Categories
अघोरी प्रथा

पैशाच्या पावसाच्या आमिषाने मुलींचे लैंगिक शोषण?

एप्रिल - २०१४

पाच फेब्रुवारी 2014 रोजी दापोलीतील एक गृहस्थ दुपारी माझ्या घरी आले. तथाकथीत चमत्कार करण्याचा दावा करून मुलींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न कसा केला जातो याचे त्यांच्या भ्रमणध्वनीवर ध्वनीमुद्रित केलेले एक संभाषण त्यांनी ऐकवले. एक मध्यमवयीन महिला व एक तरूण मुलगी यांच्यातले ते संभाषण होते. त्याची गोष्ट पुढीलप्रमाणे.

ती मुलगी स्मिता (सर्व नावे बदललेली) दापोलीपासून 8 ते 10 कि.मी.अंतरावरील एका लहान गावात रहाते. घरी ती व आई दोघीच असतात. वडील 6 वर्षांपूर्वी वारले आहेत. आरोपी महिला वैशाली तिच्या शेजारच्या गावातीलच आहे. घरोघरी फिरून वस्तू विकण्याच्या व्यवसायाच्या निमित्ताने ती पहिल्यांदा स्मिताच्या घरी गेली. स्मिताच्या आईशी तिची अगोदरच ओळख होती. या निमित्ताने तिची स्मिताशीही तोंडओळख झाली. दहावीत एक विषय गेल्यानंतर स्मिताने शिवणवर्गात नाव नोंदवले होते. त्यासाठी ती नियमितपणे दापोलीला यायची. आरोपी वैशाली हिची कपडे विकण्याची एक टपरी तिच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर होती. वैशाली स्मिताबरोबर येता-जाता हसायची-बोलायची. त्यातच तिने स्मिताला विचारले की, एक ‘जॉब’ आहे, खूप पैसे मिळतील, करशील काय! कसले काम करायचे आहे या प्रश्नाचे उत्तर वैशाली देत नसे. स्मिताला तिने बर्‍याचदा या ‘जॉब’विषयी विचारल्यावर स्मिताने आपल्या मावशीला याविषयी सांगितले. मावशी म्हणाली, की तू कामाला जायच्या आधी हे नक्की कसलं काम आहे ते आपल्याला कळायला हवं, त्यानंतर एक दिवस स्मिता वैशालीच्या दुकानात गेली व जॉबविषयी विचारू लागली. दुकानात माणसे असल्याने वैशाली तिला म्हणाली की नंतर फोन करून सांगते व तिने यावेळी स्मिताबरोबर फोन नंबरची देवाणघेवाण केली. स्मिताची मावशीही तिच्यासोबत होती परंतु जरा लांब उभी होती. थोड्या वेळाने स्मिताने स्वत:च्या भ्रमणध्वनीवरून वैशालीला फोन केला. तेव्हा वैशालीने तिला ‘जॉब’विषयी तपशीलवार माहिती दिली. पैशाचा पाऊस पाडून खूप पैसे मिळवायचा जॉब होता. या जॉबला डेरींग असलेल्या मुली हव्या होत्या. त्यांचे ऑपरेशन झालेले नसावे, केस लांब असावे अशा काही अटी होत्या. त्यांना देवीसारखं सजवण्यात येईल, त्यांची पूजा करण्यात येईल. बाहेरून आलेली माणसे त्यांची ‘मेडिकल’ करतील आणि त्यात त्या सिलेक्ट झाल्या तर पैशाचा पाऊस पाडण्याच्या विधीसाठी त्यांची निवड होणार होती. हे सर्व संभाषण चालू असताना स्मिताने तिच्या भ्रमणध्वनीच्या उपकरणाचा स्पीकर फोन चालू ठेवला होता. व मावशी स्वत:च्या भ्रमणध्वनीवर ते सर्व संभाषण ध्वनिमुद्रित करीत होती. यानंतर वैशालीच्या दुकानावर जाऊन स्मिताच्या मावशीने तिला हा काय प्रकार याबद्दल विचारले. तेव्हा त्यांची बाचाबाची झाली. ती देखील स्मिताने भ्रमणध्वनीवर ध्वनिमुद्रित केली.

(माझं एक निरीक्षण आहे की, पुरावे/माहिती गोळा करण्यासाठी भ्रमणध्वनीमधील सर्व सुविधांचा तरूण मुलं फार धडाधड उपयोग करतात. एकदा एका व्याख्यानमालेनंतर उस्मानाबादहून जालन्याला आम्ही चाललो होतो. व्याख्यानमालेच्या संयोजकांपैकी एक तरूण मुलगाही आमच्यासोबत होता. एम.एच.50 अशी पाटी असलेला ट्रक आम्हाला दिसला. 50 हा क्रमांक आर.टी.ओ.च्या मालिकेत आहे की नाही अशी आम्हा बाकीच्यांची चर्चा चालू होती तेवढ्यात तो मुलगा त्या पाटीचा मोबाईलमध्ये फोटो काढून मोकळा झाला होता. प्रश्न हाताळण्याचा दोन पिढीतला फरकच जणू आमच्यासमोर उलगडला आणि त्या तरूणाचा मार्ग अर्थातच जास्त प्रभावी होता. चर्चा, कृती याविषयी नंतर निर्णय घेता येतात आधी पुरावा गोळा करणे महत्वाचे असो) बाचाबाचीची घटना पोलीस स्टेशनपर्यंत गेली तेव्हा हा पुरावा ऐकवूनदेखील पोलीस स्वत:हून वैशालीची चौकशी करायला तयार नव्हते. स्मिताच्या बाबतीत कोणताही गैरप्रसंग घडलेला नाही सबब गुन्हा कसला दाखल करायचा असा त्यांचा प्रश्न होता.

मध्यंतरीच्या काळात स्मिताही तक्रार दाखल करावी की नाही अशा संभ्रमित अवस्थेत होती. आपल्यासमोर काय वाढून ठेवलेले होते या कल्पनेने ती खूप घाबरली होतीच. पोलीस-न्यायालय या फेर्‍यात अडकायलाही नको वाटत होते, परंतु वाईट प्रकार थांबला पाहिजे, त्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे असेही एक मन सांगत होते. अं.नि.स.च्या वतीने अनीश पटवर्धन आणि मी यांनी तिला पूर्ण मदतीची हमी दिली. तिच्या गावातील तरूणांनीही तिला पूर्ण पाठींबा देण्याचे ठरवले. सुरवातीला प्रत्येक ठिकाणी ते सात-आठच्या गटाने तिच्याबरोबर हजर राहिले. त्यामुळे तिलाही अधिक सुरक्षित वाटले. तिची आई फारच खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहिली. मावशीनेही साथ दिली. त्यानंतर 16 तारखेला ती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेली. आम्हीदेखील तिच्यासोबत गेलो. पोलिसांना जादूटोणाविरोधी कायदा दाखवला. त्यातील ‘चमत्काराचा प्रचार व प्रसार करणे’ हे कलम या केसला चपखलपणे लागू होते हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या मुलीबाबत प्रत्यक्ष शोषण घडलेले नसेल तरी पैशाचा पाऊस पाडण्याचा दावा करणे हा चमत्काराचा प्रचार व प्रसार आहे. त्यामुळे तो गुन्हा आहे हे पोलिसांना मान्य करावे लागले व त्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याखाली गुन्हा दाखल करून घेतला.

स्मिताचे लैंगिक शोषण झालेले नव्हते त्यामुळे ती व तिच्या घरातील लोक तक्रार करण्यासाठी पुढे आले. हेही खरेच कारण आपल्या समाजात बलात्कार झाला, फसवली गेली तरी बाईच गुन्हेगार ठरते. यानंतरच्या पोलीस तपासात पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावे ज्यांचं लैंगिक शोषण झालेलं आहे अशा महिला पुढे आल्या. परित्यक्ता, उत्पन्नाचा स्त्रोत नसलेल्या प्रौढ कुमारिका किंवा प्रचंड छळवादी नवर्‍यांच्या बायका या प्रकारात बळी पडलेल्या होत्या. मेडिकलच्या नावाखाली बाहेर कोठेही त्यांच्यावर बलात्कार करण्यात आलेला होता. याविषयी बाहेर कोठेही अवाक्षर काढले तर करणी करून आपण बसल्याजागी नष्ट होऊ ही भीती त्यांना होतीच व घरी माहिती झाले तर काय होईल याचीही भीती होती. तरीही शोषण करणार्‍यांच्या विरूद्धचा रागही तीव्र होता. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस स्टेशनऐवजी कोर्टासमोर ळप लराशीर पद्धतीने त्यांचे जबाब नोंदवण्यात आले. या सर्व पुराव्यांच्या आधारावर आरोपींची एक साखळी उघडी पडली व पोलिसांनी आत्तापर्यंत 5 जणांना अटक केलेली आहे. प्रमुख आरोपींमध्ये दोन महिला आहेत, ज्या या मुलींना फशी पाडण्याचे काम करीत असत.

फशी पडलेल्या सगळ्या बायका या मुळात पुरूषसत्ताक व्यवस्थेतील अन्यायाच्या बळी होत्या. त्या अगतिक परिस्थितीतून बाहेर काढणारा काही जादूई उपाय असू शकेल, आपल्या अंगात विशेष शक्ती असतील तर तो उपाय आपल्याला लाभेल, असे त्यांना वाटत होते. शोषित व्यक्ती दैववादी उपायांच्या आहारी गेली की तिच्या शोषणात वाढच होते हे पुन्हा एकदा लख्खपणे समोर आलं.

केस आता एका टप्प्यावर येऊन थांबली आहे. आरोपींना अजून जामीन मिळालेला नाही पण तो मिळू शकतो. आरोपींच्या साखळीत या पुढील कड्या आहेत का? असल्यास कोण या प्रश्नांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत.

मुक्ता दाभोलकर

लेखक संपर्क : 9423297969