यवतमाळ जिल्ह्यातील सावंगी पोरका, ता.राळेगाव येथे राहणार्या गणेश नारायण मेश्राम वय 30 या इसमाचा जादूटोणा, करणी केल्याच्या संशयावरून कट रचून खून केला गेला.
सावंगी पोरका या गावात मृत गणेश नारायण मेश्राम याचे कुटुंबीय आणि नितीन धुर्वे, पवन येबंडवाद रा.अंतरगाव यांचे सख्य होते. ओळख असल्यामुळे येणे-जाणे होते. नितीन धुर्वे, रा.सावंगी पोरका यांचे कुटुंबीय वारंवार आजारी पडत होते. यातूनच बाबाकडे जाणे सुरू झाले. दोन्ही कुटुंबाचे काही कारणास्तव वैमनस्य वाढले; त्यामुळे सहज संशय गणेश मेश्राम यांच्याकडे जाऊन या व्यक्तीला आपले चांगले पहावत नाही. त्याने जादूटोणा करणी केल्यामुळे आपल्या कुटुंबाची तब्बेत बरोबर राहत नाही. असा पक्का समज झाला.
दि. 6 फेबु्रवारी रोजी नितीन धुर्वे याने पवन येबंडवार रा.अंतरगाव याला सोबत घेऊन गणेश मेश्राम यास बोलावले. दोघांनी केलेल्या प्लॅननुसार गणेश मेश्रामला घेऊन राळेगाव तालुक्यातील कोपरा या गावाच्या शिवारात नेले, तेथे तिघांनी मिळून यथेच्छ दारू प्यायली. गणेश मेश्रामला जास्त दारू पाजली. यातच ठरविल्याप्रमाणे दोघांनी मिळून गणेश मेश्राम याचा गळा आवळून खून केला व खून लपविण्यासाठी सोबत आणलेले डब्यातील डिझेल त्याच्या मृत शरीरावर ओतून जाळले. जाळलेला मृतदेह पुलाखाली टाकून निघून गेले. शोधा-शोध सुरू असताना त्याचा मृतदेह जळालेल्या अर्धवट जळालेल्या अवस्थेत पुलाखाली शिवारात सापडला.
मृताचा भाऊ लक्ष्मण मेश्राम यांच्या तक्रारी वरून आरोपी नितीन धुर्वे, पवन येबंडवार यांना पोलिसांनी अटक केली. पोलिसी हिसका दाखवताच गणेश मेश्राम हा करणी जादूटोणा करतो म्हणून आमची तब्बेत बिघडते म्हणून त्याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यावरून खून व जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला गेला.