Categories
कार्याध्यक्षांची डायरी

अंधश्रद्धा निर्मूलन वाटचालीचा अन्वयार्थ-भाग 2

फेब्रुवारी – २०१३
अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्यापक समाज परिवर्तनाशी नाते

            मानवी प्रगतीमध्ये अंधश्रद्धेचे असंख्य अडथळे आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोणाचा  प्रकाशझोत मानवाला सापडला आणि मानवी प्रगतीचा मार्ग प्रकाशमान झाला. सभोवतालच्या घटनांकडे पाहण्याची एक नवीन पद्धत वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे माणसाला प्रथमच समजली. प्रत्येक कार्यामागे काहीतरी कारण असते; ते कारण मानवी बुद्धीला  समजू शकते, माणसाला आज सर्वच कारणे समजली नाहीत तरी ती कशी समजतील याचा मार्ग समजतो आणि यथार्थ ज्ञान प्राप्तीचा हा सर्वात खात्रीलायक मार्ग आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे काम हे समाजमनावर वैज्ञानिक दृष्टिकोनाचे रोपण करण्याआधी मानवी मनातील अंधश्रद्धेचा कचरा काढून टाकण्याचे आहे आणि त्यामुळे  ते पायाभूत आहे.  महाराष्ट्राच्या डाव्या-पुरोगामी राजकारणातील एका जेष्ठ नेत्यांनी अंनिसचे वर्णन वा मूल्यमापन करताना म्हटले आहे की, “अंनिसचे काम हे पुरोगामी राजकारणासाठी सुपिक भूमी तयार करण्यासारखे आहे.  त्यामुळे त्याची स्वतंत्रता व वैशिष्ट्यपूर्णता आपण जपायला हवी.”

विदर्भातील एका जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्याने गुजरातमधील हिंसक दंगली व कत्लेआमनंतर केलेल्या अभ्यासात म्हटले होते की, “मूलतत्त्ववाद्यांना गुजरातनंतर प्रयोगशाळा म्हणून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दंगली घडवून आणण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत याचे कारण म्हणजे महाराष्ट्राला जसा पुरोगामीत्वाचा, संत-समाजसुधारकांचा  बलदंड  वारसा असण्यात आहे तसेच महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनसारखी चळवळ सक्रीय आहे जी लोकांना प्रश्न विचारायला व तपासायला प्रवृत्त करते यामध्येही आहे.” पिढ्यानपिढ्यान जात वास्तवाची धग सोसणार्‍या मोठ्या जनसमुहाला आपल्या दलित असण्यामुळे अन्यायाची  जाण झाल्यावर आधुनिक समाज उभारणीत अर्धशतकापूर्वी त्यांच्यामधून दलित मुक्तीचा  एल्गार व्यक्त व्हायला सुरुवात झाली. त्यातून निर्माण झालेल्या अभिव्यक्तीमुळे आणि संघटीत संघर्षामुळे आता विकासाच्या मुख्य प्रवाहाचा भाग होण्याच्या दिशेने समाजाची वाटचाल सुरु झाली आहे. तसेच आज सगळ्यात पिडीत-शोषीत अन्यायग्रस्त अशा भटक्या-विमुक्तांच्या मुक्तीची पहाट केंव्हा व कशी उजाडेल? हा विचार सतत अस्वस्थ  करीत असतो. ते  घडविण्यासाठी देखिल  बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा’ या मार्गाने वाटचाल केल्याशिवाय आपल्यावरील अन्यायाची जाणीव परिस्थिती बदलासाठी निर्माण होणार  नाही.  त्यासाठी व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचे धाडस, संघर्ष करण्यासाठी संघटीत होण्याची दूर्दम्य इच्छाशक्ती आणि आपल्या हिताचा, विकासाचा विचार करून कृतीशील होण्यासाठीची सम्यकता व नम्रता वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मूल्य आशयातून प्राप्त होऊ शकते.

अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची आवश्यकता आहे असे आम्ही सांगत असतो. मानव मुक्तीच्या, शोषणमुक्त समाज उभारणीच्या वाटचालीमध्ये देखिल ह्याच करुणा व आपुलकीची आवश्यकता जाणवते. निसर्गातील कुठल्याही बाबीचा पुरावा तपासण्याची पद्धत म्हणून माणसाने विकसीत केलेला वैज्ञानिक दृष्टिकोन पूर्वग्रहदुषित मानसिकता सोडण्याचे, पशुत्वाचे लक्षणे असलेले काम-क्रोध-मद-मोह-मत्सर हे मानवी अवगूण टाकून देण्याचा संस्कार देतो. त्याचवेळी निकोप सम्यकता, अनिर्बंध स्वायत्तता, प्राणीमात्राच्या दुबळेपणातही निर्भयता आणि माणूस असल्यामुळे बुद्धीचातुर्यातही नम्रता अंगिकारण्याचा मूल्यआशय आपल्यात निर्माण करीत असतो. त्यामुळे आपल्या भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारे स्वातंत्र्य, समता, बंधुता देणारी सार्वभौम, प्रजासत्ताक, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद प्रत्यक्षात जनमानसात रुजविण्यासाठी आपण भारतीय नागरीकत्वाचे कर्तव्य म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन हा विचार करण्याचा मार्ग, कृती करण्याचा मार्ग, सत्य शोधण्याची पद्धत, मानवी जीवनधारणा  आणि माणसाच्या स्वातंत्र्याचा प्रेरणास्त्रोत म्हणून स्विकारलेला आहे.

भारत 2020 दशकात महासत्ता होऊ शकतो हे स्वप्न आज आपण बघत आहोत.  महासत्ता होण्यासाठी आवश्यक भौतिक विकासाचे निकष महत्त्वाचे आहेत की सन्माननीय मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक घटकांच्या पूर्ततेला प्राधान्य द्यायचे याचा सारासार विचार राज्यकर्ते, धोरणकर्त्यांकडून होताना दिसत नाही. त्याचप्रमाणे आपल्या देशासमोरील  आणि जागतिक मानव समुहापुढे देखील आज उपस्थित असलेले अनेक जटील प्रश्न वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार न केल्यामुळे आलेल्या आकलनाच्या परिपक्वतेच्या अभावातून निर्माण झाले आहेत असे म्हणावेसे वाटते. म्हणून अशा मानव उत्थानाच्या व्यापकत्वाला  गवसणी घालण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगिकार व प्रचार-प्रसार अत्यंत आवश्यक ठरतो. व्यापक समाज परिवर्तनाशी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे हेच जीवाभावाचे नाते आहे असे म्हणता येईल. म्हणून आम्ही असे मानतो की, ‘अंधश्रद्धा निर्मूलन एके अंधश्रद्धा निर्मूलन केल्याने अंधश्रद्धा निर्मूलन होणार नाही’ तर समाजातील   आज अस्तित्वात असणारे सर्वच थरातील प्रश्न सोडवणुकीचे मार्ग आणि पद्धती या एकमेकांच्या सहकार्याने जोपर्यंत कार्यरत होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रश्नाच्या  सोडवणुकीचे अंतिम उत्तर मिळणे कठीण आहे.  त्या भूमिकेतूनच सर्व व्यापक परिवर्तनाचा आपण एक अविभाज्य भाग आहोत असेच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ मानते. असे असतानाही परिवर्तनवादी विचार प्रवाहात आज विद्वेषी अस्मितांच्या आधारावर क्रांतीकारकत्व जोपासणार्‍या काही पुरोगामी मित्रांच्या वर्तनातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीविषयी आकसाने का कुणास ठाऊक पण त्यांची अहंगंडाची, न्यूनगंडांची कि भयगंडांची  भावना आणि वर्तन असते असा अनुभव आम्ही घेत असतो.

अविनाश पाटील