Categories
अघोरी प्रथा

जांभुळणीतील पशूबळीची प्रथा अंनिसच्या प्रबोधनाने झाली बंद!

एप्रिल - २०१४

मुळातच नववर्षाच्या स्वागतानंतर हळूहळू ग्रामीण भागातून यात्रांचा हंगाम सुरू होतो. प्रत्येक गावातील देवी-देवतांच्या यात्रांना शेकडो-हजारो वर्षांची परंपरा आहे. वर्षातून एकदा आपल्या श्रद्धेचा उत्सव साजरा करण्याची संधी यात्रेच्या रूपाने संबंधित ग्रामस्थांना उपलब्ध होते. आणि अत्याधुनिक बदलत्या युगातही या यात्रांची परंपरा टिकवून ठेवणार्‍या ग्रामस्थांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे पण जांभुळणीच्या(ता.आटपाडी, जि.सांगली) ग्रामस्थांनी पिढ्यान्पिढ्या चालत आलेली क्रूर प्रथा बंद करून समाजपरिवर्तनाच्या यात्रेला बळकटी दिली आहे.

जांभुळणी ग्रामस्थांनी दाखवलेले धाडस नक्की वाखाणण्याजोगे आहे. कोणताही गाजावाजा न करताही माणुसकीला काळिमा फासणार्‍या प्रथा बंद करता येतात हे जांभुळणीकरांनी कृतीतून दाखवून दिले आहे.

यात्रेच्या नावाने मुक्या जनावरांचा बळी देण्याची प्रथा काही एका रात्रीत बंद होणार नसली तरी त्यातील क्रूरपणा नाहीसा करण्याचे काम जांभुळणीच्या ग्रामस्थांनी करून दाखवले आहे. दोन महिन्यांचे मेंढीचे पिलू दोन्ही बाजूने दोघांनी पाय धरून पकडून ठेवायचे आणि तिसर्‍याने त्या मुक्या जनावराच्या पोटावर कुर्‍हाडीने मधोमध तीन वार करून त्या पिलाचा बळी द्यायचा अशी परंपरा तिथे पिढ्यान्पिढ्या सुरू होती.

राष्ट्रीय समाज पक्ष आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ही प्रथा बंद करण्याची मागणी केली. अंनिसचे कार्यकर्ते प्रा. विजयकुमार जोखे, राहुल थोरात व वाघेश साळुंखे यांनी पोलीस निरिक्षकांची भेट घेऊन त्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशाची माहिती दिली व त्याचे पालन करावे अशी विनंती केली. त्यानुसार पोलिसांनी नोटीस बजावली आणि सरपंच दादासाहेब पाटील आणि उपसरपंच महादेव जुगदार यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी ही क्रूर प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय आणि तोही एकमताने घेतला. पहिल्यांदाच कोणताही बळी न देता यल्लमादेवीची यात्रा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून पोलिस, प्रशासनानेही याचे स्वागत केले. सर्वात विशेष म्हणजे याला कोणीही विरोध केला नाही.

शासनानेही अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा मंजूर केला असला तरी अनेक ठिकाणी आजही समाजमनातील अंधश्रद्धा दूर झालेल्या नाहीत अशावेळी जांभुळणीतील धाडस अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त पाहणार्‍या समाजासाठी नक्कीच दिशादर्शक ठरणारे आहे.