालं; पण त्याबद्दल, त्या प्रश्नांबद्दल सर्वांगीण खोली असणारा एकही चित्रपट निर्माण झालेला नाही. या प्रश्नावर सईद मिर्झा यांचा ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’ हा चित्रपट सोडला तर बॉलिवूडमध्येही आनंदीआनंदच आहे.
या पार्श्वभूमीवर ‘सैराट’ पाहण्यासाठी चित्रपटगृहांवर लोकांचे लोंढेच्या लोंढे आदळत आहेत. या यशाची कारणे काय असावीत? ‘फॅन्ड्री’ सिनेमामुळे जगजाहीर झालेला नागराज मंजुळे हा दिग्दर्शक, मुख्य प्रवाहातील दिग्दर्शक नाही. त्याच्या दोन्हीही चित्रपटातील कलावंत हे कोणाला माहीतही नाहीत. इतकेच नव्हे, तर त्यांना चित्रपट क्षेत्रातील अभिनयाचा गंधही नाही. अभिनेता, अभिनेत्री होणं त्यांनी कधी स्वप्नातही पाहिले नाही. असे असतानाही आजवरचे बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड ‘सैराट’ने तोडले आहेत. महाराष्ट्राबाहेरही तो गर्दी खेचतो आहे. एक कारण त्याच्या उच्च दर्जाच्या कलानिर्मितीत शोधता येईल. उदा. दिग्दर्शन, संगीत, अभिनय, लोकेशन या सर्व गोष्टी चित्रपटकथेशी अगदी एकजीव झाल्या आहेत. शिवाय कुठेही हिणकसपणा नाही, ओंगळवाणे देहप्रदर्शन नाही, अचकट-विचकटपणा नाही. त्यामुळे त्याचे मनोरंजन मूल्य उच्च दर्जाचे झाले आहे. कलात्मकतेने सजलेले, कुठलीही खोट नसलेले, साधं, सरळ, ग्रामीण जीवनातील वास्तव; त्यात हिरोगिरी नाही, तर्काला न पटणार्या गोष्टी नाहीत. त्यामुळे समोर जे सुरू आहे, त्याचा आपणही भाग आहोत किंवा जे समोर घडत आहे, ते आपणही कधी अनुभवलेले आहे, याचा प्रत्यय देणारे वास्तव, नागराजने चित्रीत केले आहे. प्रत्येकाला ती आपल्या ‘त्या’ वयातील प्रेमकथा असल्याचा अनुभव चित्रपटातून घेता येतो, इतक्या वास्तव पातळीवर नागराजने ‘सैराट’च्या प्रेमकथेला नेऊन ठेवले आहे. प्रेमकथेत जे-जे पाहिजे आणि जे वास्तवात घडू शकते, ते-ते सर्व नागराजने त्याच्या दिग्दर्शकीय प्रतिमेच्या जोरावर देखणेपणाने उभे केले आहे.

परंतु इतर चित्रपटात नसलेली किंवा जाणीवपूर्वक दूर ठेवलेली, एक गोष्ट या प्रेमकथेच्या पार्श्वभूमीला आहे; जी या प्रेमकथेला रूढ प्रेमकथेतून बाहेर काढून आजच्या धगधगत्या सामाजिक वास्तवाचा, प्रश्नाचा भाग बनवते. हे वास्तव प्रत्येकाने अनुभवलेले असते, ते आपल्या समाजजीवनाचा आणि जाणिवांचा भाग बनलेले आहे. या सामाजिक वास्तवाचे संस्कारच तुम्हाला घडवीत असतात. ते वास्तव आहे, जातिव्यवस्थेने निर्माण केलेले आणि आपल्या मनावर रुजवलेले वास्तव; ज्यापासून कोणाचीही सुटका नाही. प्रत्येकजण कुठल्या तरी जातीचा असतो आणि त्या-त्या जाती संस्कारातून, तो आपल्या जाणिवा घेऊन उभा असतो. हा चित्रपट या संस्कारांना, जाणिवांना आव्हान देतो आणि आजच्या आधुनिक काळातील त्यांची निरर्थकता, अप्रासंगिकता पुढे आणतो. हे जातीय वास्तव या चित्रपटातून वजा केले, तर ती एक नितांत सुंदर प्रेमकथा होईल. ती तुमची करमणूक करील; पण ती तुमच्या हृदयाला, मेंदूला म्हणजे तुमच्या माणूसपणाला हात घालून तुम्हाला विचार करायला, अंतर्मुख करायला लावणार नाही. तुम्हाला गदागदा हलवणार नाही आणि आपण कुठल्या बाजूने उभे राहायचे, ते ठरविण्यास भाग पाडणार नाही. या चित्रपटाचे यश यात सामावलेले आहे. चित्रपटाच्या अखेरीस रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आईवडिलांचे मृतदेह पाहून त्यांच्या रक्ताने भिजलेली पावले घेऊन बाहेर धाव घेणार्या मुलाची पावले जर तुमच्या हृदयावर वेदना उमटवीत नसतील, तर तुम्ही खुशाल समजावे की, आपल्या माणूसपणात कुठेतरी खोट आहे आणि ही केवळ चित्रपट घडवणारी, दिग्दर्शकाची शक्कल नाही. आपल्या जातीय वास्तवात यापेक्षाही भीषण घटना घडून गेल्या आहेत. नगर जिल्ह्यातील सोनई गावची घटना उदाहरण म्हणून यासाठी पुरेशी आहे.
त्यामुळे नागराजने ‘सैराट’मध्ये सांगितलेली गोष्ट नवी नाही. ती त्याच्या मनाची, कल्पनेची निर्मिती नाही. अशा कितीतरी घटना आपल्या अवतीभवती घडून गेल्या आहेत. त्यांचे तपशील वेगवेगळे आणि भीषण आहेत. जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपायी होणार्या या हत्या आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, देशभर कुठे ना कुठे त्या घडत आहेत, ज्याला ‘ऑनर किलिंग’ हा शब्द आपण वापरतो. जातिव्यवस्थेने निर्माण केलेली उच्च-नीचतेची भावना जी आपण नष्ट करू शकलो नाही, तीच या अमानुषतेच्या मुळाशी आहे आणि या अन्याय, अत्याचाराचा केंद्रबिंदू आहे ‘स्त्री’. एकीकडे ती समाजजीवनात कस्पटासमान, दुय्यम असते, तर दुसरीकडे ती जातीच्या प्रतिष्ठेचे, इज्जतीचे प्रतीक असते. तिने प्रेमभावनेतून जातीबाहेरचा जोडीदार निवडणं, त्यातही तो तथाकथित खालच्या जातीचा असेल, तर मग तिची हत्याच. या संदर्भातील स्वातंत्र्य तिला नाही. याचा अर्थ स्त्रीच्या स्वातंत्र्यावर बंधने घालून जातिव्यवस्था टिकवून ठेवण्यात आली आणि आजही येत आहे. त्यामुळे स्त्रीच्या या संदर्भातील स्वातंत्र्याशिवाय ती नष्ट होणेही शक्य नाही. जातिअंताची भाषा करणारेही कधी-कधी हा मुद्दा विसरतात. तो विसरता कामा नये. या चित्रपटासंदर्भात ज्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत, त्या प्रतिक्रियांमधून आपल्याला हेच दिसून येते, की जातिभावनेने अनेक प्रेमाचे अंकुर उमलण्याआधीच नष्ट केले आहेत आणि जे उमलले, ते जाळून टाकले आहेत. म्हणजे ‘सैराट’ ही आपल्या जातीय समाजाची एक प्रातिनिधिक गोष्ट आहे.
दगड फोडणार्या (ज्यातून मामाचा चिरेबंदी वाडा बांधला जातो) वडार समजल्या जाणार्या जातिसमूहात जन्मलेला नागराज. त्याने जीवनात जे अनुभवले, ते वास्तववादी पद्धतीने, फुले-आंबेडकर, शाहूंच्या वैचारिक दृष्टीतून, चित्रपटातून मांडीत आहे. त्यामुळे त्याचे हे मांडणे केवळ करमणूक, मनोरंजन नाही, तर प्रत्येकाला आपल्या अंतर्मनात डोकावण्याची प्रेरणा देणारे आहे. अमूक एक जातीचा प्रतिनिधी म्हणून आपले वागणे ‘माणूसपणा’ला धरून आहे का? याचे आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. नागराजने ‘फॅन्ड्री’तून हेच केले. ‘फॅन्ड्री’ आजवरच्या कुठल्याही मराठी चित्रपटापेक्षा श्रेष्ठ आहे, अगदी सर्वार्थाने. त्या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम ही जातिभावनेची चिरफाड करणारी होती. सत्यजीत रे यांचा ‘पाथेर पांचाली’प्रमाणे ‘फॅन्ड्री’ कायम एक श्रेष्ठ चित्रपट म्हणून टिकून राहील. अभ्यासला जाईल.
‘फॅन्ड्री’च्या तुलनेत ‘सैराट’ थोर चित्रपट नाही. जातिभावना केंद्रस्थानी ठेवून तिचे मनावर होणारे अमानुष परिणाम हा ‘फॅन्ड्री’चा विषय होता. या केंद्रबिंदूपासून ‘फॅन्ड्री’ बिलकुल ढळला नाही. पण ‘सैराट’चे तसे नाही. ‘सैराट’ या केंद्रबिंदूपासून काहीसा ढळला आहे. मनोरंजनाचा अतिरिक्त डोस त्यासाठी कारणीभूत आहे. असे असले तरी आपल्या सामाजिक संदेशाचे काम त्याने चोख पार पाडले आहे. या चित्रपटाला जी उंची लाभली आहे, ती त्यामुळेच. रिंकू राजगुरूने साकारलेली आर्चीची अप्रतिम भूमिका या चित्रपटाला लाभलेल्या यशात मोठी भूमिका बजावणारा घटक ठरला आहे. ‘सैराट’ म्हणजे जणू आर्चीची गोष्ट बनला आहे.
नामदेव ढसाळ यांच्या कवितेने मराठी साहित्याला, मराठी भाषेला समृद्ध, उन्नत, व्यापक करण्याची जी कामगिरी आधुनिक काळात बजावलेली आहे, तीच नागराज मराठी चित्रपटकलेत बजावू पाहत आहे. उदा. अभिजनवादी मराठी चित्रपटातून ज्या ग्रामीण भाषेला गावंढळ आणि विनोद निर्माण करणारी समजली जाते, त्या भाषेत गावरान गोडवा प्रस्थापित करून नागराजने तिला प्रतिष्ठा दिली आहे. जी गोष्ट भाषेची तीच कलाकारांची. नागराज स्वत: आणि त्याच्या दोन्ही चित्रपटातील कलाकार हे स्वत: जातिव्यवस्थेने दडपलेल्या समूहातून आलेले आहेत. अर्थात त्यांच्याकडे असणारा कलेचा वारसा आजकालचा नाही. त्याला जातिव्यवस्थेत मोठी परंपरा आहे. वरच्या जातीच्या मनोरंजनाचे काम त्यांच्याकडेच सोपवलेले होते. या तथाकथित खालच्या समजल्या जाणार्या जातींनीच भांडवलपूर्व सरंजामी समाजात कलेची जोपासना केली आहे. भांडवलशाही आली आणि कलेत पैसे आले, कला एक विक्रेय वस्तू बनली. तेव्हा वरच्या सर्वच जाती या क्षेत्रात उतरल्या आणि त्यांनी हे क्षेत्र काबीज केले. आज सर्वच कलांवर त्यांची मक्तेदारी आहे. जिथे-जिथे पैसा आहे; मग तो खेळ असो अथवा अन्य कला, त्यावर आज अभिजन जातवर्गाची मक्तेदारी आहे. या पार्श्वभूमीवर पाहता नागराजचे चित्रपट या अर्थानेही ऐतिहासिक आहेत, नवा पायंडा पाडणारे आणि अभिजन वर्गांची मक्तेदारी मोडून काढणारे.
‘सैराट’मधील विषय नागराजने खूप संवेदनशीलपणे हाताळलेला आहे. त्याच्या चित्रपटातील व्यक्ती या काळ्या-पांढर्या रंगात नसतात. त्या विशिष्ट विचारांचे प्रतिनिधित्व करणार्या असतात. त्यामुळे अमूक एक व्यक्ती, अमूक एक जात, खलनायक नसते; तर एकंदर व्यवस्था खलनायक असते. सर्व माणसे व्यवस्थेचे बळी असतात. त्यांना त्यातून मुक्त करायचे, हे नागराजच्या विचारांचे सूत्र आहे, जे फुले-शाहू-आंबेडकरांच्या प्रेरणेतून घेतलेले आहे. ते ‘फॅन्ड्री’मध्येही आणि ‘सैराट’मध्येही आहे. असे असूनही ‘सैराट’बद्दल काही वाद उभे केले जात आहेत. ‘सैराट’मधील आर्ची ही सत्ताधारी पाटलाची मुलगी आहे. त्यामुळे मराठा जातीची बदनामी झाली आहे, अशी भावना व्यक्त झाली आहे. असे असले तरी संभाजी ब्रिगेडसारख्या अनेक संघटना, ज्यांना मराठावादी संघटना म्हटले जाते, त्यांनी अशी भूमिका न घेता उलट स्वागत केले आहे. खरं तर किमान महाराष्ट्रात तरी मराठा समाजच अशा घटनांना जबाबदार आहे किंवा त्या घटकातील धनदांडग्या व्यक्ती जबाबदार आहेत असे नाही, इतर ओबीसी समजल्या जाणार्या जातीतूनही अशा प्रकारचे घटना घडवणारे लोक आपल्यासमोर आहेत. त्यामुळे हा जातिवर्चस्वाच्या भावनांचा आविष्कार आहे. असे समजले पाहिजे. अर्थात सर्वच घटनांत असेच घडते असे नाही. त्यासाठी मराठा, ओबीसी समाजातील अनेक मुलींनी आंतरजातीय लग्नं केलेली आहेत; परंतु सर्वसाधारणपणे ग्रामीण भागाचा अनुभव आहे, त्यांना हे ठाऊक आहे. त्यामुळे चित्रपटावर टीका करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे अधिक गरजेचे आहे. आपल्यातील आणि आपल्या जातीतील हे दोष कसे नष्ट होतील, हे पाहणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराजांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे.
नागराजने या चित्रपटात एक प्रश्न आपल्यासमोर उभा केला आहे, तो म्हणजे आपण आर्चीचा भाऊ प्रिन्सचा वारसा चालवणार आहोत की, आर्चीचा आतेभाऊ मंगेश मोहिते-पाटलाचा, हे ठरविले पाहिजे. जो जातीच्याच नाही, तर नात्याच्या पलिकडे उभा राहिला आहे. खरं तर आजच्या आधुनिक काळात प्रत्येकाला जाती-पातीच्या-धर्माच्या बंधनापलिकडे जाऊन जगण्याचे स्वातंत्र्य मिळायला हवे; मग ती स्त्री असो अथवा पुरुष हाच आधुनिक जीवनाचा पाया आहे. जातीसाठी माती खाण्याची ही वेळ नाही. जाती मातीत गाडण्याची वेळ आहे. आपल्यासमोर कलाकृतीतून येणारी पात्रे ही प्रातिनिधिक स्वरुपाची असतात, ती या जातिवर्चस्ववादी भावनेचे, त्यातून येणार्या खोट्या प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे तो अमूक जातीवर हल्ला आहे, असा संकुचित विचार न करता आजच्या काळातही या भावना जोपासणार्या प्रवृत्तींवर हल्ला आहे, असे समजले पाहिजे!
समाजात जातिवर्चस्वाची भावना आहेच; ती नाकारण्यात अर्थ नाही. ती नष्ट कशी करायची हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न अधिक जटिल स्वरुपाचा आहे. कारण ही भावना जशी धारदार शस्त्राने व्यक्त केली जाते, तशी ती मौनातूनही व्यक्त होते. ‘सैराट’च्या यशाने खरेतर मराठी चित्रपटसृष्टीला आनंद व्हायला हवा. पण उलट झाले आहे. मराठी चित्रपटसृष्टीवर ‘बाप’ मेल्यासारखी अवकळा पसरली आहे. एकही प्रस्थापित मराठी कलावंत ‘सैराट’ या विषयावर बोलायला तयार नाही. जणू सामाजिक बहिष्कारच टाकला आहे. याला आपण जातीयवाद म्हणतो. प्रस्थापित अभिजनांपैकी असा चित्रपट कोणी काढला असता, तर वर्तमानपत्रांचे रकानेच्या रकाने भरले असते. मुलाखतींवर मुलाखती सुरू झाल्या असत्या. नाही म्हणायला लोकलाजेस्तव थोडाफार तोंडदेखलेपणा झाला आहे. पण बाकी सगळा सन्नाटा. या अभिजन जातवर्गाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया म्हणून ज्यांच्या नेमणुकीबद्दल एफटीआयच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला होता, त्यातील एक घैसास नावाच्या बाईंनी ‘सैराट’मुळे संस्कृती धोक्यात आल्याची, मुलांवर वाईट संस्कार होत असल्याची खास ब्राह्मण्यवादी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. म्हणजे बहुजनांचे जे काही पुढे येईल, ते यांच्या संस्कृतीला धोक्यात आणणारे ठरते. पण अभिजन वर्ग जेव्हा असे काही करेल, ते ‘बोल्ड’ वगैरे ठरते. अशा प्रतिक्रियांना ‘भू’ म्हणून सोडून दिले पाहिजे.
नागराजने ‘सैराट’मधून समाजातील एकूण एक प्रश्न एकाचवेळी कोंबण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याकडे जशी एकाच भाषणात सगळा पार्टी प्रोग्राम सांगण्याची पद्धत आहे, अगदी तसेच. त्यामुळे कुठल्याही प्रश्नाला न्याय मिळत नाही. जातपंचायत, शहरातल्या झोपडपट्टीतील बकाल जीवन, गुंडगिरी, स्त्रियांची असुरक्षितता वगैरे. हे खरे तर एका-एका चित्रपटाचे विषय आहेत. नागराजने पुढे ते जरूर हाताळायला हवेत. ‘सैराट’चं यश डोक्यात जाऊन हुरळून जाऊ नये. त्याने म्हटल्याप्रमाणे, ‘डोकं ढगात असलं, तरी पायाला ठेच लागली की, वाकावं लागतं. कारण पाय जमिनीवर असतात.’ नागराजचे पाय जमिनीवर राहोत, तरच तो एक थोर दिग्दर्शक म्हणून पुढे येईल. या यशाने जर ‘सैराट’ झालं तर मग काही खरं नाही.
जातिवर्चस्वाच्या भावनेबरोबरच नागराजने या चित्रपटात आर्चीच्या रुपाने स्त्री-स्वातंत्र्याचा, स्त्रीच्या निर्णयक्षमतेचाही प्रश्न हाताळलेला आहे. आजच्या आर्ची केवळ बुलेट, ट्रॅक्टर चालवत नाहीत, त्या ट्रेन चालवतात, जेट विमाने चालवतात, अंतराळात जातात. या पार्श्वभूमीवर त्यांना जाती-पाती-धर्माच्या पुरुषी वर्चस्वाच्या बंधनात बांधून ठेवणे हास्यास्पद आहे. ज्या सर्व बंधने ओलांडून आर्चीसारख्या पुढे येत राहतील, त्यांची गळे चिरून हत्या केली जाईल. त्यांना जिवंत जाळले जाईल, तरी त्या जन्माला यायच्या थांबणार नाहीत. जाती-वर्ग-पुरुष प्रधानतेचा समूळ नायनाट करून त्यावर समतेचा, स्वातंत्र्याचा झेंडा रोवल्याशिवाय राहणार नाहीत. आजवर तुम्ही जातिव्यवस्थेच्या अमानुष तत्त्वज्ञानाने, अर्थकारणाने, निसर्गालाच थोपवण्याचा प्रयत्न केलात; पण आधुनिक काळात तुम्हाला ते शक्य नाही. आर्चीच्या भाषेत बोलायचे तर “मराठीतून कळत नाही का, इंग्रजीत सांगू का”- ‘वुई विन’- एक दिवस आम्ही जिंकूच!
–सुभाष थोरात
लेखक संपर्क : 9869392157