नव्या जगात संवेदनशीलता संपत चालली आहे. नीतीमूल्ये हरवत आहेत हा विचार आधीच्या पिढीच्या मनात व संवादात मला सतत आढळतो. इतिहास चाळून पाहिला तर अशाच तक्रारी तेव्हाही जुन्या पिढीने त्या वेळच्या नव्या पिढीबाबत केलेल्या दिसून येतात. सॉक्रेटिस ह्या वस्तुनिष्ठ तत्वचिंतकाने देखील युवा पिढीच्या नैतिक र्हासाबद्दल चिंता व्यक्त केली होती. नव्या पिढीची नवी व्यवहार पद्धत नवी नीतीमूल्ये जुन्यांना नेहमीच अस्वस्थ करत आली आहेत. वागण्या बोलण्याचा पायंडा तोच राहावा हा जुन्यांचा आग्रही पवित्रा केव्हाही, कुठेही नव्या पिढीला(ते तरूण असोत) मान्य होणे मानवी स्वभावात बसत नसावे. उलट नवी मंडळी प्रतिक्रिया म्हणून जुने ते सोडण्याची बंडखोरी नेटाने दाखवितात. यात मुख्यत्वे वेगळ्या विचारापेक्षा केवळ विरोध जास्त असतो.
मात्र आजचे जग अमानुष होते आहे. याचे पुरावे रोज वर्तमानपत्रात पहिल्या पानावर ठळकपणे आढळू लागल्यावर नवे जुने सारेच संवेदनशील मानव सचिंत झाले आहेत. माणसामाणसातील प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा, बंधुत्व हरवत आहे. माणसे व्यवहारकठोर होत आहेत. हक्काबाबत आग्रह धरणारे कर्तव्याबाबत बेफिकीर आहेत. जबाबदारी टाळू पाहत आहेत. स्वार्थापायी इतरांशी अमानुष वागत आहेत असे दिसते. पुढे जाऊन हे ही म्हणता येईल की, जगात असे वागणे पूर्वीपासून दिसून आले आहे. फक्त आता ते प्रकर्षाने, लोकसंख्येच्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात प्रसार माध्यमांच्या उत्साही प्रसारणामुळे सतत समोर येत आहे. पद दलितावरील अत्याचार, स्त्रियांवरील हल्ले, दुर्बलांचे असंघटीतांचे शोषण, वृद्धांकडे दुर्लक्ष, जमीन मिळकतींच्या हिश्यांचे वाद, शूद्रांना पशुपेक्षा लाजीरवाणी वागणूक अशी अनेक उदाहरणे सांगता येतील त्यामुळे मागील पुढील पिढ्यांची तुलना करण्यापेक्षा आज समाजातील संवेदशीलतेबाबत विचारविनिमय व्हावा हे उत्तम! नव्या संस्कृतीत व्यवहारोपयोगी ठरत नसतील, तर जुन्यांचा विरोध व नाराजी सहन करून, कधी त्याकडे दुर्लक्ष करून जुने नीतीनियम बाजूला सारले जातात हे उघड सत्य आहे. नव्या युगााला सामोरे जाताना होणार्या मूल्यांच्या पडझडीत तगण्यासाठी, टिकण्यासाठी बर्याचदा नव्या पिढीला असे करावे लागते. जुने उखडून टाकीत असेल तर त्यातून सुटलेलेच बरे! त्यात प्रतिगामी, अविवेकी, अशास्त्रीय विचार मागे पडले तर संस्कृती व जीवन उन्नत होते. आधुनिकतेच्या झपाट्यात अनेक व्यवहारोपयोगी सूत्रे हळूहळू निरूपयोगी ठरत गेली. पूर्वी माणसे महत्वाची वाटत, पैसा तितका महत्वाचा नव्हता. बलुतेदारी प्रेमातही पुरायची. म्हणजे देणे घेणे पैशात नसले तर भाव भावनात असायचे. आदर, आपुलकी दाखवली तरी चालायचे. पैशापलीकडे माणसात इंटरेस्ट असायचा. जीवन आजच्यासारखे गतिमान, रोखठोक, हिशेबी, व्यवहार कठोर, रूक्ष, शुष्क झाले नसल्यामुळे, आजूबाजूच्या जगण्याकडे उत्सुकतेने पाहिले जायचे. मध्यम वर्गाचे जगणे थोडे निवांत, कमी स्वप्नाचे, सौम्य अपेक्षांचे असल्याने प्रेम व माणसाची किंमत यात थोडे अंतर ठेवले जायचे. माणसे थोडी असली की, जोडून घ्यावीशी वाटतात. आंतरिक एकाकीपणाच्या अस्वस्थतेवर तो थोडा उपाय ठरतो. जगणे सूत्रात (नितीनियमात) बांधावेसे वाटे, नातेसंबंधांचे धागे जुळवण्याची जरूर भासायची. माणसे एकत्र नसतील तर नीती नियमांचा काय उपयोग? नीती नियम नसतील तर माणसे एकत्र कशी राहू शकतील? ह्या दोन्ही प्रश्नांची परस्परपूरक उत्तरे शोधणे चालू होते. जग फारसे माहीत नसल्याने जगण्यातले कुतुहल टिकून होते. सृष्टीची रहस्ये माहीत नसल्याने तिच्याबद्दल नवल वाटत होते. अज्ञाताचे आश्चर्य व भीती वाटत होती, जगणे अनिश्चित, अनपेक्षित, अनाकलनीय म्हणून मनोरंजक वाटत होते. माणसांची जागा अजून यंत्रांनी घेतली नव्हती. जगण्याचे प्रयोजन वेगवेगळ्या शोध सिद्धांतांनी जाणून घेण्याचे प्रयत्न भरात होते. या सर्व गोष्टींमध्ये माणूस केंद्रस्थानी होता. सत्ता, संपत्ती, व्यवस्थापनाने आजच्यासारखे माणसाला परीघावर फेकले नव्हते.
जगणे अजून तगण्यापुरते मर्यादित निम्न स्तरावर पोचले नव्हते. माणसे, वृक्षवल्लीवनचरांचा अर्थ उपभोगापुरता सीमित राहिला नव्हता. जीवनात चांगले काय याचा शोध जगण्यातले कुतुहल टिकवून ठेवीत होता. जाणून घ्यावे असे बरेच काही आजूबाजूला शिल्लक होते. सगळ्या गोष्टींची बाजारातली किंमत अजून माहीत नव्हती.
आता जग व जगणे बरेचसे माहीत पडले आहे. खरे तर जग केवढे अमर्याद आहे याची छोटीशी चुणूक विज्ञानाने आपल्याला दिली आहे. त्याने उत्सुकता अधिकच वाढायला हवी. पण बाजाराच्या जीवनावरील अति नियंत्रणामुळे माणसे पुन्हा एकदा एकटी, भयभीत, स्वार्थी होत चालली आहेत. सर्व भावना, विचार, आचार, आकांक्षा, आवेगावर प्रेरणावर बाजाराची हुकुमत चालते आहे. नात्यागोत्यावर बाजारभाव राज्य करू लागला आहे. आता क्रिया प्रतिक्रिया उत्स्फूर्त न राहता तोलून मापून व्यक्त होताना दिसतात. आजचे पहा, उद्याचे काही खरे नाही, माझी शाश्वती नाही. आई, वडील, बहिण, भावंडे राहू द्यात बाजूला, पडेल ती किंमत मोजून आजचे सुख खिशात घाला हे व्यवहारातील यशस्वीतेचे मंत्र होत चालले आहेत.
जगण्याच्या लांबीबद्दल साशंक माणसाचे मन, दृष्टी, समज, विवेक सारेच अरूंद होत जाते. व्यवहारात अस्थिर माणूस तत्वज्ञानात आता संतुलन शोधत नाही. भ्रामक अस्मितेत फसतो, वृथा अभिमानात रूततो, जगापासून व अंती स्वत:पासून दूर होतो. उपभोगाची, त्वरीत आवेग शमविण्याची संधी शोधतो. अनिश्चितता, अस्थिरता भयभीत करू लागली की, वावटळीत सापडलेली माणसे उतावीळ, आक्रमक, अमानुष, चंगळवादी होतात. जन्मत:च विकृत व्यक्तिमत्व असलेली व व्यसनाने विकृत झालेली माणसे हिंसक कृत्ये करतात. पण संस्कृती संभ्रमात सापडलेली माणसेही हल्ला, बलात्कार, खून, दंगली अशी सारी कृत्ये करीत असतात. मला काय त्याचे अशा निर्विकार वृत्तीने, आजूबाजूची तगलेली, थकलेली, निराशग्रस्त मंडळी आपापले दिवस कंठत असतात.
विवेक व नीती नियम यांच्या संतुलित सूत्रबद्ध उपयोगाने माणसे व सृष्टी यात परस्परपूरक संतुलन साधले नाही तर संवेदनशीलता मानवी जीवनातून हद्दपार होईल अशी साधार भीती वाटते आहे.
–डॉ. प्रदीप पाटकर
ई–मेल : patkarpradeep@gmail.com