Categories
बुवाबाजी

मांत्रिक महिलेचा अंनिसकडून पर्दाफाश

ऑक्टोबर – २०१५

अपघातातील गंभीर दुखापतीवर अघोरी उपचार करून मानसिक, आर्थिक फसवणूक करणार्‍या मांत्रिक महिलेचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पर्दाफाश केला. त्यांच्या सहकार्‍याने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर संबंधित महिलेवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करून अटक केली.

सुनीता उर्फ ताई रमेश विटकर(वय 32, रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर) असे पोलिसांनी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. सर्वजण तिला ‘ताई’ या नावाने संबोधतात. वसंत तात्याबा माने(वय 38, रा.कोथळे, ता.माळशिरस) यांनी त्यांना झालेल्या फसवणुकप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार दिली होती तसेच नातेपुते पोलीस ठाण्यामध्येही त्यांनी तक्रार दाखल केली होती. वसंत माने यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. त्यात त्यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना मधुमेहाचा त्रासही आहे. यासाठी औषधोपचार सुरू असताना या महिलेने त्यांना पाच महिने तिच्याकडून औषधोपचार घेण्यास व दवाखान्यात जाण्यास सक्त मनाई केली.

तुमच्याच भाऊबंदकीतल्या लोकांनी तुमच्यावर करणी केली आहे, असे सांगितले. ही महिला वसंत माने यांच्यावर अघोरी उपचार करू लागली; परंतु त्यामुळे माने यांचा आजार वाढतच गेला. त्यामुळे माने यांनी घाबरून जाऊन तिथून पळ काढला व दवाखाना गाठला. त्याही अगोदर या महिलेने माने यांना साधारण 10 ते 15 देवांच्या जत्रा करण्यास व उतारे करण्यास भाग पाडले. एका जत्रेचा खर्च साधारण 40 हजार रूपये होता. अशी 5-6 लाखांची लूट केली. तिने तिची फीही यामधून वसूल केली.

वसंत माने यांनी याबाबत नातेपुते पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केल्यावर नातेपुते पोलिसांनी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी या महिलेस रंगेहाथ पकडून जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये या महिलेवर कारवाई करत तिला अटक केली आहे. या घटनेमुळे नातेपुते परिसरासह सोलापूर व सातारा जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे. नातेपुते पोलीस ठाण्याचे पो.नि.डी.एस.खाडे, सातारा अंनिसचे भगवान रणदिवे, प्रशांत पोतदार, गिरीश ढोक यांनी यामध्ये सक्रीय सहभाग घेतला.

गिरिश ढोक, माळीनगर