Categories
मानसमित्र

स्वप्ने पडतात आणि ती खरी ठरतात….?

फेब्रुवारी – २०१४

वर्षानुवर्षे ही समजूत चालत आली आहे की स्वप्ने खरी ठरतात. भविष्यात घडणार्‍या घटना या अनेकजणांना स्वप्नातून अगोदरच माहिती देतात. भारतात तर या स्वप्नांविषयी अनेक कथा वर्षानुवर्षेसतत सांगितल्या जातात. ‘स्वप्नशकुन’ नावाचे प्रकरणच ज्योतिष ग्रंथांतून वाचायला मिळते. त्यामुळे स्वप्नाळूंना तर ‘शास्त्रच सांगते’ तर आपले बरोबरच आहे असे वाटत असते.

खरेच; स्वप्ने पडतात तेव्हा त्यांना काही अर्थ असतो? स्वप्नांना अर्थ नसता तर स्वप्ने पडली असती का? ती काय उगाचच पडतात असाही प्रश्न विचारला जातो.

ज्योतिषशास्त्रातले उदाहरण घेऊ या. स्वप्नात ‘झाडू’ किंवा ‘केरसुणी’ दिसणे यालाही खूप महत्व आहे. आम आदमी पार्टीचा धसका घेतलेल्यांना स्वप्नांत झाडू दिसत असेल तर त्याचाही अर्थ ज्योतिषी निश्चित सांगतील पण ज्योतिषशास्त्र म्हणते- ‘स्वप्नात झाडू दिसला तर शुभ असते. आपल्या मनावर आणि आयुष्यावर साचलेली धूळ ती झटकून टाकते! म्हणून झाडू उलटा करून आपल्या घराच्या दरवाज्याजवळ ठेवावा!

ख्रिस्तपूर्व 5000 वर्षापूर्वीपासून स्वप्नांना अर्थ असतो आणि शुभ व अशुभ स्वप्ने असतात असे सांगण्यात येत होते. मेसोपोटेमिया संस्कृतीत ‘चिखल टॅबलेट’ नावाच्या प्रकारातून त्यांचा अर्थ सांगितला जायचा. ग्रीक व रोमनांची अशी समजुत होती की, मृत व्यक्ती किंवा देवांकडून थेट आलेला संदेश म्हणजे स्वप्ने! ख्रिस्तपूर्व 900 ते 500 च्या दरम्यान जी उपनिषदे होती त्यातही स्वप्नांचे दोन प्रकार सांगितले होते. आपल्या इच्छा ज्या अतृप्त आहेत त्या स्वप्नांत दिसतात तसेच आत्म्याच्याद्वारे काही स्वप्ने पडतात असे या उपनिषदांतून सांगितले गेले होते. ग्रीकांमध्ये स्वप्नांचा एक देव देखील होता. त्याचे नाव आहे ‘मॉर्फीयस्’ जे त्याच्या देवळांत येऊन झोपतात त्यांना तो धोक्यांचे इशारा स्वप्नाद्वारे देत असे!

ख्रिश्चन धर्मातील सर्वात प्रसिद्ध स्वप्न म्हणजे पृथ्वीवरून स्वर्गात शिडी दिसणे! याला ‘जेकबच्या शिडीचे स्वप्न’ म्हटले जाते.

स्वप्नांचा अभ्यास करणारे शास्त्र नंतर उदयास आले ज्यास ओनिरोलॉजी म्हणतात.

स्वप्न म्हणजे झोपेच्या एका विशिष्ट टप्प्यांत एका पाठोपाठ चित्रे, कल्पना, भावना व संवेदना यांची जाणीव होणे होय.

झोपेचा हा टप्पा म्हणजे भरभर डोळ्यांची हालचाल जेव्हा झोपेत होते तो टप्पा ज्यास ‘रॅपिड आय मुव्हमेंट स्टेज’ म्हणतात.

स्वप्ने काही सेकंदापासून 20 मिनिटांपर्यंत टिकतात. सर्वसाधारणपणे प्रत्येकांस सरासरीने 3 ते 5 स्वप्ने दर रात्री पडतात. सरासरीने 8 तासांची झोप असणे योग्य असते या काळातील 2 तास भरभर डोळे हालचालींचा असतो व याच काळातील स्वप्ने स्मरणात राहू शकतात.

स्वप्नांविषयीचा अभ्यास आधुनिक मानसविज्ञानाने केला आहे. आजच्या काळात स्वप्नांना अर्थ असतो असे सांगणारी अनेक मंडळी स्वप्न शकुनांचा प्रचार करीत आहेतच. अमेरिकेत लॉरी क्वीनने यासाठी खास वेबसाईट उघडली आहे आणि ‘तुमच्या स्वप्नांतील 7 गुपिते’ नावाचे पुस्तक लिहून हा शकून-अपशकुनांचा खेळ चालू ठेवला आहे. नेटवर ‘ड्रीम डिक्शनरीज्’ आहेत. ड्रीम सॉफ्टवेअर्स आहेत. तुम्ही-आम्ही ही सॉफ्टवेअर्स डाऊनलोड करून घेऊ शकतो. त्यात हजारो स्वप्नांचा ‘डाटा’ आहे. जो आपल्या स्वप्नांचा अर्थ सांगतो!

भारत, द.कोरिया आणि अमेरिका या तीन देशांत घेतलेल्या सर्वेक्षणानुसार 56% ते 74% लोकांना असे वाटते की, स्वप्नांमुळे मनात दडलेली खरी सत्ये उघडकीस येतात. ‘न्यूजवीक’ या साप्ताहिकाने घेतलेल्या एका मत सर्वेक्षणानुसार 43% अमेरिकनांचे असे मत आहे की अतृप्त इच्छा स्वप्नांत उतरतात. म्हणजे जाणतेपणी जे अर्थ आपण आपल्या व्यवहारांचे काढू त्यापेक्षा स्वप्नांचे अर्थ खात्रीशीर असतात असे या लोकांना वाटते आहे.

स्वप्नांच्या अशा अनेक डिक्शनर्‍या वेबसाईटस्वर उपलब्ध आहेत. त्यात भन्नाट मते आढळतात. ‘जर तुम्ही शेवया खात असल्याचे स्वप्न तुम्हाला पडले तर त्याचा अर्थ तुमचे काहीतरी नुकसान होणार आहे’ असे वाट्टेल ते या साईट्सवर सापडेल. उदा.ड्रीम सेंट्रल ची डिक्शनरी, हायस्पीडडिक्शनरी ऑफ ड्रीम्स वगैरे.

स्वप्नांना अर्थ असतो यासाठी मानसतज्ञ फ्रॉईडची साक्ष नेहमीच काढली जाते. मनोविश्लेषणात स्वप्नांना विशेष स्थान फ्रॉईडने दिले होते. जरी स्वप्नांचा आपण नीट अर्थ काढला तर त्याचा फायदा स्वप्नार्थीच्या मनाच्या तळापर्यंत जाण्यास होतो असे फ्रॉईड पूर्व परंपरावाद्यांचे म्हणणे होते. या बाबतीत फ्रॉईड काय म्हणतो हे समजून घेतले पाहिजे. स्वप्ने म्हणजे ‘व्हाया रेजिया’ होय असे तो म्हणे. म्हणजेच, मनाच्या अंतरंगात जाणारा राजमार्ग म्हणजे स्वप्न. 1897 मधील एका पत्रात फ्रॉईड म्हणतो, ‘मनोविकारांची मानसिकता ज्या कुपीत दडलेली असते ती कुपी म्हणजे स्वप्ने होत.’ स्वप्नावस्थेत इगो हा सुस्तावतो. त्यामुळे ‘इद’ची कुचंबणा होते व तो जाणीवांचे दरवाजे ठोठावू लागतो? इथे इगो म्हणजे, वास्तवाचा सामना करणारा व्यक्तीमत्वाचा एक भाग आणि इद म्हणजे आपल्या व्यक्तीमत्वाच्या लैंगिक आणि आक्रमक प्रेरणा.

मनोविश्लेषक या स्वप्नांच्या पलीकडे जाऊन त्यांचा अर्थ शोधतो. वरवर दिसणारे स्वप्न(मॅनीफस्ट कंटेंट) हे दिसते त्याही पेक्षा खूप गहन अर्थ सांगणारे(लेटंट कंटेंट) असते असे फ्रॉईडीयन्स मनोविश्लेषकांचे म्हणणे असते. उदाहरणार्थ जर स्वप्नात राक्षस दिसला(वरवरचा अर्थ) तर त्याचा अर्थ असा की, त्याच्या बॉसचा सर्वात जास्त धोका त्याला आहे(गहन अर्थ). आता अर्थ काहीही काढता येतो हे मनोविश्लेषक लक्षात घेत नाहीत.

फ्रॉईडचे म्हणणे एका अर्थाने बरोबर होते. तो स्वप्नांना ‘दिवसाचा गाळ’ म्हणायचा. दिवसाचा गाळ म्हणजे, आपल्या आयुष्यातील बर्‍याच गोष्टी आपण साठवून ठेवलेल्या असतात. ज्या रात्री स्वप्न पडते त्या दिवशी किंवा त्या आदल्या दिवशी ज्या गोष्टी घडलेल्या असतात त्या स्वप्नात उतरतात.

पण फ्रॉईडचे म्हणणे चुकले ते नेमके स्वप्नांचा अर्थ काढण्याच्या बाबतीत. 1900 साली त्याने ‘स्वप्नांचा अर्थ’ नावाचे पुस्तक लिहिले. यात त्याने स्वप्नांचे लिहिलेले अर्थ चुकीचे ठरले आहेत. उदाहरणार्थ, डोक्यावर घातलेल्या हॅटची एक बाजू खाली व दुसरी बाजू वर दुमडलेली असेल तर ते पुरूष लिंगाचे प्रतिक तिच्या मनात आहे असे समजावे. एवढेच नव्हे तर फ्रॉईड म्हणतो की, अरूंद जागा, कुलुपं लावलेले दरवाजे उघडणे याचा अर्थ लैंगिक क्रियाविषयक होय. केस कापणे, दात पडणे, डोके उडवून टाकणे, म्हणजे लिंग काढून टाकणे होय असे फ्रॉईड म्हणतो. यामुळेच स्वप्नांचे अर्थ सांगणार्‍यांनी बाजार मांडला. त्याचा व्यापार करताना फ्रॉईडचा वापर केला जातो. पण मुळात फ्रॉईडचेच दावे खोटे ठरल्याने त्यांच्या समर्थनाला काही अर्थ उरत नाही.

आधुनिक विज्ञानाने हे दाखवून दिले आहे की, स्वप्ने ही रोज घडणार्‍या घटनांची झोपेच्या गाढ अवस्थेत पडलेले प्रतिबिंबे होत. जेव्हा गाढ अवस्थेत आपण असतो तेव्हा मेंदूचे कार्य अनियंत्रित किंवा सैल बनते. त्यामुळे मेंदूतील विविध भागांतील देवाण-घेवाणीत स्वैरपणा निर्माण होतो. यामुळे ज्या गोष्टींचा विचार आपण झोपेत करू इच्छितो तो विचार स्वैर होतो. आणि मग वेगवेगळ्या कल्पना, चित्रे, अमूर्त गोष्टी किंवा चित्रविचित्र आभास तयार होतात. ज्यांत कोणताही अर्थ नसतो किंवा साधा एकसंघपणाही नसतो. म्हणून या विचित्र चित्रे किंवा दृष्यांमुळे आपणांस भीती वाटते. आणि मग काही तरी अघटीत घडेल असे आपणांस वाटले तर आपण स्वप्न ज्योतिषांकडे धावतो.

खरे तर ही सामान्य मानसिक क्रिया आहे. स्वप्ने कितीही पडली तरी काहीही बिघडत नाही. उलट अशी स्वप्ने आपण ‘एंजॉय’ करायला हवीत. म्हणजे आपल्या सैल मेंदूची एक भन्नाट सफर असेच आपण मानावे आणि ही सैर आपण आनंदाने करावी. हॉर्वर्डस् लॅबोरेटरी ऑफ न्युरोफिजिओलॉजी मधील जे.अ‍ॅलन हॉबसन् आणि रॉबर्ट मॅककार्लेयांनी याबातीत सखोल संशोधन करून ‘अ‍ॅक्टिव्हेशन सिंथेसिस थेअरी’ मांडली आहे. यांस वैज्ञानिक पाठिंबाही मिळाला आहे. त्यामुळेच, फ्रॉईडची मते आता जमेस धरण्याचे कारण उरलेले नाही.

हॉबसन-मॅककार्लेंनी हे दाखवून दिलेय की, गाढ झोपेच्या अवस्थेत(आर.ई.एम. काळ-90 मिनिटांचा असतो.) मेंदूतील अनेक रसायने सैलपणामुळे वेगवेगळ्या तर्‍हेने कार्य करतात आणि त्यातून एक वेगळेच रसायन तयार होऊन रंगीबेरंगी ड्रामा तयार होतो. अगदी वैज्ञानिक भाषेत सांगायचे म्हटले तर-

अ‍ॅसिटील कोलीन नावाचे रसायन भावनांच्या केंद्रांना अती उत्तेजित करते. त्यामुळे सेरोटोनीन व नॉरएपिनेफ्रीन ही रसायने कमी पातळीवर जातात. त्याचा परिणाम असा होतो की, तर्कबुद्धी, स्मृती आणि व्यवधान यावर नियंत्रण ठेवणारे मेंदूतील भाग ढिले पडतात. याच वेळी मेंदूच्या पायाजवळ असणार्‍या पॉन्स या भागामुळे मेंदूतील जमा झालेली दिवसभरातील माहिती तुकड्या तुकड्यात इकडे तिकडे जाऊ लागते आणि ‘दे धमाल भन्नाट’ स्वप्नांचा जन्म होतो. यात वेगवान आणि वाढ झालेल्या भावनांचा मोठा हातभार असतो. आणि भावनांच्या केंद्राचे हे अतिकार्य मेंदूच्या विचार करणार्‍या भागांना थंडावून टाकल्याने ‘येडपट, वेडीवाकडी’ स्वप्ने आपण रात्री बघतो आणि दुसर्‍या दिवशी डोक्याला हात लावून त्यावर विचार करत बसतो!!

खरे तर हे विज्ञान बघता, स्वप्नांना काहीच अर्थ नसतो. फ्रॉईडने स्वप्नांविषयी अभ्यास केला म्हणून त्यास काही गुण द्यावेच लागतील. पण स्वप्नांचा अर्थ वगैरे काढण्याच्या भानगडीत कुणी पडू नये. जो कोणी असा अर्थ काढत असेल तर त्यांस भानगडबाज म्हणावे आणि त्यांस त्याच्या स्वप्नांवर सोडून द्यावे.

नियंत्रण नसलेल्या मेंदूतील काही काळ बिघडलेल्या कार्याचे रूपांतर स्वप्नांत होत असेल तर आपण बिघडायचे कारण नाही. एवढे लक्षात ठेवले तरी पुरे.

सो गायज्, एंजॉय ड्रीम्स! विश यु हॅप्पी ड्रीमस्…..

डॉ. प्रदीप पाटील

मोबा.9890844468