Categories
कविता

राधे माँ आली

वार्षिकांक - २०१५
राधे माँ आली
सजवून अंग अंग
ओठास थापली लाली
सांभाळ तू स्वत:ला
देवा राधे माँ आली

झगमगीत फॅशन करूनी
तालात थिरकती पाय
भजनाचा सोडून ठेका
सिनेमाचे गाणे गाय

शालीनता सोडून सारी
शृंगार रसामध्ये न्हाली
सांभाळ तू स्वत:ला
देवा राधे माँ आली

नखरे तिचे अफाट
भक्तास भासती लीला
बघ इथे तुझ्या श्रद्धेचा
बाजार कसा हा झाला

सोडून स्वर्ग तू देवा
बघ येऊन एकदा खाली
सांभाळ तू स्वत:ला
देवा राधे माँ आली

भक्तास सांगती सोडा
मोह, ममता आणि माया
स्वत:च्या सजवून घेती
हिरे - रत्नांनी काया

भक्तास उपवास यांना
पंच पक्वान्नाची थाली
सांभाळ तू स्वत:ला
देवा राधे माँ आली

असल्या साध्वी आणि
आसाराम सारखे भोन्दू
भोगून देहाचे भोग
स्वत: म्हणविती साधू

ढोंगाची यांच्या देवा
आता पारच हद्द झाली
सांभाळ तू स्वत:ला
देवा राधे माँ आली

- शामसुंदर सोन्नुर महाराज