Categories
व्यक्तिविशेष

शिक्षकाचा प्रार्थनेस नकार, उच्च न्यायालयाचीही यास मान्यता

फेब्रुवारी – २०१४

बी. प्रेमानंद यांनी केरळ मधील कालिकत येथे स्थापन केलेल्या ‘सायन्स ट्रस्ट’ या वैज्ञानिक विचारांचा प्रसार करणार्‍या संस्थेचा पहिला ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’ 14 डिसेंबर रोजी नाशिक येथील माध्यमिक शाळेतील शिक्षक संजय साळवे यांना देण्यात आला. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि कर्नाटकातील अंधश्रद्धाविरोधी चळवळीतील कार्यकर्ते डॉ.नरेंद्र नायक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रूपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे.

भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांच्या संरक्षणासाठी संजय साळवे यांनी गेली सहा वर्षे मुंबई उच्च न्यायालयामध्ये दिलेल्या प्रदिर्घ लढ्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

संजय साळवे यांनी सरकारी अनुदानित शाळेमध्ये धार्मिक प्रार्थनेदरम्यान हात जोडण्यास नकार दिला होता. त्याचा राग मनात ठेवून तब्बल सहा वर्षेत्यांची पगारवाढ शाळेच्या व्यवस्थापनाकडून रोखण्यात आली होती. विवेकी सनदशीर मार्गाने या अन्यायाविरोधात लढा देत संजय साळवे कोर्टाकडून एक क्रांतिकारक निकाल मिळविण्यात यशस्वी झाले.

या त्यांच्या लढ्याविषयी अंनिवाच्या वाचकांना माहिती व्हावी म्हणून त्यांच्याशी आलोक देशपांडे यांनी केलेली बातचीत,

आलोक आपल्याला मिळालेल्या पुरस्काराबद्दल आपले अंनिवातर्फे हार्दिक अभिनंदन!

संजय साळवे धन्यवाद. डॉ. दाभोलकरांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी खरोखरीच खूप महत्वाचा आहे. ज्या व्यक्तींच्या कामाबद्दल तुम्हाला आदर असतो, त्याच व्यक्तीच्या नावाने पुरस्कार मिळणे ही गोष्ट नक्कीच प्रोत्साहन देणारी असते. इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा याचं मोल मला निश्चितच अधिक आहे.

आलोक मूळ विषयाकडे वळण्यापूर्वी तुमची थोडक्यात ओळख आम्हाला सांगा.

संजय साळवे माझे आईवडील काही फार शिकलेले नाहीत. मी व माझ्या भावांनी मात्र शिक्षण पूर्ण केले. माझी पत्नीही सध्या एम.फील. पूर्ण करीत आहे. माझे बी.एड. पूर्ण झाल्यानंतर 1996 साली मी नाशिक येथील महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक या पदावर रूजू झालो. 2008 पर्यंत सलग 12 वर्षे व्यवस्थापनाला तक्रारीची एकही संधी न देता मुलांना इंग्रजी विषय शिकविण्याचे काम मी केले. या 12 वर्षांत तयार करण्यात आलेल्या कर्मचार्‍यांच्या सर्व गोपनीय अहवालांमध्ये माझ्या कामाबद्दल एकही तक्रार नव्हती. माझे शिक्षकाचे काम मी पूर्ण निष्ठेने आणि समर्पित भावनेने करीत असल्याचीच ती पोचपावती होती.

आलोक मग अशी कोणती घटना घडली की, तुम्हाला शाळेच्या व्यवस्थापनाला कोर्टात खेचावे लागले?

संजय साळवे साधारण जून 2007 ची गोष्ट आहे. शाळेमध्ये सकाळची प्रार्थना सुरू होती. इतर सर्व शिक्षक आणि विद्यार्थी हात जोडून उभे होते. मी हात न जोडता तसाच उभा राहिलो. त्याक्षणी कोणताही विद्रोह करावा अशी भावना माझ्या मनात नव्हती. मी एक साधा विचार करत होतो की, ज्या धर्माला किंवा ज्या देवालाच मी मानत नाही त्याची प्रार्थना चालू असताना मी हात का जोडावे? मला हात जोडलेच पाहिजेत अशी सक्ती करण्याचे काही कारण नाही. मी बौद्ध आहे आणि नास्तिकही आहे. मला माझ्या मताप्रमाणे वागण्याचा अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच ना?

आलोक परंतु, गेली 12 वर्षे तुम्ही प्रार्थनेला हात जोडत होताच ना? अचानक असा विचार येण्याचे कारण काय?

संजय साळवे हो. ते खरे आहे. पण मी कधीच पूर्ण भक्तीभावाने हात जोडले नव्हते. माझ्या आजूबाजूचे शिक्षक आणि विद्यार्थी जोडायचे, मग मी सुद्धा त्यांच्यासारखच करायचो. त्यादिवशी मात्र हात न जोडण्याची क्रिया अगदी उत्स्फूर्तपणे माझ्याकडून घडली. मी परत सांगतो, की कोणताही विद्रोह किंवा व्यवस्थेला नाकारणे एवढा मोठा विचार त्याक्षणी माझ्या मनात नव्हता.

आलोक तुमच्या या कृतीकडे शाळेतील कोणाचे लक्ष गेले का?

संजय साळवे हो. एकाच माणसाचे. आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मधुकर बच्छाव माझ्यावर प्रचंड चिडले होते. त्यांनी माझ्याकडून मी केलेल्या कृतीचे लेखी स्पष्टीकरण मागितले. मी बराच विचार केला. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीमध्ये मी काम करत असल्याने तेथील माझ्या मित्रांसोबत चर्चा केली. काही वेळ घेऊन मी त्यांना उत्तर पाठविले. मी त्यात लिहिले की, मी नास्तिक असल्याने कोणाही देवासाठी केलेल्या प्रार्थनेमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही आणि अशा प्रकारची सक्ती करणे हे संविधानाच्या विरोधी आहे.

आलोक त्यांना तुमचे उत्तर पटले?

संजय साळवे ते शक्यच नव्हते. संस्थेचे नाव जरी महात्मा फुल्यांचे असले तरी प्रत्यक्ष वागण्यात त्यांचे विचार संस्थेतील फारच कमी लोक अंगीकारत होते. गेल्या 12 वर्षांच्या नोकरीत माझ्याविरोधात वापरता येईल अशी कोणतीच गोष्ट त्यांना न सापडल्याने त्यांनी माझ्या या तथाकथीत ‘बेशिस्त गैरवर्तणुकीचा’ माझ्याविरोधात वापर करण्याचे ठरविले. नियमानुसार 12 वर्षेकाम केल्यावर मला देय असलेली उच्च पगार श्रेणी त्यांनी मला नाकारली. माझी ‘बेशिस्ती’ हे त्याचे कारण सांगण्यात आले.

आलोक प्रार्थनेला हात जोडणे नाकारण्या मागील तुमची भूमिका समजावून सांगाल काय?

संजय साळवे सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की, मी कोणताही नियम तोडलेला नाही आणि केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाप्रमाणेच वागलो आहे. संविधानातील कलम 28(3) नुसार सरकारी अनुदान मिळणार्‍या शैक्षणिक संस्थेमध्ये कोणाही व्यक्तीला धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणे बंधनकारक नाही. अगदी अल्पवयीन विद्यार्थ्यांना सहभागी करण्यासाठी देखील, त्यांच्या पालकांनी लेखी मान्यता घेणे गरजेचे आहे. त्याउपर, माध्यमिक शाळा नियमावलीमधील नियम 45(9) शाळांना दिवसाचे कामकाज केवळ राष्ट्रगीताने सुरू करण्यास सांगतो. धार्मिक प्रार्थनांचा यात कोठेही उल्लेख नाही. माझ्या या युक्तीवादानंतरही शाळा प्रशासन आपल्या निर्णयावर कायम राहिले आणि माझी पगारवाढ रोखून धरली. मला बाहेरून असेही कळले की, मी मुख्याध्यापकांकडे विनंती केल्यास माझा प्रश्न सुटू शकेल. पण माझा धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मला संविधानाने दिला आहे आणि त्यासाठी मी इतर कोणाकडे विनंती का म्हणून करावी?

आलोक याविरोधात तुम्ही सरकारी अधिकार्‍याकडे दाद मागीतलीत का?

संजय साळवे खूप वेळा. माझी अनेक पत्रे आणि अर्ज त्यांच्याकडे गेले होते. तथापि 2009 पर्यंत शिक्षण विभागाने काही केले नाही. अखेरीस 2010 मध्ये जेव्हा मी सर्वप्रथम उच्च न्यायालयात गेलो, तेव्हा पहिल्याच दिवशी न्यायमूर्तींनी शिक्षण विभागाला आदेश देऊन माझी याचिका निकालात काढली. मात्र इतके होऊन देखील 2012 पर्यंत परिस्थितीत काहीही फरक पडला नाही. शिक्षण विभागाने काही पत्रे शाळेला पाठविली व मला उच्च पगार श्रेणी देण्यास सांगितले, मात्र त्या पत्रांची दखलही शाळेने घेतली नाही. एवढेच नव्हे तर, शिक्षण विभागानेदेखील शाळेवर कोणतीही कारवाई करण्याचे टाळले. अखेरीस पाच वर्षे झगडून देखील काहीच होत नसल्याचे बघून, मी माझे मुंबईतील वकील आणि सामाजिक कार्यकर्तेसंघराज रूपवते यांना भेटलो आणि आम्ही न्यायालयीन लढा पुन्हा एकदा सुरू करण्याचे ठरविले. संघराज रूपवते यांनी याआधी रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांडातील न्यायालयीन लढाईत महत्वाची भूमिका बजावली होती.

आलोक शाळेविरोधात भूमिका घेण्याच्या आणि कोर्टात जाण्याच्या तुमच्या कृतीला तुमच्या घरातून पाठींबा होता का?

संजय साळवे खरं सांगायचं तर सुरवातीला माझे स्वत:चे कुटुंबीय मी या फंदात पडावे या विचाराचे नव्हते. त्यांनी थेट विरोध नाही केला, परंतु अगदी तटस्थपणे मला पाठींबा दिला. तुम्हाला खोटं वाटेल, परंतु जेव्हा डॉ.दाभोलकरांचा खून झाला तेव्हा आमची केस अगदी निर्णयाप्रत आली होती. परंतु माझ्या घरातले या खुनामुळे इतके हादरले होते की, त्यांनी मला मी कुठे जातो किंवा कुणाला भेटतो ही सर्व माहिती घरी कळवत राहा असे बजावले होते. शाळेच्या व्यवस्थापनानेदेखील माझ्या काही जवळच्या नातेवाईकांच्यामार्फत माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मला या सर्व संघर्षात पूर्ण साथ दिली ती चळवळीत माझ्यासोबत काम करणार्‍या मित्रांनी. विजय निरभवणे सारखे माझे मित्र यात सोबत होते. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती ती म्हणजे, या लढ्यात उतरायचं असेल तर मागे हटायचे नाही आणि मागे हटायचे असेल तर लढ्यात उतरायचे नाही.

अलोक तुमच्या हात न जोडण्याच्या कृतीचे मुलांवर वाईट परिणाम होतील असे शाळेने कोर्टाला सांगितले. तुमचे यावर मत काय?

संजय साळवे माझे स्वत:चे मत असे आहे की, राष्ट्रगीतामुळे जेवढी मूल्ये मुलांमध्ये रूजतात तेवढी मूल्ये कोणत्याही धार्मिक प्रार्थनेने रूजत नाहीत. यापलिकडे जाऊन मी असे म्हणेन की, माझी लढाई कोणाचा अपमान करण्यासाठी नव्हती, तर मानसिक गुलामगिरीतून बाहेर पडण्यासाठी होती. मी विवेकवाद अंगिकारला आणि त्यानुसार वागलो. संविधान मानले म्हणून मुलांवर वाईट परिणाम कसे होऊ शकतात? मुलांवर संस्कार करण्याचा केवळ प्रार्थनेला हात जोडणे हा एकच मार्ग उपलब्ध आहे का?

आलोक कोर्टाने या केसवर काय निकाल दिला?

संजय साळवे सहा वर्षे या विषयावर शाळेशी संघर्ष केल्यानंतर अखेरीस कोर्टाने निकाल दिला की, शासकीय अनुदान मिळत असलेल्या शाळांमध्ये कोणाही व्यक्तीस धार्मिक प्रार्थनेदरम्यान हात जोडण्याची सक्ती करता येणार नाही, कारण तसे केल्यास भारतीय संविधानातील कलम 28(3) चे उल्लंघन होते. कोर्टाने हेदेखील सांगितले आणि त्याला माझी काहीही हरकत नाही की, प्रार्थनेदरम्यान मी सर्वांसोबत शांततेत हात न जोडता उभा राहीन. कोर्टाने शाळेला माझा सहा वर्षांचा थकविलेला पगार देखील 31 जानेवारी पूर्वी देण्याचे निर्देष दिले. खरं सांगायचे तर, या निकालापूर्वी शाळेने कोर्टाबाहेर प्रश्न सोडविण्याची तयारी दाखविली होती. परंतु मी ती नाकारली. याचे कारण म्हणजे कोर्टाने या केसमध्ये मुद्द्याच्या आधारे निर्णय द्यावा अशी माझी इच्छा होती. कारण हाच निर्णय आता यापुढे भविष्यात अनेक ठिकाणी उदाहरण म्हणून दाखविला जाऊ शकतो.

आलोक तुमच्या हात न जोडण्याच्या कृतीसाठी शिक्षा करण्यामागे प्रामुख्याने जातीय मनोवृत्ती कारणीभूत होती असे तुम्हाला वाटते काय?

संजय साळवे निश्चितच. एक बौद्ध माणूस आपल्याला आव्हान देत आहे हाच त्यामागचा खरा राग होता. त्यामुळे तर त्यांचा इगो इतका दुखावला गेला. माझ्याजागी जर दुसरा एखादा इतर जातीचा असता तर हा मुद्दा इतका ताणवला गेलाच असता असे वाटत नाही.

आलोक तुमचा लढा यशस्वी झाला असे तुम्ही म्हणाल का?

संजय साळवे माझा वैयक्तिक प्रश्न तर या लढ्याने नक्कीच निकालात निघाला आहे. परंतु, मला हे जाणवले की याचे परिणाम पूर्ण समाजावर होणार आहेत. नाशिकमध्येच तशी एक घटना नुकतीच घडली आहे. दुसर्‍या एका शाळेत व्यवस्थापनाने पसायदान म्हणण्याची सक्ती केली होती. तेथील एका शिक्षकांनी कोर्टाच्या याच निर्णयाचा दाखला शाळेला दिला, तेव्हा त्यांनी पसायदानाची सक्ती मागे घेतली. अर्थात हे एक उदाहरण झाले, परंतु लोकांमध्ये जागरूकता वाढविण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मला सहा वर्षे का झगडावे लागले असा विचार जेव्हा मी करतो, तेव्हा मला असे वाटते की, आपल्या देशात संविधानाबाबत लोकांची जागरूकता फार कमी आहे. ती जागरूकता आणि तसा जागरूक मतदार तयार होणे ही काळाची खरी गरज आहे. जर तसे झाले तर, तर मी ठामपणे म्हणेन की माझा लढा यशस्वी झाला.

आलोक तुम्हाला थेट केरळ मधून या लढ्यासाठी पुरस्कार मिळाला त्याबाबत काय सांगाल?

संजय साळवे मी नाशिक मधला एक साधा शिक्षक आहे. पण जेव्हा माझी बातमी पेपरमध्ये आली तेव्हा त्याच्या प्रती केरळमध्ये अक्षरश: वाटल्या गेल्या. त्याच सुमारास दाभोलकरांचा खून झाला होता. केरळमध्ये दाभोलकरांच्या खुनाच्या निषेधार्थ जे मोर्चे निघाले त्यात या बातमीचे पोस्टर करून लावण्यात आले होते. समविचारी माणसे एकत्र आली की आपले विचार देशाच्या एका कोपर्‍यातून दुसरीकडे कसे पसरतात याचे हे उदाहरण आहे. आपल्या भाषा एक नसल्या तरी विचार सारखेच आहेत आणि भारतात ज्याला आपण विविधतेत एकता म्हणतो त्याचेच हे एक उदाहरण आहे असे मला वाटते. मला तिथे त्यांनी विचारले की, महाराष्ट्रात रॅशनॅलिस्ट चळवळ कोणत्या नावाने काम करते? मी त्यांना म्हटले की, इथली फुले, शाहू आणि आंबेडकरी विचारांची चळवळ हीच इथली रॅशनॅलिस्ट चळवळ आहे. आम्ही सारे जात, धर्म आणि वंश यांच्या पलीकडे जाऊन काम करतो. तीच आमची खरी ताकद आहे.

संजय साळवे, सर

मोबा. 9422274043

मुलाखत आलोक देशपांडे