Categories
उपक्रम

गडहिंग्लज अंनिसची व्यसनमुक्ती रॅली

फेब्रुवारी – २०१३

हॅपी न्यू इयर, नको दारू! नको बिअर

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडहिंग्लजच्या वतीने व्यसनमुक्ती अभियानांतर्गत प्रबोधन रॅली रविवार दिनांक 30 डिसेंबर 2012 रोजी गडहिंग्लज(जि.कोल्हापूर) शहरातून काढण्यात आली. व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन अं.नि.स. जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.पी.एम.भोईटे व तालुका कार्याध्यक्ष प्रा.पी.डी.पाटील व बाळासाहेब मुल्ला यांनी केले. या रॅलीत समाजवादी प्रबोधिनी, आपले फौंडेशन, जिजाऊ ब्रिगेड, सखी महिला मंडळ, दारू बंदी कृती समिती, गार्डन ग्रुप आणि शिवशाहू अध्यापक विद्यालय यांनी सहभाग घेतला. तहसीलदार अनिल कारंडे यांच्या हस्ते रॅलीचा प्रारंभ व्यसनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दारूच्या बाटल्या व सिगारेटच्या पाकिटांचा हार घालून करण्यात आला. रॅलीत महिला व महाविद्यालयातील युवतींचा सहभाग लक्षवेधी होता.

            म.दु.श्रेष्ठी विद्यालयापासून रॅलीला सुरवात झाली. प्रमुख मार्गावरून रॅली दसरा चौकात आल्यानंतर व्यसनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन नगराध्यक्षा सौ.मंजुषा कदम यांच्या हस्ते करण्यात आला. रॅलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय प्रमुख राजेंद्र गडयाण्णावर, गडहिंग्लज तालुका शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष व अंनिसचे तालुका अध्यक्ष बी.जी.काटे, गडहिंग्लज तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रा.शिवाजीराव होडगे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा अलका भोईटे, उपाध्यक्षा सौ.सुवर्णलता गोईलकर, तालुका अध्यक्षा सौ.वसुंधरा सावंत, समाजवादी प्रबोधिनी महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रा.अनुराधा मगदूम, लायन्स क्लब अध्यक्ष व शिवशाहू अध्यापक विद्यालयाचे चेअरमन सुरज माने, सखी महिला मंडळ अध्यक्षा सौ.अरूणा शिंदे, डॉ.सुधाकर गोकाककर, डॉ.एस.के.नेर्ले, प्रा.साताप्पा कांबळे, प्रा.गणराज साळोंखे, सौ.उज्वला दळवी, प्रा.अनिता चौगुले, प्रा.अशपाक मकानदार, प्रा.आप्पासाहेब कमलाकर, सर्पमित्र महबूब सनदी, प्रा.अनिल मगर, प्रा.सुभाष कोरे, प्रा.संतोष कांबळे, प्रा.रमेश तिबिले, सौ.छाया वडगावे, सौ.सुमन सावंत, डॉ.किरण खोराटे इत्यादीसह शिवशाहू डी.एड.कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते.

            ढोल ताशांचा आवाज अन् घोषणांमुळे रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. रॅलीतील विद्यार्थिनींनी लक्षवेधी फलक उभारले होते. हॅप्पी न्यू इअर नको दारू नको बिअर, दारू सिगारेट हाय हाय! दारू पिणार तो लवकर मरणार, गुटखा खाणार तो लवकर संपणार अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. व्यसनाच्या पुतळ्याला महागाई, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, व्यसनाधिनता इत्यादी लेबल लावले होते. महिलांनी पुतळ्याला जोडे मारल्यानंतर पुतळ्याचे दहन करण्यात आले. शेवटी सर्वांना मसाला दूध वाटप करून रॅलीची सांगता केली. द दारूचा नसून द दुधाचा असा संदेश 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सर्वांना देण्यात आला.

-प्रा.पी.एम.भोईटे, गडहिंग्लज, जि.कोल्हापूर.