Categories
प्रासंगिक

सर्वजातीय विठ्ठल

ऑक्टोबर - २०१४

कुठल्याही गोष्टीची क्रांतीकारकता अथवा प्रगतीशीलता आपल्याला सापेक्ष पद्धतीने पहावी लागते. उदा.सरंजामशाहीच्या तुलनेत भांडवलदारी व्यवस्था ही प्रगतीकारक असते. कारण त्यामुळे समाजाने प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलेले असते. याचप्रमाणे सुप्रिम कोर्टाने विठ्ठल मंदिर पुजेचा बडव्यांचा आजवरचा पारंपारिक अधिकार(ज्याला कुठल्याही धर्मशास्त्रात मान्यता नाही) निकालात काढल्यामुळे जातीव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर सापेक्षपणे पाहिले तर हे एक प्रगतीचे पाऊल समजले पाहिजे.

महाराष्ट्रात बहुजनांचे दैवत म्हणून विठ्ठलाचे स्थान केवळ अनन्य साधारण आहे. महाराष्ट्रीय संस्कृतीत विठ्ठल भक्ती इतकी व्यापक, सार्वत्रिक, सर्वजातीय खोलवर रूजलेली भक्ती दुसर्‍या कोणा दैवताची नाही. ही भक्ती रूजवण्यात वारकरी पंथाच्या संतांचा अर्थातच खूप मोठा वाटा आहे. वारकरी पंथाच्या संतांच्या अभंगांची, त्यातही संत तुकारामांच्या अभंगांनी ही विठ्ठल भक्ती अगदी घरोघरी पोहोचवली. मराठी भाषेला-संस्कृतीला समृद्ध आणि प्रागतिक करण्यात या वारकरी संत परंपरेचे खास असे योगदान आहे. विठ्ठल भक्तीत ‘समतेची पताका’ फडकवण्याचे काम या विठ्ठल भक्तीय संतांनी केले आहे. ‘माझे माहेर पंढरी’ अशी भावना वारकरी पंथातील सर्वजातीय संतात दिसून येते. तो त्यांच्यासाठीच नव्हे तर अवघ्या जनतेसाठी ‘विठू माऊली’ आहे. ‘विठू माझा लेकुरवाळा, संगे संताचा मेळा’ या काव्यात विठ्ठलाचे हे सर्व जातीच्या संतांना बरोबर घेऊन जाणारे रूप दिसून येते. यामुळेच प्रसिद्ध संशोधक रा.चिं.ढेरे यांनी ‘श्री विठ्ठल एक महासमन्वय’ हे शिर्षक देऊन विठ्ठलाच्या एकंदर स्वरूपाची अनेक अंगेउपांगे उलगडून दाखवणारा महाग्रंथ लिहिला आहे.

जातीव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर ‘महासमन्वय’ हा रा.चिं.ढेरे यांनी वापरलेला शब्द अन्वयार्थक आहे. संत नामदेवाचे कपडे शिवणारा, चोखोबाची गुरे राखणारा, संत जनाबाईसाठी दळण दळणारा ही विठ्ठलाची रूपे एका अर्थाने सामाजिक समतेचा संदेश देणारीच आहेत. त्याच्यासाठी हे विविध जातीय संत असमान नाहीत तर तो सर्वांशी एकरूप आहे. पण या गोष्टीकडे आपण जेव्हा व्यापक अर्थाने पाहतो तेव्हा हा असा जातीय समन्वय का घडून येतो, त्याची सामाजिक-आर्थिक-सांस्कृतिक कारणे काय आहेत? या प्रश्नाकडे आपल्याला लक्ष द्यावे लागते.

हा विषय केवळ संत आणि विठ्ठल यांच्या व्यक्तिगत संबंधाचा राहत नाही. तर एका विशिष्ट सामाजिक परिस्थितीचे प्रतिक्रिया स्वरूप म्हणून आपल्यापुढे येतो आणि याचे उत्तर आपल्याला त्यावेळच्या एकंदर सामाजिक परिस्थितीत शोधता येते. सुप्रसिद्ध मार्क्सवादी विचारवंत डी.डी.कोसंबी यांनी गीतेतील सर्व विचार समन्वयाचे मूळ शोधताना असा निष्कर्ष काढला आहे की, ज्या काळात वर्गीय अंतर्विरोध तीव्र नसतात. म्हणजे वर्ग संघर्ष तीव्र नसतो तेव्हा वर्ग समन्वयाची भूमिका अस्तित्वात येते. सर्वच विचारांना म्हणजे दैववादी आणि भौतिकवादी अशा दोन्ही विचारसरणींना गीतेत सारखेच स्थान मिळाले आहे. याचे कारण त्या काळातील तीव्र नसलेल्या वर्गीय परिस्थितीत आहे. हा वर्ग समन्वय आणखी एका कारणांमुळे घडतो, तो म्हणजे स्व-संस्कृतीवर येणारे आक्रमण आणि तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होणे. त्यावेळी आपापसातील मतभेद विसरून एक होऊन परकीय आक्रमणाशी-संस्कृतीशी झगडा करण्याच्या परिस्थितीत अस्तित्व शोधता येते.

मुस्लिम राजवटीत जेव्हा जातीव्यवस्थेत अन्याय भोगणारा वर्ग धर्मांतराकडे वळू लागला. तेव्हा आपल्याला विठ्ठलाचे हे सर्व जाती समन्वयाचे रूप अविष्कारीत होताना दिसते. सर्व जातींना एका भक्तीसुत्रात बांधून ठेवणारे रूप आणि प्रत्येक जातीतून उदयाला आलेले संत म्हणजे त्या त्या जातीचे प्रतिनिधी अशा स्वरूपाची एक सांस्कृतिक रचना पुढे येते. शिव छत्रपतींची स्वराज्याची कल्पना आणि सर्व जातींना समानतेने बांधून घेण्याची संकल्पना याच सांस्कृतिक रचनेच्या अविष्कारातून उदय पावते.

यासाठी आपण भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे उदाहरण घेऊ. ब्रिटीशांविरूद्ध सर्व जनता एकवटून उभी राहते. मग बाबू गेनूसारखा कामगार ब्रिटीशांच्या ट्रकखाली स्वत:ला झोकून घेतो. जरी येणार्‍या स्वातंत्र्यात तो ज्या कामगार वर्गातून आलेला असतो त्याला काहीच स्थान नसते. त्याचे शोषण तर चालूच राहणार असते. पण राष्ट्रवादाच्या भावनेतून तो भांडवलदार वर्गाचे नेतृत्व असलेल्या स्वातंत्र्य लढ्यात जीवाचे रान करतो. ही राष्ट्रवादाची भावना वर्गसमन्वय घडवून आणते. हे आपण राष्ट्रा-राष्ट्रातील युद्धात पाहू शकतो. यात हानी होते ती कामगार वर्गाची, शोषितवर्गाची आणि फायदा नेहमी सत्ताधारी जात-वर्गाला होतो. शिवछत्रपतींचे स्वराज्य आले ते मावळ्यांच्या म्हणजे या शेतकरी-मराठा जातीच्या आणि महार-मांग-रामोशी यांच्या शौर्यावर पण पुढे त्याचा फायदा देशमुख-जमीनदारांनी-संस्थानिकांनीच उठवला. पुढे जाती-अत्याचारांना अधिक विकृत स्वरूप देणार्‍या पेशव्यांचे राज्य या प्रक्रियेतून पुढे आले. शेतकरी आणि दलित उपेक्षित राहिले अगदी आजही उपेक्षितच आहेत, पण लढले तेच.

तर आपण बोलत होतो वर्ग समन्वयाच्या परिस्थितीबद्दल. सर्व जातींतून उदयाला आलेले संत आणि त्यांचे श्रद्धास्थान असलेला विठ्ठल या परिस्थितीची उपज आहे. असे असले तरी या मध्ययुगीन काळातील संतांचे कार्य हे काळाच्या पुढे जाणारे होते. जसे शिवछत्रपतींचे वर्तन त्या काळातील सरंजामी मूल्यांविरोधी जाणारे; म्हणजे काळाच्या पुढे जाणारे होते. संत नामदेवांचे उदाहरण घेऊ. त्याकाळी त्यांनी संत जनाबाईंना आपल्या घरी कामावर ठेवले. संत नामदेव शिंपी जातीत जन्मल्यामुळे त्यांच्या घरी कोणी त्यांच्यापेक्षा वरच्या अथवा त्यांच्या बरोबरच्या जातीची मानली गेलेली कुठलीही व्यक्ती ‘दासी’ म्हणून काम करणे शक्य नव्हते. तेव्हा एका दलित जातीय जनाबाईंना घरी कामावर ठेवणे हे एक क्रांतीकार्यच होते. शिवाय त्यांनी चोखोबा गावकुसाची भिंत बांधताना मरण पावले, तेथे जाऊन त्यांच्या अस्थी गोळा करून त्यांची समाधी उभारली. हेही कार्य कमी क्रांतीकारक नाही. पण संत नामदेवांचे कार्य खरं तर उपेक्षितच राहिले.

आता ‘घुमान’मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन भरवताना संयोजकांना त्यांची आठवण आली आहे पण त्यांनी पंजाबात मराठी संस्कृती कशी नेली यापुरतेच त्यांचे कौतुक मर्यादित आहे. त्यांच्या जीवनातील या क्रांतीकार्याबद्दल कधीच बोलले जात नाही. किंबहुना सर्वच संतांच्या बाबतीत आपल्याला तसे म्हणता येईल त्यांच्या मुख्य कार्याकडे दुर्लक्ष करून सोयीप्रमाणे त्यांना वापरून घेणार्‍या हितसंबंधियांची संख्याच जास्त आहे. उदा.ज्ञानेश्वरांनी ‘ईश्वरकल्पित-शास्त्रे-शाब्दिक-पुराणे बाष्कळीत’ अशी एका वाक्यात जहाल म्हणता येईल अशी धर्मचिकित्सा करून ठेवली आहे. म्हणजे ईश्वर ही संकल्पना केवळ कल्पिलेली आहे. धर्मशास्त्रे केवळ शाब्दिक आहेत. त्यात व्यवहार आणि अनुभव नाही. तर पुराणे केवळ बाष्कळ आहेत. पण यावर चर्चा होत नाही. पण त्यांनी भिंत कशी चालवली, रेड्यामुखी वेद कसे वदवले याचीच चर्चा होताना दिसते. आज तर सर्व हिंदुत्ववाद्यांनी संत चळवळ वेठीस धरलेली दिसून येते. वारकरी पंथाच्या कुठल्याही संतांच्या शब्दात आणि व्यवहारात अंधश्रद्धेला स्थान नाही. पण त्यांचा वारसा सांगणार्‍या वारकर्‍यांना पुढे करून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याचे मारेकरी त्यांना बनवण्यात आले होते.

आपल्या देशातच नव्हे तर सर्वच देशात मध्ययुगात धर्मपीठे ही सत्तेची आणि संपत्तीची केंद्रे होती आणि त्या त्या वेळच्या पुरोहित वर्गाने आपापल्या ताब्यात ठेवली होती. आपल्याकडे सर्व मंदिरे अगदी बोधगयेचे मंदिरही ब्राह्मण पुरोहितांनीच ताब्यात ठेवले होते. पूजेचा अधिकार म्हणजे संपत्ती लाटण्याचा अधिकार त्यांना होता. विठ्ठल हा ब्राह्मणी परंपरेतील देव नाही. त्याची सर्व रूपे पाहिली, त्याच्याबद्दलच्या सर्व कथा पाहिल्या तर चोखोबा असो अथवा जनाबाई सर्वांच्या ठायी तो समान आहे. त्या अर्थाने तो समतेचा वाहक आहे. जरी कर्ममेळ्याने म्हटल्याप्रमाणे ‘इतका सर्वशक्तीमान असूनही त्याला जातीव्यवस्था नष्ट करता येत नाही. मग ही सर्वशक्तीमानता काय उपयोगाची.’ असे असले तरी जातीव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर तो समतामूल्यांचा वाहक आहे. शिवाय तोच एक असा देव अहे की जो कमरेवर हात ठेवून विटेवर उभा आहे. इतर देवदेवतांप्रमाणे तो हिंसक नाही. त्याच्या हातात शस्त्र तर नाहीच उलट त्याचे हात कमरेवर आहेत. हे वर म्हटल्याप्रमाणे त्याच्या काळी वर्गविरोध तीव्र नसल्याचे लक्षण आहे. बाकीचे देव कोणाला ना कोणाला मारण्याच्या तयारीत आहेत किंवा कोणाला तरी मारून ’जित गया’ म्हणत आहेत. याला आर्य-अनार्य यांच्यातील संघर्षाचे परिणाम आहे. शिवाय विठ्ठल बुद्धासारखा अहिंसक आहे. त्याच्या नावावर एक पण ‘हत्या’ नमूद नाही. किंवा तो हत्येची शिकवण देत नाही.

अशा समताप्रिय, अहिंसक विठ्ठलाची पूजा करताना वेदातील पुरूषसुक्त म्हटले जाते. हे विठ्ठलाच्या एकंदर स्वरूपाशी आणि वाकररी पंथाच्या एकंदर विचाराशी पूर्ण विरोधी आहे. पुरूषसुक्तात चार वर्णांच्या निर्मितीचा सिद्धांत मांडला आहे. जसे बायबलमधील वचन ‘सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आणि पृथ्वी सपाट आहे.’ हे विज्ञानाने खोटे ठरविले आहे, तद्वतच ब्राह्मण मुखापासून, क्षत्रिय बाहुपासून, वैश्य मांड्यांपासून, शुद्र पायापासून हा ब्राह्मणवादी सिद्धांत आज वैज्ञानिकदृष्ट्या पूर्ण चुकीचा आणि ब्राह्मण जातीचे हितसंबंध कायम ठेवणारा आहे. सर्व मंदिरांतील पूजेचा अधिकार याच सिद्धांताद्वारे ब्राह्मणांनी स्वत:कडे घेतला आहे. हे इतरांपेक्षा पवित्र, वरचे इतकेच नव्हे तर ते ‘भूदेव’ आहेत. अशी समजूत भोळसट, धार्मिक जनतेची करून देण्यात आली आहे. आजही या समजुतीतून बहुजन पूर्ण बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे ही ‘पुरूषसुक्तीय’ पूजा बंद करण्याची आंदोलकांची मागणी अगदी योग्य आहे. आज बडवे पुजारी नसले तरी पूजा जर जुन्याच पद्धतीने आणि जाती रचनेच्या समर्थनार्थ होत असेल तर याला विरोध केला पाहिजे. वेदोक्त की पुरोणोक्त हा वाद शाहू आणि तत्कालीन ब्राह्मण-सनातनी यांच्यात होऊन गेला आहे. शाहूंचा वारसा सांगणारे आज सत्तेवर आहेत. त्यांनी तरी याची चाड बाळगली पाहिजे.

दुसरी गोष्ट मात्र समतेच्या विचारांशी जोडलेली आहे आणि ती अधिक लाज आणणारी आहे. आज पंढरपूर एक मोठे पवित्र असे तीर्थस्थळ बनले आहे. तेथे येणार्‍या लाखो-करोडो लोकांकडून तेवढेच पैसे तेथे जमा होतात. असे असूनही पंढरपूर एक बकाल शहर आहे. शिवाय या लाखो लोकांच्या मलमूत्र विसर्जनाची आज पुरेशी सोय नाही. आता आतापर्यंत आणि आजही सफाई कामगारांना विष्ठा डोक्यावर वाहून न्यावी लागते. विठ्ठलनामाचा गजर करून पुण्य कमावून घरी जाणार्‍या विठ्ठल भक्तांना याची जाणीव नाही. कणव नाही. कारण त्यांच्याही डोक्यात संताच्या अभंगातील आशयापेक्षा आपली ‘जात’ भक्कमपणे रूजली आहे. ‘भक्तीत एक आणि पंक्तीत भेद’ चालूच आहे. त्यामुळे सफाई कामगारांना विठ्ठलाच्या अपरंपार भक्तीचा जो त्रास सहन करावा लागतो, त्याकडे कोणाचे लक्ष नाही. विठ्ठलाची पूजा बडव्यांनी करावी की सर्वजातीयांनी करावी यापेक्षा हे मानवतेच्या दृष्टीने अधिक महत्वाचे आहे. पण त्याकडे सरकारचे लक्ष नाही. भक्तांचे नाही आणि कुठल्या क्रांतिकारकांचेही नाही. ‘मुकी बिचारी कोणीही हाका’ अशीच परिस्थिती पंढरीत या सफाई कामगारांची आहे. ‘माझे माहेर पंढरी’ असे गळे काढून म्हणणार्‍या विठ्ठल भक्तांनी याकडे लक्ष दिले तर ‘तुकोबांनी म्हटल्याप्रमाणे ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले- तोचि साधू ओळखावा देव तेथेची जाणावा’ हे प्रत्यक्ष जीवनात साकार केल्यासारखे होईल. ब्राह्मण पुजारी जाऊन सर्वजातीय पुजारी आले ही छानच गोष्ट आहे. आता पूजा ही समतेच्या तत्वानुसार व्हावी आणि विठ्ठल भक्तीचा त्रास सफाई कामगारांना न होता त्यासाठी आधुनिक काही सोयीसुविधा भक्तांच्याच देणगीतून उभ्या राहिल्या तर ‘माझे माहेर पंढरी’ हे अभिमानाने म्हणता येईल.

अशा प्रसंगी आपल्याला थोर साने गुरूजींची आठवण काढावीच लागेल. दलितांना विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी आमरण उपोषण केले होते. चोखोबाच्या गळ्यात स्वत:च्या मोत्याचा कंठा घालणार्‍या आणि त्यांची गुरे राखणार्‍या विठ्ठलाच्या मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा म्हणून उपोषण करावे लागणे हा तर विठ्ठलाचाच मोठा अपमान समजला पाहिजे. शेवटी ‘धाव घाली विठ्ठला चालू नको मंद-बडवे मज मारीती काय अपराध’ चोखोबांना मारणार्‍या आणि आजवर विठ्ठल भक्तांना नाडणार्‍या अपमानास्पद वागणूक देणार्‍या ‘बडव्यांचे’ निर्दालन झाले ही चांगलीच गोष्ट आहे.

–सुभाष थोरात

संपर्क : 9869392157