Categories
पुस्तक परिचय

स्त्री आणि तिचे पातिव्रत्य – उत्कृष्ट समीक्षा

फेब्रुवारी – २०१४

मान्यवर लेखिका नीलम माणगावे यांचे ‘स्त्री आणि तिचे पातिव्रत्य’ हे समीक्षणात्मक पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले. स्त्री म्हणून जगत असताना दु:ख, वेदना, अपमान, मारहाण, संशय, कुचेष्टा, हत्या, दडपशाही अशाच गोष्टींची रेलचेल. उभं आयुष्य भीतीच्या छायेखाली घालवायचं.

विज्ञानाने इतक्या उपलब्धी निर्माण केल्या. सुधारणा झाल्या, मुली शिकल्या, तरी स्त्रियांच्या वाट्याला आजही तीच दु:खे आहेत. आजही स्त्रीवरील अन्यायाच्या बातमीशिवाय वृत्तपत्राची छपाई पूर्ण होत नाही. असं का?

लहानपणापासून मुलीला, नाजूक, सुंदर, हळवी, रडवी, घाबरट म्हणून वाढवलं जातं; तिच्यावरील बंधने धर्म, नीतीमत्ता, कुळ, सदाचार, परंपरा, रूढी, पातिव्रत्य याच्याशी जोडली जातात. याचे संस्कार(?) लोककथा, पुराणकथासारखे वाङ्मय समाजावर करत राहते.

लेखिकेने चिकित्सा करण्यासाठी दहा ऐतिहासिक व पौराणिक कथा निवडल्या आहेत. त्यांची समीक्षा स्त्रीच्या नजरेतून, भावनेतून, विचारातून म्हणजेच स्त्रीवादी दृष्टिकोनातून केली आहे. पात्रांच्या वर्तनावर बोट ठेवता ठेवता वाचकाला अंतर्मुख करून आजच्या घटनांकडे पहायला लावण्याची ताकद या लिखाणात आहे. स्त्री-शुद्रातिशुद्रांच्या मुक्तीसाठी म.फुलेंनी अशी चिकित्सा केली. इतरही समाजसुधारकांनी असे प्रयत्न केले, तीच परंपरा लेखिकेने पुढे नेली आहे.

त्यांनी द्रौपदी, शकुंतला, वेणाबाई, संत कवयित्री बहिणाबाई, जैन व्यक्तिरेखा मनोरमा, लोककथेतील सावकारीण, चिनीकथेमधील तआयेन, जगन्नाथाची पत्नी लक्ष्मी, पुराणकथेतील भानुमती आणि लिंगायत स्त्री संत अक्कमहादेवी यांच्या कथा निवडल्या.

या व्यवस्थेत त्यांच्या वाट्याला आलेली अवहेलना, मानहानी, अपमान, संशय, शारीरिक-मानसिक-भावनिक फरफट उघड लेखिकेने केली आहे. यातील अक्कमहादेवी आणि लक्ष्मी परिस्थितीला ताठ मानेने सामोर्‍या गेल्या. तर इतर स्त्रियांनी काही चूक नसतानाही मान खाली घालून पातिव्रत्याची परीक्षा दिली.

पातिव्रत्याची परीक्षा घ्यायला आणि शिक्षा फर्मावायला पुढे झाले, नवरा, बाप, मुलगा, सासरा, दीर, भाऊ, सावकार राजा, श्रीकृष्ण, ऋषी जमदग्नी, परशुराम, राजा दुष्यंत, देव जगन्नाथ-बलराम.

त्यांचा पुरूषी अहंकार, प्रतिष्ठा, तिरसट स्वभाव माणुसकीशून्य वर्तन, संताप, धनदौलतीची अभिलाषा यावर लेखिकेने नेमके बोट ठेवले आहे. पातिव्रत्याची कल्पनाही, खाजगी संपत्ती, आणि आपण मिळवलेल्या संपत्तीचा उपभोग आपल्याच रक्ताच्या वारसाला घ्यायला मिळावा ही तीव्र इच्छा याच्याशी जोडली आहे, हामुद्दा लेखिकेने पुसटसा मनोगतात मांडला आहे. तो अधिक ठळक करणे आवश्यक होते.

स्त्री पुरूष समतेच्या दृष्टिकोनातून साहित्य कसे तपासले हे समजण्यासाठी हे पुस्तक महत्वाचे आहे.

भारतीय घटनेने सांगितलेली- समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन ही मूल्ये रूजायची असतील तर, तसे वाङ्मय निर्माण झाले पाहिजे; तसेच उपलब्ध वाङ्मयाची या मूल्यांच्या संदर्भात चिकित्सा होणे आवश्यक आहे. जुनाट मूल्यांचे कुसंस्कार करणार्‍या ऐतिहासिक कथा, पुराणकथा, लोककथा नवा भारत कसा घडवणार? समीक्षा कशी करावी हे समजण्यासाठीही हे पुस्तक अभ्यासावे.

अनिल चव्हाण

मोबा.9764147483

पुस्तकाचे नाव - स्त्री आणि तिचे पातिव्रत्य
(समीक्षणात्मक विवेचन)
लेखिका - नीलम माणगावे, जयसिंगपूर,
फोन(02322) 225782
प्रकाशक - ऋचा प्रकाशन, 9, गजानननगर, नागपूर. 15
मूल्य - 180 रू., पाने-172