आपल्या जातीग्रस्त समाजात, जातीरचनेच्या सर्वात वरच्या स्थानी असणारे ब्राह्मण जातीसमूह सोडले तर इतर सर्व जातींमध्ये मानसिक पातळीवर सापेक्ष अर्थाने न्यूनगंडाची भावना रूजलेली आहे. अर्थात ब्राह्मणांमध्येही जाती-पोटजातींमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण याची स्पर्धा आहेच. आणि त्या त्या पातळीवर अहंगड-न्यूनगंडाची भावना कार्यरत असतेच, याचा अर्थ आपला सर्व समाजच एकाच वेळी अहंगंड न्यूनगंडाने पछाडलेला आहे. म्हणजे खालच्या जातींच्या संदर्भात अहंगंडाची भावना तर वरच्या जातींच्या संदर्भात न्यूनगंडाची भावना कार्यरत असते. भारतीय मानस असे दुतोंडी पद्धतीने तयार झाले आहे.
समाजात सर्वात तळाच्या ज्याला माणूस म्हणूनही गणले नव्हते, त्याची या पातळीवर परिस्थिती केवळ भीषण आहे. स्वत:कडे माणूस म्हणून पाहण्याची त्याची नैसर्गिक इच्छाही या न्यूनगंडाने मारून टाकली होती. असे असूनही या अस्पृश्य गणल्या गेलेल्या आणि त्यापलिकडे भटके, विमुक्त ठरविलेल्या जाती-जमातींमध्ये, आदिवासींच्याही वेगवेगळ्या समुदायांमध्ये श्रेष्ठ कोण अशी भावना, चर्चा आणि प्रत्यक्ष व्यवहार आज देखील सुरूच आहे. म्हणजे तथाकथित वरचे अहंगंडाने पछाडलेले तर तथाकथित खालचे न्यूनगंडाने पछाडलेले. त्यातही अहंगंडा-न्यूनगंडाचे विण प्रत्येक जातीसाठी आहेच. बुद्ध-चार्वाकापासून फुले-आंबेडकरांपर्यंत लढवला गेलेला समतेचा लढा या दोन्ही भावनांचे कायमचे खच्चीकरण करण्यासाठी आहे आणि आजही तो चालूच आहे. आणि जोपर्यंत हे श्रेष्ठ-कनिष्ठतेचे जातीय मापदंड अस्तित्वात राहतील तोपर्यंत तो चालूच राहील.
आजही जाती पातळीवरच्या या सूक्ष्म न्यूनगंडीय भावनांना पदोपदी तोंड देण्याची वेळ समाजात हीन गणल्या गेलेल्या जातीतील माणसांना येत असते. खालच्या जातीयांना आपले जातीवास्तव उघड होऊ नये असे वाटत असते. त्यातही आज जे मध्यमवर्गीय झालेले आहेत त्यांना तर हे फार प्रकर्षाने वाटत असते. एकतर अजून दारिद्र्यात खितपत पडलेल्या आपल्या समाजाबरोबर राहता येत नाही आणि वरचा समाज तर स्वीकारीत नाहीच अशी एक चमत्कारिक त्रिशंकू अवस्था त्यांना आली आहे. त्यातून जाती वास्तव उघड करणारी आडनावे टाकून शक्यतो चटकन जात ओळखू येणार नाही अशी आडनावे धारण केली जातात. याला सामाजिक जातीग्रस्ततेची वास्तवता कारणीभूत आहे. त्यात शिक्षणामुळे नव्या जाणीवा निर्माण झाल्यामुळे ही वास्तवता अधिकच अमनुष, भीषण वाटू लागते.
या भावनांचे चित्रण कथा कादंबर्यांतून, आत्मकथनांतून, कवितांतून, नाटकांतून दलित साहित्य प्रवाहाने केले आहे. “जेव्हा मी जात चोरली होती” ही बाबूराव बागुलांची कथा या मानसिक अवघडलेपणाचा नेमका वेध घेताना दिसते. पण हे वास्तव आजवर चित्रपटीय भाषेत समर्थपणे सूक्ष्मपातळीवर जाऊन कोणी मांडले नव्हते. व्यवहाराच्या पातळीवर ही मानसिक आंदोलने नेमकी कशी होतात आणि शालेय कोवळ्या वयात त्याचे कसे मनावर आघात होतात हे अगदी सूक्ष्म वास्तवाच्या पातळीवर जाऊन दिग्दर्शक नागराज पोपटराव मंजुरे यांनी त्यांच्या ‘फँड्री’ या चित्रपटातून प्रभावीपणे मांडले आहे. जाती पातळीवरचा अनुभव हा ‘जावे त्याच्या वंशा’ या स्वरूपाचा असतो; इतरांना त्याची कल्पना करणेही शक्य नसते. अगदी म.गांधीनाही, ज्या दक्षिण आफ्रिकेत भारतीय काळ्या जनतेसाठी त्यांनी लढा दिला, पण त्यांना इथे अस्पृश्यतेविरूद्ध भूमिका घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या उद्याची गरज पडली. तीही राजकीय गरज म्हणून, थोडक्यात दलित, आदिवासी, भटके विमुक्त, स्त्रिया, अल्पसंख्यांक यांच्या दु:खाकडे स्वाभाविकपणे पाहिले जाते. त्याची जाणीव त्या त्या पातळीवरच्या शोषक समुदायाला राहत नाही.
एकंदरच भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये जातीव्यवस्थेचे यथार्थ दर्शन घडवणारे चित्रपट अभावानेच आढळतात. मानवतावादी दृष्टीतून पूर्वी “सुजाता”सारखे चित्रपट एखादे दुसरे आढळतात. ज्यातून जातीव्यवस्थेची अमानुषता प्रखरपणे पुढे येत नसे. गांधीवादी दृष्टिकोनातून ‘गरीब बिच्चारे हरीजन’ अशी भावना त्यात ओतप्रोत भरलेली असे. अशा चित्रपटातून मानवतेला आवाहन असे. विद्रोहाची भाषा सोडाच साधी विरोधाची भावनाही पुढे येत नसे. अलिकडच्या काळात प्रकाश झा यांचा ‘दामुल’, शेखर कपूरचा ‘बँडिट क्वीन’, सत्यजीत रे यांचा ‘सद्गती’ यासारखे चित्रपट जातीव्यवस्थेची दाहकता, अमानुषता चांगल्या प्रकारे प्रकट करताना दिसतात. पण दलित माणसाला या सगळ्याबद्दल काय वाटते, त्याच्या भावना काय याचे मात्र यात चित्रण दिसत नाही. मराठीत जाती प्रश्नावर चटकन आठवणारा चित्रपट म्हणजे ‘मुक्ता’ बाकी काही चित्रपटांतून थोडे फार इकडे तिकडे ‘मारूती कांबळेचे काय झाले’ यासारखे उल्लेख येतात. पण जाती वास्तव दडवण्याकडेच जास्त कल असतो. या संदर्भात आपण ‘जोगवा’ पहा, ‘नटरंग’ पहा, त्याला जातीव्यवस्थेचे काही देणेघेणेचं दिसत नाही. वर्गीय वास्तवावर आधारलेले खूप चित्रपट आहेत. पण या चित्रपटांतून जातीवास्तव जवळ जवळ हद्दपार केले आहे. मराठीतच नुकताच ‘टाईमपास’ नावाचा गल्लाभरू चित्रपट येऊन गेला. त्यातही जातीवास्तव बाजूला सारण्यात येऊन ते वर्गीय स्वरूपात बांधण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अर्थात हा चित्रपट मुळातूनच बोगस आहे.
हे खरे की, जातीवास्तवाचे चित्रीकरण करणे, ते वास्तव स्वरूपात पुढे आणणे, त्यातील गुंतागुंतीचे नीट आकलन करणे, ही फार मोठी जोखमीची तसेच स्वत:च्या अंतरंगात डोकावून पाहण्याची गोष्ट आहे. दलित, भटके विमुक्त, आदिवासी या समूहातील लोकांचे त्यांच्या मानसिक पातळीवर जाऊन त्यांचे दु:ख वास्तव स्वरूपात पडद्यावर आणणे हे खरोखरच खूप महान प्रतिभावान दिग्दर्शकाचे काम आहे. त्यासाठी जातीपल्याड जाणारा सम्यक दृष्टिकोन हवा. मराठीत असे दिग्दर्शक जवळ जवळ नाहीतच. अलिकडे मराठी चित्रपटाने कात टाकली आहे आणि अनेक वास्तववादी चित्रपट दिग्दर्शक पुढे आले आहेत. प्रेक्षकांचीही त्यांना दाद मिळाली आहे. असे असले तरी समाजवास्तवाकडे पाहण्याचा त्यांचा ‘मध्यमर्गीय चष्मा’ या चित्रपटांची कमजोरी पुढे आणतो. त्यामुळे वैश्विक होत नाहीतच पण राष्ट्रीयही होत नाहीत. उदा.शेखर कपूर यांचा ‘बँडीट क्वीन’ हा केवळ फुलनदेवीची कहाणी राहत नाही तर तो भारतीय जातीग्रस्त समाजाचा एक प्रातिनिधीक सिनेमा बनतो. फुलनदेवी एक डाकू राहत नाही तर ती दलित समाजाच्या प्रतिकाराचे प्रतिक बनते, ते वैश्विक परिणाम लाभल्यामुळे, मराठीतील ही उणीव भरून काढण्याचे काम “फँड्री” या मराठी चित्रपटाने केले आहे. शिक्षणातून आलेले नव्या जाणीवांचे आत्मभान, आणि प्रत्यक्षातील त्याला छेद देणारे जीवन यांच्या आंतरिक मानसिक संघर्षातून हळूहळू प्रतिकाराच्या अवस्थेपर्यंत होणारी वाटचाल या चित्रपटाने अत्यंत वास्तव पद्धतीने चितारलेली आहे.
कैकाडी समाजातील, अठराविश्वे दारिद्र्य असलेल्या कुटुंबाची ही कहाणी आहे. या चित्रपटाचे मुख्य पात्र ज्याला आपण नायक म्हणू तो 15-16 वर्षांचा शाळेत शिकणारा जांबुवंत नावाचा मुलगा. गावच्या रचनेतील त्याच्या कुटुंबाचे स्थान आणि त्या पार्श्वभूमीवर त्याला येणारे अनुभव यांनी ही कथा गुंफली आहे. यातून भारतीय जातीग्रस्त समाजाचे सूक्ष्म पैलू दिग्दर्शक-नागराज पोपटराव मंजुळे यांनी अचूकपणे टिपले आहेत. ते प्रत्यक्ष चित्रपट पाहून अनुभवणे गरजेचे आहे.
अंधारात दडलेले भूभाग जसे हळूहळू प्रकाशात यावेत तसे केवळ अन्याय वाट्याला आलेले एक एक समूह आपली मुद्रा समाज पटलावर उमटवीत आहेत. नागराज पोपटराव मंजुळे हे अशाच समाजातून पुढे आलेले दिग्दर्शक आहेत. स्वत: अनुभवलेले दु:ख त्यांनी सहजतेने म्हणूनच चित्रपटाच्या पडद्यावर साकार केले आहे. समतेच्या आणि जातीअंताच्या लढाईसाठी अशा चित्रपटांची खूप गरज आहे. जातीभावना नष्ट होऊन निखळ माणूस म्हणून ओळख होण्याची लढाई यातूनच पुढे जाईल.
–सुभाष थोरात
लेखक संपर्क : 9869392157