Categories
अभियान

महाराष्ट्र विवेकवाहिनी तर्फे चमत्कार सत्यशोधन अभियानाची बांदा(सिंधुदूर्ग) येथून सुरवात

फेब्रुवारी – २०१३

महाराष्ट्र विवेकवाहिनी तर्फे चमत्कार सत्यशोधन अभियानाची सुरवात बांदा ते चांदा अशी गुरूवार दि.10 जानेवारी 2013 पासून सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बांदा या तालुक्यातील गोगटे वाळके महाविद्यालयातून करण्यात आली. एकूण तीन दिवशीय कोकण अभियानात एकूण 13 कार्यक्रम महाविद्यालयांमध्ये सादर करण्यात आले. या संपूर्ण अभियानात पुणे येथील म.अं.नि.स.चे राज्य संघटना सचिव मिलिंद देशमुख, सातार्‍याचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रशांत पोतदार, पाल(ता.कराड, जि.सातारा) येथील किशोर धरपडे, सातार्‍याचे तरूण कार्यकर्ते वसिम बागवान यांच्या तीन टीम तयार केल्या गेल्या. या तीनही टिमनी संपूर्ण सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नवनिर्माण महाविद्यालय दोडामार्ग, गोगटे वाळके महाविद्यालय बांदा, पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी, संत राऊळ महाविद्यालय कुडाळ, बॅ.नाथ पै अध्यापक महाविद्यालय कुडाळ, पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी हुमरमळा, आनंदीबाई रावराणे महाविद्यालय वैभववाडी, बी.एड.कॉलेज-तोंडवली, कला व वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाट(ता.कणकवली), पार्वती राणी विद्यालय सावंतवाडी, जि.प.प्राथ.शाळा सावंतवाडी तसेच एन.एस.एस.कॅम्प कोलगाव(खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी) या सर्व ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोन व चमत्कार सत्यशोधन या व्याख्यानाचे आयोजन चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांसह केले.

            सर्वच ठिकाणी कार्यक्रमाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा प्रतिसाद हा उत्स्फूर्त व थक्क करणारा होता. सर्वच चमत्कार त्यांना नवीन व नाविन्यपूर्ण होते. कार्यक्रमानंतर विवेकवाहिनीत प्रत्यक्ष सहभाग घेऊ इच्छिणार्‍यांचे एक दिवशीय शिबीर रविवार दि.13 जानेवारी रोजी मुक्तांगण आंबेडकर पुतळ्यासमोर घेण्यात आले. याला स्वेच्छेने 11 विद्यार्थी सहभागी झाले. या शिबीराला मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर पूर्णवेळ उपस्थित होते.

            या संपूर्ण मोहिमेसाठी प्राचार्य उमेश गोळवणकर, प्राचार्य सावंत व अ‍ॅड.देवदत्त परूळेकर यांनी परिश्रम घेतले. पुढील टप्प्यात या मोहिमेतून जे 11 विद्यार्थी विवेकवाहिनीत प्रत्यक्ष कृतीशील काम करू इच्छितात त्यांचे एक दिवशीय सखोल प्रशिक्षण घेण्याचा निर्णय झाला. हे अभियान पुढे नागपूर जिल्ह्यात राबविले जाणार आहे.

-प्रशांत पोतदार, सातारा.