महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नांदेड जिल्ह्यातील एक समर्पित कार्यकर्ते इंजि. सम्राट हटकर यांनी आपल्या मुलींच्या लग्न सोहळ्यात पारंपारिक आहेर व वस्तूरूपी भेटींना फाटा देऊन उपस्थित पाहुण्यांना डॉ.नरेंद्र दाभोलकर लिखीत ‘श्रद्धा-अंधश्रद्धा’ व ‘अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ ह्या दोन वैचारिक ग्रंथाच्या 110 प्रति भेट म्हणून दिल्या. दैनंदिन जीवनात आढळणार्या अंधश्रद्धांचे स्वरूप, प्रश्न व त्यांची उत्तरे यांचा उलगडा या पुस्तकाद्वारे होतो. विविध उपक्रमाद्वारे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविण्याचा नेहमीच प्रयत्न करणार्या सम्राट हटकर यांची मुलगी मोनिका हिचा विवाह राहुल ढगे यांच्यासोबत 15 मार्च रोजी बौद्ध पद्धतीने संपन्न झाला. बौद्ध विवाह पद्धतीमध्येदेखील अलिकडच्या काळात अनेक अपप्रवृत्तीचा शिरकाव होऊन कर्मकांडास अनाठायी महत्व प्राप्त झाले आहे.
दोन-दोन तास लग्नास उशीर लावणे, बँड बाजा व डी. जे. च्या तालावर तरूणांच्या घोळक्यांनी डान्स करणे, एक दीड तास फटाके फुटण्याचा आवाज होत राहील व हवेत प्रचंड प्रदूषण होईल अशी आतषबाजी करणे, सर्वच पाहुणे सन्माननीय असतांना काही मोजक्या पाहुण्यांचा शाल देऊन खास सत्कार करणे, मोजक्या पाहुण्यांना मूळ चिट्ट्या देणे, लग्नाच्या वेळीच आहेर करीत रहाणे अशा अनेक अपप्रवृत्तीला फाटा देऊन इंजि. सम्राट हटकर यांनी आपल्या मुलीचे लग्न अत्यंत साधेपणाने, कोणत्याही मान्यवरांचे सत्कार न करता अगदी ठरलेल्या वेळेवर पार पाडले याबद्दल सर्व उपस्थितांनी हटकर यांचे अभिनंदन केले.
प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, नांदेड