गणेशोत्सव म्हटले की, धागडधिंगा हे समीकरण आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात पक्के आहे. बर्याच अंशी ते खरेही आहे. कानठळ्या बसवणारा डॉल्बीचा दणदणाट. मोठे मंडप घालून रस्ता बंद करणे, अचकट विचकट संवादाचे देखावे उभे करणे. महाप्रसादाच्या पंगती उठवणे, पैशाची श्रमाची अनाठायी उधळपट्टी, पाण्याचे प्रदूषण अशी एक ना अनेक चित्रं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात आणि मग गणेशोत्सवाकडे पाठ फिरवून आपण आपापल्या उद्योगात रमतो.
भारतीय माणूस हा उत्सवप्रिय आहे. गणेशोत्सव हा मोठा सण आहे. त्याला योग्य व विधायक वळण देण्यासाठी कोल्हापूर अंनिसचे प्रथम निर्माल्यदान व नंतर विसर्जित गणेशमूर्ती दान म्हणून स्वीकारून उत्सवाला विवेकी रूप देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. आज निर्माल्य हे पाण्यात टाकले जात नाही आणि अंनिसच्या चिकाटीमुळे, पर्यावरणवादी कार्यकर्त्याच्या धडाडीने, डाव्या पक्षांच्या कृतीशील पाठींब्याने व समाजमन थोडे जागृत झाल्यामुळे गणपती दान करण्याची मोहीम वेगाने वाढू लागली आहे. 2014 च्या गणेशोत्सवात कोल्हापुरात घरगुती गणपती 40 हजारांच्या आसपास दान म्हणून मिळाले. याहीपेक्षा कौतुकाची गोष्ट म्हणजे कोल्हापूरच्या 110 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्ती दान केल्या. पाण्याच्या प्रदूषणाबाबत लोकांमध्ये जनजागृती होत आहे आणि याचा पाया अंनिसने रचला आहे हे ध्यानात घ्यायला हवे.
सार्वजनिक मंडळांतर्फे सादर केले जाणार्या देखाव्यांमध्ये ‘समाज प्रबोधनपर’ देखावे लक्ष वेधून घेत आहेत. अंनिसचे उपक्रम या देखाव्यातून मांडले जात आहेत याची आपण दखल घ्यायला हवी. कोल्हापूरातील ‘सोल्जर्स तरूण मंडळाने’ मागील वेळी “फलज्योतिष नाकारा, खगोलशास्त्र स्वीकारा” हा देखावा सादर केला. यासाठी अंनिसचे नितीन शिंदे यांच्या ‘सफर विश्वाची’ व प.रा.आर्डेयांच्या ‘वेध विश्वाचा’ या पुस्तकांचे सहाय्य घेतले. यावर्षी याच मंडळाने ‘साप वाचवू या, पर्यावरण जपू या’ हा देखावा अंनिसच्या सर्पविज्ञान आणि सर्पमित्र राजेश ठोंबरे, गजेंद्र सुरकार, ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून माहिती घेऊन सादर केला. यानिमित्त शालेय मुलांसाठी ‘साप बनवा स्पर्धा’, परिसरातील 400 घरातून सर्पविषयक लोकसमजुतींचा प्रश्नोत्तर रूपात सव्हे, सर्पजनजागृती विषयक 5000 परिपत्रके मंडळाने वाटली. ‘हाय कमांडो फ्रेंडस सर्कल’ या मंडळाने गेल्यावर्षी पाणी प्रदूषणावर देखावा करून मंडळाची गणेशमुर्ती पंचगंगा नदीच्या तीरावर काहिलीमध्ये जाहिररित्या लोकांसमक्ष वितळवून टाकली. गणेशमुर्तीची माती पुन्हा कुंभाराला देऊन टाकली. यावर्षी ‘एक हात मदतीचा’ असा देखावा करून अपंगांना व्हिलचेअर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, निराधार महिलांना विमा या मंडळातर्फे काढण्यात ‘कृष्णा ग्रुप’ या मंडळातर्फे कोल्हापूरच्या दंगलीवर आधारीत देखावा केला गेला. हे मंडळ गेली 9 वर्षे विसर्जन मिरवणुकीत ‘वीज वाचवा’ संदेश देत गणेशमुर्ती कंदिलाच्या प्रकाशात घेऊन जातात. राजारामपुरीतील ‘युवक मित्र मंडळाने’ दोन वर्षांपूर्वी सांगली अंनिसचे विजयकुमार जोखे सरांच्या मार्गदर्शनाखाली ‘बुवाबाजीचा भांडाफोड’ हा देखवा सादर केला. यावर्षी भोंदूगिरीवर प्रकाश टाकणारा देखावा कसबा गेट मंडळाने सादर करून डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या स्मृतीला अर्पण केला. कपीलतीर्थ मार्केट मित्र मंडळाने अंधश्रद्धा निर्मूलनाचा देखावा सादर केला व विसर्जन मिरवणुकीमध्ये दाभोलकरांच्या छायाचित्रासहित अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश दिला.
प्रिन्स क्लब व युवक मित्र मंडळाने यावर्षी एकमेकांच्या गणेशमुर्तीची अदलाबदली केली. पुढील वर्षासाठी गणेशमुर्तीचे आदान-प्रदान हा नवा उपक्रम या मंडळांनी राबवला. अंनिसच्या मूर्तीदानाचा उपक्रम रंकाळ्याजवळील राजे संभाजी तरूण मंडळ प्रथमपासून आजपर्यंत अविश्रांत चिकाटीने राबवत आहे. सामाजिक कार्यकर्ते दीपक पोलादे यांनी कोल्हापुरात जागोजागी मूर्ती विसर्जनासाठी काहिली स्वखर्चाने उपलब्ध केल्या. अंनिसचे सहकारी अभिजीत भोईटे यांनी कायमस्वरूपी फोल्डींग करता येण्याजोगा विसर्जन कुंड तयार करून मोठ्या प्रमाणावर गणेशमुर्ती दान स्वीकारले. प्रख्यात मूर्तीकार के.आर.कुंभार यांनी अकरा फूट उंचीवरील गणेशमुर्ती करणार नाही असे जाहीर केले.
गणेशोत्सवाच्या धागडधिंग्यामध्ये कोल्हापुरात 27 कोटी रूपये प्रतिवर्षी खर्च होतात. गणेशोत्सव विधायक बनवून यातील पैसा चांगल्या कार्यासाठी वापरावा अशी आवाहने निसर्गमित्रचे अनिल चौगुले यांनी केले व त्याला प्रतिसाद म्हणून मंगेशकरनगर येथील 22 मंडळांनी कृतीशील सहमती दाखवली. वाचवलेल्या पैशातून प्रभागातील रस्ता शाळा इमारत दुरूस्ती, वृक्षारोपण, माळीण गावासाठी मदत असे उपक्रम राबवले.
गणेशोत्सवाच्या धागडधिंग्यामध्ये अशी अनेक लोकोपयोगी कृती मंडळांकडून होत असतात. म्हणतात ना ‘दुर्गंधी दूरवर पसरते परंतु अत्तराचा फाया नाकाजवळ न्यावा लागतो’ त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या गणेशोत्सवाला विधायक व विवेकी रूप देणार्या मंडळांचा हा अल्पसा परिचय अंनिस वाचकांसाठी व मुख्यत: कार्यकर्त्यांसाठी.
–उमेश सूर्यवंशी
संपर्क : 9922784061