Categories
वाचक प्रतिसाद

वाचणारे म्हणतात

फेब्रुवारी – २०१४

चुकीच्या विचारावर अंनिसमुळे मात केली

गेल्या वर्षी 29 नोव्हेंबरला माझा 20 वर्षे वयाचा मुलगा सुजीत मित्रांसमवेत उमरग्याहून लातूरकडे साखरपुडा कार्यक्रमास जात होता. अपघातात लातूरजवळ सुजीतचे दु:खद निधन झाले…! त्यासोबत असलेल्या मित्राचा जीव बचावला….

अशा भीषण घटनेतून सावरायचं कसं? हा प्रश्न आमच्यासमोर असताना, समाजातील श्रद्धा व अंधश्रद्धा या संबंधीच्या विचारांच्या संकटांनाही आम्हाला तोंड द्यावं लागलं….!

1) मोटारसायकलस्वार ज्या मित्राचा जीव बचावला गेला त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे असे आले की, “त्याच दिवशी, आमचा मुलगा पंढरपूरच्या एकादशीच्या वारीहून आल्याने त्याचे पुण्यकर्म पुढे उभे राहिल्याने तो बचावला….!”

2) ज्या नियोजित साखरपुडा कार्यक्रमास हे दोघे मित्र जाणार होते. तो कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता संपन्न झाला होता. त्यानंतर तिथे अपघाताची बातमी पोहचली. तेव्हा, एका आठवड्यानंतर ती मुलगी ‘अपशकुनी’ आहे, असे समजून ठरलेले लग्न मोडले.

3) लग्न म्हटले की, विघ्न येणारच… म्हणून तुमच्या मुलाच्या मुळावर ते विघ्न आले. त्याचा प्रकोप झाला म्हणून, तुमच्या मुलाचा ‘बळी’ गेला. याची उतराई म्हणून ‘शांती’ करावी लागेल….!

4) तुमचा मुलगा अल्पायुषी होता त्याचे आयुष्य तेवढेच होते म्हणून तर अपघात घडला….!

तसेच, एकाच मोटारसायकलवर असलेल्या दोघा मित्रांपैकी एकजण किरकोळ जखमी होतो अन् तुमच्या मुलास गंभीर मार कसा बसला…..? एकंदर म्हणावे लागेल की, हे सारं ‘विधिलिखीत’ होतं……! प्रारब्धाशिवाय काही खरं नसते…! गेल्या जन्माचे काहीतरी पाप फेडायचे राहिले असेल, म्हणून तर या जन्मी दु:ख भोगावे लागते….!

अशा प्रकारचे विचार ऐकून माझे मन अधिकच विषण्ण वाटू लागले. समाजातील समज-गैरसमज याबाबतीतील भयानक वैचारिक संकटाचीही जाणीव झाली….!

गेल्या दोन दशकांपासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून मी विविध कार्यक्रमात, प्रशिक्षणात, शिबिरात सहभाग घेतला… म्हणून विचारांचे बळ मला मिळाले… त्या बळाच्या जोरावर मी या संकटाला तोंड देण्याचे ठरवले. माझ्या कुटुंबियांना धीर दिला…. सविस्तर चर्चा घडवून आणली…. यासाठी अंनिस कार्यकर्ते मित्र, पदाधिकारी यांनी दुजोरा दिला… दर महिन्याला येणार्‍या ‘अं.नि.वा.’ मासिकाच्या संग्रहातील विशेष लेख कुटुंबात नेहमी वाचल्यानेही धीर मिळाला…. धन्यवाद.

. . आरणे गुरूजी, उमरगा, जि. उस्मानाबाद.


जादूटोणाविरोधी कायद्याला धर्ममार्तंडाचा विरोध अपेक्षितच

जादूटोणाविरोधी विधेयक संमत झाले ही चांगली बाब आहे. जादूटोणाविरोधी कायद्याला सनातनी लोक विरोध करणार हे अपेक्षितच होते. धर्मातील प्रत्येक सुधारणेला त्यांनी नेहमी विरोध केला आहे. सतीबंदी कायदा त्यांना नको होता. निरपराधी स्त्रीला तिच्या पतीच्या चितेवर जिवंतपणी जाळून मारण्याचा धर्मदत्त अधिकार त्यांना अबाधित राखायचा होता. विधवा केशवपनाची प्रथा बंद करण्यास धर्ममार्तंडांचा विरोध होता. विधवेला विद्रुप केले नाही तर अधर्म माजेल असा कंठशोष ते करीत होते. संमतीवयाच्या कायद्याच्या विरोधात सनातन्यांनी आकाशपाताळ एक केले. धर्मगुरू अजूनही चातुर्वर्ण्यांचे समर्थन करतात. नीतीतत्वांची शाब्दिक प्रशंसा; पण कृतीत अनीतीला धर्ममान्यता असा हा दांभिकपणा आहे. अनिष्ट धार्मिक रूढी बंद झाल्या त्या समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे हे लक्षात घेतले पाहिजे.

प्रा. . ना. वालावलकर, पुणे.


अंधश्रद्धा मूळापासून संपवा!

शंकराचार्यांच्या चारी मठांची माहिती मी शोधतच होतो. नोव्हेंबर-2013 अंकामध्ये शृंगेरी मठाची माहिती मिळाली. त्याबद्दल हार्दिक धन्यवाद! अन्य तीन मठांची-पीठांची अशीच सचित्र माहिती प्रसिद्ध करा. असा मी आपणास आग्रह आणि विनंती करतो.

भारतात निसर्ग संपत्ती, खजिन संपत्ती मुबलक आहे. पण नियोजन नाही. त्यामुळे घरात सोनं ठेवून कर्ज मागणार्‍या आणि उशाला पंचपक्वान्न ठेवून भीक मागणार्‍या वेड्या माणसासारखी भारताची स्थिती आहे. शासकीय नोकर आणि राज्यकर्ते देशच विकत आहेत. सुज्ञ, प्रतिष्ठित असामी स्वत:च्या प्रगतीचा प्रयत्न करत आहेत. त्यांना समाज व देश हिताबद्दल काही देणं-घेणं नाही. तिरूपतीला दहा कोटी दान देणार्‍या सिनेनटाने एक खेडं दत्तक घेतलं असतं तर? ते त्याचं कायम स्मारक झालं असतंच आणि इतरांना अशा कार्यासाठी प्रोत्साहन मिळालं असतं. सिने कलाकार आणि क्रिकेट खेळाडूंना प्रचंड मान भारताएवढा जगात कुठेही नाही.

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सर्व प्रथम शासकीय कामांना वेग द्या. अनेक ज्योतिषी, देवदेवी, अंगात येणार्‍या ठिकाणी येणार्‍या स्त्री-पुरूषांचं मी अनेक वर्षे निरीक्षण केलंय. प्रश्न सगळीकडे तेच आहेत. गाव आणि प्रश्नकर्ते वेगळे फरक एवढाच आहे.

नोकरी केव्हा लागेल? मुलीचं लग्न केव्हा होईल? पहिला मुलगा होईल? कोर्टाचा निकाल केव्हा लागेल? शंभर टक्के हेच प्रश्न सर्व प्रथम आहेत. शासकीय कामाला न्यायालयातील कामाला प्रचंड वेग दिल्यास खूप अंधश्रद्धा संपतील. ह्याच विषयावर मी डॉक्टरांनाही पत्र लिहिलं होतं.
देव, देवी, मारूती, गणपती नवसाला पावतो असा सतत प्रचार केला जातो. तसेच नवस पूर्ण(?) झाला. असे सांगणारे खूप प्रचार करतात. हे अंधश्रद्धेचे कारण आहे. नवस पूर्ण झाला नाही. असं कोणीही सांगत नाही.

अशोककुमार इंगळे, सोलापूर